इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. यातच इस्रायलने हमासच्या तीन प्रमुख चेहर्यांना ठार मारून हमासला मोठे धक्के दिले आहेत. मोहम्मद देईफ ठार झाल्याची माहिती नुकतीच इस्रायलने दिली. इस्रायलने गेल्या महिन्यात गाझा येथे केलेल्या हवाई हल्ल्यात हमासची लष्करी शाखा इज्ज अल-दिन अल-कासम ब्रिगेडचा प्रमुख मारला गेल्याचे सांगितले. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मानल्या जाणार्या मोहम्मद देईफला इस्रायलने अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला आहे. इतक्या प्रयत्नांतून वाचल्याने त्याला ‘द कॅट विथ नाईन लाईव्स’ असे टोपणनावही देण्यात आले होते. अखेर, मोहम्मद देईफला ठार मारण्यात इस्रायल यशस्वी झाला आहे. इराणमध्ये हमासचे राजकीय ब्युरो प्रमुख इस्माइल हानिया यांची हत्या केल्याच्या एक दिवसानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. परंतु, इस्त्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) मोहम्मद देईफला कसे ठार मारले? कोण होता मोहम्मद देईफ? जाणून घेऊ. 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायल डिफेन्स फोर्सने १३ जुलै रोजी दक्षिण गाझामधील एका कंपाउंडवर हवाई हल्ला केला होता. मोहम्मद देईफ आणि खान युनिस ब्रिगेडचा कमांडर राफा सलामेह दोघेही या हल्ल्यात ठार झाले. हमासवरील इस्रायलच्या लष्करी दबावामुळे मोहम्मद देईफला भूमिगत बोगद्यातून बाहेर पडणे भाग पडले, असे वृत्त 'टाईम्स ऑफ इस्रायल'ने दिले. बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर देईफने राफा सलामेहशी संबंध जोडला. तो अनेक आठवड्यांपासून कंपाऊंडमध्ये राहात होता. इस्रायलची लढाऊ विमाने हल्ला करण्यापूर्वी कंपाऊंडवर घिरट्या घालत होते. सैन्याने देईफ कंपाऊंडमध्ये असल्याची पुष्टी केली आणि त्यानंतर आयडीएफ विमानांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. काही मिनिटांत हवाई हल्ला सुरू झाला आणि या हवाई हल्ल्यात देईफसह त्याच्या साथीदारांचाही खात्मा करण्यात आला. इस्त्रायल डिफेन्स फोर्सने 'एक्स'वर हवाई हल्ल्याचे फुटेज पोस्ट केले. इस्रायलने गेल्या महिन्यात गाझा येथे केलेल्या हवाई हल्ल्यात हमासची लष्करी शाखा इज्ज अल-दिन अल-कासम ब्रिगेडचा प्रमुख मारला गेल्याचे सांगितले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स) हेही वाचा : भोपाळ गॅस दुर्घटनेतील घातक कचर्याची ४० वर्षांनंतर विल्हेवाट लावणार; विल्हेवाटीसाठी इतक्या वर्षांची प्रतीक्षा का करावी लागली? अल-मवासी कॅम्पवर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान ९० लोक मारले गेले. छावणीतील छायाचित्र आणि व्हिडीओंमध्ये सर्वत्र मृतदेह आणि इमारती नष्ट झाल्याचे दिसून आले. आयडीएफने गेल्या महिन्यात सलामेहच्या मृत्यूची घोषणा केली होती. परंतु, देईफच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली नव्हती. “इस्त्रायल डिफेन्स फोर्सने घोषणा केली की, १३ जुलै २०२४ रोजी आयडीएफ फायटर जेटने खान युनिसच्या परिसरात हल्ला केला आणि गुप्तचर यंत्रणेच्या मूल्यांकनानंतर मोहम्मद देईफ या हल्ल्यात मारला गेल्याची पुष्टी झाली आहे,” असे इस्रायलने आपल्या निवेदनात स्पष्ट केले. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा बदला "देईफने ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याची योजना आखली आणि अमलात आणली. या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमध्ये १२०० लोक मारले गेले होते आणि २५१ लोकांचे अपहरण करण्यात आले होते," असे आयडीएफने सांगितले. हमासने अद्याप देईफच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. हमासचे प्रवक्ते इज्जत अल-रिश्क यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ला सांगितले की, गटातील कोणत्याही नेत्याच्या मृत्यूची पुष्टी करणे किंवा नाकारणे हा हमासच्या लष्करी शाखेच्या नेतृत्वाचा विषय आहे. