Premium

History and culture of Ganesh festival: भारताआधीच आग्नेय आशियातील देशांमध्ये गणपती लोकप्रिय का झाला? तिथे गणपती कसा पोहोचला?

History and culture of Ganesh festival: तिबेट, चीन, जपान आणि आग्नेय आशियातील इतर अनेक देशांत गणरायाच्या पूजनाची परंपरा आजही अस्तित्त्वात आहे. आजही आग्नेय आशियातील अनेक देश रामायण, महाभारत आणि गणेश पूजनाची परंपरा त्यांच्याच संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे मानतात. प्राचीन व्यापाराच्या निमित्तानेच गणेश पूजनाची परंपरा या सर्व देशांमध्ये पोहोचल्याचे अभ्यासक नमूद करतात.

south east asian ganesh ganpati
History and Culture of Ganesh Festival Ganpati- आग्नेय आशियातील गणपती

History and culture of Ganesh festival: गणेशोत्सवाचा कालावधी हा प्रचंड उर्जा आणि उत्साहाचा असतो. या वर्षीही गणेशाचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. गणरायाची घरोघरी स्थापना झाली आहे. गणेश किंवा गणपती हिंदूंधर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहे, इतकेच नाही तर अनेक मिथक शास्त्राचे अभ्यासक गणरायाचे वर्णन करताना ‘सीमांपलीकडचा देव’ असे करतात. सर्व जाती, धर्माच्या सीमा ओलांडून गणरायाची स्थापना आणि पूजा केली जाते. हे केवळ आजच घडत आहे असे नाही तर गणरायाला भारत वगळता इतर अनेक देशांमध्ये पूजण्याची परंपरा काही शतके जुनी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Ganesh festival Ganpati Gauri: कोण आहे ही ‘निर्ऋती’?; जी ठरली ‘ज्येष्ठागौरी’! 

प्राचीन व्यापाराचे महत्त्व

भारत हा देश प्राचीन व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावत होता, भारताचे व्यापारी संबंध जसे पाश्चिमात्य देशांशी होते, तसेच आग्नेय आशियाई देशांशी देखील होते. किंबहुना या सर्व देशांच्या संस्कृतींवर भारतीय संस्कृतीची छाप असल्याचे आपण पाहू शकतो. त्याचीच परिणती म्हणून भारतीय हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांचा प्रसार या देशांमध्ये झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच आजही हे देश रामायण, महाभारत, गणेश पूजनाची परंपरा त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे मानतात. प्राचीन व्यापाराच्या निमित्तानेच गणेश पूजनाची परंपरा या देशांमध्ये पोहोचल्याचे अभ्यासक नमूद करतात.

आणखी वाचा: मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन? 

आग्नेय आशियात पाचव्या शतकात गणेशाचे शिलालेख

‘भारतीय आणि आग्नेय आशियाई कला’ या विषयाचे प्राध्यापक रॉबर्ट एल. ब्राउन यांनी त्यांच्या गणेशावरील संशोधनात, आग्नेय आशियातील गणेशाचे सर्वात जुने शिलालेख आणि प्रतिमा इसवी सन ५ व्या आणि ६ व्या शतकातील असल्याचे नमूद केले आहे. कंबोडियामध्ये, गणेशाला अर्पण केलेली मंदिरे अस्तित्त्वात होती. किंबहुना ७ व्या शतकापासून गणेशाची या देशांमध्ये आराध्यदैवत म्हणून उपासना केली जात होती. म्हणजेच भारतामध्ये गाणपत्य संप्रदाय अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय होण्याआधीच या देशांमध्ये गणेशाला आराध्य मानले गेले होते.

आणखी वाचा: पांडव-कौरव नाही तर ‘हे’ होते महाभारताच्या युद्धाला कारणीभूत?

जपानमध्ये प्रवेश बौद्ध धर्माच्या माध्यमातून

असे असले तरी, भारताप्रमाणेच प्रांतपरत्त्वे या देशांमध्येही गणरायाच्या स्वरुपात आणि पूजा- विधींमध्ये वैविध्य आढळते. कंबोडियात गणेश हा मानवी मस्तकाच्या वैशिष्ट्यांसह आपले वेगळेपण दर्शवतो. चीनमध्ये गणपती विघ्नहर्ता नसून विघ्नकर्ता आहे. त्याला अडथळे आणणारा म्हणून चित्रित केले जाते. जपानमध्ये, गणेशाचे एक लोकप्रिय रूप म्हणजे दोन गणेश एकमेकांना आलिंगन देतात. गणेशाचे हे रूप ८ व्या शतकात चीनमधून जपानमध्ये बौद्ध धर्माच्या माध्यमातून गेल्याचे संशोधक नमूद करतात. म्हणूनच या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारताबाहेरील संस्कृतींमध्ये गणपतीची पूजा कशी केली जाते, ते समजून घेणे संयुक्तिक ठरावे.

