अलीकडे फळांमधूनही कथित विषबाधा होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, आंबा, केळीसह टरबुजही आतून लालभडक दिसण्यासाठी रासायनिक पद्धतीचा वापर होत असल्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फळांचा राजा असलेला आंबा नेमका कसा पिकतो, त्यातील घटक काय, रासायनिक व नैसर्गिक पद्धत नेमकी कशी आहे, याचे विश्लेषण करणारी ही माहिती.
आंब्याची पिकवण पद्धत काय?
आंबा पिकवण्याची एक पारंपरिक पद्धत रूढ झालेली आहे. यामध्ये उसाचे पाचट, भाताचे तणस, वाळलेले गवत जमिनीवर अंथरुण त्यावर आंबे ठेवून वर पुन्हा तसेच झाकून ठेवले जाते. या पद्धतीतून आंबा पिकण्याची नैसर्गिक क्रिया होत असताना इथिलीन वायू बाहेर पडत असतो. आंबे जर उघडे राहिले तर इथिलीन वायू निघून जातो. असे होऊ नये म्हणून त्यावर वाळलेले गवत झाकण्याची पारंपरिक पद्धत आहे. त्यामुळे एका फळातून बाहेर पडणारा इथिलीन दुसऱ्या फळास मिळतो. आंबा क्रेटमध्येही पिकवला जातो. प्लॅस्टिकच्या हवाबंद कक्षामध्ये क्रेट ठेवावा. या कक्षाच्या प्रति घनमीटर आकारानुसार एका छोट्या वाटीमध्ये दोन मिलि इथेफॉन घ्यावे. दोन मिलि इथेफॉनमध्ये ०.५० ग्रॅम कॉस्टिक सोडा मिसळावा. या दोन्ही रसायनांच्या क्रियेतून इथिलिन वायू निर्माण होईल. तो हवाबंद पॉलिथिन चेंबरमध्ये सर्वत्र पसरेल. हा वायू व्यवस्थितरीत्या कक्षामध्ये पसरण्यासाठी शक्यतो छोट्याशा बॅटरीवर चाललेला फॅन ठेवल्यास फायदा होतो. या प्रकारे इथिलीन वायू खेळता ठेवलेल्या कक्षामध्ये आंबे १८ ते २४ तास ठेवावेत. ती फळे क्रेटमध्ये खाली वर्तमानपत्राचा कागद पसरवून नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी ठेवावीत. सामान्य तापमानामध्ये साधारणतः पाच ते सहा दिवसांत फळे चांगल्या पद्धतीने पिकतात. रंगही येतो. एक घनमीटर (१११ मीटर) पॉलिथिन कक्षामध्ये २०० ते २५० किलो आंबा एका वेळी पिकवता येतो. चार घनमीटर कक्षामध्ये (१.६ १.६ १.६ मी) एक टन आंबा एका वेळी पिकवता येतो.
व्यापारीवृत्तीतून रसायने वापर?
पारंपरिक पद्धतीमध्ये आढी घालून आंबा पिकवला जातो. आढी घालताना अलीकडे रसायनांचा वापर करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल असतो. त्यातून आंब्याला रंग चांगला येत असला, तरी आतून आंबा चांगला पिकेलच असे नाही. शिवाय ही रसायने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. हे लक्षात घेऊन आंबा पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.
आंबा सडणे टाळण्याची पद्धत
आंबा सडण्याचे प्रकार टाळण्यासाठी फळाखाली वर्तमानपत्राचे पेपरचे एकावर एक असे दोन ते तीन थर द्यावेत. त्यावर तीन ते चार थरात फळे रचावीत. असा गादीवाफा तयार केल्यानंतर बाजूने आणि वरूनसुद्धा वर्तमान पेपरने घट्ट झाकून हवाबंद करावे. याची लांबी रुंदी ही आपल्या घरातील जागेनुसार ठेवता येते. मात्र एकापेक्षा जास्त वाफे करणार असाल, तर दोन्हींमधून पाहणीकरिता चालता यावे, इतकी जागा ठेवावी. या प्रकारे वर्तमानपत्राने बंदिस्त केल्यामुळे संपूर्ण हवाबंद होत नाही. परंतु येथे तयार होणारा वायू एका फळाचा दुसऱ्या फळाला मिळतो. फळे दोन-तीन दिवस लवकर पिकतात. त्यांना आकर्षक रंग येतो. इथेफॉन दीड मिलि अधिक बेनोमील एक ग्रॅम प्रति लिटर पाणी असे द्रावण तयार करून त्यात फळे पाच मिनिटे बुडवावीत. त्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्यावीत. (फळ बुडवणीसाठी या रसायनाचा पीएचआय सामान्यतः ७ ते १० दिवस आहे.) वर सुचविलेल्या पद्धतीने ही फळे पिकविण्यास ठेवावीत. यामुळे फळे देठाकडून सडणे, करपा रोगामुळे फळे सडणे असे प्रकार होत नाहीत. या द्रावणात इथेफॉनचा समावेश असल्यामुळे फळे एक ते दोन दिवस लवकर पिकतात. फळांना आकर्षक रंगही येतो. (सीएफटीआयआर, म्हैसूर यांची शिफारस) क्रेटमध्येही खालून आणि बाजूने पेपरचे थर ठेवून फळे ठेवता येतात. ही पद्धत तर कुणालाही घरी सहज वापरता येऊ शकते.
