Discover Nanasaheb Peshwa Nepal Refuge facts and 1857 mutiny history: १८५७ चा लढा हा केवळ ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतीय क्रांतिकारकांमधील संघर्ष नव्हता, तर तो राजकीय मुत्सद्देगिरीचाही एक अनोखा अध्याय होता. या संग्रामात पराभवाच्या सावटाखाली असताना पेशवे नानासाहेबांना नेपाळने दिलेला गुप्त आश्रय आणि त्यामागे मराठे व नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक बंध, हा इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित राहिलेला भाग आहे.

मराठ्यांच्या इतिहासातील एक फारसा परिचित नसलेला अध्याय पुण्यातील तत्कालीन नेपाळच्या राजसत्तेशी संबंधित आहे. १८२७ साली दुसरे बाजीराव पेशवे यांनी धोंडू पंत (नानासाहेब) या तीन वर्षांच्या बालकाला दत्तक घेतले. पुढे हाच मुलगा ‘नानासाहेब पेशवे’ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि पेशव्यांच्या घराण्याचा वारस ठरला. इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, नानासाहेबांचे बालपण ब्रिटिशांविरोधाच्या वातावरणातच घडले. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (१८१७–१८१९) ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव केला आणि त्यानंतर मराठा साम्राज्यासह जवळपास संपूर्ण भारतावर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली. ब्रिटिशांनी पेशव्यांना दख्खनमधून हटवून कानपूरजवळील बिठूर येथे स्थानबद्ध केले आणि त्यांना वार्षिक पेन्शन सुरू केली. मात्र, बाजीरावांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी नानासाहेबांना त्यांचे दत्तक पुत्र आणि कायदेशीर वारस मानण्यास स्पष्ट नकार दिला; तर दुसरीकडे, भारतीय जनतेच्या दृष्टीने नानासाहेब हेच पेशव्यांचे वैध वारसदार होते.

१८५७ चा उठाव सुरू झाल्यावर नानासाहेब पेशवे त्याचे एक प्रमुख सूत्रधार ठरले. या संग्रामात दोन्ही बाजूंनी भीषण युद्ध झाले; अतिरिक्त सैन्य पाठवून आणि परस्परांचे डावपेच उधळण्यासाठी नव्या रणनीती आखून लढा दिला गेला. मात्र, दुर्दैवाने भारतीय योद्ध्यांचा यात पराभव झाला आणि तात्या टोपेंसारख्या अनेक क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली. “परंतु नानासाहेब पुढे नेमके कुठे गेले, याचा सुगावा कोणालाच लागला नाही,” असे बलकवडे नमूद करतात. त्यांनी सांगितले की, पुणे पुराभिलेखागारातील कागदपत्रांवरून स्पष्ट होते की नानासाहेबांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. बलकवडे सांगतात, “मराठा नेतृत्व आणि नेपाळ यांच्यात पूर्वापार जिव्हाळ्याचे संबंध होते. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा प्रतापगडावर श्री भवानीमातेच्या मंदिराची उभारणी केली, तेव्हा मूर्तीसाठी लागणारी शालिग्राम शिळा नेपाळच्या गंडक नदीतूनच आणली होती.” छत्रपती शाहू महाराजांच्या दैनंदिनींमध्येही नेपाळबद्दलचा विशेष आदर आणि पशुपतिनाथ मंदिराविषयीची भक्ती यांचे उल्लेख आढळतात. त्यामुळे ब्रिटिशांच्या पाठलागामुळे संकटात सापडलेल्या नानासाहेबांनी मदतीसाठी नेपाळकडे पाहणे स्वाभाविक होते, असे बलकवडे नमूद करतात.

काठमांडू येथील अभ्यासक डोल राज काफ्ले, तारानाथ घिमिरे आणि तेज बहादूर के.सी. यांच्या “Dual Diplomacy of Nepal in the Indian National Movement of 1857” या संशोधन निबंधानुसार, नेपाळने एका बाजूला ब्रिटिशांना उघडपणे लष्करी मदत केली, तर दुसऱ्या बाजूला गुप्तपणे भारतीय क्रांतिकारकांनाही साहाय्य केले, असे ऐतिहासिक नोंदींवरून स्पष्ट होते. या संशोधकांनी दिलेल्या एका पत्राच्या दाखल्यानुसार, १८५७ च्या संग्रामातील निष्ठावंत सैनिकांनी गंडक नदी ओलांडून नेपाळमध्ये प्रवेश केला होता. या निबंधात नमूद केले आहे की, “१८५७ च्या लढ्यात केवळ सैनिकच नव्हे, तर सामान्य जनताही ब्रिटिशांविरुद्ध हिरिरीने लढली. पराभवानंतर आश्रयाच्या शोधात या बंडखोरांनी नेपाळच्या सीमेत प्रवेश केला.” नेपाळ-भारत सीमेवर तैनात असलेल्या कर्नल केली यांनी १४ एप्रिल १८५९ रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते की, या युद्धातील सुमारे ६० भारतीय सेनाधिकारी नेपाळमध्ये दाखल झाले असून त्यांनी ठिकठिकाणी आपल्या छावण्या उभारल्या होत्या. त्या वेळी नानासाहेब पेशवे बुटवलच्या पलीकडे असलेल्या नुवाकोट किल्ल्यात वास्तव्यास होते. केली यांनी पुढे लिहिले होते, “किल्ल्यात तैनात असलेले सुमारे २०० अंगरक्षक नानासाहेबांच्या सुरक्षेची काळजी घेत होते, तर त्यांचे उर्वरित सैन्य बुटवलच्या घनदाट जंगलात तळ ठोकून होते.”

नानासाहेबांना आश्रय देताना नेपाळचे पंतप्रधान जंगबहादूर यांना ब्रिटिशांशी अत्यंत मुत्सद्दीपणाने आणि कौशल्याने व्यवहार करावा लागला. संशोधन निबंधानुसार, नानासाहेब नेपाळमध्येच लपले आहेत आणि नेपाळ सरकार त्यांना गुप्तपणे मदत करत आहे, अशा बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. तेव्हा जंगबहादूर यांनी ब्रिटिश रेसिडेंट रॅम्से यांना पत्र लिहून थेट आव्हान दिले की, “नानासाहेब नेपाळमध्ये आहेत आणि नेपाळ सरकार त्यांना आश्रय देत आहे, हे कोणी सिद्ध करून दाखवल्यास त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.” नानासाहेबांच्या अखेरच्या दिवसांबद्दल आजही अनेक मतप्रवाह आणि आख्यायिका प्रचलित आहेत. काही नोंदींनुसार त्यांचे निधन नेपाळमध्येच झाले, तर काहींच्या मते त्यांचा अंतिम काळ भारतात गेला. तरीही, “नेपाळने त्या कठीण प्रसंगी नानासाहेबांना पाठिंबा अन् आश्रय दिला, ही गोष्ट आजही आपण आदराने लक्षात ठेवतो,” असे बलकवडे नमूद करतात.