जपानचा कांगितेन

जपानमध्ये, गणपतीला ‘कांगितेन’ म्हणून संबोधले जाते, गणरायाचे हे रूप जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे. जपानमध्ये गणेशाला वेगवेगळ्या रुपात दर्शविण्यात आले होते. या वेगवेगळ्या स्वरूपातील कांगितेन हे रूप विशेष प्रसिद्ध आहे. या रुपात दोन गणेश एकमेकांना आलिंगन देताना दर्शविले जातात. हे गजशीर असलेले नर आणि मादी प्रणयात एकमेकांना मिठी मारत असल्याचे चित्रित केलेले आहे. इतर काही रूपांमध्ये चतुर्भुज गणेशाच्या हातात मुळा आणि गोड पदार्थ दाखविले जातात. जपानमध्ये कांगितेनचे पहिले स्वरूप ८ व्या-९ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. गणेशाचे भारतीय अंकन सर्वात आधी चीनमध्ये गेले मग तेथून ते जपानमध्ये गेल्याचे मानले जाते. गणेशाचे हे रूप पुष्कळ सामर्थ्यवान आणि संपन्न असल्याचे जपानमध्ये मानले जाते. जपानमध्ये कांगितेनची पूजा सामान्यतः व्यापारी आणि अभिनेते यांच्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे.

तिबेट आणि दीपंकर अतिश

तिबेट मध्ये बौद्ध धर्मातील गणेशाची ओळख ११ व्या शतकात भारतीय बौद्ध धर्मगुरू अतिश दीपंकर सृजन आणि गयाधर यांनी केली. तिबेटमधील गाणपत्य पंथाचे संस्थापक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अतिश यांनी भारतातील तांत्रिक स्वामींनी लिहिलेल्या गणेशावरील अनेक भारतीय ग्रंथांचे तिबेटन भाषेत भाषांतर केले आहे. दुसरीकडे, गायधरा, हे काश्मीरमधील होते. त्यांनी तिबेटमधील गणेशपंथासाठी गणेशाशी संबंधित अनेक भारतीय ग्रंथांचे भाषांतर करून देण्याचे काम केले. तसेच गणेशाची उपासना आणि गणेशाची साधना तिबेटमध्ये लोकप्रिय केली.

तिबेटी लोकांनी गणेशाशी सलंग्न पंथ वाढविला, संबंधित कथनांचा प्रसार केला. १७ व्या शतकातील गणेशाशी संबंधित मिथकं, त्याच्या जन्माच्या विविध कथा आणि प्रसंग सांगतात. या कथांनुसार शिवाला उमा आणि गंगा या दोन पत्नी होत्या. उमा हिने दिलेल्या शापामुळे गंगेच्या नवजात मुलाने शीर गमावले. नंतर, गंगेला तिच्या मुलाचे शीर बदलण्यासाठी मृत शरीराचे शीर वापरण्याचा सल्ला दिला जातो आणि अशा प्रकारे गजमुख गणेश जन्माला येतो. गणेशावरील तिबेटी दंतकथा मूलत: भारतीय पुराणातील कथांसारख्याच आहेत.

तिबेटी दंतकथा

तिबेटी पौराणिक कथांमध्ये गणेशाशी संबंधित अनेक आख्यायिका आहेत. त्यातील एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार , लामा धर्माची संस्था स्थापन करण्यात गणेशाची भूमिका महत्त्वाची होती. बौद्ध धर्माचे अभ्यासक वाय. कृष्ण यांनी नमूद केल्याप्रमाणे ११ व्या किंवा १२ व्या शतकात गणपतीने शाक्य पंडिताच्या भावाला आपल्या सोंडेत धरले आणि मेरू पर्वताच्या शिखरावर खाली बसवले आणि भविष्यवाणी केली, की ‘एक दिवस तिबेटच्या सर्व प्रांतांवर त्याच्या वंशजांचे राज्य असेल’. त्यामुळेच तिबेटी संस्कृतीत गणेशाच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

थायलंडमध्ये बौद्ध गणेशाचा जन्म

गणेशाला थायलंडमध्ये ‘फिरा फिकानेट’ म्हणून संबोधले जाते. यशाची देवता आणि सर्व अडथळे दूर करणारा म्हणून त्याची पूजा केली जाते. थाई बौद्धांमध्ये नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा लग्नाच्या प्रसंगी या देवतेची पूजा करणे सामान्य मानले जाते. कला आणि संस्कृतीशी निगडीत थायलंडच्या ललित कला विभागाच्या चिन्हाचा-लोगोचा एक भाग म्हणून गणेशाची प्रतिमा वापरली जाते. संपूर्ण थायलंडमध्ये गणेशाच्या मूर्ती आणि मंदिरे आढळतात, बँकॉकच्या रत्चाप्रसाँग शॉपिंग डिस्ट्रिक्टमध्ये असलेली गणेशाची प्रतिमा प्रसिद्ध आहे. भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जाते त्याच वेळी थाई बौद्ध गणेशाचा जन्म साजरा करतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How ganpati ganesh became popular in south east asian countries before india how tibet china japan indonesia svs

First published on: 23-09-2023 at 14:05 IST
Next Story
जातीआधारित स्वतंत्र मतदारसंघाला गांधींनी विरोध का केला होता?