How Indian Currency Has Beaten US Dollar : गेल्या वर्षभरात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली असली तरी प्रत्यक्ष चलनात असलेल्या भारतीय नोटांच्या संख्येने मात्र डॉलर आणि युरोलाही मागे टाकले आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर शिरीष चंद्र मुर्मू यांनी जकार्ता येथील बँक इंडोनेशियाद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ही महत्वपूर्ण माहिती दिली आहे. भारतात सध्या तब्बल १७६ अब्ज नोटा चलनात असून ही संख्या डॉलर आणि युरोच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जगभरातील बँकर्सना संबोधित करताना मुर्मू यांनी भारतातील रोख व्यवहारातील विरोधाभासाचाही उल्लेख केला आहे. भारतात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असताना वैयक्तिक व्यवहारांमध्ये रोखीचा वाटा कमी होत आहे. मात्र, त्याचवेळी चलनात असलेल्या एकूण रोख रकमेच्या संख्येत मात्र दुहेरी दराने वाढ सुरूच असल्याचे त्यांनी नमूद केले आहे, त्याविषयी…

भारतात किती रुपयांच्या नोटा चलनात आहेत?

सध्या भारतात विविध मूल्याच्या एकूण १७६ अब्ज म्हणजेच १७ हजार ६०० कोटी नोटा सध्या चलनात असल्याची माहिती आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर शिरीषचंद्र मुर्मू यांनी दिली. या नोटांमध्ये दोन रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतच्या विविध मूल्याच्या नोटांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. जकार्ता येथील आंतरराष्ट्रीय परिषदेतील उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारतात दरवर्षी २८ ते ३० अब्ज नोटांची छपाई करण्यात आली आहे. या नोटा सहा वेगवेगळ्या मूल्याच्या असून त्यापैकी जुन्या किंवा खराब झालेल्या सुमारे २१ अब्ज नोटा नष्ट करण्यात आल्या आहेत. या नोटांची संख्या पाहिल्यास देशभरातील चलनाच्या व्यवस्थापनाची व्याप्ती किती मोठी आहे, याची कल्पना येते, असेही त्यांनी नमूद केले.

भारतात ५०० रुपयांच्या किती नोटा?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, देशातील चलनात असलेल्या १७६ अब्ज नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ७ ऑगस्टपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरात ५०० रुपयांच्या ७,२५,७५५ नोटा चलनात होत्या आणि त्यांचे एकूण मूल्य जवळपास ३६.२९ लाख कोटी रुपये इतके होते. त्यापाठोपाठ १०० रुपयांच्या नोटांचा क्रमांक लागतो आणि या मूल्याच्या २,८०,२०६ नोटा चलनात असल्याचे समजते. त्याचवेळी २,००० रुपयांच्या अत्यंत कमी नोटा सध्या चलनात असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीत नमूद आहे. देशातील चलनी नोटांची छपाई प्रामुख्याने चार राज्यांतील केंद्रांवर केली जाते. त्यापैकी एक छापखाना महाराष्ट्रात, दुसरा मध्य प्रदेशात, तिसरा कर्नाटकात, तर चौथा पश्चिम बंगालमध्ये आहे. डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असतानाही भारतात चलनातील नोटांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे भारताच्या रोख अर्थव्यवस्थेची व्याप्ती अद्याप मोठी असल्याचे स्पष्ट होते.

रुपयाची डॉलर आणि युरोशी तुलना कशी?

चलनातील नोटांच्या संख्येचा विचार केल्यास भारतीय रुपयाने जगातील प्रमुख चलनांना मागे टाकले आहे. भारतात सध्या १७६ अब्ज नोटा चलनात असून त्या तुलनेत अमेरिकेत केवळ ५६ अब्ज डॉलरच्या नोटा चलनात असल्याचे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर शिरीषचंद्र मुर्मू यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ भारतातील चलनी नोटांची संख्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तिप्पट आहे. त्याचवेळी युरोच्या सुमारे ३० अब्ज नोटा सध्या चलनात असल्याचे समोर आले आहे. युरोपियन सेंट्रल बँकेनुसार, युरोच्या नोटांच्या दोन मालिका आहेत. पहिल्या मालिकेत ५, १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० युरो अशा सात मूल्यांच्या नोटा आहेत. दुसऱ्या मालिकेला ‘युरोपा सिरीज’ म्हटले जाते. त्यामध्ये सहा मूल्यांच्या नोटा आहेत, कारण ५०० युरोची नोट चलनातून कायमस्वरुपी बंद करण्यात आली आहे.

