Nalanda University exploring ancient Indian wisdom: आजचे जग एका गुंतागुंतीच्या वळणावर उभे आहे. एका बाजूला अमेरिका, चीन आणि रशिया यांसारख्या महासत्तांमधील स्पर्धा अधिक तीव्र होत आहे; दुसऱ्या बाजूला ऊर्जा संकट, हवामान बदल, युद्धे, आर्थिक अस्थिरता आणि नैतिक नेतृत्वाचा अभाव अशा समस्या जगासमोर उभ्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे या आधुनिक संकटांना उत्तर देण्यासाठी केवळ पाश्चात्य राजकीय सिद्धांत पुरेसे आहेत का? की भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेतही आजच्या जागतिक व्यवस्थेला दिशा देण्याची क्षमता आहे?
याच गंभीर प्रश्नांचा आढावा सध्या नालंदा विद्यापीठात घेतला जात आहे. जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांतील विद्यार्थी येथे ‘इंटरनॅशनल रिलेशन्स अँड पीस स्टडीज’ या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत आहेत. या अभ्यासक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करताना यात रामायण, महाभारत आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रासारख्या भारतीय ज्ञानप्रणालींचा समावेश करण्यात आला आहे. इथे या ग्रंथांकडे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दस्तऐवज म्हणून पाहिले जात नाही; तर राजकारण, प्रशासन, नैतिकता, संघर्षनिवारण आणि जागतिक नेतृत्वाची धोरणात्मक चौकट म्हणून या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला जातो.
या अभ्यासक्रमामागील मुख्य विचार असा आहे की, भारताची प्राचीन महाकाव्ये ही फक्त भक्ती, युद्ध किंवा आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या कथा नाहीत. तर ती मानवी स्वभाव, सत्ता, न्याय, कर्तव्य, युती, संघर्ष, संवाद आणि शांतता यांचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण करतात. रामायणात रामाचे नेतृत्व, सुग्रीवाशी केलेली युती, विभीषणाचा स्वीकार आणि रावणाविरुद्धचा संघर्ष हे केवळ कथानकाचे भाग नाहीत; ती नैतिक मुत्सद्देगिरीची उदाहरण ठरू शकतात. त्याचप्रमाणे महाभारतातील कृष्णनीती, शांतिदूत म्हणून श्रीकृष्णांची भूमिका, युद्ध टाळण्याचा प्रयत्न आणि शेवटी धर्माच्या रक्षणासाठी कठोर निर्णय घेण्याची तयारी हे सर्व आधुनिक राजकारणासाठीही विचारप्रवर्तक ठरते.
नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू सचिन चतुर्वेदी सांगतात की, या उपक्रमाचा उद्देश प्राचीन भारतीय परंपरांचे पुनरुज्जीवन करणे एवढाच नाही, तर आजच्या जागतिक समस्यांशी त्यांचा अर्थपूर्ण संवाद घडवणे हा आहे. ते पुढे सांगतात, भारतीय ज्ञानप्रणाली ही भूतकाळात बंदिस्त नसून वर्तमानाशी बोलू शकणारी, प्रश्न विचारू शकणारी आणि नवे मार्ग सुचवू शकणारी बौद्धिक परंपरा आहे. त्यामुळे नालंदा विद्यापीठात सुरू असलेले संशोधन हे परंपरेचे गौरवगान नसून, परंपरेचा आधुनिक उपयोग शोधण्याचा प्रयत्न आहे.

या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे शोधनिबंध पाहिले तर हा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होतो. काही विद्यार्थी रामायणातील युतींचा अभ्यास करून भारताची आधुनिक धोरणात्मक भागीदारी समजावून घेत आहेत. काही महाभारताच्या आधारे ‘नियमाधारित जागतिक व्यवस्था’ आणि ‘सॉफ्ट पॉवर’ यांचे विश्लेषण करत आहेत. तर काही विद्यार्थी भारतीय पर्यावरणीय ज्ञान, स्थानिक समुदाय आणि शाश्वत ऊर्जा यांचा संबंध शोधत आहेत.
