Gold legally own without tax trouble सोने हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. अनेक कुटुंबे गुंतवणुकीच्या स्वरूपात सोने खरेदी करतात. गेल्या काही वर्षांत सोने खरेदीत वाढ पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात होत असलेली मोठी दरवाढ पाहता आणि वाढती खरेदी पाहता सोन्याच्या साठवणुकीबाबत प्राप्तिकर विभागाचे नियम प्रत्येक कुटुंबाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सध्या तरी एखाद्या व्यक्तीने किती प्रमाणात सोने (बिस्किट किंवा दागिन्यांच्या स्वरूपात) जवळ बाळगावे, याबाबत कोणताही कायदा किंवा मर्यादा नाही.

पण, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ११ मे १९९४ रोजीच्या एका जुन्या परिपत्रकाद्वारे, प्राप्तिकर विभागाच्या छाप्यादरम्यान एका ठराविक मर्यादेपर्यंतचे सोन्याचे दागिने जप्त न करण्याच्या सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामध्ये विवाहित पुरुष आणि महिलांसाठी सोन्याच्या दागिन्यांच्या वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. घरात नक्की किती सोने ठेवता येते? त्याविषयीचे नियम काय? जाणून घेऊयात…

काय आहेत नियम?

परिपत्रकात दिलेल्या सूचनांनुसार, प्राप्तिकर अधिकाऱ्यांना विवाहित महिलेच्या मालकीचे ५०० ग्रॅमपर्यंतचे सोन्याचे दागिने जप्त न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कुटुंबातील अविवाहित महिलेसाठी ही मर्यादा २५० ग्रॅम इतकी कमी आहे, तर पुरुषांसाठी प्रति व्यक्ती १०० ग्रॅमची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्राप्तिकर छाप्यादरम्यान उद्भवणारे वाद टाळणे हा या परिपत्रकाचा मुख्य उद्देश आहे, कारण कर अधिकाऱ्यांना दागिन्यांसह कोणतीही मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार असतो. संबंधित व्यक्तीचे राहणीमान किंवा समाजातील दर्जा कोणताही असला तरी या परिपत्रकात नमूद केलेल्या मर्यादेतील सोन्याचे दागिने अधिकाऱ्यांना जप्त करता येत नाही.

या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, एखादी व्यक्ती किंवा कुटुंबाकडे सोने कसे खरेदी केले याची माहिती असल्यास हे परिपत्रक कोणतेही निर्बंध घालत नाही. मुख्य म्हणजे, हे परिपत्रक केवळ सोन्याच्या दागिन्यांसाठी लागू आहे. त्यामध्ये सोन्याची नाणी, बिस्किटे, हिरे किंवा इतर मौल्यवान दागिन्यांचा समावेश होत नाही. या परिपत्रकातील नियम ज्या व्यक्तीवर छापा टाकला आहे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही लागू होते.

वारसाहक्काने मिळालेल्या दागिन्यांसाठी नियम काय?

कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन सांगतात की, तुमच्याकडे असलेले सोन्याचे दागिने हे एक तर खरेदी केलेले असू शकतात किंवा भेट/वारसाहक्काने मिळालेले असू शकतात. वारसाहक्काने मिळालेल्या दागिन्यांच्या बाबतीत जर तुमच्याकडे ‘मृत्युपत्र’, मृत व्यक्तीचा ‘वेल्थ टॅक्स रिटर्न’ किंवा ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ यांसारखे कागदोपत्री पुरावे असतील तर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त दागिने असले तरीही अधिकारी ते जप्त करणार नाहीत. त्याचप्रमाणे भेटीच्या स्वरूपात मिळालेल्या दागिन्यांच्या बाबतीतही संबंधित कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे.

बलवंत जैन म्हणतात, हे परिपत्रक छाप्यादरम्यान सापडलेल्या मर्यादेतील सोन्याला कोणत्याही प्रकारे कायदेशीर ठरवत नाही. अधिकारी ते दागिने जप्त करणार नाहीत, मात्र त्याची नोंद करतील. कर आकारणीच्या प्रक्रियेत तुम्हाला ते दागिने कुठून आले याचा स्रोत स्पष्ट करावाच लागेल. बलवंत जैन सर्व खरेदीची बिले जपून ठेवण्याचा सल्ला देतात. ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही जुने दागिने मोडून नवीन दागिने घेतले असतील, तर मूळ खरेदीच्या बिलाबरोबरच लेबर चार्जेस बिलेही जवळ ठेवावीत. दागिने केवळ चेक किंवा क्रेडिट/डेबिट कार्डनेच खरेदी केले पाहिजेत असे नाही; ते रोख रक्कम देऊनही खरेदी केले जाऊ शकतात.”

मात्र, कायद्यानुसार विक्रेत्याला २ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दागिने रोखीने विकण्यास मनाई आहे. तुमच्याकडे खरेदीची बिले नसली, तरी तुमचे उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत असेल आणि त्यातून इतके दागिने जमवणे शक्य असल्याचे दिसत असेल, तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे बलवंत जैन सांगतात.

‘वेल्थ टॅक्स’ म्हणजेच संपत्ती कर आता रद्द झाला आहे, मात्र तरी ३१ मार्च २०१५ पर्यंतच्या काळात जर तुम्ही वेल्थ टॅक्स रिटर्न भरले असतील आणि त्यात या सोन्याच्या दागिन्यांचा, नाण्यांचा किंवा बिस्किटांचा उल्लेख असेल तर त्याचा स्रोत स्पष्ट होतो, त्यामुळे तुमचे जुने वेल्थ टॅक्स रिटर्न्स फेकून देऊ नका. सोन्याच्या प्रत्येक खरेदीची योग्य कागदपत्रे ठेवा, असेही बलवंत जैन सांगतात.