Currency Notes Circulation India 176 Billion, 500 Rupee Notes Total Worth India
भारतीय चलनातील नोटा (छायाचित्र रॉयटर्स)

भारतात नोटांची संख्या एवढी जास्त का?

भारत आणि अमेरिका तसेच युरोपमधील चलनातील नोटांच्या संख्येत एवढा मोठा फरक का आहे, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत मुर्मू यांनी सांगितले की, भारतामध्ये कमी मूल्याच्या नोटांचे प्रमाण अधिक असल्यामुळे चलनातील नोटांची संख्या मोठी आहे. अमेरिकन डॉलर आणि रुपयाच्या नोटांच्या संख्येतील तुलना करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे लहान मूल्याच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे तितक्याच मूल्याच्या व्यवहारांसाठी लोकांच्या हातातून अधिक संख्येने नोटांची देवाणघेवाण होते, तर अमेरिकेत मोठ्या मूल्याच्या नोटा तसेच सर्वाधिक डिजिटल व्यवहार असल्यामुळे त्यांची संख्या दिसून येत नाही.

आरबीआय चलनाची मागणी कशी ठरवते?

आरबीआयकडून नोटांची छपाई करण्यापूर्वी दरवर्षी पुढील पाच वर्षांसाठी चलनाच्या मागणीचा अंदाज तयार केला जातो. हा अंदाज प्रामुख्याने व्यवहारासाठीची मागणी आणि जुन्या नोटा बदलण्यासाठीची मागणी या दोन प्रकारावर आधारित असतो. मुर्मू यांच्या मते, व्यवहारासाठीच्या चलनाची मागणी ही चलनातील अपेक्षित बदलांवर आधारित असते आणि ती जीडीपी वाढ, व्याजदर, अन्नधान्याची महागाई आणि डिजिटल पेमेंटचा स्वीकार यावर ठरवली जाते. जुन्या आणि खराब झालेल्या नोटा चलनातून काढून लोकांच्या हातात चांगल्या नोटा उपलब्ध करून देण्यासाठी ही मागणी मोजली जाते.

US Dollar Circulation vs Indian Rupee
अमेरिकन डॉलर आणि युरो (छायाचित्र रॉयटर्स)

रोख रकमेची मागणी का कायम आहे?

भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असतानाही चलनातील रोख रक्कम सातत्याने वाढत आहे. आरबीआयने याला ‘कॅश पॅराडॉक्स’ संबोधले आहे. आकडेवारीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी देशातील चलनातील रोख रक्कम ४२.७६ लाख कोटी रुपये होती. त्याआधी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अखेरीस म्हणजेच २०२६ च्या मार्चमध्ये ही रक्कम ४१.६६ लाख कोटी रुपये इतके असल्याचे समोर आले होते. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते, मौल्यवान धातू आणि रिअल इस्टेटसारख्या क्षेत्रांतील मोठ्या मूल्याच्या व्यवहारांसाठी अजूनही रोख रक्कम पसंत केली जाते. तसेच, फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक डिजिटल पेमेंटच्या तुलनेत रोख व्यवहारांना अधिक पसंती देत आहेत. याशिवाय दरवर्षी निवडणुकांच्या काळात रोख पैशांची मागणी वाढत असल्याने प्रत्यक्ष चलनाची गरज कायम मोठी आहे.

आरबीआयसमोर कोणकोणती आव्हाने?

रोख व्यवहाराचा वाटा कमी होत असतानाही चलनातील नोटांची संख्या आणि एकूण रोख रक्कम वाढत असल्यामुळे भविष्यातील रोख चलनाची मागणी किती असेल, याचा अंदाज बांधणे आरबीआयसाठी अधिक कठीण होत आहे. त्यामुळे नोटांची छपाई, साठवणूक, वितरण आणि देशभरातील चलन व्यवस्थापनासाठी आवश्यक क्षमता निश्चित करण्याचे कामही अधिक गुंतागुंतीचे होत आहे. यादरम्यान चलनातील अनेक नोटा खराब होत असल्याने आरबीआयने अधिक टिकाऊ आणि नक्कल शक्य नसणाऱ्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भारतीयांच्या खिसे-पाकिटातील कागदी नोटांचा काळ लवकरच संपणार असून त्याऐवजी प्लास्टिकच्या नोटा येण्याची शक्यता आहे. आरबीआयची उपकंपनी असलेल्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने गेल्या महिन्यात प्लास्टिक नोटांच्या छपाईसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. त्यात ३.४ कोटी पॉलिमर (प्लास्टिक) शीट्सची तातडीची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले होते. क्षेत्रीय चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणावर शीट्सची खरेदी करण्यात येणार असल्याचे संकेतही आरबीआयने दिले आहेत.