Mouth Condom for HPV Cancer Prevention: अलीकडेच म्हणजे २० मार्च रोजी जगभरात World Oral Health Day साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर HPV आणि तोंडाचा कॅन्सर यासंबंधातील चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. या कॅन्सरवर HPV लसीकरण हा अजूनही सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जातो. किंबहुना भारतात गेल्याच महिन्यात वय वर्ष १४ पूर्ण झालेल्या मुलींना ही लस देण्यात आली. HPV लसीशिवाय Oral कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कंडोम आणि डेंटल डॅम्ससारखी (माउथ किंवा टंग कंडोम) बॅरियर महत्त्वाची भूमिका बजावतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. HPV हा जगभरात सर्वाधिक आढळणाऱ्या लैंगिक संसर्गांपैकी एक असून तोंड आणि घशाच्या कॅन्सरशी त्याचा संबंध आहे. जागतिक आरोग्य संस्थांच्या मते, HPV तोंडावाटे होणार्या संपर्कातूनही पसरू शकतो आणि घशात संसर्ग होवून ओरोफॅरिंजियल कॅन्सरसाठी (घशाचा कर्करोग) कारणीभूत ठरू शकतो.
HPVचा संसर्ग आणि तोंडाचा कॅन्सर यांच्यातील संबंध समजून घेणे गरजेचे का आहे?
HPV संसर्ग आणि तोंडाच्या कॅन्सरमधील संबंध तातडीने लक्षात घेण्याची गरज आहे, असे डॉ. व्ही रामा कृष्णा यांनी NDTVशी बोलताना सांगितले. भारतात गेल्या काही वर्षात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. किंबहुना अनेक पुरुषांना धूम्रपान किंवा अतिमद्यपानाच्या सवयी नसतानाही ओरोफॅरिंजियल कॅन्सर झाला आहे, असे डॉ. कृष्णा सांगतात. तोंडाच्या कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये समान धागा म्हणजे HPV संसर्ग.
तोडावाटे संसर्ग
मानेला गाठ येणे, गिळताना त्रास होणे किंवा सतत घशात वेदना होणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे निदान अनेकदा उशिरा होते, कारण सुरुवातीला ही लक्षणे किरकोळ वाटतात. याउलट, तोंडावाटे (लैंगिक) संपर्कातून (oral contact) संसर्गाचा धोका कमी होतो किंवा होतच नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात, HPV व्यतिरिक्त हर्पीस, गोनोरिया आणि सिफिलिस यांसारखे संसर्गही अशा प्रकारे पसरू शकतात.
लैंगिक विषयांवर मोकळेपणाने चर्चा नाही
“ज्या समाजात लैंगिक विषयांवर मोकळेपणाने चर्चा होत नाही. तिथे संरक्षणात्मक उपायांची चर्चाही मर्यादित असते. त्यामुळे oral transmission सारखे धोके दुर्लक्षित होतात, असे डॉ. राजीव अरोरासांगतात. याबाबत डॉ. कृष्णा असंही सांगतात की, “आपला समाज लैंगिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलत नाही. लोकांमध्ये या विषयांवर बोलण्यास अजूनही कलंक मानला जातो किंना लोक काय म्हणतील, याची भीती अनेकांना वाटते. आणि पलीकडे असलेली सार्वजनिक आरोग्य संस्था पुरुषांसाठी पुरेशी माहिती देत नाहीत. त्यामुळे वेळेवर निदान होण्यात अडथळे निर्माण होतात आणि प्रतिबंधात्मक उपायांपर्यंत पोहोचणे मर्यादितच राहाते. ” डॉ. अरोरा यांच्या मते, “HPV आणि तोंडाच्या कॅन्सरसंबंधाबाबत जागरूकता वाढत असताना, विशेषतः भारतात, हे सोपे बॅरियर (barrier methods) प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र, भीती, अपुरी माहिती आणि मर्यादित उपलब्धता यामुळे अनेकांना याविषयी माहिती नसते.”
