Indian Folk Tales Caste System History: समाजांना पिढ्यानपिढ्या मानसिक भावनिक आधार देण्याचं काम लोककथांनी केलं आहे. देव, वीरयोद्धा आणि पूर्वजांशी संबंधित या लोककथा केवळ मनोरंजनासाठी नव्हत्याच. त्या सामाजिक प्रतिष्ठा, मान-सन्मान, जातीय आणि सामाजिक स्थान याबद्दलही काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत होत्या. स्थानिक भाषांत गायल्या जाणाऱ्या या वीरकथा आणि लोकमहाकाव्यांमध्ये अनेकदा जातीय उतरंडीला आव्हान देणारा सूर उमटत असायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भारतातील सर्वच वीरगाथा, आख्यायिका किंवा महाकाव्ये ब्राह्मणांनी लिहिलेली नाहीत आणि ती सर्व संस्कृतमध्येही रचलेली नाहीत. असं मानणं हा एक मोठाच गैरसमज आहे.
जातीय सीमा कशा सैल पडतात?
वाळवंटाचं वरदान असलेल्या राजस्थानात फड ही चित्रकला (Phad Painting) स्थानिक लोकदेवतांच्या पराक्रम कथा सांगण्यासाठी वापरली जाणारी महत्त्वाची चित्रपरंपरा आहे. या परंपरेनुसार मोठ्या कापडी किंवा गुंडाळता येणाऱ्या पटावर कथा चित्रित केली जाते आणि तिच्या आधारानं गायन-कथन केलं जातं. उदाहरणार्थ, ‘देवनारायण की फड’ आणि ‘पाबूजी की फड’ या परंपरांमध्ये गुर्जर आणि रबारी यांसारख्या पशुपालक समुदायांच्या वीरकथा सांगितल्या जातात. या कथांतील नायक सामाजिकदृष्ट्या क्षत्रियांपेक्षा कनिष्ठ मानल्या गेलेल्या समुदायांमधून आलेले असले, तरी कथेत ते थेट राजांना आव्हान देतात, आपला पराक्रम सिद्ध करतात आणि अखेरीस देवतांच्या रूपात पूजलेही जातात.
शौर्य हेचं प्रतिष्ठेचं साधन
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात प्रसिद्ध असलेल्या ‘आल्हा खंड’ या बाराव्या शतकातल्या वीर काव्यात बुंदेलखंडातले बनाफर वंशातले बंधू आल्हा आणि उदल यांच्या पराक्रमाची कथा सांगितली जाते. त्यांना कनिष्ठ किंवा कमी प्रतिष्ठेचे राजपूत म्हणून पाहिलं जात असलं, तरी रणांगणावर त्यांनी आपली योग्यता आणि पराक्रम सिद्ध केला होता. मात्र त्यांनी दाखवलेल्या शौर्यानंतरही त्यांच्यावरचा सामाजिक कलंक पूर्णपणे नाहीसा होत नाही. या कथा त्यामुळे केवळ युद्ध पराक्रमाची गाथा राहत नाहीत. त्या तत्कालीन योद्धा समाजातील वंश, कुलप्रतिष्ठा आणि सामाजिक दर्जाबाबतची अस्वस्थताही उघड करतात.
भक्तीने अशा मिटवल्या जातीच्या सीमा
पंजाबमधील पूरण भगत आणि इतर संतांच्या लोकगाथांमध्ये असेही राजपुत्र दिसतात, जे राजसत्ता आणि उच्च सामाजिक स्थानाचा त्याग करून संन्याशांचे जीवन स्वीकारतात. या परिवर्तनामुळे उच्च जन्म आणि निच्च सामाजिक स्थान यांच्यातील भेद काही प्रमाणात धूसर होतो. राजपुत्र असलेली व्यक्ती सर्व काही त्यागून साधू झाली की, तिची प्रतिष्ठा जन्मावर आधारित राहात नाही; ती तपस्या, वैराग्य आणि आध्यात्मिक सामर्थ्यावर आधारलेली होते. गुजरातमध्ये रामदेव पीर आणि इतर लोकदेवतांच्या कथांमध्येही असा प्रवाह दिसतो. याच प्रदेशात राजपूत पार्श्वभूमीशी जोडल्या गेलेल्या देवतांची दलित आणि मुस्लीम समुदायांमध्येही भक्ती केली जाते. येथे भक्तीची भावना जात आणि धार्मिक सीमा ओलांडण्याचं माध्यम होते.