सुरभी राणी या विद्यार्थिनीने आपल्या ‘India’s Strategic Partnerships through the Lens of Ramayana Alliances’ या संशोधन निबंधात रामायणातील किष्किंधा कांडाचा अभ्यास आधुनिक मुत्सद्देगिरीच्या संदर्भात केला आहे. राम आणि सुग्रीव यांची युती ही फक्त दोन व्यक्तींमधील मैत्री नव्हती; ती विश्वास, मित्रधर्म, राजधर्म आणि जबाबदार नेतृत्वावर आधारित भागीदारी होती. या युतीत रामाने सुग्रीवावर वर्चस्व गाजवले नाही, त्याच्या राज्यावर दावा केला नाही, तर न्यायाच्या आधारावर परस्पर सहकार्याची चौकट निर्माण केली. आजच्या भाषेत सांगायचे तर ही एक प्रकारची असमान पण नैतिक भागीदारी होती. यात शक्तिशाली पक्ष दुर्बल मित्राचा उपयोग करत नाही, तर त्याला सक्षम करतो.
ही चौकट (Framework) भारताच्या आजच्या परराष्ट्र धोरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. भारत आज जगभरातील अनेक देशांशी सुरक्षा, तंत्रज्ञान, व्यापार आणि विकास सहकार्य अशा विविध क्षेत्रांत भागीदारी करत आहे. या भागीदारींमध्ये भारत स्वतःला केवळ एक महासत्ता (Superpower) म्हणून सादर करत नाही, तर ‘विश्वबंधू’ म्हणजेच जगाचा एक विश्वासू भागीदार म्हणून पुढे आणत आहे. इथे राम-सुग्रीव युतीचा विचार अत्यंत उपयुक्त ठरतो; कारण ही युती आपल्याला शिकवते की, जगात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी साम्राज्यविस्तार करण्याची गरज नसते, तर विश्वास, न्याय आणि जबाबदारीच्या जोरावरही एक मजबूत प्रभाव उभा केला जाऊ शकतो.

महाभारताच्या संदर्भात प्रीती कुमारी यांनी श्रीकृष्णांच्या भूमिकेचा अभ्यास ‘सॉफ्ट पॉवर’ आणि ‘नियमाधारित व्यवस्थेच्या’ (Rule-based order) संदर्भाने केला आहे. श्रीकृष्ण हे युद्धप्रिय नव्हते; त्यांनी सुरुवातीला नेहमीच संवाद, समेट आणि शांततेचा मार्ग निवडला. परंतु, जेव्हा अन्याय, अधर्म आणि राज्यव्यवस्थेचा संपूर्ण ऱ्हास अटळ झाला, तेव्हा त्यांनी धर्मरक्षणासाठी अत्यंत निर्णायक आणि कठोर भूमिका घेतली. आज आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही (Modern IR) हेच प्रश्न सतत विचारले जातात; युद्ध कधी न्याय्य (Just War) ठरू शकते? कोणत्या क्षणी शांततेची भाषा अपुरी पडते? आणि जेव्हा राष्ट्राचे नैतिक अस्तित्वच धोक्यात येते, तेव्हा राज्याने कोणती पावले उचलावीत?
मायकेल वॉल्झर यांसारख्या विचारवंतांनी ‘Just War’ आणि ‘Supreme Emergency’ यांसारख्या संकल्पना मांडल्या आहेत. महाभारतातील कृष्णनीति या चर्चेशी जोडली गेली तर भारतीय दृष्टिकोनातून युद्ध, नैतिकता आणि राजकीय जबाबदारी यांची नवीन मांडणी शक्य होते. श्रीकृष्णांचे महत्त्व केवळ त्यांच्या युद्ध रणनीतित (Strategy) नाही, तर त्यांच्या नैतिक प्रभावात आहे. युद्धात प्रत्यक्ष शस्त्र न उचलताही ते सर्वात निर्णायक भूमिका बजावतात. हा ‘सॉफ्ट पॉवर’चा (वैचारिक व नैतिक प्रभाव) एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे. यात तुमचे व्यक्तिमत्त्व, नैतिक विश्वासार्हता (Moral Credibility) आणि बुद्धिमत्ता ही केवळ शारीरिक किंवा लष्करी सामर्थ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी ठरते.
