Cigarette Smoke Lungs Clearance Doctor Advice : धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याची अनेकांना कल्पना असते. नियमित विडी-सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार आणि अर्धांगवायू यांसारखे गंभीर आजार होतात. तरीदेखील काहीजण त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास धूम्रपान करतात. सिगारेट ओढल्यानंतर त्याचा धूर हवेत विरून गेल्यास तो शरीरातूनही पूर्णपणे निघून जातो, असा अनेकांचा समज असतो; पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अधिक चिंताजनक आणि गंभीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सिगारेटचा काही सेकंदांत डोळ्यांसमोरून नाहीसा होणारा धूर अनेक महिने एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांत अडकून राहतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
चेन्नई येथील ग्लेनेगल्स रुग्णालयातील फुप्फुसविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश सागदेवन सांगतात की, डोळ्यांना दिसणारा आणि काही क्षणात हवेत नाहीसा होणारा विडी-सिगारेटचा धूर दिशाभूल करणारा असतो. प्रत्यक्षात हा धूर जेव्हा फुप्फुसांमध्ये प्रवेश करतो त्याच क्षणापासून आरोग्यावर गंभीर परिणाम सुरू होतो. सिगारेटच्या धुरातील हानिकारक घटक फुफ्फुसांवर दीर्घकाळ परिणाम करू शकतात. त्यामुळे धूर दिसेनासा झाला म्हणजे त्याचा शरीरावरील धोका संपला, असे समजणे चुकीचे आहे.
सिगारेटचा धूर फुफ्फुसात गेल्यानंतर नेमके काय होते?
सिगारेटच्या प्रत्येक झुरक्यासोबत विषारी घटकांचे घातक मिश्रण शरीरात प्रवेश करते. जेव्हा एखादी व्यक्ती विडी किंवा सिगारेट ओढते, तेव्हा त्याच्या शरीरात प्रत्येक झुरक्यासोबत ७००० हून अधिक रसायने जातात. त्यापैकी किमान ७० रसायने कर्करोग म्हणजेच कॅन्सरला कारणीभूत ठरतात. सिगारेट ओढल्यानंतर अवघ्या १० सेकंदांत त्यातील निकोटीन मेंदूपर्यंत पोहोचते. मात्र, फुफ्फुसांमध्ये त्याआधीच नुकसान होण्यास सुरुवात झालेली असते, असेही डॉ. सुरेश सागदेवन यांनी सांगितले. त्यांच्या मते, सिगारेटचा धूर शरीरात गेल्यानंतर त्यातील अतिसूक्ष्म विषारी कण फुप्फुसांमधील सूक्ष्म वायुकोशांमध्ये जमा होतात. परिणामी श्वसनमार्गाला आतून सूज येऊ लागते. शरीरात कफ आणि श्लेष्माची निर्मिती झपाट्याने वाढते आणि फुप्फुसांची नैसर्गिक स्वच्छता राखणाऱ्या अतिसूक्ष्म रचनेचे अवयव निकामी होऊन लुळे पडायला लागतात. याच कारणामुळे २० ते २५ वर्षे वयोगटातील नियमित सिगारेट ओढणाऱ्या तरुणांना सकाळी उठल्यानंतर खोकला आणि घशात खवखव जाणवते. आतापर्यंत शेकडो तरुण अशाच तक्रारी घेऊन आपल्याकडे आल्याचे डॉ. सगदेवन यांनी नमूद केले.
सिगारेटचा धूर शरीरातून बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागतो?
शरीरामधून सिगारेटचा धूर आणि विषारी द्रव्ये बाहेर पडण्याची प्रक्रिया दोन वेगवेगळ्या टप्प्यांत पार पडते. तसेच लोकांच्या अंदाजापेक्षा हा कालावधी खूपच मोठा असतो, अशी माहिती डॉ. सगदेवन यांनी दिली. डोळ्यांना दिसणारा धूर हा खोकल्याद्वारे किंवा फुप्फुसांतील सिलियाच्या हालचालीमुळे दोन ते तीन तासांत बाहेर टाकला जातो. मात्र, त्यातील घातक रसायने शरीरात खूप जास्त काळ टिकून राहतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. सिगारेटच्या धुरातील विविध घटक शरीरात किती काळ टिकून राहतात याबाबतही डॉ. सागदेवन यांनी माहिती दिली. धूम्रपानामुळे कार्बन मोनॉक्साइड हा वायू रक्तामध्ये २४ ते ३६ तासांपर्यंत राहू शकतो. त्यामुळे शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. तसेच, सिगारेटमधील निकोटीन आणि कोटिनीन हे घटक रक्तामध्ये तीन दिवसांपर्यंत, तर लघवीमध्ये १० दिवसांपर्यंत राहू शकतात. त्याशिवाय टार नामक विषारी घटक फुफ्फुसांच्या आतील आवरणावर चिकटून राहतो. धूम्रपान सोडल्यानंतरही तो पूर्णपणे कमी होण्यासाठी सहा ते नऊ महिने लागू शकतात, असे डॉ. सागदेवन यांनी सांगितले.
