Consciousness, Science and Brain: आपल्याला ज्ञान होतं म्हणजे नेमके काय होतं? शिक्षक बोलत असतात आणि विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होतं… पण मग ते ज्ञान कुणाला होतं? विद्यार्थ्याच्या मनाला, मेंदूला की, त्याच्या पंचसंवेदनांना की, शरीराला? जाणीवेशिवाय ज्ञानप्राप्ती असू शकते का? तसं असेल तर मग जाणीव आणि ज्ञान यातील फरक नेमका काय? असे एक ना अनेक प्रश्न गेली काही शतकं माणसाला भेडसावताहेत. त्याचा शोध विज्ञानाच्या आधारे घेण्यासाठी संशोधकांनीही विविध प्रयोग केले. आता अगदी अलीकडे केलेल्या प्रयोगांमध्ये तर आत्मजाणीव ही तर पक्ष्यांनाही असते, या काहीशा धक्कादायक आणि आश्चर्यकारण अशा निष्कर्षाप्रत संशोधक पोहोचले आहेत. याबाबत अलीकडचे आणि आजवरचे वैज्ञानिक प्रयोग नेमकं काय सांगतात, ते जाणून घेऊ!
जाणीव माणसाला केव्हा होते?
आपण आहोत, हे आपल्याला कसं कळतं? म्हणजे आपण आहोत याची जाणीव माणसाला केव्हा आणि कशी होते? दु:ख, आनंद, आठवण, भीती, प्रेम आदी भावभावनांचा अनुभव येतो तेव्हा, असं विज्ञान सांगतं. …कारण आपल्यात चेतना आहे. पण चेतना म्हणजे नक्की काय? आणि निसर्गाने ती निर्माणच का केली? मग चेतना म्हणजेच जाणीव की जाणीव त्यापेक्षा वेगळी असते? हे प्रश्न केवळ तत्त्वज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. न्यूरोसायन्स, उत्क्रांतीशास्त्र आणि जीवशास्त्र या सगळ्या शाखा आज एकत्र येऊन या मूलभूत गूढ मुद्द्याची उकल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

धोक्याची जाणीव ते आत्मजाणीवेपर्यंत!
शास्त्रज्ञांच्या मते जाणीव एका झटक्यात निर्माण झालेली नाही. तर उत्क्रांतीमध्ये टप्प्याटप्प्याने ती विकसित झाली. सगळ्यात प्राथमिक स्वरूप म्हणजे जागरूकता. धोका ओळखण्याची क्षमता. गरम वस्तूला हात लावल्यावर होणारी वेदना ही केवळ त्रासदायक नसते, तर शरीराला दिलेला तो तत्काळ इशारा असतो. या संवेदनांमुळेच प्राणी आजवर जिवंत राहू शकले.
जाणीव मानवापुरतीच मर्यादित नाही
पुढील टप्प्यात प्राणी परिस्थितीची जाणीव ठेवू लागले. एकाच वेळी अनेक संकेतांमधून योग्य गोष्टीकडे लक्ष देणं, अनुभवातून शिकणं, आणि पुढे येणारा धोका ओळखणं या सर्व क्षमता विकसित झाल्या. त्यानंतर आला तो सर्वात गुंतागुंतीचा टप्पा. याला आपण आत्मजाणीव किंवा स्व-ची जाणीव असं म्हणू शकतो. स्वतःबद्दल विचार करणं, भूतकाळ आठवणं, भविष्याचा अंदाज बांधणं, ही क्षमता मानवात ठळकपणे दिसते, पण ती केवळ मानवापुरतीच मर्यादित नाही.

पक्ष्यांनाही असते जाणीव
फक्त माणसालाच जाणीव आहे, हा समज चुकीचा आहे, असं संशोधकांना वाटतं. अलीकडेच केलेल्या प्रयोगांनंतर संशोधकांना असं लक्षात आलं की, काही पक्षी, विशेषतः कावळे, पोपट आणि मॅग्पाय रॉबिन हे आरशात पाहिल्यानंतर स्वतःला ओळखू शकतात. एवढंच नव्हे तर समस्याही सोडवू शकतात. परिस्थितीनुसार ते त्यांचे वर्तन बदलण्याची क्षमता राखतात आणि प्रसंगी ती क्षमता वापरतातही. महत्त्वाचं म्हणजे, पक्ष्यांचा मेंदू मानवी मेंदूपेक्षा रचनेने वेगळा असला, तरी जाणीवेसाठी आवश्यक असलेली क्षमता त्यांच्यात आढळते. याचा अर्थ जाणीव निर्माण होण्यासाठी ‘मानवी मेंदूसारखी रचना’ अनिवार्य नाही. म्हणजेच, जाणीव ही निसर्गात अस्तित्त्वात असलेली जुनी क्षमता असू शकते.
