इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका व इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात २८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला. तब्बल १२५ दिवस अयातुल्ला अली खामेनी यांचा मृतदेह इराणने जतन करून ठेवला. इराणची राजधानी तेहरानमध्ये ‘ग्रँड मोसल्ला’ येथे ४ जुलै रोजी खामेनी यांच्या मृतदेहाच्या अंत्यविधीला सुरूवात झाली आहे.
इराण मधील सामान्य नागरिकांना अयातुल्ला अली खामेनी यांना शेवटचे पाहता यावे म्हणून त्यांची शवपेटी अधिकृतपणे सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. खामेनी यांच्या मृतदेहाचे जतन दीर्घकाळ जतन करण्यात आले. तसेच त्याासाठी इस्लामिक अंत्यविधीशी संबंधित नियमांचेही पालन करण्यात आले. इराण युद्धाच्या विळख्यात अडकल्याने खामेनी यांचा अंत्यविधी लांबणीवर पडला.
इराणने अयातुल्ला अली खामेनी यांचा मृतदेह जतन कसा केला?
अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह मृत्यूमुखी पडलेल्या त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृतदेह जतन करून ठेवण्याचे आव्हान इराण समोर होते. मृतदेहांना सुस्थितीत जतन करून ठेवण्यासाठी केमिकल्सचा वापर करणे इराणने टाळले. त्याऐवजी एका मोठ्या ‘रेफ्रिजरेटेड मेडिकल कोल्ड स्टोरेज’मध्ये त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता.
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृतदेहाचे जतन करण्यासाठी व अंत्यविधीसाठी इराणने एक विभाग स्थापन केला होता. त्या विभागानुसार व आंतरराष्ट्रीय न्यायवैद्यकीय विश्लेषकांच्या मते, खामेनी यांचा मृतदेह रसायनांचा वापर करून जतन करणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘रेफ्रिजरेटेड मेडिकल कोल्ड स्टोरेज’चा वापर करणे अनिवार्य होते. शिया व सुन्नी इस्लामच्या नियमांनुसार, मृतदेहावर रसायनांचा वापर करण्यास मनाई आहे.
रसायनांचा वापर करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीरातील नैसर्गिक द्रव बाहेर काढले जातात आणि त्यांच्या जागी फॉर्मल्डिहाइड-आधारित रसायने शरीरात भरली जातात. या प्रक्रियेमुळे मृतदेहाचे नुकसान होते, तसेच त्याचे पावित्र्य राखले जात नाही, असे मानले जाते. त्यामुळे मृतदेह १२५ हून अधिक दिवसांसाठी जतन करण्यासाठी रसायनांऐवजी विशेष शीतगृहाचा वापर करण्यात आला.
‘रेफ्रिजरेटेड मेडिकल कोल्ड स्टोरेज’मध्ये (शीतगृह) ऊतींचे सुकणे आणि पेशींचे विघटन रोखण्यासाठी अत्यंत नियंत्रित आर्द्रता पातळीसह, गोठणबिंदूच्या अगदी वरचे एक स्थिर, अनुकूल तापमान साधारणपणे २ अंश ते ४ अंश राखून ठेवले जाते. अयातुल्ला अली खामेनी यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांचे मृतदेह अशाच प्रकारे ठेवण्यात आले होते. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका – इस्रायलने केलेल्या हल्ल्यात खामेनींसह त्यांची मुलगी, जावई, सून आणि १४ वर्षांच्या एका नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
हवामान-नियंत्रित काचेच्या आवरणात मृतदेह
इस्लामिक परंपरेनुसार मृतदेहाचा दफनविधी हा जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर केला पाहिजे, असे सांगण्यात आले आहे. सामान्यत: मृत्यूनंतर २४ तासांत दफनविधी केला जातो. शिया कायद्यामध्ये आपात्कालीन परिस्थितीत मृतदेहाचा अंत्यविधी कसा करावा याबाबत काही गोष्टी स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे म्हटले जाते.
“मृतदेहांना सर्वोच्च सन्मानाने व काळजीने जतन केले आहे. त्यासाठी इस्लामिक पद्धती व कायद्यांचे पालन करण्यात आले. मृतदेहांना आतापर्यंत पुरण्यात आलेले नाही तसेच त्यांना इतर कोणाकडे सुरक्षित ठेवण्यातही आले नाही”, असे खामेनी यांच्या अंत्यविधीची जबाबदारी असलेल्या विभागाचे प्रवक्ते इमाम अत्तरजादेह यांनी म्हटले आहे.
चाहत्यांच्या अंत्यदर्शनासाठी अयातुल्ला अली खामेनी यांची शवपेटी एका खुल्या मंचावर ठेवण्यात आली आहे. खामेनी यांचा अंत्यविधी आठवडाभर चालणार आहे. इराणमध्ये जुलै महिन्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट आहे. प्रचंड गर्दीपासून मृतदेह सुरक्षित राहावा यासाठी शवपेटी एका विशेष हवामान-नियंत्रित काचेच्या आवरणात ठेवण्यात आली आहे. यामुळे शोकव्याकुळ झालेल्या लाखो समर्थकांना ध्वजात गुंडाळलेली आणि त्यांचे प्रतीक असलेली काळी पगडी ठेवलेली खामेनी यांची शवपेटी पाहता येत आहे, तर दुसरीकडे अंतिम दफनविधी पूर्ण होईपर्यंत मृतदेहाची स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी शवपेटीच्या सभोवतालची हवा थंड ठेवली जात आहे.
अयातुल्ला अली खामेनींचा दफनविधी कुठे होणार?
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत खामेनींवर अंत्यविधी करणे शक्य नव्हते. तसेच नेत्यांचे दफनविधी करताना समर्थकांचा मृत्यू होण्याचा धोकाही वाढतो. तसा रक्तरंजित इतिहास इराणचा आहे. खामेनी यांचा अंत्यविधी युद्धावेळी केला असता तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. सुरक्षेचा गंभीर प्रश्न उद्भवला असता. त्यामुळे खामेनी यांचा मृतदेह एका शीतगृहात ठेवण्यात आला. खामेनी यांच्या अंत्यविधीवेळी कोणताही हल्ला होऊ नये याची खात्री इराणने अमेरिकेकडून करून घेतली आहे.
इराणचे माजी सर्वोच्च नेते रूहोल्ला खामेनी यांचा दफनविधी १९८९ मध्ये झाला होता. त्यावेळी अंदाजे एक कोटी लोक जमा झाले होते. अत्यंयात्रेवेळी गदारोळ झाल्याने खामेनींच्या मृतदेहाचीही हेळसांड झाली होती. मृतदेहाला गर्दीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली होती. २०२० मध्ये इराणी जनरल कासीम सुलेमानी यांच्या अंत्यविधीवेळी ५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो लोक जखमी झाले होते. त्यावेळी सुलेमानी यांचा अंत्यविधी पुढे ढकलावा लागला होता. आता अयातुल्ला अली खामेनी यांची अंत्ययात्रा तेहरान, कोम आणि इराकमधील नजाफ आणि करबाला या शहरांमधून जाणार आहे. शेवटी ९ जुलै रोजी मशहाद येथील इमाम रेझा श्राइन येथे त्यांचा दफनविधी होईल.