कमी प्रमाणातील धूम्रपानही शरीरासाठी कसे घातक ठरते?
अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिन या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दिवसाला पाचपेक्षा कमी सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींमध्येही सहा महिन्यांच्या आत श्वसनमार्गाला मोजता येईल इतकी सूज निर्माण होऊ शकते, असे डॉ. सुरेश सागदेवन यांनी सांगितले. यातील चिंताजनक बाब म्हणजे मध्यम प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत कमी धूम्रपान करणाऱ्यांनाही फुफ्फुसांची सुधारणा होण्यासाठी जवळपास तितकाच वेळ लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सागदेवन यांनी अलीकडील संशोधनातील आणखी एका महत्त्वाच्या निष्कर्षाकडे लक्ष वेधले. छातीतील संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिलियाची कार्यक्षमता धूम्रपान सोडल्यानंतर पूर्ववत होण्यासाठी किमान सहा महिने लागू शकतात. परिणामी धूम्रपान सोडल्यानंतरही अनेक काही व्यक्ती सातत्याने आजारी पडत राहतात. त्यामुळे दिवसाला कमी सिगारेट ओढल्याने नुकसान होत नाही, हा समज चुकीचा असल्याचे डॉ. सागदेवन यांचे म्हणणे आहे.
धूम्रपान सोडल्यास फुप्फुसे पुन्हा निरोगी होऊ शकतात का?
धूम्रपानामुळे फुप्फुसांचे मोठे नुकसान होत असले, तरी सिगारेट ओढणे पूर्णपणे थांबवल्यास शरीरामध्ये पूर्वस्थितीत येण्याची कमालीची क्षमता असते. फुफ्फुसांना पुरेसा वेळ दिल्यास ते पुन्हा सुधारू शकतात, असे डॉ. सुरेश सागदेवन यांनी सांगितले. धूम्रपान सोडल्यानंतर शरीर कशा प्रकारे पूर्वपदावर येते, याचा कालक्रम त्यांनी स्पष्ट केला. सिगारेटचे व्यसन सोडल्यानंतर ७२ तासांच्या आत श्वसनमार्ग मोकळा होऊन श्वास घेणे अधिक सुलभ होते. पुढील एक ते नऊ महिन्यात फुप्फुसांतील सिलियाची कार्यप्रणाली हळूहळू पूर्ववत होते. त्याशिवाय हृदयविकाराचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. दोन वर्षांनंतर पक्षाघात (स्ट्रोक) आणि फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या घटतो. धूम्रपान सोडल्याने तुम्हाला पूर्णपणे नवीन फुप्फुसे मिळणार नाहीत, मात्र अस्तित्वात असलेल्या फुप्फुसांना स्वतःला स्वच्छ करून पूर्वस्थितीत येण्याची मोठी संधी नक्कीच मिळते, असे डॉ. सुरेश सागदेवन यांनी अधोरेखित केले.
धूम्रपान सोडणे इतके कठीण का वाटते? त्यामागचे कारण काय?
निकोटीनचे व्यसन हे केवळ शारीरिक पातळीपुरते मर्यादित नसून त्याचा थेट संबंध मेंदूच्या रचनेशी असतो. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर निकोटीनच्या व्यसनाशी लढण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला डॉ. सागदेवन देतात. विडी-सिगारेटमधील निकोटीन मेंदूला आनंद देणाऱ्या मज्जासंस्थेच्या रचनेत बदल घडवून आणते. याच कारणामुळे व्यसनाची तीव्र तलफ येते, असेही त्यांनी सांगितले. धूम्रपान यशस्वीपणे सोडण्यासाठी डॉ. सागदेवन एका सुनियोजित आराखड्याचा अवलंब करण्याचा सल्ला देतात. धूम्रपान सोडण्याची तारीख निश्चित करा आणि कुटुंबीय किंवा मित्रांना त्याची माहिती द्या, धूम्रपानाची इच्छा निर्माण करणाऱ्या कारणांचा शोध घ्या, जसे सकाळचा चहा, कामाच्या वेळेतील ब्रेक किंवा मद्यपान, हातातून तोंडाकडे सिगारेट नेण्याची सवय बदलण्यासाठी पाणी प्या किंवा काही पावले चालणे सुरू करा, सिगारेटची तीव्र इच्छा साधारणपणे केवळ तीन ते पाच मिनिटे सर्वाधिक असते. हा काही मिनिटांचा कालावधी तुम्ही सांभाळू शकलात, तर हळूहळू या व्यसनाचे चक्र तोडता येते, असे डॉ. सागदेवन यांनी सांगितले. धूम्रपान सोडल्याने यापूर्वी झालेले नुकसान पूर्णपणे नाहीसे होत नाही. मात्र, ते वेळीच थांबवल्यामुळे फुफ्फुसांना सावरण्यास, झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यास आणि पुन्हा अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करण्यास वेळ आणि संधी मिळते, असेही डॉ. सागदेवन यांनी स्पष्ट केले आहे.