महाराष्ट्रात खंडोबाचं योगदान काय?
महाराष्ट्रात खंडोबाच्या कथांमध्ये, विशेषतः खंडोबा-कथेत, जातीय प्रतिष्ठा आणि पशुपालक जीवन यांच्यातला तणाव प्रतीकात्मक स्वरूपात दिसतो. खंडोबाच्या दोन पत्नींपैकी एक उच्चजातीय परंपरेशी जोडली जाते, तर दुसरी धनगर समाजाशी. या दोन्ही पत्नींमधील संघर्षाकडे केवळ कौटुंबिक संघर्ष म्हणून पाहता येत नाही. त्यात एका बाजूला उच्चजातीय सामाजिक प्रतिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला पशुपालक समुदायाची लोकपरंपरा यांच्यातील ऐतिहासिक ताण प्रतिबिंबित झालेला दिसतो.
कर्नाटकचं मैलार महात्म्य
कर्नाटकातल्या ‘मैलार लिंग माहात्म्य’मध्येही साधारण अशीच रचना दिसते. शिवाचं लोकदैवत रूप मानला जाणारा मैलार एका बाजूला ब्राह्मण धार्मिक परंपरेशी जोडला जातो, तर दुसऱ्या बाजूला कुरुबा मेंढपाळ समुदायाच्या भक्तीशीही त्याचा गाढ संबंध दिसतो. यातून लोकदैवत वेगवेगळ्या सामाजिक विश्वांमध्ये सहजपणानं वावरताना दिसतं.
आंध्र-तेलंगणातील लोककथा काय सांगतात?
आंध्र प्रदेश आणि तेलंगणात ‘पालनाटी वीरुल कथा’ हे बाराव्या शतकातलं तेलुगु मौखिक महाकाव्य म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात एका ऐतिहासिक युद्धाचं वर्णन आहे. तेव्हा काही सुधारकांनी निम्न जातीय समूहांना सैन्यात सामील करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पारंपरिक उच्चवर्गीय गटांकडून तीव्र विरोध निर्माण झाला. यातून युद्धकथेबरोबरच सत्तेत सहभाग कोणाला मिळावा, हा सामाजिक प्रश्नही समोर येतो.
गंगम्माची विद्रोही लोककथा
आंध्र-तेलंगणा प्रदेशात गंगम्मा कथासारख्या स्थानिक देवीच्या आख्यायिकाही महत्त्वाच्या आहेत. गंगम्मा दलित वस्त्यांमध्ये वावरते आणि तरुण स्त्रियांचं शोषण करणाऱ्या उच्चजातीय पुरुषाचा वध करते. मात्र, पुढे घडतं असं की, वर्चस्ववादी जातीय परंपरा त्या देवीला आपल्या धार्मिक व्यवस्थेत सामावून घेतात. यातून एक महत्त्वाची बाब दिसते. ती म्हणजे, दैवी शक्ती केवळ सामाजिक केंद्रातूनच नव्हे, तर उपेक्षित समाजातूनही उगम पावू शकते.
तमिळनाडूत प्रेम, शिक्षा आणि नंतर देवत्व
तमिळनाडूतल्या ‘मदुराई वीरन कथै’मध्ये निम्न जातीत जन्मलेल्या एका वीराची कथा सांगितली जाते. हा वीर राजघराण्यातील एका स्त्रीवर प्रेम करतो. प्रेमसंबंधासाठी त्याला शिक्षा दिली जाते आणि अखेरीस त्याची हत्या होते. मृत्यूनंतर मात्र त्याच व्यक्तीला देवत्व प्राप्त होतं. लोकदेवता म्हणून तिची पूजा केली जाऊ लागते. ‘अण्णम्मार कथै’मध्ये शेतकरी जातींमधली प्रतिष्ठा, सन्मान आणि परस्परसंबंधांचे प्रश्न दिसतात. या कथांमध्ये वारंवार एकच पॅटर्न समोर येतो. तो म्हणजे, प्रेम, निष्ठा आणि शौर्य जातीच्या सीमा ओलांडून जातात; म्हणूनही समाज त्यांना शिक्षा देतो आणि नंतर त्याच व्यक्तींना पवित्र किंवा दैवी स्थानही देतो.
