How much blood loss during periods: मद्रास उच्च न्यायालयाने १० मार्च २०२६ रोजी तमिळनाडू सरकारला महिलांसाठी ‘पगारी मासिक पाळी रजा (Menstrual Leave) धोरण’ तयार करण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती एन. सतीश कुमार आणि न्या. एम. जोथीरामन यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. मदुराई येथील आरोग्य व प्रतिबंधक औषध विभागात कार्यरत असलेल्या नर्मधा यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अनेक महिला कर्मचारी आणि रुग्णांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना (menstrual cramps) होतात, परंतु अशा परिस्थितीत त्यांना मदत करणारे कोणतेही ठोस धोरण अस्तित्वात नाही. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (RTI) चौकशी केल्यानंतर तमिळनाडूमध्ये अशा प्रकारचे कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याच पार्श्वभूमीवर महिलांच्या पाळीशी संबंधित नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नाविषयी जाणून घेणे महितीपूर्ण ठरावे.
मासिक पाळी आणि गैरसमज
महिलांची मासिक पाळी हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आढळतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा समज म्हणजे मासिक पाळीच्या काळात शरीरातून खूप मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर पडतं. परंतु वैद्यकीय संशोधनानुसार हा गैरसमजच ठरतो. स्त्रीरोगशास्त्रातील अभ्यासांनुसार मासिक पाळी हे शरीराचे एक नियोजित जैविक चक्र आहे आणि त्यात होणारा रक्तस्राव मर्यादित असतो.
शरीरात एकूण किती रक्त असते?
पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण थोडे कमी असते. एका सरासरी वजनाच्या महिलेच्या शरीरात तिच्या वजनाच्या साधारण ७% ते ८% रक्त असते. लिटरमध्ये सांगायचे तर हे प्रमाण साधारण ४.५ ते ५ लिटर इतके भरते.
मासिक पाळीच्या काळात नेमकं किती रक्त जातं?
एका सुदृढ प्रौढ महिलेच्या शरीरात साधारणपणे ४.५ ते ५ लिटर रक्त असते. त्यापैकी मासिक पाळीच्या संपूर्ण चक्रात केवळ ३० ते ८० मिली (साधारण २ ते ४ मोठे चमचे) द्रव शरीराबाहेर पडतो. काही अभ्यासांमध्ये सरासरी रक्तस्राव सुमारे ६० मिली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. हे प्रमाण ऐकायला कमी वाटू शकतं, परंतु प्रत्यक्षात दिसणाऱ्या द्रवाचं प्रमाण जास्त असल्यामुळे अनेकांना रक्तस्राव अधिक असल्याचा भास होतो.
चार टेबलस्पून रक्तस्राव
हे सोप्या उदाहरणातून समजून घ्यायचं झालं तर, एका पाळीत होणारा रक्तस्राव साधारण २ ते ४ टेबलस्पून (चमचे) इतका असतो. म्हणजेच स्वयंपाकघरातील छोट्या कपाच्या अर्ध्या भागाइतकं प्रमाण असतं. त्यामुळे पाळीच्या काळात अर्धा लिटर किंवा अत्यंत मोठ्या प्रमाणात रक्त जातं ही, धारणा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही, असं तज्ज्ञांच मत आहे. साधारणतः मासिक पाळीचा कालावधी ३ ते ७ दिवसांपर्यंत असतो आणि या काळात रक्तस्राव हळूहळू कमी होत जातो.
मासिक पाळीत रक्ताशिवाय इतर कोणते घटक असतात?
मासिक पाळीबाबत समजून घेण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर पडणारा द्रव पूर्णपणे रक्त नसतो. त्यामध्ये अनेक जैविक घटकांचा समावेश असतो. संशोधनानुसार पाळीतील द्रवामध्ये साधारण ५० टक्के रक्त, तर उर्वरित भागात गर्भाशयाच्या आतील अस्तराचे तुकडे (endometrial tissue), म्यूकस, तसेच गर्भाशय आणि योनीतील विविध स्त्राव असतात. त्यामुळे पाळीत दिसणारा द्रव जास्त असल्याचा भास होतो. ही प्रक्रिया प्रत्यक्षात गर्भाशयाच्या आतील अस्तराशी संबंधित असते. प्रत्येक महिन्याला गर्भधारणेसाठी गर्भाशयात एक नवीन अस्तर तयार होतं. जर त्या महिन्यात गर्भधारणा झाली नाही, तर शरीर हे अस्तर बाहेर टाकतं. या प्रक्रियेलाच मासिक पाळी म्हणतात.
पहिल्या दोन दिवसांत रक्तस्राव जास्त का होतो?
बहुतेक महिलांच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांत रक्तस्राव अधिक असतो. यामागे हार्मोन्सशी संबंधित जैविक प्रक्रिया कार्यरत असते. पाळी सुरू होताच गर्भाशयातील अस्तर वेगाने बाहेर पडू लागतं. या वेळी प्रोस्टाग्लॅंडिन्ससारखे हार्मोनल घटक रक्तवाहिन्या रुंद करतात, त्यामुळे सुरुवातीच्या एक-दोन दिवसांत रक्तस्राव तुलनेने जास्त होतो. यानंतर शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण बदलतं आणि गर्भाशयातील अस्तर बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसापासून रक्तस्राव कमी होत जातो. ही पूर्ण प्रक्रिया शरीराच्या नैसर्गिक चक्राचा भाग आहे.
