Poverty Tourism Dharavi धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. परदेशी पर्यटकांबरोबरच पेडर रोड आणि मलबार हिलमधील उच्चभ्रू लोकही धारावातील राहणीमान पाहण्यासाठी तिथे भेट देत आहेत. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या वस्तीला भेट देताना दोन तासांच्या ‘स्लम टुरिझम’साठी उच्चभ्रूकडून १५,००० रुपये उकळले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. ही झोपडपट्टी दाखवण्यासाठी एक गाईडदेखील लोकांबरोबर असतो, अशी माहिती ‘इंडिया टुडे डिजिटल’ने घेतलेल्या एका मुलाखतीतून समोर आली आहे. काय आहे ‘स्लम टुरिझम’? धारावीत नक्की काय चाललंय? जाणून घेऊयात…

काय आहे ‘स्लम टुरिझम’?

धारावीत अशा काही गल्ल्या आहेत, जिथे सामान्य मुंबईकरही जायला कचरतात. ‘इंडिया टुडे डिजिटल’ने धारावीतील काही लोकांची मुलाखत घेतली. त्यावेळी तिथे अनपेक्षितपणे परदेशी पर्यटकांचा एक गट दिसला. त्यांच्याबरोबर एक ‘गाईड’ होता. त्याचे नाव ओंकार ढमाले होते. त्याला विचारण्यात आले की, तो या स्लम टूरसाठी किती शुल्क घेतो. तेव्हा त्याने प्रतिव्यक्ती १५ हजार रुपये, असे उत्तर दिले. त्याच्याबरोबर पाच परदेशी पर्यटक होते आणि झोपडपट्टीत केवळ दोन तास चालून त्याने ७५,००० रुपये कमावले. ही काही नवीन बाब नाही. ‘इंडिया टुडे मॅगझिन’ने २००६ मध्येच भारतातील ‘पॉव्हर्टी टुरिझम’चा उल्लेख केला होता; मात्र तेव्हापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत.

पूर्वी अशा सहली संघटित वॉकिंग ग्रुप्स आणि प्रशिक्षित गाईड्सद्वारे चालवल्या जात असत. आता हा व्यवसाय खुद्द धारावीकरच करत आहेत आणि तेही एखाद्या कॉर्पोरेट पगाराला साजेसा दर आकारून. मुंबईला भेट देणारे परदेशी पर्यटक सहसा धारावीतील चर्मोद्योगासाठी (लेदर मार्केट) येतात; पण ही वस्ती त्या मुख्य रस्त्याच्या पलीकडे कित्येक किलोमीटर खोलवर पसरलेली आहे. तिथे अशा काही गल्ल्या आणि कोपरे आहेत, जिथे फक्त रहिवासीच जातात. धारावीत जेमतेम तीन फूट रुंदीच्या गल्ल्या आहेत. अशा जागांचे आकर्षण फक्त परदेशी लोकांनाच नाही, तर कधीही तिथे न गेलेल्या मुंबईकरांनाही वाटते.

मात्र, भारतीयांसाठी स्लम टुरिझमचे दर वेगळे आहेत. त्यांना यासाठी १,५०० ते ७,००० रुपये मोजावे लागतात. हा दर परदेशी पर्यटकांकडून आकारल्या जाणाऱ्या दराच्या अर्धा असतो. अनेक जण अशा पर्यटनाला ‘व्हॉयरिझम’ (दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे) म्हणतात. पण धारावीत जन्मलेल्या, वाढलेल्या आणि १२ वीपर्यंत शिकलेल्या ओंकार ढमालेला आपल्या परिसरातून पैसे कमावण्यात काहीच गैर वाटत नाही. ‘इंडिया टुडे मॅगझिन’शी बोलताना तो म्हणतो, “परदेशी लोकांना येथे पहिल्यांदाच झोपडपट्टी बघायला मिळते. आपलं घर दाखवून पैसे मिळतात, मग का नाही दाखवायचं?”

धारावीत पर्यटकांचा ओघ का वाढतोय?

‘खाकी टूर्स’चे संस्थापक भारत गोठोसकर यांनी बराच काळ पर्यटकांना धारावीत नेण्याच्या कल्पनेला विरोध केला. त्यांनी ‘इंडिया टुडे डिजिटल’ला सांगितले की, ही संकल्पना अपघातानं सुरू झाली नव्हती. २००५ मध्ये युरोपियन सामाजिक कार्यकर्ते ख्रिस वे आणि कृष्णा पुजारी यांनी ‘रिअ‍ॅलिटी टूर्स’ सुरू केल्या. स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पैसे मिळावेत, या उद्देशाने धारावीत वॉक सुरू करण्याचा एक पायंडा त्यांनी पाडला. गोठोसकर यांच्या मते, त्यांच्या नफ्याचा मोठा वाटा समाजासाठी खर्च केला जायचा; मात्र काळांतर्गत या उपक्रमाचे स्वरूप बदलले.

