scorecardresearch

विश्लेषण : करोना प्रतिबंधक लस काम कसे करते? रोगप्रतिकार शक्तीला विषाणू ‘आठवतो’ कसा?

लशीच्या मानवी शरीरातील स्मृती आणि प्रभाव याचा संबंध असून स्मृती जितक्या अधिक काळ टिकतील तितका काळ आजारापासून संरक्षण मिळते.

coronavirus vaccine
लशीच्या मात्रा, त्यांचा प्रभाव आणि कालावधी यांचाही अभ्यास केला जाणार (फाइल फोटो, सौजन्य – आशिष काळे)

-शैलजा तिवले

करोना प्रतिबंधात्मक लशीच्या मानवी शरीरातील स्मृतींच्या कालावधीचा अभ्यास केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागामार्फत (डीबीटी) करण्यात येणार आहे. या लशीच्या मात्रा, त्यांचा प्रभाव आणि कालावधी यांचाही अभ्यास केला जाणार आहे. लशीच्या मानवी शरीरातील स्मृती आणि प्रभाव याचा संबंध असून स्मृती जितक्या अधिक काळ टिकतील तितका काळ आजारापासून संरक्षण मिळते.

लशीची मानवी शरीरातील ‘स्मृती’ म्हणजे काय?

शरीरात रोगप्रतिकार शक्तीचे विविध भाग असतात. त्याच्या काही पेशींमध्ये प्रतिपिंडे असतात. एखाद्या आजारावरील लस म्हणजे त्या विषाणूचे एक वेगळे स्वरूप असते. लशीच्या स्वरूपात हे विषाणू शरीरात सोडले जातात तेव्हा ते प्रतिपिंडांना चेतवतात आणि त्या आजाराची प्रतिपिंडे शरीरात निर्माण होतात. या प्रक्रियेनंतर शरीरामध्ये प्रत्यक्ष आजाराच्या विषाणूंनी शिरकाव केल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या विषाणूविरोधात असलेल्या प्रतिपिंडांना चेतवते. म्हणजेच स्मृती जागृत करते. ही प्रतिपिंडे विषाणूंना प्रभावहीन करतात. त्यामुळे विषाणूने शरीरात प्रवेश केला तरी आजाराची बाधा होत नाही. या प्रक्रियेमध्ये लशीमुळे निर्माण झालेल्या प्रतिपिंडांची स्मृती किती काळ टिकेल हे प्रत्येक लशीवर अवलंबून असते.

लशीच्या स्मृती हळूहळू कमी होतात का?

बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांत त्याला दिलेल्या पोलिओ, गोवर, रुबेला इत्यादी लशींच्या स्मृती शरीरामध्ये जन्मभर राहतात. परिणामी या आजारांच्या विषाणूच्या संपर्कात आल्यावरही संसर्ग होत नाही. त्या आजारांपासून संरक्षण मिळते. माणूस वयस्कर होतो तसा यातील काही लशींचा प्रभाव कमी होतो. म्हणजेच त्याची स्मृती कमी होते. काही लशींची स्मृती दीर्घकाळ का आणि काही लशींची अल्पकाळ का राहते याचा उलगडा अद्याप झालेला नाही. शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय गुंतागुंतीची असल्यामुळे हे शोधणे अतिशय आव्हानात्मक असून जगभरात याबाबत संशोधन सुरू असल्याचे‘काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले.

स्मृती कमी झाल्यावर लशींचा प्रभावीपणाही कमी होताे का?

लशीचा प्रभावीपणा हा बहुतांशी त्याच्या शरीरातील संबंधित लसघटकांच्या स्मृतीवर अवलंबून असतो. शरीरात विषाणूचा प्रवेश झाल्यावर या विषाणूविरोधात तयार असलेली प्रतिपिंडे चेतवणे, त्याच्या स्मृती जागविणे हे रोगप्रतिकारशक्तीचे कार्य असते. या स्मृती फारशा प्रभावी नसतील तर विषाणू प्रभावहीन होत नाही आणि आजाराची बाधा होण्याची शक्यता असते. लशीचा प्रभावीपणा कमी होण्यामागे आणखी एक कारण डॉ. मांडे यांनी सांगितले. ते म्हणाले, “विषाणूच्या स्वरूपात वारंवार बदल झाल्यामुळेही लशीचा प्रभावीपणा कमी होतो. उदाहणार्थ इन्फ्लुएन्झा संसर्गाची लस एकदा घेतली तरी एक किंवा दोन वर्षांनी पुन्हा घ्यावी लागते. कारण इन्फ्लुएन्झाच्या विषाणूमध्ये दरवर्षी अनेक बदल होत असल्यामुळे आधीची लस फारशी प्रभावशाली राहत नाही. लशीची स्मृती असली तरी वेगळ्या प्रकारच्या विषाणूंना ती ओळखू शकत नाहीत.

