इस्रायलचा गाझा पट्टीतील संघर्ष अजूनही सुरू आहे. आता गाझा पट्टीतील महत्त्वाच्या भूभागावर इस्रायलने मातीचे बांधकाम उभारून सीमा निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे ‘एपी’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. २३ किमी पर्यंतचे नवीन बांधकाम मागील काही महिन्यांतच पूर्ण झाले. या बांधकामामुळे इस्रायलच्या ताब्यात असलेला गाझा पट्टीचा ५० टक्क्यांहून अधिक भाग उर्वरीत गाझा पट्टीच्या भूभागापासून वेगळा होईल. उर्वरित भूभागात अजूनही पॅलेस्टाइनमधील नागरिक राहतात. इस्रायल सीमा निश्चित करण्यासाठी बांधकाम का उभारत आहे? इस्रायल – पॅलेस्टाइनमधील संघर्षावर याचा काय परिणाम होईल? आंतरराष्ट्रीय कायदे काय सांगतात, जाणून घेऊ.

इस्रायल मातीचे बांधकाम का करत आहे?

इस्रायल मातीचे बांधकाम व अडथळे निर्माण करत असल्याने गाझाचा भूगोल बदलणार आहे. इस्रायल बांधत असलेल्या ४५ किमी लांब ‘यलो लाइन’मुळे पूर्वेकडे असलेले इस्रायलचे लष्करी तळ आणि पश्चिमेकडे असलेले पॅलेस्टाइन नियंत्रित भूभाग यांच्यात थेट विभागणी होणार आहे. एकेकाळी एकमेकांचे शेजारी असलेले हे भाग, या भागातील शेती आणि वाहतुकीच्या सोयी आता उद्ध्वस्त झाल्या आहेत. या भूभागाची विभागणी झाल्यास गाझा पट्टीच्या उर्वरित भागातील लोकांना तिथून पुन्हा बाहेर पडणे अवघड होणार आहे.

मुख्यत: सुरक्षेच्या कारणामुळे इस्रायलने मातीचे अडथळे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. सामान्य नागरिकांच्या वस्त्या व लष्करी छावण्या यांतील अंतर जास्तीत जास्त असावे यासाठी इस्रायल त्या दरम्यान एक ‘बफर झोन’ (सुरक्षा क्षेत्र) तयार करत आहे. दरम्यान, गाझाची विभागणी करण्यासाठी इस्रायल करत असलेल्या प्रयत्नांमुळे त्या भागातील दोन लगतच्या प्रदेशांमधील सौहार्दाला तडा जाणार आहे.

इस्रायल आणि गाझा पट्टी

पॅलेस्टाइनवर काय परिणाम होणार?

भूगोलशास्त्रज्ञ मेराव अमीर यांनी २०१७ मध्ये ‘रिव्हिसिटिंग पॉलिटिसाइड: स्टेट अॅनिहिलेशन इन इस्रायल/पॅलेस्टाइन’ हा रिसर्च पेपर प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी म्हटले, २००५ पासून गाझा पट्टीची नाकेबंदी केली जात असल्याने हा भाग जगापासून पूर्णपणे वेगळा झाला आहे. पॅलेस्टाइन प्रदेशासाठी यामुळे काही आव्हाने निर्माण झाली आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये गाझा पट्टीला विभागणे हे वेस्ट बँकला जसे विभागले तसेच आहे. असे केल्याने त्या प्रदेशाचे अस्तित्व धोक्यात येते. त्याबाबत अनिश्चितता निर्माण होते.

मेराव म्हणाल्या, गाझाची विभागणी केल्याने महत्त्वाचे रस्ते देखील इतर भागांपासून तुटले जाणार आहेत. जसे की गाझा शहराचा दक्षिणेकडे असलेल्या शेतीशी संबंध तुटेल. त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युद्धा दरम्यान इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली, नुकसान ग्रस्त झाली त्यांना पुन्हा त्यांच्या घराकडे जाता येणार नाही. आता ज्या सीमा रेषा आखल्या जात आहेत त्याच कायमस्वरूपी राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

इस्रायलच्या या बांधकामामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. इस्रायलने वारंवार लष्करी कारवाया करण्यापेक्षा आता भूभाग कायमस्वरूपी ताब्यात घेण्यास सुरूवात केल्याचे त्यांनी म्हटले. राजकीय मार्गाने प्रश्न सोडवण्यापेक्षा इस्रायल जमिनीवर कायमस्वरूपी वर्चस्व निर्माण करत आहे. संशोधक इयान स्लेसेंजर आणि मज्द अबूअमेर यांनी इस्रायली लष्कराच्या गाझा पट्टीतील धोरणाचा अभ्यास केला आहे. पॅलेस्टाइन मधील नागरिकांसाठी हे मातीचे अडथळे, बांधकाम कायमस्वरूपी सीमारेषा निश्चित करणार आहेत. इस्रायलने त्यांच्या संरक्षणात्मक धोरणात भूभागातच बदल करण्याची रणनीती स्वीकारल्याचे दिसून येते.

आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो?

चौथ्या जिनिव्हा कराराच्या कलम ४७ आणि कलम ५३ नुसार, ताबा मिळवणाऱ्या देशाला व्यापलेल्या भूभागातील मालमत्तेचा विनाश करण्यास, ती जप्त करण्यास किंवा तेथे कायदेशीर/रचनात्मक बदल करण्यास सक्त मनाई आहे. केवळ अत्यंत लष्करी गरजेपोटी तात्पुरत्या उपाययोजना करण्यास अपवादात्मक परवानगी दिली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने असा इशारा दिला आहे की, कायमस्वरूपी सुरक्षा क्षेत्रे किंवा अंतर्गत विभागणी ही गाझाच्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करतात, ज्याची पुष्टी ‘युएन सुरक्षा परिषदेच्या ठराव २७२०’ मध्येही करण्यात आली आहे. युएनच्या नेतृत्वाचे असे ठाम मत आहे की, गाझाच्या भूभागात कोणतीही कपात न करता तो भावी पॅलेस्टिनी राष्ट्राचा अविभाज्य भागच राहिला पाहिजे.

दरम्यान, युरोपीय युनियनच्या मुत्सद्दी नेतृत्वाने वारंवार स्पष्ट केले आहे की, “गाझावर कोणतेही कायमस्वरूपी नियंत्रण नसावे, कोणतेही बफर झोन नसावेत आणि गाझाच्या भूभागात कोणतीही कपात केली जाऊ नये.” तसेच इजिप्त आणि जॉर्डनसह अरब लीग आणि प्रादेशिक सत्तांनी या अंतर्गत विभागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. मातीचे हे कायमस्वरूपी अडथळे म्हणजे पॅलेस्टिनींचे सक्तीचे विस्थापन किंवा भूभागावर दीर्घकालीन कब्जा मिळवण्याची पूर्वतयारी आहे, असा दृष्टिकोन ते मांडतात.

मातीचे तट आणि बुरुज हे मानवी इतिहासातील सर्वात जुन्या वास्तुशास्त्रीय बचावात्मक रचनांपैकी एक आहेत, ज्यांचा इतिहास प्राचीन काळातील वेढा घालण्याच्या युद्धांशी आणि रोमन सैन्याच्या तटबंदीच्या पद्धतींशी जोडलेला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, लढाऊ सैन्ये वेढा घातलेल्या शहरांना जिंकण्यासाठी किंवा लष्करी छावण्यांच्या सीमांचे अत्यंत कमी अभियांत्रिकी खर्चात संरक्षण करण्यासाठी मातीचे प्रचंड मोठे अडथळे उभे करत असत.