किती रक्तस्राव झाल्यास तो जास्त मानला जातो?
वैद्यकीय भाषेत, जर एका मासिक पाळीत ८० मिलीपेक्षा जास्त रक्तस्राव झाला, तर त्याला Heavy Menstrual Bleeding (Menorrhagia) म्हटलं जातं. अशा परिस्थितीत काही विशिष्ट लक्षणे दिसू शकतात. उदाहरणार्थ, प्रत्येक एक-दोन तासांत पॅड किंवा टॅम्पॉन पूर्ण भिजणे, रक्ताच्या मोठ्या गुठळ्या दिसणे, सात दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तस्राव होणे किंवा पाळीनंतर खूप अशक्तपणा जाणवणे. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं, कारण काही वेळा त्यामागे अॅनिमिया किंवा हार्मोनल समस्या असू शकतात.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) काय सांगते?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एका सामान्य मासिक पाळीत सरासरी ५० मिलीपेक्षा कमी रक्तस्राव होतो. मात्र, जगभरातील ३०% पेक्षा जास्त महिलांना ‘अति-रक्तस्रावाचा’ त्रास होतो, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊन ॲनिमियाचा धोका वाढतो. त्यामुळे पाळीतील रक्ताचे प्रमाण कमी वाटत असले, तरी त्याचा शरीराच्या ऊर्जेवर मोठा परिणाम होतो.

प्रत्येक स्त्रीमध्ये रक्तस्राव वेगळा का असतो?
मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा अनुभव असू शकतो. काही महिलांमध्ये पाळी फारशी त्रासदायक नसते, तर काहींमध्ये तुलनेने जास्त रक्तस्राव दिसू शकतो. यामागे अनेक जैविक आणि वैद्यकीय घटक कार्यरत असतात.
हार्मोनल बदल महत्त्वाचा
हार्मोनल बदल हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. किशोरवयात पाळी सुरू झाल्यानंतर काही वर्षे चक्र नियमित होत असताना रक्तस्रावाचे प्रमाण बदलू शकते. त्याचप्रमाणे ४० वर्षांनंतरही हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे पाळीच्या स्वरूपात फरक पडू शकतो.
थायरॉईडचाही पाळीच्या रक्तस्रावावर परिणाम
याशिवाय PCOS (Polycystic Ovary Syndrome), थायरॉईड समस्या, गर्भाशयातील फायब्रॉइड्स, काही औषधे किंवा गर्भनिरोधक पद्धती यांचाही पाळीतील रक्तस्रावावर परिणाम होऊ शकतो. काही संशोधनांमध्ये पाळीतील द्रवाचे प्रमाण १५ ml ते २७० ml पर्यंत बदलू शकते असेही नमूद करण्यात आले आहे.
पाळीबद्दलचे गैरसमज
समाजात पाळीबद्दल अनेक मिथके प्रचलित आहेत. त्यापैकी एक म्हणजे मासिक पाळीत शरीरातून खूप मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर पडतं. वैज्ञानिक आकडेवारी मात्र याला समर्थन देत नाही. त्याचप्रमाणे जास्त रक्तस्राव म्हणजे शरीर अधिक स्वच्छ होत आहे, ही धारणादेखील चुकीची आहे. उलट, अत्यधिक रक्तस्राव हा काही वेळा आरोग्याच्या समस्येचा संकेत असू शकतो. तसेच पाळीत रक्ताच्या लहान गुठळ्या दिसणं हे नेहमीच आजाराचं लक्षण नसतं. काही प्रमाणात गुठळ्या दिसणं हे नियमित प्रक्रियेचा भाग मानलं जातं.
डॉक्टर काय सांगतात?
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते मासिक पाळी हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा जैविक संकेत आहे. बहुतेक महिलांमध्ये पाळी २१ ते ३५ दिवसांच्या अंतराने येते आणि साधारण ३ ते ७ दिवस रक्तस्राव होतो. या चक्रामध्ये अत्यधिक रक्तस्राव, तीव्र वेदना किंवा अनियमित पाळी असे अचानक मोठे बदल दिसल्यास, वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक ठरते.

…तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
काही प्रकरणांमध्ये एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड्स किंवा हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्या पाळीतील बदलांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे पाळीच्या पॅटर्नमध्ये अचानक बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं सुरक्षित ठरतं.
आरोग्यविषयक समस्येचे संकेत
मासिक पाळीच्या काळात शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त जातं हा समज वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही. संशोधनानुसार एका मासिक पाळीत साधारण ३० ते ८० मिली रक्तस्राव होतो, जो साधारण २ ते ४ चमच्यांइतका असतो. मात्र या प्रमाणापेक्षा जास्त आणि दीर्घकाळ रक्तस्राव झाला, तर ते आरोग्याविषयक समस्येचे संकेत असू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
