Pakistan Economic Survey 2024-2025 : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या महागाईचा वणवा पेटला आहे. भारताविरोधात नेहमीच कुरापती करणारा हा देश सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने पाकिस्तानमधील लोकांचं जगणं कठीण झालं आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने १९८४ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) जवळपास १२ वेळा मदतीसाठी झोळी पसरवली आहे, पण तरीही तेथील महागाई काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विशेष बाब म्हणजे, पाकिस्तानमधील राजकारणी, लष्करी अधिकारी आणि सत्ताधारी वर्गावर या आर्थिक संकटाचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. उलटपक्षी यातील बरेच जण अब्जाधीश झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानवर दिवाळखोरीचं संकट कशामुळे आलं? तेथील राजकारण्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली? याबाबत जाणून घेऊ…
पाकिस्तान कर्जाच्या खाईत कसा सापडला?
सोमवारी जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ नुसार, पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आल्याचं दिसून येत आहे. मार्च २०२५ पर्यंत पाकिस्तानवर २६९.३४४ अब्ज डॉलर्स (भारतीय रुपयात अंदाजे २३.१ लाख कोटी) एवढं कर्ज असल्याचं समोर आलं आहे. २०१५ मध्ये पाकिस्तानवरील कर्जाची रक्कम दोन लाख कोटींच्या आसपास होती. २०२०-२१ मध्ये ती वाढून ११ कोटींपर्यंत गेली होती. म्हणजेच गेल्या दशकभरात पाकिस्तानवरील कर्जात पाचपट वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, “अत्याधिक किंवा चुकीच्या प्रकारे हाताळलेले कर्ज हे दीर्घकालीन वित्तीय स्थिरतेस धोका निर्माण करू शकते,” असं पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत पाकिस्तानवरील कर्जवाढीचा दर ६.७ टक्के होता, तर वित्तीय तूट जीडीपीच्या २.६% आणि महागाईचा दर ४.६ टक्के नोंदविण्यात आला. एकीकडे पाकिस्तानमधील जनता महागाईच्या भडक्यात होरपळून निघत असताना दुसरीकडे तेथील लष्करी अधिकारी व राजकीय व्यक्ती मात्र अब्जाधीश झाल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा ढासळत असतानाही तेथील लष्करी अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी मात्र अफाट संपत्ती गोळा केली आहे.
आणखी वाचा : वादळांमुळे विमानं कशी भरकटतात? २२७ प्रवाशांना वैमानिकाने मृत्यूच्या दाढेतून बाहेर कसे काढले?

पाकिस्तानमधील कोणकोणत्या व्यक्तींची वाढली संपत्ती?
- आसिम मुनीर : पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर हे देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. त्यांची एकूण संपत्ती ८००,००० डॉलर्स (भारतीय चलनातील ६.७ कोटी) एवढी असल्याचे सांगितले जाते.
- कमर जावेद बाजवा : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांची संपत्ती निवृत्तीच्या वेळी १२७० कोटी इतकी होती. मागील ६ वर्षात कमर जावेद बाजवा यांच्या पत्नीची संपत्ती शून्यावरून २२० कोटींपर्यंत पोहोचली आहे.
- आसिफ अली झरदारी : पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची संपत्ती सुमारे १८० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
- झरदारी हे पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष असून त्यांचा व्यापार शेती, साखर कारखाने आणि रिअल इस्टेटमध्ये पसरलेला आहे. मागील काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
- शहबाज शरीफ : पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी २०२५ मध्ये २६२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये लंडनमधील १५३ कोटी रुपयांची मातमत्ता व पाकिस्तानमधील रिअल इस्टेट व शेतीचा समावेश होता.
- नवाज शरीफ : तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाज शरीफ यांनी २०२५ मध्ये ४७ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली. मात्र, २०१५-१६ च्या निवडणुकांदरम्यान त्यांनी ५०० कोटी रुपयांची संपत्ती दाखवली होती. सूत्रांनुसार त्यांची संपत्ती १८०० कोटी रुपयांच्या आसपास असू शकते.
- २०१६ मध्ये पनामा पेपर्स प्रकरणात नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना १० वर्षांची शिक्षा व १०.५ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
- बिलावल भुट्टो-झरदारी : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी २०२५ मध्ये १९० कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये यूके व दुबईतील मालमत्ता आणि कंपन्यांना दिलेले १२४ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे.
- इम्रान खान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी २०२० मध्ये २४ कोटींची संपत्ती घोषित केली होती. इस्लामाबादमधील बानी गाला व्हिला मला भेटस्वरूप मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते.
- इम्रान यांना बहुतांश संपत्ती त्यांच्या वारसा हक्काने मिळालेली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या नावावर २०२० मध्ये ४३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे इम्रान यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात अमेरिकेत स्थलांतरितांची हिंसक निदर्शने; वाचा सविस्तर प्रकरण
‘आयएमएफ’कडून पाकिस्तानला ८,५०० कोटींचे कर्ज मंजूर
एकीकडे पाकिस्तानमधील सर्वसामान्य माणूस कर्जाच्या ओझ्याखाली दबत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि सैन्याचे वरिष्ठ अधिकारी मात्र अफाट संपत्ती उभारण्यात यशस्वी झाले आहेत. देश आर्थिक अंधारात असताना, काहींच्या घरात मात्र सोन्याचा प्रकाश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या कार्यकारी मंडळाने ९ मे रोजी पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे ८,५०० कोटी रुपये तात्काळ वितरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
आशियाई विकास बँकेकडूनही मिळणार ८०० कोटींचं कर्ज?
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजे ९ मे रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला एक अब्ज डॉलरचं कर्ज दिलं. आयएमएफच्या कार्यकारी मंडळाने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचं कर्ज तात्काळ वितरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे, आयएमएफच्या या निर्णयाला भारताने विरोध केला होता. दरम्यान, आयएमएफनंतर आता आशियाई विकास बँक पाकिस्तानला तब्बल ८०० दशलक्ष डॉलर्स देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या विरोधानंतरही एडीबीनेही हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. भारतासाठी हा धक्का मानला जात आहे.