जिममध्ये वर्कआउट करून आल्यानंतर जर तुम्ही एनर्जी ड्रिंक घेत असाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी एक माहिती समोर आली आहे. एनर्जी ड्रिंक बनवणाऱ्या कंपन्या सध्या अन्न सुरक्षेची खात्री करणाऱ्या यंत्रणेच्या रडारवर आहेत. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (FSSAI) एनर्जी ड्रिंक विकण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. उत्पादनावर “एनर्जी ड्रिंक” असा उल्लेख करण्यावर FSSAI ने आक्षेप घेतला आहे. तसेच या ड्रिंक्सच्या मार्केटिंगसाठी केल्या जाणाऱ्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. “बुस्ट्स एनर्जी”, “एकाग्रता वाढवणारे पेय”, “मन आणि शरीराला प्रफुल्लीत करणारे पेय” असे दावे करून ही पेय “एनर्जी ड्रिंक”च्या नावाने विकली जातात. “एनर्जी ड्रिंक” या श्रेणीचे कोणतेही मानक अन्न सुरक्षेशी संबंधित कायद्यात नसल्याचे तसेच नियमात नमूद नसलेला कोणताही दावा अन्नाबाबत करता येत नाही, असे FSSAI ने स्पष्ट केले.
एनर्जी ड्रिंकबाबत FSSAI ला कोणती काळजी वाटते?
नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफिन आणि साखर असते. एनर्जी ड्रिंकची २५० एमएलची कॅन सर्वाधिक विकली जाते. त्या कॅनमध्ये कॅफिन ७५ मिलीग्रॅम, तर साखर २७ ग्रॅम म्हणजेच जवळपास सात चमचे (टिस्पून) असते. त्याचबरोबर त्यात टॉरिन, ग्लुकुरोनोलॅक्टोन आणि निआसीन, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन बी१२ ही व्हिटॅमिन्स असतात. साखर आणि कॅफिन यांच्यामुळे एनर्जी ड्रिंकचे दीर्घकाळ सेवन करणे घातक ठरते.
साखर व कॅफिनचा शरीरावर काय परिणाम होतो?
एनर्जी ड्रिंकमध्ये असलेल्या या पदार्थांपैकी कॅफिन रक्तामार्फत थेट मेंदूपर्यंत उतींच्या मार्फत पोहोचते. तसेच आपल्याला झोप किंवा थकवा येण्यासाठी कारण ठरणाऱ्या व मेंदूत जमा झालेल्या एडेनोसिन रिसेप्टर्सला हे कॅफिन ब्लॉक करते. त्यामुळे थकवा किंवा झोप कमी होते. मेंदूची सतर्कता (अलर्टनेस), एकाग्रता आणि प्रतिसाद देण्याचा कालावधी वाढतो.
FSSAI च्या पेपरनुसार, कॅफिन हे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते. त्यामुळे मेंदूची सतर्कता वाढते. कॅफिनमुळे शरीराला असलेली झोपेची गरज संपत नाही. तसेच कॅफिन शरीरात कोणतीही ऊर्जा (एनर्जी) निर्माण करत नाही. आपल्याला काही कालावधीसाठी फक्त ताजेतवाने वाटते. परंतु, आपल्या शरीराला असलेली झोपेची व आरामाची गरज मात्र तशीच कायम राहते.
एनर्जी ड्रिंकमधील टॉरिन या घटकाबद्दल सर्वाधिक गैरसमज आहे. टॉरिन हे मानवी शरीरात नैसर्गिकपणे असणारे अमिनो अॅसिड आहे. स्नायूंचे कार्य, कॅल्शियम नियंत्रण आणि मज्जासंस्थेचे कार्य यांमध्ये टॉरिन महत्त्वाची भूमिका बजावते. टॉरिनमुळे शरीरात एनर्जी निर्माण होते असा दावा अनेकदा जाहिरातींमध्ये केला जातो. व्हिटॅमिन बी देखील ऊर्जा चयापचयात महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु, त्यामुळे तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण होत नाही.
