Pancreatic Cancer Pill Treatment Daraxonrasib : भारतासह जगभरात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठिकठिकाणी संशोधन सुरू आहे. गेल्या महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या काही प्रकारांवर अवघ्या सात मिनिटात उपचार करणारे एक इंजेक्शन भारतात उपलब्ध झाले होते. त्यानंतर आता स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांचे आयुष्य दुप्पट वाढवणारी एक गोळी बाजारात आली आहे. ‘डाराक्सोनरासिब’ असे या गोळीचे नाव असून वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला कर्करोग उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवू शकणारे औषध म्हणून संबोधले आहे, त्याविषयी…
स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे काय?
कर्करोगाच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी स्वादुपिंडाचा कर्करोग हा सर्वाधिक रुग्णांमध्ये आढळून येतो. पश्चिमेकडील देशांच्या तुलनेत भारतात या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीरातील ‘स्वादुपिंड’ या अवयवामध्ये पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे हा कर्करोग उद्भवतो. स्वादुपिंड हा अवयव आपल्या पोटाच्या खालच्या भागाच्या अगदी मागे असतो. अन्नाच्या पचनामध्ये आणि रक्तातील साखरेच्या पातळीच्या नियंत्रणात या अवयवाची भूमिका खूपच महत्त्वाची असते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षण सुरुवातीला सहसा दिसून येत नसल्याने त्याला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. पोटदुखी होऊन वेदना पाठ किंवा शरीराच्या बाजूच्या भागापर्यंत पसरणे, भूक कमी होत जाणे, अचानक वजन घटणे, त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणे, विष्ठेचा रंग फिकट होणे किंवा ती पाण्यावर तरंगणे, तसेच लघवीचा रंग गडद तपकिरी होणे, हात किंवा पायांमध्ये वेदना आणि सूज येणे, सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, ही स्वादुपिंडाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
हा कर्करोग इतका धोकादायक का?
स्वादुपिंडाचा कर्करोग अत्यंत धोकादायक मानला जातो. कारण- बहुतेक वेळा तो सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येत नाही. या आजाराची लक्षणे कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरल्यानंतरच स्पष्टपणे दिसू लागतात. त्यामुळे निदान होईपर्यंत आजार बऱ्याचदा प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो. याशिवाय, या कर्करोगासाठी उपलब्ध उपचारांचे पर्यायही तुलनेने मर्यादित आहेत. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांमध्ये अनेक आव्हाने निर्माण होतात. भारतात दरवर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे अंदाजे १४,००० ते १५,००० नवीन रुग्ण आढळून येतात. एकूण कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण साधारणपणे १ ते १.५ टक्के एवढे आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हा कर्करोग होण्याचे प्रमाण थोडे जास्त आढळून येते. त्यातील तब्बल ७० ते ८० टक्के रुग्ण हे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात डॉक्टरांकडे पोहोचतात आणि त्यामुळेच या आजाराचा मृत्यूदर जास्त आहे. अशा परिस्थितीत नव्या औषधांमुळे आणि उपचारपद्धतींमुळे रुग्णांसाठी आशेचे नवे किरण निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
अभ्यासातून नेमके काय समोर आले?
स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील उपचारांसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘डाराक्सोनरासिब’ (Daraxonrasib) या नव्या गोळीच्या क्लिनिकल चाचण्यांचे अत्यंत सकारात्मक परिणाम समोर आले. त्याबाबतचे संशोधन ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या प्रसिद्ध नियतकालिकात नुकतेच प्रकाशित करण्यात आले. शिकागो येथे झालेल्या अमेरिकन सोसायटी फॉर क्लिनिकल ऑन्कोलॉजीच्या वार्षिक बैठकीत त्याचे सादरीकरण झाले. या अभ्यासाला ‘रिव्होल्यूशन मेडिसिन्स’ यांचे आर्थिक पाठबळ मिळाले होते. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. झेव्ह वेनबर्ग यांनीही संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, या संशोधनात स्वादुपिंडाचा कर्करोग शरीराच्या इतर भागांत पसरलेल्या ५०० गंभीर रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासातून असे समोर आले की, डाराक्सोनरासिब घेणाऱ्या रुग्णांचे सरासरी आयुर्मान १३.२ महिने होते. त्याउलट केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांचे सरासरी आयुर्मान केवळ ६.६ ते ६.७ महिने नोंदवले गेले. म्हणजेच या औषधामुळे रुग्णांच्या जगण्याचा कालावधी जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले.
हे औषध नेमके कसे काम करते?
तज्ज्ञांच्या मते, स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये एक विशिष्ट जनुकीय बदल आढळून येतो. हा बदल संबंधित रुग्णाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशींची वेगाने वाढवण्यास कारणीभूत ठरतो. डाराक्सोनरासिब हे औषध या बदललेल्या प्रथिनाला लक्ष्य करून त्याच्या जैविक प्रक्रियेला रोखते. परिणामी ट्युमरची वाढ मंदावण्यास मोठी मदत होते. या संशोधनात सहभागी असलेल्या डॉ. झेव वेनबर्ग यांनी सांगितले की- जरी हे औषध कर्करोग पूर्णपणे मुळापासून बरे करत नसले, तरी वैद्यकीय विज्ञानाच्या दृष्टीने हे एक खूप मोठे पाऊल आहे. त्यांच्या मते, डाराक्सोनरासिब घेतलेल्या रुग्णांमध्ये ट्युमरचा आकार कमी झाल्याचे दिसून आले. तसेच रुग्णांनी वेदना कमी झाल्याचे आणि जीवनमानात सुधारणा झाल्याचेही सांगितले. या गोळीचे काही सामान्य दुष्परिणामही दिसून आले असून त्यामध्ये त्वचेवर तीव्र पुरळ येणे आणि तोंडात फोड येणे यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, स्वादुपिंडाच्या कर्करोगावर प्रभावी उपचारासाठी या औषधाचे निष्कर्ष आशादायक असले, तरी त्याच्या दीर्घकालीन सुरक्षिततेबाबत पुढील संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.
जगभरात कर्करोगाची किती रुग्ण?
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत यंदा सुमारे ६७,००० नवीन स्वादुपिंडाच्या कर्करोग रुग्णांचे निदान होण्याचा अंदाज आहे. या आजारामुळे यंदा ५२,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या कर्करोगाचे सुरुवातीला निदान होणे कठीण असल्याने रुग्णाचा पाच वर्षे जगण्याचा सरासरी दर केवळ १३ टक्के एवढाच आहे. जगभरातही स्वादुपिंडाच्या कर्करोगाची रुग्णे वाढतच असून दरवर्षी साधारणपणे ५ लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होते. जागतिक स्तरावर कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग हा सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा आजार आहे. दरवर्षी जवळपास ४,७०,००० पेक्षा जास्त लोकांचा या आजाराने मृत्यू होतो. त्यामध्ये युरोप आणि उत्तर अमेरिका यांसारख्या विकसित देशांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण आशिया किंवा आफ्रिकेच्या तुलनेत जास्त आढळून येते. बदलती जीवनशैली, प्रक्रिया केलेले अन्न, धूम्रपान आणि लठ्ठपणा ही यामागची मुख्य कारणे मानली जातात. त्यामुळेच डाराक्सोनरासिब या गोळीमुळे जगभरातील लाखो रुग्णांना आता मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
