अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अब्दुलरहिम मौसावी व संरक्षणमंत्री अझीझ नसीर झादेह यांच्यासह इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिन्यांनी दिली. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनेही आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर इराणची लष्करी ताकद नेमकी किती? त्यांच्याकडे नेमकी कोणकोणती क्षेपणास्त्रे आहेत? त्याविषयीचा हा आढावा…

इराणची लष्करी ताकद नेमकी किती?

अमेरिका व इस्रायलबरोबरच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्करी क्षमतेची जगभरात चर्चा सुरू आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या ताज्या आकडेवारीनुसार, इराणचे सैन्य पश्चिम आशियातील सर्वांत मोठ्या सैन्यापैकी एक आहे. या देशाकडे तब्बल ५,८०,००० सक्रिय सैनिक असून, त्यातील सुमारे २,००,००० सैनिक राखीव आहेत. हे सैन्य पारंपरिक लष्करी दल आणि ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस् कॉर्प्स’मध्ये विभागलेले आहे. इराणकडे ‘बसिज’ नावाची स्वयंसेवकांनी तयार केलेली एक धार्मिक निमलष्करी संघटना असून, ती सरकारशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे. अंतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी किंवा युद्धाच्या काळात स्वयंसेवकांची फौज वापरली जाते आणि ती संख्या कोट्यवधींच्या घरात असण्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.

इराणकडे संघटनांची मोठी कुमक

इराणकडे ‘रिव्होल्युशनरी गार्डस्’अंतर्गत ‘कुद्स फोर्स’ हे एक अत्यंत उच्चभ्रू पथक कार्यरत आहे. या पथकाद्वारे पश्चिम आशियातील इराणच्या मित्र संघटनांना प्रशिक्षण आणि शस्त्रे पुरवण्याचे काम केले जाते. त्यामध्ये लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी बंडखोर, सीरिया व इराकमधील शिया मिलिशिया आणि गाझामधील हमास व पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यांसारख्या संघटनांचा समावेश आहे. इराणवर हल्ला केल्यास त्याचे अत्यंत गंभीर व विध्वंसक परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती अनेकांना असल्यामुळेच आजवर इराणवर हल्ला करण्याचे कोणीही धाडस दाखवले नसल्याचे नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूलमधील राष्ट्रीय सुरक्षा विषयाचे तज्ज्ञ अफशोन ओस्तोवार यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : इराण युद्धामुळे अभूतपूर्व तेलभडक्याची शक्यता? होर्मुझ खाडीच्या नाकेबंदीने तेलपुरवठा आक्रसणार?

इराणकडे कोणकोणती क्षेपणास्त्रे?

इराणकडे मध्यपूर्वेतील सर्वांत घातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे व ड्रोनचा साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये क्रूझ क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे, तसेच २,००० किलोमीटर किंवा त्याहून अधिक पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इस्रायलसह संपूर्ण पश्चिम आशियाला कवेत घेऊ शकेल, अशी या शस्त्रांची मारक क्षमता आहे. इराणने आपल्या लष्करी कवायतीमध्ये अनेकदा आपल्या क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन केले आहे. त्यातील सेजील हे सर्वांत घातक क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २,४९४ किमी असून, ते इस्रायलपर्यंत सहज पोहोचू शकते. त्याशिवाय इराणकडे खैबर हे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र असून, त्याची मारक क्षमता १,४९४ किमीपर्यंत आहे. इराणकडे क्रूझ क्षेपणास्त्रे आणि नौकाविरोधी क्षेपणास्त्रांचाही मोठा साठा आहे. इराणचे ‘शाहेद’ ड्रोन सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहे. रशिया-युक्रेन युद्धावेळी आणि सुदानमधील संघर्षातही इराणच्या ड्रोनचा वापर झाल्याचे समोर आले होते.

होर्मुझ सामुद्रधुनीची बंद पाडण्याची क्षमता

वॉशिंग्टनस्थित आर्म्स कंट्रोल असोसिएशननुसार, इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम प्रामुख्याने उत्तर कोरिया आणि रशियाच्या डिझाईनवर आधारित आहे. त्यासाठी त्यांना चीनकडूनही काही तांत्रिक साह्य मिळत असल्याचे समोर आले आहे. इराणकडे तब्बल १,७१३ रणगाडे व १,५१७ रॉकेट प्रोजेक्टर्स आहेत. आपल्या नौदलाला बळकटी मिळण्यासाठी इराणने मोठ्या प्रमाणावर वेगवान बोटी व काही लहान पाणबुड्याही तयार केलेल्या आहेत. या पाणबुड्या होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा जागतिक ऊर्जा पुरवठा आणि जहाज वाहतुकीत अडथळा निर्माण करू शकतात. इराणला लष्करीदृष्ट्या सक्षम राष्ट्र मानले जात असले तरीही ते अमेरिका व इस्रायलच्या अत्याधुनिक आणि प्रगत सशस्त्र दलांच्या तुलनेत खूप मागे आहे. इराणचे हवाई दल अत्यंत कमकुवत असून, त्यांच्याकडे असलेली बहुतेक विमाने १९४१ ते १९७९ मधील शाह राजवटीच्या काळातील आहेत. इराणचे अनेक रणगाडे आणि चिलखती वाहने आता जुनी आणि कालबाह्य झाली आहेत. त्याशिवाय पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत इराणकडे अत्याधुनिक रडार आणि स्टेल्थ तंत्रज्ञानाचा अभाव आहे.

हेही वाचा : Ayatollah Seyyed Ali Khamenei : अयातुल्ला खामेनींनी केलेला कर्नाटक आणि काश्मीर दौरा ऐतिहासिक का ठरला होता?

इराणचा कमकुवत दुवा काय?

आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करून, इराणने दीर्घकाळापासून गुप्त अण्वस्त्र संशोधन सुरू ठेवल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. इराण अवघ्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत अण्वस्त्रासाठी आवश्यक असलेले ‘फिझिल मटेरियल’ तयार करू शकतो, असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेने इराणच्या मुख्य अणू केंद्रांना लक्ष्य केले होते. त्यामध्ये इराणचे मुख्य युरेनियम संवर्धन केंद्र ‘नतांन्झ’ व ‘फोर्डो’ यांसारख्या अतिसंवेदनशील लष्करी तळांचा समावेश होता. या हल्ल्यांमुळे इराणच्या अणू कार्यक्रमाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या हवाई दलातील निवृत्त कर्नल सेड्रिक लेटन यांनी ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इराणकडे सुमारे दोन ते तीन हजार क्षेपणास्त्रे आहेत; मात्र ती डागण्यासाठी त्यांच्याकडे पूर्वीइतकी लाँचर्स उरलेली नाहीत. गेल्या वर्षी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांपूर्वी इराणकडे जितकी लाँचर्स होती, त्यापैकी आता सुमारे एक-तृतीयांशच शिल्लक असण्याची शक्यता आहे. अमेरिका व इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणकडून इतक्या लवकर प्रत्युत्तर मिळेल, असे कोणालाही वाटले नव्हते. आता ते युद्धात किती काळ तग धरून राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.