“एनर्जी ड्रिंक” हे नावच फसवणूक करणारे का आहे?
“एनर्जी ड्रिंक” हे नावच मुळात गोंधळ निर्माण करणारे आहे. आहारशास्त्रात एनर्जीला कॅलरीज म्हटले जाते. आपण खाल्लेल्या अन्नातून शरीराला मिळणारी उष्णता किंवा शक्ती मोजण्याचे कॅलरी हे एक एकक आहे. एनर्जीचा अर्थ दैनंदिन जीवनात आपण शरीराची सतर्कता, क्षमता (स्टॅमिना) किंवा सुधारलेली कार्यक्षमता असा लावतो. शरीराची सतर्कता आणि क्षमता या दोन गोष्टींशी संबंधित घटक एनर्जी ड्रिंकमध्ये समाविष्ट केले जातात. सतर्कतेसाठी कॅफिन तर कॅलरीजसाठी साखर एनर्जी ड्रिंकमध्ये टाकली जाते. २५० एमएल एनर्जी ड्रिंकमध्ये जवळपास सात चमचे साखर असते. एनर्जी ड्रिंक बनवणाऱ्या कंपन्या मार्केटिंग करताना सतर्कता व क्षमता यातील फरक धूसर करतात आणि इथेच ग्राहकांची गफल्लत होते. या कंपन्यांनी “एनर्जी ड्रिंक” ऐवजी “कॅफिनेटेड बेव्हरेजेस” असे उत्पादनावर लिहिणे अधिक संयुक्तिक आहे. कारण, “कॅफिनेटेड बेव्हरेजेस”या अन्नपदार्थ श्रेणीतील घटकच “एनर्जी ड्रिंक”च्या नावाने खपवले जात आहेत.
एनर्जी ड्रिंकमधील साखर घातक का आहे?
एनर्जी ड्रिंकमध्ये असलेली साखर आरोग्यासाठी चिंताजनक आहे. २५० एमएल एनर्जी ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण जवळपास सात चमचे इतके असते. भारतात सध्या विकल्या जाणाऱ्या एनर्जी ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण इतकेच किंवा यापेक्षा अधिक आहे. मधूमेह (डायबिटिज) झालेल्या रूग्णांनी रिकाम्या पोटी एनर्जी ड्रिंक प्यायल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढू शकते. तसेच चांगले आरोग्य असणाऱ्यांनी एनर्जी ड्रिंक सतत प्यायले तर वजन वाढणे, लठ्ठपणा, टाइप २ डायबिटिज, फॅटि लिव्हर डिसिज आणि दातांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
एनर्जी ड्रिंक म्हणजे स्पोर्ट ड्रिंक नव्हे…
एनर्जी ड्रिंकमुळे शरीर हायड्रेट राहते किंवा शरीराची कार्यक्षमता वाढते असा आणखी एक सामान्य गैरसमज आहे. एनर्जी ड्रिंक व स्पोर्ट ड्रिंक यामध्ये मूलभूत फरक आहे. स्पोर्ट ड्रिंक हे अतिव्यायाम केल्याने किंवा शरीर थकल्याने त्यातील पाण्याचे प्रमाण, इलेक्ट्रोलाइट्स आणि कार्बोहायड्रेट्सचे नुकसान भरून काढते. तर एनर्जी ड्रिंक फक्त अलर्टनेस वाढवते. शरीर हायड्रेट ठेवण्याचे कार्य एनर्जी ड्रिंक करत नाही. लहान मुले जर सतत एनर्जी ड्रिंक घेत असतील त्याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण, त्यात साखर व कॅफिनचे प्रमाण अधिक असते. एनर्जी ड्रिंकच्या कॅनवर समोर काय लिहिले आहे ते वाचण्याऐवजी त्याच्या मागे बारीक अक्षरात काय लिहिले आहे, ते वाचल्यास आरोग्य सुरक्षित ठेवता येऊ शकते.