जाणीव उपयोगी का ठरली?
उत्क्रांतीत टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे असलेली क्षमता उपयुक्त असावी लागते. जाणीव ही केवळ अनुभवासाठी नसून, ती निर्णयक्षमता वाढवते.
- जाणीवेमुळे…
- शिकणं सोपं होतं
- चुका सुधारता येतात
- सामाजिक वर्तन शक्य होतं
- सहकार्य आणि संघर्ष समजून घेता येतो
उत्क्रांतीच्या टप्प्यांत समूहात राहणाऱ्या प्राण्यांसाठी ही क्षमता फार महत्त्वाची ठरली. समाज, भाषा, संस्कृती यांची पाळेमुळे याच जाणीवेत दडलेली आहेत, असेही संशोधकांना लक्षात आले.
मेंदूमध्ये जाणीव नेमकी कुठे निर्माण होते?
न्यूरोसायन्सने आता मेंदूमधील अशा नेटवर्क्सची ओळख पटविण्यास सुरुवात केली आहे, ज्यांचा संबंध या जाणीवेशी आहे. मेंदूतील थॅलेमस आणि आतील भागांमधील नेटवर्क विविध इंद्रियांकडून येणारी माहिती एकत्र करतं. ‘ग्लोबल न्यूरॉनल वर्कस्पेस’ किंवा ‘इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन थिअरी’सारख्या संकल्पना सांगतात की, माहितीचा समन्वय जेवढा अधिक केला जातो किंवा ती एकसंध स्वरूपात मेंदूत असते, तितकीच जाणीव अधिक खोलवर रुजलेली असते.
तरीही एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे मेंदूतील रासायनिक व विद्युत प्रक्रियांमधून अनुभव कसा घडतो?
जाणीव मेंदूपलीकडे आहे का?
काही शास्त्रज्ञांच्या मते, जाणीव हे विश्वातील एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. अवकाश, काळ यांसारखीच जाणीवेचीही एक जाणीव असते. या सिद्धांतांनुसार मेंदू जाणीव निर्माण करत नाही, तर तो ती स्वीकारतो. अर्थात या संदर्भातील ठोस आणि ठाम पुरावे अद्याप संशोधकांच्या हाती आलेले नाहीत. पण गोष्ट मात्र ते स्पष्ट करतात, ती म्हणजे मानवी जाणीव समजून घेण्याचा प्रयत्न गेली काही शतके सुरूच आहे. तत्त्ववेत्त्यांपासून ते संतांनीही ही जाणीव वेगळ्या पातळीवर तर संशोधकांनी ती विज्ञानाच्या पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न केला.
आपल्यासाठी याचा अर्थ काय?
जाणीव ही केवळ वैज्ञानिक किंवा तत्त्वज्ञानातील संकल्पना नाही. तीच आपल्यातील ‘मी’ ला घडवते आणि प्रसंगी बिघडवतेही! तिच प्रश्न विचारायला, अर्थ शोधायला, आणि स्वतःच्या अस्तित्वाकडे आणि त्याच्याही पल्याड पाहायला माणसाला भाग पाडते!
संदर्भ (References)
- १. Stanislas Dehaene, Consciousness and the Brain: Deciphering How the Brain Codes Our Thoughts, Viking Press, 2014
- २. Antonio Damasio, Self Comes to Mind: Constructing the Conscious Brain, Pantheon Books, 2010
- ३. Michael Gazzaniga, Who’s in Charge? Free Will and the Science of the Brain Ecco, 2011
- ४. David Chalmers, The Conscious Mind: In Search of a Fundamental Theory, Oxford University Press, 1996
- ५. Thomas Metzinger, The Ego Tunnel, Basic Books, 2009
- ६. Newen, A. & Montemayor, C. (2024–25) Evolutionary stages of consciousness, Ruhr University Bochum
- ७. Donald Griffin, Animal Minds, University of Chicago Press
- ८. The Cambridge Declaration on Consciousness (2012), University of Cambridge
- ९. Integrated Information Theory (IIT), Giulio Tononi
- १०. Global Neuronal Workspace Theory, Dehaene & Changeux