सर्व जातींचा उगम एकच?
केरळमधील ‘ऐतिह्यमाला’ किंवा ‘इतिह्यमाला’ या दंतकथांच्या संग्रहात वररुची नावाच्या ब्राह्मणाची कथा आढळते. वररुची एका परया समाजातील स्त्रीशी विवाह करतो. त्यांच्या मुलांचं संगोपन वेगवेगळ्या समाजगटांमध्ये होतं. हीच मुलं विविध जातींची संस्थापक मानली जातात. या कथेतून जातीच्या वेगळेपणाच्या दाव्यालाच अप्रत्यक्ष आव्हान दिलं गेलं आहे. समाज वेगवेगळ्या जाती मानत असला, तरी त्यांचा उगम एकाच कुटुंबातून असू शकतो हा मांडला जाणारा संदेश तत्कालीन सामाजिक व्यवस्थेमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा होता.
जात बहिष्काराला लक्ष्मीपुराणाचं आव्हान
ओडिशातलं ‘लक्ष्मीपुराण’ जात बहिष्कारावर थेट प्रहार करणारं साहित्य मानलं जातं. या कथेनुसार देवी लक्ष्मी एका निम्न जातीय स्त्रीच्या घरी जाते. त्यामुळे जगन्नाथ तिला मंदिरातून बाहेर काढतात. मात्र अडचण अशी होते की, लक्ष्मीच्या अनुपस्थितीत देवांनाच अन्न मिळेनासं होतं. त्यांना उपासमारीचा सामना करावा लागतो. या कथेतून दिला जाणारा संदेश साफ असतो. तो म्हणजे, समृद्धी, अन्न आणि दैवी कृपा जातीय शुद्धतेच्या नियमांना बांधिल राहत नाहीत. ‘कांची अभिजान’मध्ये तर झाडू मारण्याचा धार्मिक विधी केल्यामुळे एका राजाची खिल्ली उडवली जाते. यात राजसत्तेचा अभिमान आणि विधीमध्ये करावी लागणारी सेवकाची भूमिका यांच्यातला तणाव उघड होतो.
बंगालमध्ये संघर्ष लोकदेवता विरुद्ध ब्राह्मण सत्ता
बंगालमध्ये धर्म ठाकूर आणि इतर ग्रामदेवतांच्या कथांमध्ये सीमांत किंवा निम्न सामाजिक गटांशी संबंधित देवता अनेकदा ब्राह्मण धार्मिक सत्तेला आव्हान देताना दिसतात. आजही धर्म ठाकूराला मातीचे घोडे अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. बंगालमधील मंगलकाव्ये आणि चंडीमंगल यांसारख्या परंपरांमध्येही व्यापारी, शिकारी आणि सामान्य लोकांना मदत करणाऱ्या लोकदेवतांच्या कथा सांगितल्या जातात. या कथांमध्ये दैवी कृपा केवळ उच्च सामाजिक वर्गापुरती मर्यादित राहात नाही.
हिमालयीन प्रदेशात जात अस्तित्वात होती, पण…
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि नेपाळच्या सीमावर्ती भागांतल्या स्थानिक देवतांच्या आख्यायिकांमध्येही जातींच्या संबंधांचे वेगळं चित्र दिसतं. तिथे अनेक ग्रामदेवता सर्व जातींतील लोकांकडून अर्पण स्वीकारत असत. मात्र उत्सव आणि धार्मिक विधींमध्ये प्रत्येक जात किंवा समुदायाला विशिष्ट भूमिका दिली जात असे. या देवतांकडे गावाचं रक्षण करणाऱ्या, संकटात मदत करणाऱ्या तर कधी भय निर्माण करणाऱ्या शक्ती म्हणूनही पाहिलं जात असे.
