जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता. अखेर शुक्रवारी (१० मे) दोन्ही देशांमध्ये शस्त्रविरामावर सहमती झाली. भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्यानंतर या शस्त्रविरामाची घोषणा करण्यात आली. शस्त्रविरामानंतर चार दिवसांपासून सीमेवर सुरू असलेले ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले आणि गोळीबार थांबला.

दक्षिण काश्मीरच्या पहलगामजवळ बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान २५ पर्यटक आणि एका स्थानिक पोनी ऑपरेटरचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)ने स्वीकारली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने कारवाई करीत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर तणाव आणखी वाढला. त्यानंतर पाकिस्तानने नागरी भागावर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला, जे सर्व हल्ले भारताने परतवून लावले. यादरम्यान दोन मुस्लीम देश वगळल्यास सर्व मुस्लीम देशांनी पाकिस्तानला पाठिंबा नाकारला. त्यामागील कारण काय? सविस्तर जाणून घेऊ…

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही दिवसांत भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पाकिस्तानला केवळ दोन मुस्लीमबहुल देशांचा पाठिंबा

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तुर्की व अझरबैजान हे दोन मुस्लीमबहुल देश पाकिस्तानच्या समर्थनार्थ पुढे सरसावले. तुर्कीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारताच्या हल्ल्यांचा निषेध केला आणि ऑपरेशन सिंदूरने सर्वव्यापी युद्धाचा धोका वाढवल्याचे भाष्य केले. तुर्कीने दोन्ही देशांना विचार करण्याचे आणि एकतर्फी कृतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने, “आम्हाला अपेक्षा आहे की, शक्य तितक्या लवकर या प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील आणि अशाच प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्याकरिता दहशतवादविरोधी क्षेत्रात आवश्यक यंत्रणा तयार केल्या जातील. जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या आवाहनाला आम्हीदेखील पाठिंबा देतो,” असे म्हटले आहे.

भारताच्या हल्ल्यांनंतर तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांनी ७ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना फोन करून संवेदनादेखील व्यक्त केल्या होत्या. भारताने केलेल्या हल्ल्यांबद्दल तुर्कीने म्हटले की, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे. एर्दोगान यांनी शरीफ यांना सांगितले की, तुर्कीने या संकटात पाकिस्तानच्या शांत आणि संयमी धोरणांना पाठिंबा दिला आहे, असे त्यांच्या कार्यालयाच्या एका निवेदनात जाहीर करण्यात आले.

दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांनंतर अझरबैजाननेदेखील पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला. अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला पाठिंबा देत एक निवेदन जारी केले आणि म्हटले, “पाकिस्तानच्या लोकांबरोबर एकता दर्शवीत आम्ही निष्पाप बळींच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो आणि जखमी लोक लवकर बरे होतील, अशी प्रार्थना करतो. आम्ही दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आणि राजनैतिक मार्गांनी हा संघर्ष सोडविण्याचे आवाहन करतो.”

मुस्लीमबहुल देश भारताबरोबर उभे

भारताबरोबरच्या तणावादरम्यान पाकिस्तानला अपेक्षित असा पाठिंबा मिळाला नाही, अशी माहिती आहे. अधिकृत सूत्रांनी ‘एएनआय’ला सांगितले, “विविध देशांच्या राजदूत आणि प्रतिनिधींबरोबर अनेक चर्चा झाल्या आणि या संवादांदरम्यान कोणीही पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला नाही. इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी)देखील संयम दाखवला. मुख्य म्हणजे इस्लामिक सहकार्य संघटनेशी भारताचे मर्यादित संबंध आहेत. भारताने ओआयसीमधील मित्रराष्ट्रांशी संपर्क साधला. काही वेळानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली, जी स्पष्टपणे भारताच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ओआयसीने दक्षिण आशियाई प्रदेशातील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि भारत- पाकिस्तानमध्ये संयम बाळगण्याचे आणि संवाद साधण्याचे आवाहन केले होते. तसेच दोन्ही बाजूंना शांततेच्या मार्गाने, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांचे चार्टर यांनुसार मतभेद सोडविण्याचे आवाहन केले होते. सूत्रांचे सांगणे आहे की, अलीकडील तणावातून हे स्पष्ट झाले आहे की, सर्व इस्लामिक देश पाकिस्तानच्या मागे उभे असल्याचा त्यांचा दावा खोटा ठरला आहे. सूत्रांनी सांगितले, “पाकिस्तानने बऱ्याच कालावधीपासून सर्व इस्लामिक देश त्यांच्या भूमिकेशी एकरूप असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु तसे झाले नाही.

पहलगाम हल्ल्यावर मुस्लीमबहुल देशांची प्रतिक्रिया

सौदी अरेबियाने भारताबद्दल विशेष सहानुभूती दाखवली. विशेषतः पंतप्रधान मोदी सौदी अरेबिया दौऱ्यावर असताना पहलगाम हल्ला झाला, तेव्हा त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. तसेच, मलेशियाने पहलगाममधील हल्ल्याचा निषेध केला आणि तो चुकीचा असल्याचे म्हटले. पाकिस्तानला कोणत्याही मुस्लीमबहुल देशाचा पाठिंबा नव्हता,” असे त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कतार, इराक व जॉर्डन यांसारख्या मुस्लीमबहुल देशांनी आपण भारताबरोबर असल्याचे म्हटले होते. त्यावेळी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी या हल्ल्यानंतर लगेचच भारतात परतले होते. तणाव कमी करण्यासाठी सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशीही संपर्क साधला होता.

ऑपरेशन सिंदूरनंतर सौदी अरेबियाच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी अचानक दोन्ही देशांचे दौरे केले. “पंतप्रधान मोदींच्या (सौदी अरेबिया) भेटीदरम्यान पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याने ते नाराज होते आणि त्यांनी गरज पडल्यास ते मदत करण्यास तयार असल्याचा संदेश दिला,” अशी माहिती सूत्रांनी दिली. सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री फैसल बिन फरहान यांनी एका निवेदनात म्हटले, “दूरध्वनी संभाषणादरम्यान चालू लष्करी संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली.” फैसल बिन फरहान यांनी प्रादेशिक सुरक्षा व स्थिरतेसाठी राज्याची वचनबद्धता आणि दोन मैत्रीपूर्ण देशांशी असलेले त्यांचे जवळचे संबंध अधोरेखित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इराणनेही शोक व्यक्त केला होता. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी ‘एक्स’वर लिहिले, “भारत आणि पाकिस्तान हे इराणचे शेजारी आहेत. या देशांचे शतकानुशतके जुने सांस्कृतिक संबंध राहिले आहेत. इतर शेजारी देशांप्रमाणे आम्ही या देशांना प्राधान्य स्थानी ठेवतो”. ऑपरेशन सिंदूरच्या एक दिवसानंतर त्यांनी भारतातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावरून स्पष्ट होते की, कोणत्याही मुस्लीमबहुल देशांनी पाकिस्तानला खुला पाठिंबा जाहीर केला नाही.