Premium

कॅनडात शिखांचे प्रमाण एवढे जास्त का? स्थलांतरास कधीपासून सुरुवात झाली?

२०२१ सालच्या कॅनडाच्या जनगणनेनुसार तेथे साधारण २.१ टक्के शीख नागरिक आहेत.

CANADA SIKH
१९१४ साली कोमागाटा मारू नावाचे एक जपानी जहाज कॅनडातील व्हॅनकुव्हरच्या किनाऱ्यावर आले होते. या जहाजात एकूण ३७६ प्रवासी होते. (फोटो सौजन्य-Wikimedia Commons)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. खलिस्तान चळवळीचे समर्थन करणाऱ्या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात आहे, असा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे याबाबतचे पुरावेदेखील आम्ही भारताला दिले आहेत, असे ट्रुडो म्हणाले आहेत. कॅनडा देशात शीख नागरिकांचे प्रमाण लक्षणीय असून राजकीय लाभापोटी ट्रुडो यांनी अशा प्रकारचे आरोप केले असावेत, असा दावा केला जात आहे. दरम्यान, शीख बांधव भारतातून कॅनडा देशात का स्थायिक झाले? कॅनडात शीख समाजाचे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे? असे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतानंतर कॅनडात सर्वाधिक शीख

२०२१ सालच्या कॅनडाच्या जनगणनेनुसार तेथे साधारण २.१ टक्के शीख नागरिक आहेत. भारतानंतर सर्वाधिक शीख समाजाचे लोक असलेला हाच देश आहे. एका शतकापेक्षा अधिक काळापासून भारतातून शीख समाज वेगवेगळ्या कारणांसाठी कॅनडात स्थायिक झालेला आहे. याच कारणामुळे तेथे शीख समुदाय मोठ्या प्रमाणात आढळतो. भारतातून शीख बांधवांचे कॅनडात स्थलांतर कसे झाले, याबाबत लंडन युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजचे प्राध्यापक गुरहरपाल सिंग यांनी ‘द न्यूयॉर्कर’ मासिकाला सविस्तर माहिती दिलेली आहे. “१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात शीख समाजातील लोकांनी कॅनडात स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. ब्रिटिश लष्करातील नोकरीनिमित्त हे शीख बांधव कॅनडात येऊ लागले,” असे गुरहरपाल सिंग यांनी सांगितले.

हे वाचा >> कॅनडाच्या पंतप्रधानांना खलिस्तान समर्थक भूमिका घ्यायला लावणारा जगमित सिंग कोण आहे?

लष्करात सैनिक म्हणून कॅनडात तात्पुरते स्थलांतर

“ब्रिटिश साम्राज्याचा ज्या ठिकाणी विस्तार झाला, त्या बहुतांश ठिकाणी ब्रिटिश लष्करातील सैनिक म्हणून शीख बांधव त्या त्या प्रदेशात गेले. यात विशेषत: चीन, सिंगापूर, फिजी, मलेशिया तसेच पूर्व आफ्रिका या प्रदेशांचा समावेश होता”, असेही सिंग यांनी सांगितले. १८९७ सालापासून शीख समाज कॅनडात येण्यास सुरुवात झाली. ब्रिटिश इंडिया आर्मीमधील (२५ वे घोडदळ, फ्रंटियर फोर्स) रिसालदार मेजर केसूरसिंग हे कॅनडात स्थायिक होणारे पहिले शीख मानले जातात. हाँगकाँग रेजिमेंटचा एक भाग म्हणून भारतातून शीख सैनिक व्हॅनकुव्हर या प्रदेशात आले होते. याच सैनिकांत केसूरसिंग हेदेखील होते. पुढे या रेजिमेंटमध्ये काही चीन आणि जपानी सैनिकदेखील सहभागी झाले.

नोकरीच्या शोधात शीख समाजाचे कॅनडात स्थलांतर

१९०० च्या सुरुवातीला शीख समाज कॅनडात येण्यास सुरुवात झाली, असे म्हटले जाते. त्या काळी बहुतांश शीख लोक कामाच्या निमित्ताने स्थलांतर करायचे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, ओंटारियो या भागात ते काम करायला यायचे. याबाबत मेल्विन एम्बर, कॅरोल आर एम्बर आणि इआन स्कोगार्ड यांनी संपादित केलेल्या ‘एनसायक्लोपीडिया ऑफ डायास्पोरस: इमिग्रंट अँड रिफ्युजी कल्चर्स अराउंड द वर्ल्ड’ या पुस्तकात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. “शीख समाजातील लोकांचे कॅनडामध्ये येण्याचे प्रमाण सुरुवातीला कमी होते. प्रतिवर्ष साधारण पाच हजारच्या आसपास हे प्रमाण असावे. नोकरीच्या शोधात ते यायचे. कॅनडात स्थायिक होण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता,” असे या पुस्तकात सांगण्यात आले आहे.

