करोनाकाळात संपूर्ण जग बंदिस्त झाल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर झाला. याच काळात जंकोस या पक्ष्यामध्ये बदल होऊन त्याच्या चोचीचा आकार वाढल्याचे निरीक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसरात नोंदवण्यात आले आहे. काय आहे हे निरीक्षण आणि बदल कसा आणि का झाला, याचा हा आढावा.
कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसरात काय आढळले? करोनाकाळात कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिसचा परिसर बंद झाला होता. त्या वेळी तेथे मुले आणि कर्मचाऱ्यांकडून टाकून देण्यात येणारे शिल्लक अन्न खाण्यासाठी येणाऱ्या जंकोस या पक्ष्याचे हाल झाले. ज्या वेळी मुले आणि कर्मचारी तेथे परत आले त्या वेळी तेथील पक्ष्यामध्ये त्यांना बदल झाल्याचे दिसून आले. तेथे नियमित येणाऱ्या जंकोस या पक्ष्याच्या चोचीचा आकार बदलला होता. तो पक्षी त्याच प्रजातीचा होता, मात्र त्याच्या चोचीत झालेला बदल सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. यातूनच या पक्ष्याचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली. पक्ष्यातील हा बदल मानवी वर्तनाला निसर्गातून मिळणाऱ्या प्रतिसादाने घडलेली उत्क्रांती असल्याचे बोलले गेले. वातावरण अचानक बदलते तेव्हा वन्यजीव किती लवकर त्याच्याशी जुळवून घेऊ शकतात हे यातून दिसून आले.
अभ्यासाला सुरुवात कशी झाली?
कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसरात काळ्या डोळ्यांचा जंकोस (जंको हायमालिस) हा पक्षी नियमित येतो. करोनाकाळात ज्या वेळी विद्यापीठ परिसर ओसाड झाला, मुले आणि कर्मचाऱ्यांकडून टाकण्यात येणारे शिल्लक अन्न मिळेनासे झाले त्या वेळी या जंकोस पक्ष्याला अन्य गोष्टींमध्ये अन्न शोधावे लागले असावे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. जंकोस हा पक्षी सहसा डोंगराळ भागात राहतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये अधिक संख्येने दिसून येत आहे. मनुष्याकडून मिळणारे अन्न हे त्यामागील एक कारण असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मनुष्याकडून मिळणारे अन्न हा जंकोस पक्ष्यासाठी सहज सोपा मार्ग ठरल्याने तो मनुष्यवस्तीत येत असावा असे मानले जाते. करोनाकाळानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात मुले, कर्मचारी परत आले त्या वेळी या जंकोस पक्ष्याची चोच बदलली होती. एका दशकापर्यंत या कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी या पक्ष्याचा बारकाईने अभ्यास केला. त्याचे वर्तन पाहिले, शरीराचे मोजमाप केले आणि रक्ताचे नमुने घेतले. त्या अभ्यासात करोनाकाळ हा केवळ मानवासाठी बदल घेऊन आला नाही तर प्राणीपक्षीही त्यामुळे बदलल्याचे यात स्पष्ट झाले.
पक्ष्याच्या चोचीमध्ये काय झाले बदल?
कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी जंकोसमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास केला असता त्यात त्याची चोच सामान्य आकारात आल्याचे आढळले. करोनाकाळापूर्वी संशोधकांना जंकोसची चोच लहान आणि जास्त घट्ट दिसत होती; परंतु जवळपास दोन वर्षांच्या काळात जंकोस पक्ष्याने अशा पिल्लांना जन्म दिला की त्यांची चोच लांब आणि बारीक होती. प्रोफेसर पामेला येह यांच्या मते ‘उत्क्रांतीचा हा काळ इतर उत्क्रांतीप्रमाणेच अतिशय मंद गतीचा आहे.’ या अभ्यासाच्या पहिल्या लेखिका एलेनोर डायमंट यांनी जंकोस पक्ष्यातील हा बदल धक्कादायक असल्याचे नमूद केले. चोचीचा आकार बदललेल्या जंकोस पक्ष्यांची संख्या इतकी मोठी असेल हे त्यांना अपेक्षित नव्हते. त्यांनी सांगितले, ‘खरे सांगायचे तर, जेव्हा आम्ही तो बदल किती जबरदस्त होता हे पाहिले तेव्हा आम्हाला खूप धक्का बसला. आमच्या मते हा बदल मानवाकडून मिळणारे अन्न पक्ष्यांना करोनाकाळात न मिळाल्यानेच झाला असावा.’ या संदर्भातील अभ्यास जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाला आहे.
