Karachi Cocaine Queen Pinky Arrested High-Profile Drug Supplier : पाकिस्तानातील कराची शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली. अनमोल उर्फ पिंकी या नावाने ओळखली जाणाऱ्या या महिलेने अनेक शहरांत ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे निर्माण केले होते. इतक्यावरच न थांबता पिंकीने स्वतःच्या नावाने कोकेनचा ब्रँडदेखील बाजारात आणल्याची माहिती तपासातून समोर आली. तिच्या अटकेनंतर पाकिस्तानातील अमली पदार्थांच्या तस्करी विरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांना ड्रग्जचे व्यसन लावणारी ‘कोकेन क्वीन’ पिंकी आहे तरी कोण? तिचे काळे साम्राज्य कसे चालत होते? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्याविषयीचा हा आढावा…
पिंकीला अटक केल्यानंतर कराची पोलिसांनी एक सविस्तर निवेदन जारी केले. “शहरात कोकेन आणि इतर घातक अमली पदार्थांचा पुरवठा करण्यात गुंतलेली मुख्य संशयित महिला अनमोल ऊर्फ पिंकी हिला अटक करण्यात आली आहे. ही महिला ‘मोस्ट-वॉटेंड’ गुन्हेगार असून अनेक गुन्ह्यांमध्ये ती दीर्घकाळापासून फरार होती. तिच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल, कोट्यवधी रुपयांचे कोकेन, अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी रसायने आणि इतर साहित्य जप्त केले, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पिंकी ही पाकिस्तानातील ड्रग्स रॅकेटमधील एक मोठे नाव मानली जात होती. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून ती स्वतःची ओळख निर्माण करत होती, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
पिंकीच्या काळ्या साम्राज्याची इनसाइड स्टोरी
पाकिस्तानची ‘कोकेन क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंकीच्या अटकेनंतर तिच्या वैयक्तिक आणि गुन्हेगारी आयुष्याबद्दल अनेक खळबळजनक खुलासे समोर आले. अवघ्या १४ व्या वर्षी घर सोडणाऱ्या एका मुलीने पाकिस्तानातील तरुणांना ड्रग्जचे व्यसन कसे लावले, याचा उलगडा पोलीस तपासातून झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९५ मध्ये कराची शहरात जन्मलेली पिंकी बलोच पाडा या भागात लहानाची मोठी झाली. अतिशय कमी वयातच तिचा अंमली पदार्थांच्या तस्करांशी संपर्क आला होता. अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यामुळे पिंकीने वयाच्या १४ व्या वर्षी आपले घर सोडले. त्यानंतर तिने कराचीतील हाय-प्रोफाइल डान्स पार्ट्यांमध्ये जाण्यास सुरुवात केली. या पार्ट्यांच्या माध्यमातून पिंकीने अनेक प्रभावशाली आणि बड्या व्यक्तींबरोबर ओळख निर्माण केली. हेच हाय-प्रोफाइल संबंध तिला पुढे स्वतःचे ड्रग्सचे जाळे निर्माण करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरले.
आंतरराष्ट्रीय वकिलाशी लग्न अन् गुन्हेगारीत प्रवेश
पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, पिंकीने आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करीशी संबंध असलेल्या एका वकिलाशी विवाह केला होता. काही काळानंतर तिने पहिल्या पतीला घटस्फोट देऊन एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्नगाठ बांधली. या काळात पिकींने भाऊ नासिर आणि शौकत यांच्या मदतीने ड्रग्सचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला. कोकेनची निर्मिती कशी केली जाते, याचे तिने इंटरनेटवर रीतसर संशोधनही केले होते. नासिर हा पंजाबमधून कराचीमध्ये कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवायचा, तर शौकत हादेखील याच कामात अग्रेसर होता, त्याला यापूर्वी कराचीतील गिझरी पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात अटकही केली होती. पाच वर्षांपूर्वी पिंकीलाही पंजाब पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तब्बल २.४ कोटी रुपयांची लाच देऊन ती सुटल्याचा आरोप आहे. स्वत:ची ओळख लपवण्यासाठी पिंकीने अत्यंत क्रूर पाऊल उललले होते. तिने आपल्या हाताचे ठसे कायमचे मिटवण्यासाठी चक्क अॅसिडचा वापर केला होता. तिच्या अटकेनंतर पाकिस्तानातील ड्रग्स माफियाच्या नेटवर्कबाबत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्वीन मॅडम पिंकी – नावच पुरेसे आहे!
पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पिंकी आपल्या कोकेनची जाहिरात “क्वीन मॅडम पिंकी – फक्त नावच पुरेसे आहे, आनंद घ्या” या घोषवाक्यासह करत होती. कराचीतील उच्चभ्रू भागांमध्ये तिने ड्रग्स पुरवण्याचे मोठे जाळे उभे केले होते. ती स्वतः उच्च दर्जाचे कोकेन तयार करत होती आणि महिला रायडर्स तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी केली जात होती. उच्चभ्रू भागातील विद्यार्थी, श्रीमंत आणि प्रभावशाली लोक हे तिचे ग्राहक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंकी लाहोरहून कराचीपर्यंत रेल्वेने दोन महिलांमार्फत कोकेनची पाकिटे पाठवत होती. त्यानंतर रेल्वे स्थानकावर आधीच उभे असलेले दुचाकीस्वार ही पाकिटे घेऊन विविध व्यक्तींपर्यंत पोहोचवायचे, असेही पोलिसांनी म्हटले आहे. चौकशीदरम्यान पिंकीने “पाकिस्तानमध्ये माझ्यापेक्षा चांगले कोकेन कोणी तयार करू शकत नाही,” असा दावा केल्याचे वृत्त आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी तिच्याकडून कोकेन हायड्रोक्लोराइड, केटामाइन हायड्रोक्लोराइड, इफेड्रीन हायड्रोक्लोराइड, अॅसिटोन आणि बेकिंग पावडरसह मोठ्या प्रमाणात रसायने जप्त केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील समाजमाध्यमांवर पिंकीचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती पोलिसांसह इतर तपास यंत्रणांची खिल्ली उडवत असल्याचे दिसून आले. “आम्ही संपूर्ण कराचीमध्ये खुलेआम काम करत आहोत… हिम्मत असेल तर रोखून दाखवाच,” असे आव्हान तिने पोलिसांना दिले होते.
पोलिसांकडून पिंकीला व्हीआयपी ट्रीटमेंट?
पिंकी हिच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिला न्यायालयात हजर करताना मिळालेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, पोलिसांनी अटक केल्यानंतर पिंकीला कराचीतील सिटी न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तिची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली. पिंकीला जेव्हा न्यायालयात आणण्यात आले, तेव्हा तिचा लूक आणि तोरा पाहून सर्वजण थक्क झाले. व्हायरल व्हिडीओमध्ये पिंकीच्या हातात कोणतीही हातकडी नव्हती. तसेच, ती स्टायलिश चष्मा लावून हातात पाण्याची बाटली घेऊन एखाद्या सेलिब्रिटीसारखी चालताना दिसून आली. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसही तिला सन्मानाने रस्ता दाखवत असल्याचे दिसून आले. हा प्रकार समोर येताच कराचीचे पोलीस महासंचालक जावेद आलम या धक्कादायक घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कर्तव्य बजावणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कोणतीही निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. सिंध प्रांताचे गृहमंत्री झियाउल हसन लांजार यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली चौकशीचे आदेश दिले आहेत. एकंदरीत पिंकीला मिळालेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे कराची पोलिसांची नाचक्की झाली आहे.
