राजधानी दिल्लीत एका १७ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही संतापजनक घटना शहरातील स्वरुपनगर परिसरात ११ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून त्यातील तिघेजण अल्पवयीन असल्याचे समजते. शिवम गणेश (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असल्याचे सांगितले जाते. त्याचे तीन साथीदार हे १६ ते १७ वर्ष वयोगटातील असल्याचे समोर आले. हत्येनंतर चारही आरोपींनी तरुणीचा मृतदेह एका शेतात फेकून दिला होता. घटनेच्या दोन दिवसांनी हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर दिल्लीला हादवणारी ही क्रूर घटना नेमकी कशी घडली? पोलिसांनी आरोपींना नेमके कसे पकडले? त्याविषयी जाणून घेऊ…
बलात्कार आणि हत्याकांडाची घटना कशी घडली?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पीडित तरुणी तिच्या १७ वर्षीय मित्राला भेटायला गेली होती. त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर जबदस्तीने लैंगिक अत्याचार केला. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने त्याच्या तीन मित्रांना फोनवरून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर चौघांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता आरोपींनी पीडितेला एका शेतात नेले आणि तिच्यावर चाकूने एकापाठोपाठ एक सहा वार केले. या घटनेत अंगावर गंभीर दुखापत झाल्यानंतर पीडितेचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपींनी एका झुडपात मृतदेह फेकून घटनास्थळावरून टेम्पोतून पळ काढला. यादरम्यान बलात्कार वाहनात झाला की शेतात, याचा तपास सुरू असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मृत तरुणीने आपले शिक्षण अर्धवट सोडले होते आणि काही वर्षांपूर्वी ती स्वरूप नगरमध्ये राहायला आली होती. आई-वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी पीडिता नोकरीच्या शोधात वेगळी राहत होती. त्यामुळेच कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली नव्हती. आमची मुलगी कामानिमित्त अनेकदा बाहेर जायची आणि काही दिवसांनी परत यायची, असे पीडितेच्या पालकांनी पोलिसांना सांगितले.
बलात्कार आणि हत्याकांडाचा छडा कसा लागला?
या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी स्वरुपनगर जवळील शेतात स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला. परिसरातील भटके कुत्रे या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पडून होता आणि चेहराही विद्रूप झाला होता. तसेच मृतदेहाचा उजवा हात शरीरापासून पूर्णपणे वेगळा झालेला होता. मृतदेह इतका सडला होता की- सुरुवातीला पोलिसांना तो महिलेचा आहे की पुरुषाचा हे ओळखणेही कठीण झाले होते. त्यावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या अनेक जखमा होत्या. वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित मृतदेह तरुणीचा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हत्या करण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कारही झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणातील एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ दोन दिवस झाले होते, तरी मृतदेह वेगाने कुजत होता. कदाचित तो उघड्यावर पडलेला असल्यामुळे असे झाले असावे. आम्हाला मृतदेहाचा चेहरा ओळखता येत नव्हता. वैद्यकीय अहवालात सदरील मृतदेह एका तरुणीचा असल्याचे समजले. संबंधित तरुणीवर बलात्कार झाला होता आणि तिच्या शरीरावर चाकूच्या आठ जखमाही आढळून आल्या होत्या.
पोलिसांनी आरोपींचा नेमका कसा घेतला शोध?
एका १७ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचे उघडकीस येताच दिल्लीत संतापाची लाट उसळली. जनतेचा रोष आणि राजकीय नेत्यांचा दबाव यामुळे हत्याकांडाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले. दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त यांनी पोलीस अधीक्षक रवींद्र अहलावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार केले. या पथकाने परिसरातील शनिवारी आणि रविवारी रात्रीचे तब्बल ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. पीडित तरुणी त्या शेतापर्यंत नेमकी कशी पोहोचली याचा तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. यादरम्यान गुन्हा घडल्याचा संशय असलेल्या वेळेदरम्यान घटनास्थळाजवळ एक टेम्पो संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना दिसला. अंधार असल्याने टेम्पोचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता; पण पोलिसांनी अथक चौकशी करून टेम्पोची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टेम्पोचा मार्ग तपासला आणि चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चालकाने खुलासा केला की, त्याचा १७ वर्षांचा धाकटा भाऊ हा टेम्पो वारंवार वापरत असे.
रातोरात शोधमोहीम आणि चौघांना अटक
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेम्पोच्या आत चार तरुण मुले असल्याचेही दिसून आले. या मुलांची ओळख पटवण्यात आली. मात्र, ते आपल्या घरातून फरार झाले होते. घटनेच्या दिवशी पीडित तरुणी चारही आरोपींसोबत टेम्पोतून प्रवास करत होती आणि ती चारही आरोपींना ओळखत होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील धागेदोरे आणि स्थानिक चौकशीतून मिळालेली माहिती एकत्र करून पोलिसांनी आरोपींच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग निश्चित केला, असे पोलीस उपायुक्त शोभित सक्सेना यांनी सांगितले. मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री संपूर्ण रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली. स्वरूप नगरमधील खड्डा कॉलनी येथून तो टेम्पो जप्त करण्यात आला. चालकाची चौकशी केल्यानंतर समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. रात्रभर चाललेल्या या मोहिमेत गुन्ह्यात सहभागी असलेल्या चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेले दोन चाकू आणि गुन्ह्याच्या वेळी आरोपींनी घातलेले कपडे जप्त करण्यात आले, असेही ते म्हणाले. या प्रकरणातील किमान तीन आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिल्याचे दोन पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