कॅनडात शीख समाजाचे प्रमाण वाढल्यामुळे संघर्ष

काळानुसार शीख समाजाचे कामानिमित्त कॅनडात येण्याचे प्रमाण वाढले. त्यांना येथे रोजगारही मिळू लागला. मात्र, हे प्रमाण वाढल्यानंतर कॅनडातील लोकांमध्ये अस्थिरता निर्माण झाली. आमचे रोजगार शीख समाज हिसकावून घेत आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ लागली. परिणामी येथे शीख समाजाला काही काळ शत्रुत्वाचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे, तर शीख समाजाला सांस्कृतिक आणि वाशिंक भेदभावालाही सामोरे जावे लागले. शीख समाजाचे कॅनडात येण्याचे प्रमाण वाढल्यानंतर हा संघर्षही वाढत गेला.

कॅनडाने निर्बंध केले होते कडक

शीख लोकांचे प्रमाण वाढल्यानंतर कॅनडा सरकारवर तेथील जनतेचा दबाव वाढला. हे स्थलांतर रोखण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलावी, अशी मागणी होऊ लागली. त्यानंतर तेथील सरकारने कॅनडात येऊन काम करण्यासाठीचे निर्बंध कडक केले. आशियातील नागरिकांना कॅनडात यायचे असेल तर त्यांच्याजवळ २०० डॉलर्स असणे बंधनकारक करण्यात आले. तसे नलिनी झा यांनी ‘द इंडियन डायस्पोरा इन कॅनडा: लुकिंग बॅक अँड अहेड’ या आपल्या लेखात (भारत त्रैमासिक, जानेवारी-मार्च, २००५, खंड ६१) लिहिलेले आहे.

१९१४ सालची कोमागाटा मारू घटना

या निर्बंधांचा परिणाम म्हणून कामानिमित्त कॅनडात जाणाऱ्या शीखांचे प्रमाण कमी झाले. १९०८ सालानंतर हे प्रमाण सातत्याने कमी झाले. १९०७-०८ या सालापर्यंत भारतातून कॅनडात जाणाऱ्या शिखांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. याच काळात ‘कोमागाटा मारू’ ही दु:खद घटना घडली होती. १९१४ साली कोमागाटा मारू नावाचे एक जपानी जहाज कॅनडातील व्हॅनकुव्हरच्या किनाऱ्यावर आले होते. या जहाजात एकूण ३७६ प्रवासी होते. यात बहुतांश शीख समाजाचे प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना व्हॅनकुव्हरमध्ये ताब्यात घेण्यात आले. साधारण दोन महिने हे प्रवासी जहाजातच होते. पुढे त्यांना परत आशियात पाठवण्यात आले होते. कॅनेडियन म्युझियम ऑफ ह्युमन राइट्सच्या म्हणण्यानुसार हे जहाज भारतात आल्यानंतर ब्रिटिश अधिकारी आणि प्रवासी यांच्यात तीव्र संघर्ष झाला होता. ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते क्रांतिकारक असल्याचे वाटले होते. या संघर्षात साधारण १६ प्रवाशांसह २२ जणांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा >> खलिस्तान समर्थकांच्या मुद्द्यावरून अनेकवेळा भारत-कॅनडा आमनेसामने, जाणून घ्या…

दुसऱ्या महायुद्धानंतर निर्बंध शिथिल

दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतर कॅनडाने परदेशातील नागरिकांना कॅनडात येण्यासाठीच्या नियमांत बदल केले. हे निर्बंध अधिक शिथिल केले. कॅनडा सरकारच्या या निर्णयामागे एकूण तीन कारणे असल्याचे म्हटले जाते. यातील पहिले कारण म्हणजे कॅनडाने संयुक्त राष्ट्रसंघात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी कॅनडाने वांशिक भेदभावाविरुद्ध असल्याचे सांगितले होते. त्यामुळे वंशाचा आधार घेऊन परदेशी नागरिकांना कॅनडात येण्यासाठीचे धोरण राबवणे कॅनडाला कठीण झाले. दुसरे कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर कॅनडाला आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करायचा होता. त्यासाठी कॅनडाला मजुरांची गरज होती. तिसरे कारण म्हणजे युरोपमधून स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. परिणामी मनुष्यबळही कमी झाले. त्यामुळे कॅनडाने आपले धोरण शिथिल केले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How punjab sikh community migrated to canada know detail information prd

First published on: 25-09-2023 at 20:35 IST
Next Story
अमेरिकेचे सरकार १ ऑक्टोबर रोजी ‘शटडाऊन’? सरकार शटडाऊन होणे म्हणजे काय, ते कसे होते?