आदिवासी पट्ट्यामध्ये जात बिनमहत्त्वाची
उत्तराखंडात घोडेस्वार गोलू देवता लोकप्रिय आहेत, तर हिमाचल प्रदेशात महासू देवता. इथे त्यांचे बंधू रक्षणकर्ते मानले जातात. झारखंड, छत्तीसगड आणि मध्य भारतातल्या आदिवासी पट्ट्यांमध्ये पूर्वज आणि आत्म्यांशी संबंधित अनेक मौखिक महाकाव्ये ब्राह्मणवादी जातीय उतरंडीला फारसं महत्त्व देत नाहीत. त्या ऐवजी कुळ, जमीन, पूर्वज आणि स्थानिक समुदाय हे सामाजिक ओळखीचे अधिक महत्त्वाचे आधार ठरतात.
जात होती, पण निर्विवाद नव्हती
देशभरातल्या या विविध लोककथा एकत्र पाहिल्या की लक्षात येतं, जात व्यवस्था लोककथांमधून कधीही पूर्णपणे गायब झालेली नव्हती. उलट, सामाजिक दर्जा, जन्म, प्रतिष्ठा आणि जातीय मर्यादा या साऱ्याचं प्रतिबिंब त्यात सतत उमटतच होतं. मात्र त्याचवेळी जात हा घटक कधीही पूर्णपणे स्थिर, अपरिवर्तनीय किंवा निर्विवादही नव्हता. इथे, उच्च सामाजिक गट आपली प्रतिष्ठा आणि वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतील, तर देव मात्र अनेकदा माणसांनी आखलेल्या सामाजिक सीमांच्या पलीकडे जाताना दिसतात. म्हणून भारतीय लोकपरंपरेतून डोकावणारी जात हा केवळ कठोर सामाजिक नियमांचा प्रश्न नव्हता; ती वाटाघाटी, संघर्ष, स्वीकार, समावेश, विरोध आणि रिडिफाइन होत राहणारी एक सामाजिक व्यवस्थासुद्धा होती.
या लोककथा नेमकं काय सांगतात?
एकूणच भारतातल्या विविध प्रदेशांमधल्या लोककथा केवळ देव-वीरांच्या कथा सांगत नाहीत; त्या भारतीय समाजात प्रतिष्ठा कोणाला मिळते, ती जन्मामुळे मिळते की शौर्यामुळे? भक्ती ही सामाजिक सीमा ओलांडू शकते का ? उपेक्षित समूह स्वतःसाठी सन्मानाचे नवे आधार निर्माण करू शकतात का, अशा काही कळीच्या प्रश्नांचीही उत्तरं देतात.
(देवदत्त पट्टनायक हे कला, संस्कृती आणि वारसा या विषयांवर लेखन करणारे प्रसिद्ध पुराणकथांचे अभ्यासक आहेत.)
विषयाशी संबंधित प्रश्न:
१. प्रादेशिक लोक-महाकाव्ये एकाच वेळी जातव्यवस्थेला बळकटी देणारी साधनं आणि जातीय स्थानाबाबत वाटाघाटी करण्याची सांस्कृतिक क्षेत्रं म्हणून कार्य करत होती. भारतातील विविध प्रदेशांतील योग्य उदाहरणांसह चर्चा करा.
२. “भारतात जात कधीच अनुपस्थित नव्हती; पण ती कधीच पूर्णपणे स्थिरही नव्हती.” प्रादेशिक वीरगाथा आणि लोकदेवतांच्या परंपरांच्या उदाहरणांच्या आधारे या विधानाचे विश्लेषण करा.
३. भारतीय लोकपरंपरांमध्ये भक्ती, शौर्य आणि बलिदान हे जन्माधारित प्रतिष्ठेला पर्यायी सामाजिक वैधता देणारे स्रोत कसे बनले? स्पष्ट करा.
४. जात आणि समुदायांच्या सीमा ओलांडून सामाजिक समन्वय घडवण्यात लोकधर्माने कोणती भूमिका बजावली?
