Decoding Pakistan’s strategic move in US-Iran Conflict Mediation: पश्चिम आशियातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. अमेरिका व इराण यांच्यात सलोखा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानने मध्यस्थी केली आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी रविवारी (२२ मार्च) ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त ‘द फायनान्शियल टाइम्स’ने दिले. असीम मुनीर हे सध्या पाकिस्तानमधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरत आहेत. त्यानंतर सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याबरोबर फोनवर चर्चा केल्याची माहिती ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली. ट्रम्प यांनी दिलेला शांततेचा १५ कलमी प्रस्ताव पाकिस्तानने इराणला दिल्यानंतर इराणने तो फेटाळला आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये अमेरिका व इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान टर्की व इजिप्त या देशांबरोबर मिळून मागच्या दाराने अमेरिका व इराणमध्ये चर्चा घडवून आणत आहे. अमेरिका व इराणमध्ये शातंता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान नेमकं काय करतोय? दोन देशांमध्ये मध्यस्थी करताना पाकिस्तान कसा अडकू शकतो? ते सविस्तर जाणून घेऊयात.
पाकिस्तानने मध्यस्थी केली तेव्हा काय घडले?
शांततेसाठी दोन देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे. विशेषत: अमेरिकेशी संबंधित प्रकरणात पाकिस्तानने अनेकदा मध्यस्थी केली आहे. १९७० मध्ये पाकिस्तानने चीन व अमेरिकेत सामंजस्य घडवून आणले होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन व चीनचे अध्यक्ष माओ झेडाँग यांच्यात पाकिस्तानने सलोखा घडवून आणला होता. त्यामुळे १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेशला मुक्त करण्यासाठी झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या प्रशासनाने पाकिस्तानची बाजू घेतली होती. पाकिस्तानने २००० व २०१० मध्ये सौदी अरेबिया व इराणमध्ये तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली होती.
२०१९ मध्ये सौदी अरेबियाच्या तेलाशी संबंधित सुविधांवर हल्ला झाला होता. त्यावेळी अमेरिकने इराणवर हल्ल्याचा आरोप केला होता. त्यानंतर इराण व सौदी अरेबिया या दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. तेव्हा अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान हे इराणची राजधानी तेहराण व सौदी अरेबियाची राजधानी रियाध दौऱ्यावर गेले होते. ‘अल जझीरा’ या वृत्तसंस्थेला इम्रान खान म्हणाले, “इराण व सौदी अरेबियात लष्करी संघर्ष टाळण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही आमचे बेस्ट दिले आहे.” पाकिस्तानने तालिबान व अमेरिका यांच्यात दोहा येथे टेबलवर चर्चा घडवून आणण्यात भूमिका बजावली होती. या चर्चेनंतर ऑगस्ट २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेतले होते.
पाकिस्तानने अमेरिकेशी जवळीक कशी साधली?
पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान सध्या मध्यस्थी करत आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर व पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मागील वर्षी एप्रिलपासून अमेरिकेशी जवळीक वाढवली आहे. पाकिस्तानने अमेरिकेबरोबर क्रिप्टोकरन्सी व दुर्मिळ खनिजांशी संबंधित करार केला आहे. मागील वर्षी मे महिन्यात भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबल्याचे श्रेय पाकिस्तानने ट्रम्प यांना दिले. तसेच ट्रम्प यांनीही भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध टाळल्याचे अनेकदा सांगितले. दरम्यान, भारताने ट्रम्प यांचा दावा सतत फेटाळला आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर मागील वर्षी जून महिन्यात ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना व्हाईट हाऊस मध्ये जेवणाचे आमंत्रण दिले होते. पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना जेवण दिल्याचे तेव्हा घडले होते. जून २०२५ मध्येच पाकिस्तानने ट्रम्प यांना भारत – पाकिस्तानमधील युद्ध टाळल्यासाठी शांततेचे नोबेल पारितोषिक द्यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला, हा भाग वेगळा. दरम्यान, मागील वर्षभरापासून पाकिस्तानने अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान या प्रकरणात मध्यस्थाची भूमिका निभावत आहे.
मोजतबा खामेनी यांनी पाकिस्तानला शुभेच्छा का दिल्या?
पाकिस्तानमध्ये शिया मुस्लीमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शिया मुस्लीमांचा देश असलेल्या इराणने पाकिस्तानला लक्ष्य केले नाही, असे मानले जाते. इराणने शेजारील यूएई, सौदी अरेबिया, कतार, ओमान, कुवैत, बहरीन या देशांवर हल्ला केला परंतु, पाकिस्तानवर हल्ला केला नाही. तसेच इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी पाकिस्तानला पर्शियन नववर्षाच्या शुभेच्छा मागील आठवड्यात दिल्या होत्या. यावरून पाकिस्तान व इराणमधील मैत्री दिसून येते. याचाच फायदा घेऊन पाकिस्तान सध्या मध्यस्थी करत आहे.
तारेवरची कसरत पाकिस्तानच्या कशी येऊ शकते अंगलट?
अमेरिका व इराण यांच्यात सलोखा घडवून आणताना पाकिस्तान तारेवरची कसरत करत आहे. ही कसरत त्याच्या अंगलटही येऊ शकते. इराणचे सध्या सौदी अरेबियाबरोबर संबंध बिघडले आहेत. इराणने सौदी अरेबियावर हल्लेही केले आहेत. मागील वर्षी पाकिस्तानने सौदी अरेबियाबरोबर एक संरक्षण करार केला आहे. त्यानुसार सौदी अरेबियावर कोणत्याही देशाकडून हल्ला झाल्यास पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मदतीला धावून जाईल व त्या हल्ल्याचा प्रतिकार करेल, असे त्या करारात आहे. त्यामुळे आता इराणच्या जवळ जाताना सौदी अरेबियाशी संबंध बिघडवणे पाकिस्तानच्या हिताचे नसेल. त्याचे कारण म्हणजे मोडकळीस आलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेसाठी सौदी अरेबिया हा महत्वाचा देश आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे भविष्य हे सौदी अरेबियाच्या सहकार्यावर अवलंबून आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींकडे भारत बारीक लक्ष ठेवून आहे. पाकिस्तान युद्ध मध्यस्थाच्या भूमिकेत यशस्वी होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