तिसरा महत्त्वाचा संशोधन प्रवाह ऊर्जा संकट आणि भारतीय ज्ञानप्रणालीशी संबंधित आहे. आज जग ऊर्जा असुरक्षिततेच्या मोठ्या टप्प्यातून जात आहे. जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व, युद्धांमुळे वाढणारे तेलदर, हवामान बदल आणि वाढती लोकसंख्या या सगळ्यांमुळे शाश्वत ऊर्जा हा केवळ पर्यावरणाचा विषय राहिलेला नाही; तो राष्ट्रीय सुरक्षेचा, अर्थव्यवस्थेचा आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न ठरला आहे.
हिमांशी गुप्ता यांनी आपल्या संशोधनात भारताच्या ऊर्जा परिवर्तनाकडे स्थानिक समुदाय, स्वदेशी ज्ञान आणि जागतिक अनुभव यांच्या साहाय्याने पाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, ऊर्जा परिवर्तन केवळ मोठ्या प्रकल्पांनी किंवा तंत्रज्ञानाने घडत नाही; ते स्थानिक लोकांच्या सहभागाने, स्थानिक पाणलोट व्यवस्थापनाने, पारंपरिक वास्तुरचनेने आणि समाजाधारित प्रशासनाने घडते. बिहारमधील ‘आहार-पाइन’ जलव्यवस्था किंवा हिमाचल प्रदेशातील विकेंद्रित पर्यावरणीय व्यवस्थापन हे दाखवते की भारतीय समाजात समुदायाधारित शाश्वततेची समृद्ध परंपरा आहे.

नालंदा विद्यापीठाची रचना देखील या विचाराचा भाग म्हणून पाहिली जाते. प्राचीन पर्यावरणीय शहाणपण आणि आधुनिक शाश्वत वास्तुकला यांचा संगम साधण्याचा प्रयत्न येथे दिसतो. यामुळे भारतीय ज्ञानप्रणाली ही फक्त ग्रंथांमध्ये नसून प्रत्यक्ष रचना, पाणी, ऊर्जा, समाज आणि प्रशासन यामध्येही जिवंत राहू शकते, हे स्पष्ट होते.
या संपूर्ण प्रयोगाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘शास्त्रार्थ’. पाश्चात्य वादविवाद पद्धतीत अनेकदा विजय आणि पराजय यांना महत्त्व दिले जाते. भारतीय शास्त्रार्थ परंपरेत मात्र उद्देश दुसऱ्याला हरवणे नसून एकत्रित शहाणपण वाढवणे हा आहे. नालंदा विद्यापीठ पुढील काळात ही पद्धत अभ्यासक्रमात अधिक पद्धतशीरपणे समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. हे महत्त्वाचे आहे, कारण आजच्या जागतिक राजकारणाला अशा संवादपद्धतीची गरज आहे जी अहंकार वाढवत नाही, तर समज वाढवते.
नालंदा विद्यापीठात चाललेला हा अभ्यास केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कारण, हा अभ्यास आधुनिक आंतरराष्ट्रीय संबंधांना (International Relations) पूर्णपणे वेगळे आणि मूलभूत प्रश्न विचारतो, सत्ता म्हणजे केवळ लष्करी ताकद आहे का? युती म्हणजे फक्त हितसंबंधांचा करार आहे का? शांतता म्हणजे केवळ युद्धाचा अभाव आहे का? आणि विकास म्हणजे फक्त ऊर्जा उत्पादनाचा एखादा आकडा आहे का?
रामायण, महाभारत आणि भारतीय ज्ञानपरंपरा या प्रश्नांना अधिक व्यापक उत्तर देतात. त्या सांगतात की सत्ता नैतिक असली पाहिजे, युती विश्वासावर उभी राहिली पाहिजे, युद्ध शेवटचा पर्याय असला पाहिजे, आणि विकास समाज व निसर्ग यांच्या संतुलनात घडला पाहिजे. म्हणूनच नालंदा विद्यापीठातील हा अभ्यासक्रम भूतकाळात परत जाण्याचा प्रयत्न नाही; तो भूतकाळाच्या प्रकाशात भविष्य घडवण्याचा प्रयत्न आहे.