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमीची पुष्टी करणे शक्य नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, आयडीएफ आणि शिन बेट आणि त्यांचे प्रमुख यांच्या सहकार्यामुळे आणि समन्वयामुळे हे ऑपरेशन शक्य झाले आहे. ऑपरेशनच्या परिणामांवरून हे स्पष्ट होते की, हमास ही एक विघटनशील संघटना आहे आणि दहशतवाद्यांकडे आत्मसमर्पण किंवा मृत्यू हे दोनच पर्याय आहेत. "डिफेंस फोर्स हमास दहशतवाद्यांचा पाठलाग करेल आणि ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील गुन्हेगारांना ठार मारेल. इस्रायल मिशन पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही," असेही यात सांगण्यात आले. अल-मवासी कॅम्पवर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान ९० लोक मारले गेले. (छायाचित्र-रॉयटर्स) हानियाह आणि देईफ यांच्या मृत्यूचा हमासला धक्का तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देईफ आणि हानियाह या दोघांच्याही मृत्यूचा हमासला मोठा धक्का बसला आहे. "इतिहासाने वारंवार हे दाखवून दिले आहे की, पॅलेस्टिनी राजकीय व्यक्तींच्या हत्येच्या बाबतीत इस्रायल फार पूर्वीपासून खूप ताकदवान राहिला आहे. हमासच्या क्षमतेवर, त्याच्या विकासावर या मृत्यूंचा परिणाम होईल हे निश्चित," असे सेंटर फॉर कॉन्फ्लिक्ट अँड ह्युमॅनिटेरियन स्टडीज आणि जडालियाचे सह-संपादक मौइन रब्बानी यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ला सांगितले. मोहम्मद देईफ कोण होता? मोहम्मद देईफ २००२ मध्ये हमासची सशस्त्र शाखा एजेडाइन अल-कसाम ब्रिगेड्सचा प्रमुख झाला. तो जवळजवळ तीन दशकांपासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड व्यक्तींपैकी एक होता आणि २०१५ पासून अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत होता. “युद्धादरम्यान त्याने गाझा पट्टीतील क्रियाकलापांसाठी हमासच्या लष्करी विंगच्या वरिष्ठ सदस्यांना आदेश दिले आणि सूचना जारी केल्या,” असे लष्कराने सांगितले. देईफचे खरे नाव मोहम्मद दीब अल-मसरी आहे. त्याचा जन्म १९६५ मध्ये खान युनिस निर्वासित शिबिरात झाला होता. देईफ या शब्दाचा अर्थ 'अभ्यागत' किंवा 'अतिथी' असा होतो. व्हिडीओंमध्ये, देईफ मुखवटा घातलेला किंवा चेहरा झाकून दिसायचा. त्याची काही दुर्मीळ छायाचित्रे इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादीत प्रसारित झाली होती. जानेवारीमध्ये इस्त्रायलने देईफचे एक डोळा नसणारे छायाचित्र जारी केले. २०१४ मध्ये इस्रायलने गाझावर हवाई हल्ला केला, ज्यात देईफची पत्नी आणि त्याचा सात महिन्यांचा मुलगा ठार झाला. ७ ऑक्टोबर रोजी एका ऑडिओ संदेशात देईफने ऑपरेशन 'अल-अक्सा फ्लड' सुरू केल्याची घोषणा केली. देईफ गाझा इस्लामिक विद्यापीठात विद्यार्थी असताना १९८० मध्ये हमासमध्ये सामील झाला. गाझापट्टीत मोठ्या प्रमाणात बांधण्यात आलेल्या बोगद्यांच्या कामात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याला १९८० पासून इस्रायलने ताब्यात घेतले होते. त्याने तुरुंगात सुमारे दोन वर्षे घालवली होती. त्याला एकतर सोडण्यात आले असावे किंवा तो पळून गेला, असे अहवालात सांगण्यात आले आहे. हेही वाचा : ‘या’ देशात सरकार ४० लाख कुत्र्यांची हत्या करणार? कारण काय? त्यासाठी का पडली नवा कायदा करण्याची गरज? मे मध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातील वकिलाने त्याच्या अटकेचा वॉरेंट जारी करण्याची विनंती केली. त्यात गाझामधील हमासप्रमुख याह्या सिनवार याच्या नावाचाही समावेश होता. इराणच्या राजधानीत बुधवारी मारला गेलेला हमासचा राजकीय नेता हानियाहही त्या यादीत होता. फिर्यादीने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि संरक्षण मंत्री गॅलंट यांच्याकडे वॉरंटची मागणी केली. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान, हमासने २५१ लोकांना ताब्यात घेतले होते, त्यातील १११ अजूनही गाझामध्ये बंदी आहेत, तर यातील ३९ जणांचा मृत्यू झाल्याचे लष्कराचे सांगणे आहे. तेव्हापासून इस्रायलकडून सुरू असलेल्या लष्करी कारवाईत गाझामध्ये ३९,४८० लोक मारले गेले आहेत, अशी माहिती प्रदेशातील आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.