डीबीटीचा अभ्यास का गरजेचा आहे?

डीबीटी करत असलेल्या अभ्यासामुळे भारतातील नागरिकांमध्ये करोनाविरोधातील प्रतिकारशक्ती कितपत आणि कशी तयार झाली आहे हे समजून घेण्यास मदत होणार आहे. यामध्ये करोना प्रतिबंधात्मक लशीचा प्रभाव आणि स्मृती याचा अभ्यास केला जाणार असून यामध्ये दोन वेगवेगळ्या लशींच्या प्रभावाबाबतही संशोधन करण्यात येणार आहे.

करोना विषाणूवर लशीची परिणामकारकता कितपत?

करोना प्रतिबंधात्मक लशीमध्ये मूळ विषाणूचा वापर केला गेला आहे. कोविशिल्डबाबत सांगायचे झाले, तर मूळ करोना विषाणूतील प्रथिनांचा यात वापर केलेला आहे. करोनाचे सध्या आढळणाऱ्या ओमायक्रॉन किंवा अन्य उपप्रकारांच्या विषाणूमध्ये प्रथिनांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. लशीमुळे तयार झालेली प्रतिपिंडे ही प्रथिने ओळखू शकत नाहीत. त्यामुळे लस घेऊनही करोनाची बाधा होत आहे. परंतु मूळ प्रथिनांच्या लशीमुळे आजाराची तीव्रता, प्राणवायूची गरज किंवा रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता निश्चितच कमी झाली आहे. त्यामुळे लशीच्या स्मृतीचा सहभाग, त्यांचा प्रभाव याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. भविष्यात अन्य संसर्गजन्य आजारांच्या साथीमध्ये या स्मृती दीर्घकाळ टिकवण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार असल्यामुळे हा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे डॉ. मांडे यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे लहानपणापासून दिल्या जाणाऱ्या लशींचा अभ्यास हा अनेक वर्षे करण्यात आला आहे. याउलट करोना हा नवीन आजार असून त्यावर प्रतिबंधक लशींचा अभ्यास अगदी काही महिन्यांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळेही या लशीच्या स्मृतीबाबतचा अभ्यास गरजेचा आहे. यावरून आपल्याला करोनाची लस वारंवार घ्यावी लागणार की एकदा घेतलेली लस प्रभावशाली असेल, हे देखील समजण्यास मदत होईल, असे डॉ. मांडे यांनी सांगितले.

टी – सेल आणि लशीच्या स्मृती यांचा काही संबंध आहे का?

लस दिल्यानंतर शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर त्याला पेशीत शिरू न देणे हे या प्रतिपिंडांचे महत्त्वाचे काम असते. परंतु काही वेळा शरीरातील या आजाराविरोधात लढणाऱ्या प्रतिपिंडांची स्मृती कमी झाली असली तरी रोगप्रतिकार यंत्रणेता भाग असलेल्या टी- सेल, बी – सेल अशा पेशी कार्यरत होतात. या पेशींमध्ये असलेल्या स्मृती चेतविल्या जातात आणि त्या विषाणूंना प्रभावहीन करतात. त्यामुळे लशींच्या स्मृती दीर्घकाळ टिकल्या नाहीत, तरी टी – सेलच्या स्मृतींमुळे आजारांपासून संरक्षण मिळते. करोना आजाराची तीव्रता कमी कऱण्यात टी – सेलचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या पेशींचाही अभ्यास जगभरात सुरू असल्याचे डॉ. मांडे यांनी सांगितले.

आजाराची तीव्रता कमी का?

करोना विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर विषाणूची संख्या झपाट्याने वाढते. आठ ते दहा दिवसांत ही संख्या एकदम कमी होते. दहा दिवसानंतर मात्र आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती एकदम वाढते. म्हणजेच शरीराची या आजाराविरोधातील प्रतिक्रिया खूप तीव्रतेने वाढते. याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतात. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बहुतांश मृत्यूचे कारण हे सायटोकाईन स्टॉर्म होते. लस घेतल्यानंतर सायटोकाईन स्टॉर्मचे प्रमाण खूप कमी झालेले दिसून येते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर लशीमुळे झालेले परिणाम आणि सायटोकाईम स्टॉर्मचे घटते प्रमाण याचा काय संबंध आहे, याचेदेखील संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. मांडे यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How does coronavirus vaccine works print exp 0722 scsg