प्रशांत महासागरात सुपर एल निनोची स्थिती निर्माण झाल्याने देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. सध्या मात्र सगळीकडे ढगाळ वातावरण असून अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) घेतलेल्या उपग्रह छायाचित्रांत देशातील सुमारे ९५ टक्के भूभागावर दाट ढगांचे आच्छादन निर्माण झाल्याचे दिसून येते. सामान्यत: एल निनोमुळे नैऋत्य मान्सून कमकुवत राहण्याची आणि दुष्काळाचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. तरीदेखील देशभरात अचानक पावसाला सुरुवात कशी झाली? त्याबाबत हवामान तज्ज्ञांचे मत काय? त्याविषयीचा हा आढावा…
एल निनोचा प्रभाव असूनही ढगांची गर्दी का?
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यंदाच्या हंगामात प्रथमच राज्यात सर्वत्र पावसाची नोंद करण्यात आली. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. सध्या अनेक भागात वादळी वारे वाहत असून समुद्राला उधाण येण्याची शक्यता लक्षात घेऊन किनारपट्टी भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. दीर्घकालीन हवामानावर परिणाम करणारे जागतिक हवामान घटक आणि प्रादेशिक वातावरणीय प्रणाली यांतील फरक यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एल निनोसारखे जागतिक हवामान घटक अनेक महिन्यांतील पर्जन्यमानावर प्रभाव टाकतात; तर मान्सून प्रणाली आणि स्थानिक वातावरणीय घडामोडीमुळे वातावरणात वारंवार बदल होत असतात. त्यामुळे ‘सुपर एल निनो’ सक्रिय असतानाही देशातील अनेक भागांत सध्या मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण होत असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
सुपर एल निनोचा प्रभाव कसा वाढत आहे?
सध्या प्रशांत महासागरातील ‘निनो ३.४’ क्षेत्रातील पृष्ठभागाचे तापमान नेहमीपेक्षा २.० अंश सेल्सिअसने वाढले आहे. या परिस्थितीने सुपर एल निनोची मर्यादा ओलांडली असून हा प्रभाव २०२७ च्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामान्य स्थितीत ला निनाच्या काळात प्रशांत महासागरातील उबदार पाण्यामुळे दक्षिण आशियातील दमट आणि उष्ण हवा वातावरणाच्या वरच्या दिशेने सरकते. या स्थितीमुळे भारतात नैऋत्य मान्सूनला मोठे बळ मिळते. मात्र, एल निनोच्या काळात महासागरातील सर्वाधिक उबदार पाणी दक्षिण अमेरिकेच्या दिशेने पूर्वेकडे सरकते. त्यामुळे भारतीय उपखंडावर कोरडी हवा येण्याची प्रमाण वाढते आणि पावसाचे ढग तयार होण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. याच जागतिक बदलांमुळे भारतीय हवामान विभागाने यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० ते ९२ टक्केच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता; त्याचवेळी जूनच्या अखेरीस देशात २० टक्क्यांहून अधिक पावसाची तूट नोंदवण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते, एल निनो हा दैनंदिन हवामानावर नव्हे तर मोसमी पावसाच्या एकूण संभाव्यतेवर परिणाम करतो. म्हणजेच, तो काही महिन्यांच्या कालावधीतील हवामानाची दिशा ठरवू शकतो; पण एखाद्या विशिष्ट आठवड्यात हवामान कसे असेल हे तो ठरवू शकत नाही.
प्रादेशिक हवामान प्रणालीची एल निनोवर मात
सध्या सगळीकडे दिसणारे दाट ढगांचे आच्छादन हे देशातील विविध भागात सक्रिय झालेल्या प्रादेशिक हवामान प्रणालीमुळे तयार झाले. या प्रणालींनी तात्पुरत्या स्वरूपात का होईना एल निनोच्या कोरड्या प्रभावावर मात केली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हरियाणा, ईशान्य मध्य प्रदेश आणि नैऋत्य राजस्थान या भागांवर सध्या चक्रीय वाऱ्यांची अनेक केंद्रे तयार झाली. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. या सर्व हवामान प्रणाली एकत्र येऊन बाष्प वाहून नेणाऱ्या एका मोठ्या यंत्रणेसारखे काम करतात. त्या एकाच वेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्हीकडून बाष्पयुक्त वारे खेचून आणतात. परिणामी एल निनोचा प्रभाव असूनही संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर ढग तयार झाल्याचे दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, चक्रीय वाऱ्यांची केंद्रे ही कमी दाबाच्या क्षेत्राच्या तुलनेने लहान असतात, जिथे हवा एकत्र येऊन वरच्या दिशेने जाते. एल निनो सामान्यतः अशा प्रणालींची निर्मिती कमी करण्यास पोषक वातावरण तयार करतो. तरीही, स्थानिक वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्यास अशा हवामान प्रणाली तयार होण्यापासून तो रोखू शकत नाही.
पश्चिमी विक्षोभामुळे देशभरात ढगांची दाटी
देशभरात दाट ढगांचे आच्छादन तयार होण्यापूर्वी अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट होती. किनारपट्टी तसेच अंतर्गत भागांमध्ये स्थानिक पातळीवर ‘हीट डोम’ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तापमानातील तीव्र फरकामुळे जमिनीवर कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्यास मदत झाली. त्यामुळे अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर दमट हवा भारताच्या दिशेने खेचली गेली. ही दमट हवा वेगाने वर गेल्यामुळे मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती झाली. त्याचवेळी उत्तर-पश्चिम भारतात पश्चिमी विक्षोभ या अतिरिक्त उष्णकटिबंधीय हवामान प्रणालीनेही पावसाची तीव्रता वाढवली. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभ आणि दमट मान्सून वाऱ्यांचा संगम झाला. वरच्या स्तरावरील थंड हवा आणि उष्ण दमट हवेच्या मिश्रणामुळे मोठ्या प्रमाणावर ढग तयार झाले आणि अनेक भागांत मुसळधार पावसाची सुरुवात झाली.
मान्सून आता पूर्वपदावर आला आहे का?
तज्ज्ञांच्या मते, सध्या देशभरात पडणारा पाऊस पाहता मान्सून पूर्णपणे पूर्वपदावर आल्याचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असून अनेक भागांतील उभ्या पिकांनाही फायदा झाला आहे. मात्र, मान्सूनमधील तूट ही जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामातील पर्जन्यमानाच्या आधारे मोजली जाते. केवळ काही दिवसांचा पाऊस ही तूट भरून काढू शकत नाही. सध्याची कमी दाबाची क्षेत्रे आणि चक्रीय वारे कमकुवत झाल्यानंतर ‘सुपर एल निनो’चा प्रभाव पुन्हा वरचढ ठरू शकतो. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सूनच्या उर्वरित काळात पावसाची तूट राहण्याचा धोका कायम आहे. सध्याची परिस्थिती हवामानशास्त्रातील एक महत्त्वाचा धडा अधोरेखित करते. जागतिक हवामानावर परिणाम करणारे घटक आणि रोजच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या प्रादेशिक प्रणाली नेहमीच एकाच वेळापत्रकानुसार कार्य करत नाहीत. एल निनो अनेक महिन्यांच्या कालावधीत पावसाची शक्यता कमी करण्याची पार्श्वभूमी तयार करतो. मात्र, काही दिवस किंवा आठवड्यांसाठी प्रादेशिक हवामान प्रणाली त्याच्या प्रभावावर मात करू शकतात. त्यामुळे सध्या भारतात पसरलेली ढगांची चादर म्हणजे ‘सुपर एल निनो’ पूर्णपणे गायब झाला आहे, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
