US Navy vs Iran Strait of Hormuz War : पश्चिम आशियातील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तब्बल २१ तास वाटाघाटीची चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने दोन्ही देशांतील तणाव अद्याप कायम आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण हा वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. इराणने या महत्त्वाच्या जलमार्गाचा वापर शांतता चर्चेत दबावाचे साधन म्हणून केल्याचे समजते. जोपर्यंत ठोस करार होत नाही, तोपर्यंत या महत्त्वाच्या जलमार्गावरील जहाजांची वाहतूक विस्कळितच राहील, असा इशारा इराणने दिल्याची माहिती आहे. त्याविषयीचा हा आढावा…
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत अमेरिकेचा दावा काय?
शनिवारी वाटाघाटीची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटॉगॉन) माहिती दिली की, त्यांच्या दोन ‘गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर’ युद्धनौकांनी ‘फ्रीडम-ऑफ-नेव्हिगेशन’ मोहिमेचा भाग म्हणून होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास केला. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकन युद्धनौकांनी हा मार्ग ओलांडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा अमेरिकेने केला. मात्र, इराणने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, अमेरिकेने असा कोणताही प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा दिला. पश्चिम आशियात संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर इराणच्या नौदलाचा पूर्णतः नाश करू, असा इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत इराणने होर्मुझसारख्या महत्त्वाच्या जलमार्गावरील आपले नियंत्रण कायम ठेवले असून, शांतता चर्चेत त्याचा दबाव तंत्र म्हणून वापर केल्याचे समोर आले आहे.
इराणचे ९० टक्क्यांहून अधिक नौदल उद्ध्वस्त?
अमेरिकन नौदलाने आतापर्यंत इराणची १५५ हून अधिक जहाजे बुडवली असल्याचा दावा अमेरिकन सेंट्रल कमांडने ६ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात केला. युद्ध सुरू झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेने इराणच्या नौदलांना मोठा तडाखा दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. आम्ही होर्मुझ सामुद्रधुनीतील इराणच्या नौदलाची उपस्थिती पूर्णपणे निकामी केल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले. संरक्षण क्षेत्रातील गुप्तचर माहिती देणाऱ्या ‘जेन्स’ या वेबसाईटच्या ५ मार्चच्या अहवालानुसार, उपग्रहाद्वारे घेतलेल्या फोटोंमध्ये इराणच्या बंदर अब्बास आणि कोनारक नौदल तळांवरील प्रमुख युद्धनौकांना अमेरिकेने लक्ष्य केल्याचे दिसून आले. इराणचे नौदल आता मुख्यत्वे अरबी समुद्राच्या तळाशी आहे. आम्ही त्यांच्या नियमित ताफ्यातील ९० टक्क्यांहून अधिक जहाजे बुडवली आहेत, ज्यात सर्व प्रमुख युद्धनौकांचा समावेश आहे, असे अमेरिकेच्या जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी पेंटागॉनमध्ये बोलताना स्पष्ट केले. तसेच, अमेरिकन नौदलाने इराणचे ९५ टक्क्यांहून अधिक समुद्री सुरुंग नष्ट केल्याचा दावाही त्यांनी केला.
आणखी वाचा : युद्धविरामानंतर सोने, चांदी अस्थिरतेच्या छायेतून बाहेर..? गुंतवणूकदारांना काय सल्ला?
इराणचे युद्धतंत्र अमेरिकेसाठी ठरतेय डोकेदुखी?
जागतिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणने आपल्या नौदलाच्या धोरणात मोठा बदल केला असून, मोठ्या युद्धनौकांपेक्षा लहान आणि वेगवान साधनांवर भर दिल्याने अमेरिकेपुढील आव्हाने अद्यापही कायम आहेत. यापूर्वी १८ एप्रिल १९८८ रोजी अमेरिकेने एकाच दिवसात इराणचा अर्धा ताफा बुडवला होता. तेव्हा इराणला जाणीव झाली की, अमेरिकेसारख्या महासत्तेशी समोरासमोर लढणे शक्य नाही. त्यातूनच इराणने आपल्या नव्या नौदल धोरणाची आखणी केली. गेल्या काही दशकांत इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी गनिमी काव्यासारख्या युद्धतंत्राचा अवलंब केला आहे. त्यामध्ये जलद हल्ला करणाऱ्या बोटी, समुद्री सुरुंग, किनाऱ्यावरून डागता येणाऱ्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. तसेच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत लहान पाणबुड्या आणि मानवरहित स्फोटक नौकांचाही वापर वाढवला आहे.
इराणने कसे मिळवले होर्मुझवर नियंत्रण?
वॉशिंग्टन इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ फर्झिन नदिमी यांच्या मते, इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्डस’कडील ६० टक्क्यांहून अधिक वेगवान नौकांचा ताफा अजूनही सुरक्षित असून, तो अमेरिकन नौदलासाठी मोठा धोका निर्माण करू शकतो. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळित करण्यासाठी इराण केवळ जहाजांवर अवलंबून नाही. २८ फेब्रुवारीपासून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर किमान ५० हल्ले केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे हल्ले सुरुंग किंवा जहाजांच्या मदतीने करण्याऐवजी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून करण्यात आले आहेत. अमेरिकेने इराणच्या मोठ्या आणि पारंपरिक युद्धनौका नष्ट केल्या असल्या तरी इराणी सैन्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली असल्याचे अल जझीराने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.
होर्मुझवरील इराणच्या नियंत्रणाबाबत तज्ज्ञांचे मत काय?
अमेरिकेबरोबरच्या संघर्षात इराणच्या नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरही त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी समजल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कसे कायम ठेवले आहे, त्यावर जागतिक तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. इराणचे पारंपरिक नौदल कदाचित नष्ट झाले असेल; परंतु त्यांच्या किनारपट्टीवरील क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा ताफा आणि समुद्री सुरुंगांचा धोका इतका मोठा आहे की, अत्यंत धाडसी व्यापारी जहाजे वगळता इतर कोणीही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याचे धाडस करत नाही, असे भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल अरुण प्रकाश (निवृत्त) यांनी दी इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहिलेल्या एका लेखात नमूद केले आहे.
हेही वाचा : युद्धविरामासाठी इराणकडून अमेरिकेशी वाटाघाटी करणारे बाघेर गलिबाफ कोण आहेत? इराणने त्यांची निवड का केली?
इराणपुढे अमेरिकचे नौदल हतबल?
अमेरिकेच्या ‘काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ या थिंक-टँकसाठी लिहिताना संरक्षण तज्ज्ञ माईक फ्रोमन यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा वापर करून होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प करण्याची क्षमता इराणने विकसित केली आहे. त्यांचे हे तंत्रज्ञान दडपून टाकणे अमेरिकेसाठी अत्यंत कठीण ठरत आहे. अण्वस्त्रप्रसार केल्याचा डाग स्वतःवर पडणार नाही अशा पद्धतीने इराणने शत्रूवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच मोठ्या युद्धनौका बुडवूनही अमेरिकन नौदलाला इराणला पूर्णपणे नमवता आले नसल्याचे माईक फ्रोमन यांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेसाठीची पहिली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे पश्चिम आशियातील युद्धविरामाचे पुढे काय होणार, याकडे जगभरातील देशांचे लक्ष लागून आहे.
