How Russia R-37M Long-Range Air-to-Air Missiles : भारताने आपल्या हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी रशियाकडून नवीन क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये तब्बल १.२ अब्ज डॉलर्सचा (सुमारे ११,४०० कोटी रुपये) करार झाल्याचे सांगितले जात आहे. या करारांतर्गत भारताला हवेतून हवेत मारा करणारी ‘R-37M’ श्रेणीची जवळपास ३०० अत्याधुनिक क्षेपणास्त्रे मिळणार आहे. पाकिस्तानच्या ताफ्यातील चिनी बनावटीच्या लढाऊ विमानांना रोखण्यासाठी ही क्षेपणास्त्रे अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे. चीन आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशांकडून निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वदेशी बनावटीची शस्त्रे विकसित करण्यावरही भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यात येत असलेली रशियन बनावटीची नवीन क्षेपणास्त्रे नेमकी कशी असणार, त्याबाबत जाणून घेऊ…

R-37M क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्ये काय?

रशियाकडील ‘आर-३७ एम’ हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणाऱ्या जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक मानले जाते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ३०० ते ४०० किमीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. अंदाजे ६०० किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात ६० किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. शत्रूच्या मोठ्या विमानांसह त्यांच्या ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. त्याची रचना शेकडो किलोमीटरचे अंतर काही सेकंदात पार करून लक्ष्य गाठण्यासाठी केली गेली आहे. भारतीय हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानांवरून ही क्षेपणास्त्रे अगदी सहजपणे डागले जाऊ शकते. ‘ॲक्सहेड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियन बनावटीच्या या क्षेपणास्त्राचा वेग आवाजापेक्षाही सहा पटीने जास्त आहे.

चीन-पाकिस्तानला धडकी भरणार

गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही लष्करी मोहीम राबवली होती. त्यावेळी भारताच्या लढाऊ विमानांविरोधात पाकिस्तानने चिनी बनावटीच्या ‘पीएल-१५’ या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. त्याची मारक क्षमता सुमारे २०० किमी असून ते आवाजाच्या सुमारे पाचपट वेगाने प्रवास करू शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ‘आर-३७ एम’ हे ‘पीएल-१५’ पेक्षाही अधिक घातक ठरते. ‘मिलिटरी वॉच’ मॅगझिनच्या अहवालानुसार, लांब पल्ल्याच्या मारक क्षमतेच्या बाबतीत ‘आर-३७ एम’ हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीनची ‘पीएल-एक्सएक्स’ ही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे असल्याचे मानले जाते, ज्यांची मारक क्षमता अंदाजे ८०० किमी पर्यंत असण्याची शक्यता आहे. रशियाकडील ‘आर-३७ एम’ या नवीन क्षेपणास्त्रांमुळे भारताला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांविरुद्ध मोठी ताकद मिळणार आहे.

भारत ३०० क्षेपणास्त्रे खरेदी करणार

रशियाने भारताला सुमारे ३०० ‘आर-३७ एम’ अल्ट्रा-लाँग-रेंज क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. खरेदी करण्यास हिरवा कंदील दिला आहे. ‘डिफेन्स सिक्युरिटी एशिया’च्या अहवालानुसार, या क्षेपणास्त्रांचा पुरवठा पुढील १२ ते १८ महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. रशियाने युक्रेनविरोधातील युद्धात या क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचेही सांगितले जात आहे. ‘आर-३७ एम’ हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने शत्रूच्या मुख्य लढाऊ विमानांच्या मागे असणाऱ्या AWACS विमाने, हवेत इंधन भरणारे टँकर, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालीला लक्ष करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. सिंगापूरमधील ‘एस राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’चे संशोधक शौनक सेट यांच्या मते, ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या संपूर्ण हवाई जाळ्याला निकामी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

R-37M क्षेपणास्त्रांची ब्राह्मोसशी तुलना

भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असलेल्या ब्राह्मोसशी तुलना केल्यास R-37M चे विशिष्ट क्षेत्रातील वर्चस्व दिसून येते. ब्राह्मोस जमिनीवरील आणि सागरी लक्ष्यांविरुद्ध जमिनीवरून-जमिनीवर किंवा हवेतून-जमिनीवर मारा करण्यात उत्कृष्ट आहे. मात्र, असे असले तरी ते विमानांवर हल्ला करू शकत नाही. R-37M ही उणीव भरून काढते, ते ब्राह्मोसपेक्षा वेगवान असून हवाई धोक्यांवर हल्ले करण्यास सक्षम आहे. R-37M AWACS सारख्या शत्रूच्या पाळत ठेवणाऱ्या मालमत्तांना दूरवरून नष्ट करू शकते. R-37M हे टँकर निष्क्रिय करते, ज्यामुळे लढाऊ विमानांना इंधनाची तफावत भासू शकते. रशिया आणि भारतातील हा खरेदी करार झाल्यास भारताच्या शस्त्रागारातील तातडीची पोकळी भरून निघू शकते.

चीन-पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा

स्वीडन येथील ‘स्टॉकहोम सेंटर फॉर साऊथ एशियन अफेअर्स’चे प्रमुख जगन्नाथ पांडा यांच्या मते, रशियाबरोबरच्या या करारामुळे भारताला अनेक फायदे होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सध्या चिनी बनावटीच्या ‘जे-१० सी’ या विमानांवर अवलंबून आहे. रशियन क्षेपणास्त्रांमुळे भारताला पाकिस्तानकडे असलेल्या लढाऊ विमानांना प्रभावी प्रत्युत्तर देता येईल. ‘आर-३७ एम’ मुळे पाकिस्तानला आपली महत्त्वाची विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून खूप दूर ठेवावी लागतील, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होईल. हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानांवर हे क्षेपणास्त्रे समाविष्ट केल्यास त्यांच्या हल्ल्याची क्षमता वाढेल आणि पाकिस्तानच्या हवाई नियोजनात अडथळे निर्माण होतील. हा करार दर्शवतो की, भारत सध्या आपल्या स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या विकासाची वाट न पाहता तातडीच्या लष्करी गरजांना प्राधान्य देत आहे. तथापि, भारताचे स्वदेशी प्रकल्प देखील प्रगतीपथावर आहेत. भारताला रशियन बनावटीची नवीन क्षेपणास्त्रे मिळत असली तरीही स्वदेशी श्रेणीतील क्षेपणास्त्रेदेखील लवकरच सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद दुप्पटीने वाढण्यास मदत होणार आहे.