करोनाकाळात जंकोस कोठे होता?
करोनाकाळापूर्वी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये दिसून येणारा जंकोस पक्षी मानवी वस्तीत अन्न मिळणे बंद झाल्यावर तो शहराच्या दुसऱ्या भागात गेला नाही. त्याऐवजी, त्याने त्याच्या पूर्वीच्या म्हणजे डोंगराळ भागात जाणेच पसंत केले असावे. तेथे त्याला झुडुपे, गवत आणि पानांच्या कचऱ्यातून अन्न गोळा करावे लागले. त्या परिस्थितीत त्याच्या चोचीचा आकार महत्त्वाचा ठरला असावा. बिया शोधण्यासाठी आणि हाताळण्यासाठी चांगले चोचीचे टोक पक्ष्यांना फायदेशीर ठरते. एलेनोर डायमंट यांनी सांगितले, आम्हाला वाटते की कॅम्पस बंद असताना वेगळ्या आकाराची चोच असलेले जंकोस पक्षी अन्न शोधण्यात अधिक यशस्वी झाले. त्यामुळेच त्यांना या काळात टिकून राहता आले.
करोनाकाळानंतर जंकोस कसा परतला?
करोनाकाळानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात मुले, कर्मचारी दाखल झाल्यानंतर पुन्हा या परिसरात पक्ष्यांसाठी अन्न मिळू लागल्याने जंकोस पक्ष्याने आपला मोर्चा येथे वळवला. प्रोफेसर पामेला येह यांच्या मते वन्यप्राणी आणि पक्ष्यांना त्यांचे अन्न मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र ज्या वेळी मनुष्याकडून त्यांना सहज अन्न उपलब्ध होऊ लागते त्या वेळी हे प्राणी आणि पक्षी त्याच्याशी जुळवून घेऊ लागतात. त्यांचे शरीरही बदलू लागते. विशेषत: त्यांचे तोंड अन्न सहज मिळू लागल्याने बदलते. थोडक्यात, मानवी वस्ती, शहरे प्राणी-पक्ष्यांना आकार देतात. जंकोस पक्ष्याबाबत असेच काहीसे झाले आहे.
अन्नामुळे प्राणी, पक्ष्यांमध्ये कसा घडतो बदल?
संशोधकांना मानवी वस्तीत राहणाऱ्या काही प्राण्यांमध्ये विविध बदल दिसून आले. विशेषकरून उंदीर, रॅकूनसह काही प्राण्यांमध्ये थुंकी आढळून आल्याची नोंद करण्यात आली. संशोधकांच्या मते असे बदल प्राण्यांच्या खाण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलातून घडतात. या वेळी त्यांचे खाण्यासाठी वापरले जाणारे भागदेखील बदलू शकतात. या बदलांचा परिणाम प्राण्यांच्या पिल्लांवर होतो. अभ्यासात असे नमूद केले आहे की, गेल्या ५० वर्षांत अंदाजे ३ अब्ज पक्षी गायब झाले, ज्यात सुमारे १६८ दशलक्ष जंकोस पक्ष्यांचा समावेश आहे. दरम्यान, दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जंकाेस पक्ष्यांच्या संख्येत होत असलेल्या वाढीकडे येह यांनी लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते जंकोसमध्ये इतर शहरी पक्ष्यांप्रमाणे समूहात राहणे, इमारतींमध्ये घरटे बांधणे असे गुण नसले तरी ते शहराशी जुळवून घेत आहेत. त्यांच्यात अनवधानाने बदल होत आहे. ज्यामुळे त्यांना मानवांमध्ये टिकून राहण्यास मदत होते, ही गोष्ट उत्साहवर्धक आहे.