आंब्यासाठीचे तापमान कसे?
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे निवृत्त फळबाग तंत्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले की, आंबा पिकविण्यासाठी २० ते २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता ही अत्यंत महत्त्वाची असते. आंबा पिकविण्याच्या खोलीतील वातावरण शक्यतो थंड असावे. पत्र्याच्या शेडऐवजी कौलाचे छत असलेल्या अंधाऱ्या खोलीमध्ये आंबे ठेवावेत. येथील आर्द्रता वाढविण्यासाठी रिकामी पोती ओली करून खोलीतच पण आंब्यापासून दूर ठेवावीत. ज्यांच्याकडे एसी रूम आहेत, त्यांनी त्या बंदिस्त करून आंबे पिकविण्यासाठी वापरल्या तरी चालतात.
योग्य पद्धतीने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे?
हंगामाच्या सुरुवातीला आलेल्या आंब्यांना अधिक दर मिळतो, पुढे दर आठ दिवसाने त्यात काही प्रमाणात घट होत होते. त्यामुळे आंबा शेतकरी अधिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने झाडावरून लवकर काढण्याची घाई करतात. व्यापारीही योग्य पक्वता न गाठलेल्या आंब्यावर बंदी झालेल्या रसायनाचा वापर करत पिकविण्याचा प्रयत्न करतात. हवाबंद खोलीत किंवा क्रेटमध्ये या रसायनाच्या कागदामध्ये बांधलेल्या पुड्या ठेवल्या जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या अॅसिटिलीन वायूमुळे आंब्याच्या हिरव्या सालीचा रंग ३५ ते ४० तासामध्ये पिवळा होतो. मात्र आतून आंब्याला गोडवा न येत तो आंबटच राहतो. विशेषतः देठाजवळ थोडासा खड्डा पडलेला असून बाजूची खदि वर आलेली असतात. मात्र खड्डा देठाजवळ पडण्याचा प्रकार फक्त हापूस आणि केसर याच आंब्यांमध्ये प्रकर्षानं घडतो. सर्वच आंबा वाणामध्ये घडत नाही. फळाची चोच साधारणतः बोथट असते. आंब्याला भरीव आकार आलेला दिसतो. त्यावरील लेंटिसेलचे ठिपकेही ठळक असतात.
कृत्रिम आणि नैसर्गिक आंब्यातील फरक
कृत्रिमरीत्या पिकविलेला आंबा पिवळा जर्द, चमचमीत व आकर्षक दिसतो. फक्त सालच पिवळी झालेली असली तरी आतून फारसा पिकलेला नसल्याने बोटाने किंचित दाबल्यास नरमपणाऐवजी कडकपणा जाणवतो. आंब्याचा वास घेतल्यास नैसर्गिक सुगंधाऐवजी थोडासा उग्र आणि नकोसा वाटणारा वास येतो. चवीला आंबटपणा जास्त जाणवतो. आंबे घरी आणल्यानंतर त्याच्या सालीवर लगेच काळे डाग पडतात. दोन-चार दिवसातच साल खराब होऊ लागते. अशा आंब्यांची पचनीयताही कमी असते. त्यात भेसळयुक्त रसायनाच्या अंशामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आंब्यांची पिकण्याची प्रक्रिया ही तुलनेने सावकाश असते. त्याच्या सालीवर अतिसूक्ष्म लहान सुरकुत्या पडतात. फळ पिवळेधमक न होता हिरवट पिवळे राहते. चमकदार रंगाऐवजी मातकट रंग दिसतो. आंबा बोटाने थोडासा दाबून पाहिल्यास अगदी सहज नरमपणा जाणवतो. योग्य पिकल्यामुळे आंब्यातील शर्करा व आम्लतेचे प्रमाण योग्य होते. फळाला विशिष्ट सुगंध येऊन घरभरात दरवळतो.