माऊथ आणि टंग कंडोम म्हणजे काय?
माऊथ किंवा टंग कंडोम हा तांत्रिक शब्द नसून, सामान्यतः डेंटल डॅम्ससाठी (dental dams) वापरला जातो. डेंटल डॅम्स या लेटेक्स किंवा पॉलीयुरेथेनपासून तयार केलेल्या अतिशय पातळ शिट्स (thin sheet) असतात. या शिट्स तोंड आणि जननेंद्रिय (genitals) किंवा गुदद्वार (anus) यांच्यामध्ये oral contact दरम्यान ठेवल्या जातात. या शिट्स विशिष्ट प्रकारच्या भौतिक अडथळ्याच्या (physical barrier) स्वरुपात काम करतात. यामुळे शरीरातील द्रव (bodily fluids) आणि तोंडातील त्वचेचा थेट संपर्क टाळला जातो आणि त्यामुळे संसर्गजन्य जंतू (pathogens) पसरण्याचा धोका कमी होतो. लिंगाशी संबंधित oral contact साठी सामान्य कंडोम (condom) वापरण्याची शिफारस केली जाते. योनी (vulva) किंवा गुदद्वाराशी संबंधित oral contact साठी डेंटल डॅम्स वापरले जातात, हे डॅम्स संरक्षणात्मक थर तयार करतात.

बॅरियर प्रोटेक्शन कसे काम करते? (How It Works)
बॅरियर प्रोटेक्शनचा मूलभूत सिद्धांत सोपा आहे. संसर्ग होण्याचे मार्ग (transmission pathways) अडवणे. HPV प्रामुख्याने त्वचेचा थेट संपर्क (skin-to-skin contact) आणि oral contact द्वारे पसरतो. डेंटल डॅम्स आणि कंडोम्स संक्रमित पृष्ठभाग व शरीरातील द्रवांशी थेट संपर्क कमी करतात. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो, मात्र तो पूर्णपणे टाळला जात नाही. अमेरिकेच्या Centers for Disease Control and Prevention (CDC) यांनी म्हटले आहे की, योग्य पद्धतीने वापरल्यास कंडोम आणि डेंटल डॅम्स HPV संसर्गाचा धोका कमी करू शकतात. अनेक संशोधनांमध्येही नियमित कंडोम वापरामुळे HPV संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
कॅन्सरपासून संरक्षणासाठी का महत्त्वाचे?
CDC ने म्हटले आहे की, HPV-संबंधित घशाच्या कॅन्सरच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः पुरुषांमध्ये हा धोका अधिक दिसतो. आणि याचा थेट संबंध तोंडावाटे होणाऱ्या संसर्गाशी जोडला जातो. या पार्श्वभूमीवर काही उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतात. HPV लसीकरण, बॅरियर प्रोटेक्शन (कंडोम/ डेंटल डॅम्स) आणि नियमित तपासणी केल्यास या कॅन्सरच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येवू शकते.
माऊथ कंडोम पूर्णपणे प्रभावी असतात का?
इथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोणतीही बॅरियर पद्धत १००% संरक्षण देत नाहीत. HPV चा संसर्ग कंडोम किंवा डेंटल डॅमने न झाकलेल्या भागांवरही होवू शकतो. त्यामुळे काही प्रमाणात धोका कायम राहतो. याशिवाय, डेंटल डॅम्सच्या परिणामकारकतेबाबतचे संशोधन मर्यादित असून, oral HPV संसर्गाविरुद्ध ते किती प्रभावी आहे यावर सखोल संशोधनाची गरज आहे. परंतु, सार्वजनिक आरोग्य संस्था त्याच्या वापराची शिफारस सातत्याने करतात; कारण त्यांच्या वापरामुळे संसर्गाचा धोका कमी होतो, वापरण्यास सोपे आणि सहज उपलब्ध असतात आणि सुरक्षित लैंगिक सवयींना प्रोत्साहन मिळून अनेक विकार आपसूक टळतात.
