चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात रविवारी दुपारच्या सुमारास एक थरारक घटना घडली. विमान हजारो फूट उंचीवर असताना एका प्रवाशाकडे असलेल्या पॉवर बँकला अचानक आग लागली. त्यामुळे काही क्षणातच विमानाच्या कॅबिनमध्ये धूर पसरला आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विमानाचे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्याचवेळी विमानातील कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची विमान कंपनीने गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही मे महिन्यातही इंडिगोच्या विमानात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळीही एका प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाल्याने चंदीगडला जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. मागील सहा महिन्यांत लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकला आग लागण्याचा किंवा तिचा स्फोट होण्याचा धोका नेमका कशामुळे निर्माण होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे, त्याविषयी…
पॉवर बँकला आग लागण्यामागे नेमकी कारणे काय?
तज्ज्ञांच्या मते, बहुतांश पॉवर बँकमध्ये ‘लिथियम कोबाल्ट ऑक्साइड’ किंवा लिथियम-आयन सेल्सचा वापर केला जातो. त्यापैकी काही सेल निकृष्ट दर्जाचे, सदोष पद्धतीने तयार केलेले असतात. या बॅटरींमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असल्याने काही विशिष्ट परिस्थितींमध्ये त्या अतिउष्ण होऊन पेट घेऊ शकतात. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक सागर मित्रा यांच्या मते, निकृष्ट दर्जाचे बॅटरी सेल वापरल्यामुळे पॉवर बँकमध्ये आग लागल्याची सर्वाधिक शक्यता आहे. इंडिगोच्या विमानात ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या आगीच्या घटनेमागचे हेच संभाव्य कारण असू शकते. मे महिन्यात घडलेल्या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना मित्रा म्हणाले की, विमानाच्या लँडिंगदरम्यान साधारणपणे हलका धक्का बसतो. त्यामुळे पॉवर बँकमध्ये यांत्रिक कंपन निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास अंतर्गत शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचा धोका वाढू शकतो.
प्रवाशांना काही सवयीही ठरू शकतात धोकादायक
तज्ज्ञांच्या मते, बॅटरीच्या सकारात्मक आणि नकारात्मक टोकांदरम्यान अंतर्गत गळती होणे, उत्पादनातील दोष किंवा इलेक्ट्रोलाइटची गळती यामुळेही अशा घटना घडू शकतात. बॅटरीला नुकसान होणे, आतील संरक्षक थरात दोष असणे आणि कालांतराने बॅटरीची गुणवत्ता खालावणे यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. त्याशिवाय पॉवर बँक वापरताना काही चुका केल्यामुळे आगीचा धोका वाढू शकतो. बॅटरी उत्पादक कंपनी पॉवरट्रॉनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक पांचाळ यांच्या मते, अनेक जण नकळत पॉवर बँक जास्त तापमानाच्या संपर्कात ठेवतात, तसेच ती गरजेपेक्षा अधिक चार्ज करतात आणि खराब झालेली पॉवर बँक वापरत राहतात. या सवयींमुळे संबंधित उपकरण असुरक्षित बनू शकते. सामान्यतः पॉवर बँकची चार्ज पातळी सुमारे ८० टक्क्यांवर ठेवण्याची शिफारस केली जाते. बॅटरी पूर्ण क्षमतेपर्यंत चार्ज करणे टाळल्यास तिच्या सेलवरील ताण कमी होण्यास आणि साठवणुकीदरम्यान बॅटरीचे आयुष्य वाढण्यास मदत होऊ शकते.
विमान प्रवासात पॉवर बँक नेण्याचे नियम काय?
इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर इंडियासह बहुतांश भारतीय कंपन्या प्रवाशांना चेक-इन बॅगेजमध्ये पॉवर बँक ठेवण्यास सक्त मनाई करतात. मात्र असे असले तरीही काही ठराविक नियमांनुसार प्रवाशांना आपल्या हँडबॅगमध्ये पॉवर बँक ठेवण्याची परवानगी दिला जाते. विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ जय राव यांच्या मते, पॉवर बँकमध्ये लिथियम बॅटरी असते. या बॅटरीमध्ये बिघाड होऊन आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे पॉवर बँक प्रवाशाच्या हँडबॅगमध्ये असल्यास तिला आग लागल्याचे तातडीने लक्षात येऊ शकते. त्याउलट चेक-इन बॅगेज (विमानाच्या तळाशी ठेवलेले सामान) पॉवर बँक ठेवल्यास आणि तिला आग लागल्यास पटकन लक्षात येत नाही. नोव्हेंबर २०२५ मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालयाने विमान प्रवासादर्यान धोकादायक वस्तूंसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. त्यानुसार, विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकचा वापर करणे किंवा ती चार्ज करण्यास मनाई करण्यात आली. तसेच, प्रवाशांच्या आसनांवरील सामान ठेवण्याच्या कप्प्यातही पॉवर बँक ठेवण्यास बंदी घालण्यात आली. जगभरात घडलेल्या अशाच घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती. जून २०२४ मध्ये अबुधाबीहून कोझिकोडला जाणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानात एका प्रवाशाच्या पॉवर बँकचा स्फोट झाला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये दक्षिण कोरियातील एका विमानाने उड्डाण करण्यापूर्वी पोर्टेबल पॉवर बँकशी संबंधित आगीमुळे विमानाचे मोठे नुकसान झाले होते.
विमानात पॉवर बँक घेऊन जाताना कोणती काळजी घ्यावी?
पॉवर बँकला आग लागण्याच्या धोक्याबरोबरच ती अतिउष्ण होणे हीदेखील एक महत्त्वाची समस्या आहे. तज्ज्ञांच्या मते, विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पॉवर बँक शक्यतो ५५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवायला हवी. आधुनिक पॉवर बँकमध्ये सामान्यतः बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम असते. ही यंत्रणा बॅटरीच्या स्थितीवर लक्ष ठेवते आणि तिला आग लागण्याच्या किंवा स्फोट होण्याच्या समस्यांपासून संरक्षण करते. या यंत्रणेतील काही सुविधा वापरकर्त्याला स्वतः नियंत्रित करता येतात, तर काही सुविधा स्वयंचलितपणे कार्य करतात. वापरकर्त्यांनी पॉवर बँक खरेदी करताना तिचे आयुष्य, बॅटरी सेलचा दर्जा आणि वॉरंटी यांना प्राधान्य द्यावे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक सागर मित्रा यांनी सांगतात की, पॉवर बँक चार्ज करताना ती गरम झाल्यास प्रवाशांनी तिचा वापर तातडीने थांबवावा हवा. पॉवर बँक फुगणे, त्यातून द्रव पदार्थाची गळती होणे, विचित्र वास येणे किंवा ती असामान्यरीत्या गरम होणे ही स्फोट होण्याच्या धोक्याची संभाव्य लक्षणे आहेत. त्यामुळे पॉवर बँकमध्ये अशी लक्षणे दिसल्यास तिचा वापर टाळावा आणि सुरक्षितपणे विल्हेवाट लावावी, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