“धारावीत झोपडपट्टी पर्यटन आता एक गृहोद्योग होताना दिसत आहे,” असे त्यांनी नमूद केले. आज थोडंफार इंग्रजी बोलणारा कोणीही स्वतःला गाईड म्हणवून घेतोय. स्वतः अशा एका सहलीत सहभागी झाल्यावर गोठोसकर यांना त्यात वेगळेपण जाणवले. ते म्हणतात, “माझ्या मते हे फक्त गरिबीबद्दल नाहीये. हे तिथले उद्योग, स्थलांतर, धर्म आणि भूगोलाशी तितकेच संबंधित आहे.” ते पुढे म्हणतात, “अनेक घरांमध्ये एअर कंडिशनर्स आहेत. ते पाहून स्थानिक आणि परदेशी दोन्ही पर्यटक थक्क होतात. राहण्याची जागा अपुरी आहे; पण ती शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. येथील रहिवाशांना विरार किंवा बदलापूरसारख्या दूरच्या उपनगरांमधून प्रवास करण्यापेक्षा येथे राहणे व्यावहारिक वाटते,” असे ते म्हणाले.

ते सांगतात, “आम्ही स्थानिक भागीदाराबरोबर काम करतो; पण अनुभवाचे स्वरूप वेगळे ठेवतो. तिथे गृहनिर्माण, रिसायकलिंग अर्थव्यवस्था आणि जातींवर आधारित वस्त्यांबद्दल एक बौद्धिक चर्चा होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. काही सहली संदर्भ आणि स्थानिकांचे दृष्टिकोन देऊन एक सखोल अनुभव प्रदान करतात; मात्र ढमालेसारख्या प्रकरणांमध्ये शहराचा कोणताही संदर्भ न देता, फक्त गल्ल्यांमधून घाईघाईने फेरफटका मारला जातो.

पर्यटकांनी काढलेल्या फोटोंबद्दल स्थानिकांची परवानगी घेतली होती का, असे ढमाले या युवकाला विचारल्यावर तो म्हणाला, “आपलीच माणसं आहेत, सगळं चालतं.” मात्र, वास्तव वेगळे होते. जेव्हा ‘इंडिया टुडे डिजिटल’ने मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या राजू हनुमंता आणि त्यांच्या कुटुंबाला फोटोसाठी विचारले, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. कारण- धारावीचे नाव नेहमीच दुःख आणि गरिबीशी जोडले जाते. पुन्हा कोणीतरी पत्रकार तेच वास्तव टिपायला आला आहे, अशी त्यांना भीती वाटत होती.

रहिवाशांचा विरोध

माहिती देणे आणि कोणाच्या खासगी आयुष्यात शिरकाव करणे यातली रेषा खूप धूसर आहे, असे तज्ज्ञ सांगतात. अनेकदा रहिवाशांनी याला विरोधही केला आहे. पर्यटकांनी घराच्या आतले फोटो परवानगीशिवाय काढल्यामुळे काही वस्त्यांनी पर्यटकांना प्रवेश नाकारला आहे. “आम्ही नेहमी आग्रह धरतो की, फोटो काढण्यापूर्वी परवानगी घ्या,” असे गोठोसकर म्हणाले. कुंभारवाड्यात अनेक वृद्ध महिला फोटो काढायला नकार देतात. पर्यटकांना कुंभाराचे नाही, तर मातीच्या भांड्यांचे फोटो काढायला सांगितले जाते. गोठोसकर यांच्या मते, ही जबाबदारी गाईडची आहे. पर्यटकांना हे पटवून देणे महत्त्वाचे आहे की, हा वॉक समजून घेण्यासाठी आहे; केवळ फोटोग्राफी किंवा गरिबी पाहण्यासाठी नाही.

धारावीच्या स्लम टूर्समधून तिथली कष्ट करण्याची वृत्ती (हसल कल्चर) आणि औद्योगिक जिद्द दोन्ही दिसून येते. “पुनर्विकासानंतर ही जिद्द कायम राहील की नाही हे सांगता येत नाही. उपजीविकेची साधने बदलतील. या सहलींवर अवलंबून असलेल्या तरुण गाईड्सना कदाचित स्वतःला पुन्हा नव्यानं सिद्ध करावे लागेल,” असे गोठोसकर म्हणाले.