पंजाबमधील दोन नामांकित विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी अचानक हिंसक आंदोलने केल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. विद्यापीठात भूताचा वावर, विद्यार्थिनींचे अचानक बेपत्ता होणे, तरुणीवर झालेला बलात्कार आणि आत्महत्येच्या कथित घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा कडेलोट झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही विद्यापीठांना आपल्या नियमित परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. तसेच पुढील १० दिवसांसाठी सुट्टीही जाहीर करावी लागली. अवघ्या २४ तासांत घडलेल्या या प्रकारांमुळे राज्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील विद्यापीठांमध्ये नेमके काय घडले? विद्यार्थ्यांच्या या दुहेरी उद्रेकामागचे कारण काय? त्याविषयीचा हा आढावा…

भूत दिसल्याच्या अफवेने विद्यापीठात खळबळ

पंजाबमधील नामांकित खासगी शिक्षण संस्था असलेल्या चितकारा विद्यापीठात शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रात्री भुताची अफवा पसरल्याने प्रचंड घबराट उडाली, ज्याचे रूपांतर नंतर मोठ्या हिंसक आंदोलनात झाले. काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती आणि तिचाच आत्मा विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचा दावा काही तरुणींनी केला. तसेच वसतिगृहात सातत्याने किंचाळण्याचे आवाज ऐकू येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यादरम्यान वसतिगृहात एका पुजाऱ्याला पाचारण करण्यात आल्याची आणि दोन विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची आणखी एक अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली. विद्यापीठ प्रशासनाने या गोष्टीकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी परिसरात जमा झाले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. यावेळी अनेकांनी घोषणाबाजी करून दगडफेक केल्याने विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेबाबत पोलिसांनी नेमके काय सांगितले?

या घटनेबाबत बनूरचे पोलीस उपअधीक्षक सुखदेव सिंह यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या तक्रारीची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल. विद्यापीठात भूत असल्याची अफवा नेमकी कोणी पसरवली. विद्यार्थिनींच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी वसतिगृहात रात्री किंचाळ्या कोण मारत आहे, तसेच खरंच कोणी बेपत्ता झाले आहे का याचा शोध घेतला जाईल आणि विद्यापीठाच्या नोंदीही तपासली जाईल. या आंदोलनादरम्यान दगडफेक आणि तोडफोडीच्या हिंसक घटना घडल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तातडीने मध्यावधी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विद्यार्थ्यांना १० दिवसांची सुट्टीही जाहीर केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना ही फक्त समाजमाध्यमांवरील अफवा असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. याबाबत बनूरचे ठाणेदार गुरसेवक सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुताच्या या अफवेची सुरुवात २३ सप्टेंबर रोजी काही मुलींनी केलेल्या मस्करीमुळे झाली होती. त्यावेळी वसतिगृह अधीक्षकांनी सर्व खोल्यांची झडती घेतली, मात्र त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. तरीही विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढत गेली आणि काही वर्षांपूर्वी येथे आत्महत्या झाली असून तिचा आत्मा फिरत असल्याची अफवा पसरली.

विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा आरोप

चितकारा विद्यापीठातील मोठ्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी जालंधर जिल्ह्यातील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक आंदोलनाला सुरुवात केली. वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा आणि त्यानंतर तिने आत्महत्या केल्याची वार्ता समाजमाध्यमांवर पसरल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहात राहणाऱ्या एका तरुणीवर विद्यापीठातील कर्मचाऱ्याने बलात्कार केला आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली. तसेच, विद्यापीठ प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुमारे दोन हजार विद्यार्थी वसतिगृहाजवळ जमा झाले होऊन न्यायाची मागणी करू लागले. त्याचवेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि विद्यार्थ्यांनी महामार्ग रोखून वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. तसेच विद्यापीठावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि काही खोल्यांना आगही लावली. समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी कॅम्पसमध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या भारतीय हवाई दलाच्या ‘मिग-२३’ लढाऊ विमानावर चढलेले दिसले, तर काहीजण लष्करी रणगाड्यावर उभे राहून घोषणाबाजी करताना दिसले.

पोलिसांकडे बलात्काराची तक्रारच नाही

परिस्थिती काहीशी निवळल्यानंतर कपूरथला येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव तूरा यांनी सांगितले की, समाजमाध्यमांवर फिरत असलेला दावा ११ ऑगस्टचा आहे. एका तरुणीवर बलात्कार झाल्याचा आणि तिने आत्महत्या केल्याचा दावा काहीजण करत आहेत. मात्र, आमच्याकडे त्यासंदर्भातील कोणतीही तक्रार आलेली नाही. तरीदेखील या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल आणि खरंच असे घडले असल्यास दोषींना अटक करण्यात येईल. दुसरीकडे- लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वसतिगृहातील कोणत्याही विद्यार्थिनीबरोबर गैरकृत्य झालेले नाही. तसे असते तर आम्हीच स्वत:हून पोलिसांत तक्रार दाखल केली असतील. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी काही समाजकंटक या अफवा पसरवत असल्याचा आरोपही विद्यापीठाने केला आहे. त्या संदर्भात निवेदन काढण्यात आले असून विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंजामधील दोन नामांकित विद्यापीठांमध्ये उसळलेल्या आंदोलनाचे राजकीय पडसादही उमटले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलिसांना या घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून विरोधी पक्षांतील नेत्यांनी हे सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे.