How RSS Chief Appointed: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालकांची नियुक्ती कशी केली जाते, त्याबाबत माहिती दिली होती. भागवत म्हणाले होते, “कोणताही हिंदू स्वयंसेवक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक होऊ शकतो. एससी, एसटी प्रवर्गातील स्वयंसेवक देखील सरसंघचालक होऊ शकतो.” सरसंघचालक पदावर नियुक्ती हे जात पाहून केली जात नाही, तर कार्य पाहून केली जाते, असे मोहन भागवत म्हणाले होते. तसेच त्यांनी सरकार्यवाह पदाची निवडणूक कशी घेतली जाते, त्याबाबत माहिती दिली होती.
सरसंघचालक पद
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (अध्यक्ष) या पदावरील व्यक्ती संघाचे तत्वज्ञान तसेच संघाची दिशा ठरवण्याचे काम करते. संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक उपस्थित असतील त्यांना एक विशेष प्रणाम स्वयंसेवकांकडून केला जातो. त्याला सरसंघचालक प्रणाम असे म्हटले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक या पदानंतर सरकार्यवाह हे पद आहे. या पदावरील व्यक्तीला संघाचे कार्यकारी प्रमुख मानले जाते. याच पदाला सरचिटणीस असेही संबोधले जाते. सरसंघचालक व सरकार्यवाह या मराठी शब्दांवरून संघात मराठी भाषिकांचे प्रस्थ असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी नागपुरात झाली होती. त्यामुळे नागपूरमध्येच संघाचे मुख्यालयदेखील आहे.
सरसंघचालक निवड प्रक्रिया
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाह या पदासाठी निवडणूक घेण्यात येते. परंतु, सरसंघचालक या पदासाठी मात्र निवडणूक घेतली जात नाही. पुढील सरसंघचालकांची नियुक्ती करण्याचा संपूर्ण अधिकार हा विद्यमान सरसंघचालकांकडे असतो. सरसंघचालकांना योग्य वाटेल त्या व्यक्तीची त्यांना सरसंघचालकपदी नियुक्ती करता येते. सरसंघचालकांनी कधी पदावरून पायउतार व्हायचे, याचा निर्णय योग्य वेळी ते स्वत:च घेतात.
सरकार्यवाह पदासाठी दर तीन वर्षांनी नागपूरमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित केली जाते. त्यात निवडणूक घेऊन सरकार्यवाह या पदावर नियुक्ती केली जाते. सरकार्यवाह यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाचे महत्वाचे निर्णय घेणारी सभा मानली जाते. त्यात देशभरातून प्रतिनिधी सहभागी होतात. सरकार्यवाह यांची नियुक्ती झाली की ते स्वत: त्यांच्या टीमची नियुक्ती करतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील आतापर्यंतच्या सरसंघचालकांची नियुक्ती कशी झाली?
हेडगेवार यांनी केली गोळवलकरांची नियुक्ती
केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना केली होती. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यानंतर तेच आरएसएसच्या प्रमुख पदावर होते. २१ जून १९४० रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
हेडगेवार यांनी एक सीलबंद लिफाफा मागे सोडला होता. त्यात त्यांनी पुढील सरसंघचालकाचे नाव लिहिले होते. एम. एस. गोळवलकर यांचे त्या लिफाफ्यात नाव होते. गोळवलकर हे त्यावेळी फक्त ३३ वर्षांचे होते. ते देखील ब्राम्हण समाजातील होते. ३ जुलै १९४० रोजी सरसंघचालक म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. हेडगेवार यांनी जशी गोळवलकरांची नियुक्ती केली, तशीच गोळवलकर यांनी पुढील सरसंघचालकांची नियुक्ती केली होती.
गोळवलकरांकडून बाळासाहेब देवरस यांची नियुक्ती
गोळवलकर हे ३३ वर्ष सरसंघचालक पदावर होते. ५ जून १९७३ रोजी सरसंघचालक पदावर असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यकाळात संघाने आणखी काही संघटना सुरू केल्या होत्या. तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये संघाचा विस्तार झाला होता.
गोळवलकर यांनी देखील एका लिफाफ्यात पुढील सरसंघचालकाचे नाव लिहून ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर तो लिफाफा मिळाला होता. ६ जून १९७३ रोजी ५८ वर्षीय बाळासाहेब देवरस यांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बाळासाहेब देवरस यांनी १९६५ ते १९७३ या कालावधीत सरकार्यवाह या पदावर काम केले होते.
देवरस यांनी सिंह यांची नियुक्ती केली
हेडगेवार व गोळवलकर यांचे निधन झाले त्यावेळी ते दोघेही सरसंघचालक पदावर होते. बाळासाहेब देवरस यांनी २१ वर्ष सरसंघचालक पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर त्यांनी सतत आजारी पडत असल्याने सरसंघचालक पद सोडत पुढील सरसंघचालकांच्या नावाची घोषणा केली होती. राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांची ११ मार्च १९९४ रोजी देवरस यांनी सरसंघचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी राजेंद्र सिंह हे ७२ वर्षांचे होते.
राजेंद्र सिंह यांनी १९८७ मध्ये संघाच्या सरकार्यवाह पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सह सरकार्यवाह या पदावर काम करत होते. त्यांची १९९४ मध्ये सरसंघचालक पदावर नियुक्ती करण्यात आली. ते संघाचे पहिले गैरब्राह्मण व उत्तर भारतातील स्वयंसेवक होते. प्रचारक होण्याआधी ते फिझिक्सचे शिक्षक होते. सहा वर्ष त्यांनी सरसंघचालक पद सांभाळले.
राजेंद्र सिंह यांनी केली सुदर्शन यांची नियुक्ती
सरसंघचालक राजेंद्र सिंह व सरकार्यवाह एच.व्ही. शेषाद्री या दोघांची प्रकृती २००० मध्ये खालावली होती. त्यावेळी राजेंद्र सिंह यांनी ६९ वर्षीय के. एस. सुदर्शन यांच्या नावाची सरसंघचालक म्हणून घोषणा केली. सुदर्शन हे त्यावेळी सह सरकार्यवाह होते. सुदर्शन यांचा जन्म कर्नाटकातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. मार्च २००९ पर्यंत सुदर्शन यांनी सरसंघचालक पदाची जबाबदारी पार पाडली होती.
दरम्यान, २००० मध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा झाली होती. त्यात मोहन भागवत यांची सरकार्यवाह या पदावर निवड करण्यात आली. एच.व्ही.शेषाद्री यांनी १९८७ ते २००० या सर्वाधिक जास्त कालावधीसाठी सरकार्यवाह या पदाचा कार्यभार सांभाळला होता.
सुदर्शन यांनी केली मोहन भागवत यांची नियुक्ती
२१ मार्च २००९ रोजी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पार पडली. त्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. २००० ते २००९ पर्यंत सरकार्यवाह पदावर असलेल्या मोहन भागवत यांनी पदावर कायम राहण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. नवीन सरकार्यवाह निवडण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधी सुदर्शन म्हणाले, “माझी स्मृती आता कमी होत आहे. माझ्यावर जी जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्यासाठी मला सतत अभ्यास करणे आवश्यक आहे. पण मी माझ्या खराब स्वास्थ्यामुळे ते करण्यात असमर्थ ठरतोय. मला माझ्या सरसंघचालक पदाची जबाबदारी मोहनराव भागवतजी यांच्यावर सोपवायची आहे.” असे बोलून सुदर्शन यांनी त्यांचे सरसंघचालक पद सोडले. त्यानंतर मोहन भागवत यांनी सुदर्शन व इतर ज्येष्ठांच्या पाया पडल्या व ते खुर्चीवर बसले. त्यावेळी ते ५८ वर्षांचे होते. राजेंद्र सिंह यांचा अपवाद वगळता भागवत हे देखील ब्राह्मण आहेत. हेडगेवार यांच्या निधनानंतर जन्मलेले ते पहिले सरसंघचालक ठरले. १९७५ मध्ये आणीबाणी घोषित झाल्यानंतर भागवत हे पूर्णवेळ प्रचारक झाले. त्याआधी ते व्हेटरनरी डॉक्टर म्हणून चंद्रपूरमध्ये काम करत होते.

