How To Quit Smoking Nicotine Addiction Treatment : तरुण वयात मौजेखातर केलेले धूम्रपान कालांतराने कधी व्यसनात बदलते हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. व्यसनाधीनता फक्त मुलांपुरतीच मर्यादित राहिलेली नसून मुलीसुद्धा त्याच्या आहारी जात असल्याचे विविध अहवाल सांगतात. आज देशातील लाखो तरुण-तरुणी धूम्रपान तसेच मद्यपानाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येतात. धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याची कल्पना बऱ्याच लोकांना असते. तरीदेखील त्याचे व्यसन सोडणे अनेकांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर धूम्रपानाचे प्रमाण कसे कमी करावे आणि त्यापासून हळूहळू कसे मुक्त व्हावे? याबाबत तज्ज्ञांनी अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आहे, त्याविषयी…

विडी-सिगारेटचे व्यसन नेमके कसे सोडावे?

दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. अक्षत मलिक यांच्या मते, एखाद्या व्यक्तीला विडी-सिगारेट ओढण्यास कोणती गोष्ट प्रवृत्त करते हे ओळखणे अत्यंत गरजेचे असते. अनेकांना चहा किंवा कॉफी घेताना, जेवणानंतर, कामातील ब्रेकदरम्यान, मद्यपान करताना किंवा तणावाखाली असताना धूम्रपान करण्याची इच्छा होते. त्यामुळे अशा परिस्थिती आणि सिगारेट यांच्यातील संबंध ओळखणे अत्यंत महत्वाचे ठरते. धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यानंतर लगेच सिगारेट न ओढता काही वेळ त्याकडे दुर्लक्ष करणे फायदेशीर ठरू शकते. दोन सिगारेट ओढण्यामधील कालावधी हळूहळू वाढवत नेल्यास दिवसाभरातील सिगारेटची संख्या आपोआप कमी होण्यास मदत होते. दरम्यान, सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी करण्याऐवजी पूर्णपणे धूम्रपान बंद करणे हेच मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे, असेही डॉ. मलिक यांनी सांगितले.

धूम्रपान सोडण्यास निकोटीन गम मदत करतात का?

सिगारेट किंवा तंबाखूचे व्यसन सोडताना बाजारात उपलब्ध असलेले विविध निकोटीन गम आणि निकोटीन पॅचही काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतात. या उत्पादनांमुळे सिगारेट ओढण्याची तीव्र इच्छा नियंत्रणात ठेवणे शक्य होते असा अनेकांचा समज आहे. धूम्रपान कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे सोडण्यासाठी काही उत्पादने अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे समाजमाध्यमांवर दावे केले जातात; पण अशा उत्पादनांच्या परिणामकारकतेबाबत तितके ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे निकोटीन गम आणि निकोटीन पॅच याकडे धूम्रपान सोडण्यासाठीच्या वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध पर्याय म्हणून पाहू नये, असा इशाराही डॉक्टर मलिक यांनी दिला.

धूम्रपान सोडण्यास मोबाईल उपकरणे किती फायदेशीर?

डॉ. मलिक यांच्या मते, धूम्रपान कमी करण्यासाठी किंवा सोडण्यासाठी काही मोबाईल उपकरणेही (अ‍ॅप्स) अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः दिवसभरात किती सिगारेट ओढल्या जातात याची नोंद ठेवणे, धूम्रपानाची इच्छा निर्माण करणारे ट्रिगर्स ओळखणे, व्यसन सोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करणे आणि प्रगतीचा मागोवा घेणे, यासाठी या उपकरणांची मदत होऊ शकते. मात्र, अशी उपकरणे केवळ सहाय्यक म्हणून काम करतात आणि ते धूम्रपान सोडवण्याचा एकमेव उपाय असू शकत नाहीत. वारंवार प्रयत्न करूनही जर एखाद्या व्यक्तीला धूम्रपान सोडण्यात अपयश येत असेल, तर केवळ मोबाईल उपकरणांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचे समुपदेशन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषधे अधिक प्रभावी ठरतात, असा सल्लाही डॉ. मलिक यांनी दिला आहे.

धूम्रपान हा केवळ इच्छाशक्तीचा विषय आहे का?

धूम्रपान करणे किंवा सोडणे ही केवळ प्रबळ इच्छाशक्तीची बाब नाही. विडी-सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनचा मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’वर परिणाम होतो आणि वारंवार धूम्रपान केल्याने त्याचे व्यसन लागू शकते. त्याचबरोबर धूम्रपानाची सवय विशिष्ट दिनचर्या, भावना आणि परिस्थितींशी जोडली जाते. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला धूम्रपान सोडण्याची तीव्र इच्छा असूनही ते सोडणे कठीण जाऊ शकते. अशा वेळी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, औषधोपचार आणि वर्तणुकीशी संबंधित समुपदेशन यांच्या मदतीने हे व्यसन सोडणे अधिक सोपे होऊ शकते, असेही डॉ. मलिक यांनी सांगितले.

धूम्रपानाचा शरीरातील अवयवांवर काय परिणाम होतो?

डॉ. मलिक यांच्या मते, धूम्रपानाचा परिणाम केवळ फुफ्फुसांपुरता मर्यादित राहत नाही. शरीरातील रक्तवाहिन्यांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि पायांमध्ये रक्ताभिसरण कमी होण्याचा धोका वाढतो. याशिवाय धूम्रपानामुळे तोंड, घसा, अन्ननलिका, मूत्राशय आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगासह इतर अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो. प्रजनन क्षमता, हाडांचे आरोग्य, तोंडाचे आरोग्य आणि जखम भरून येण्याच्या प्रक्रियेवरही धूम्रपानाचा परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, धूम्रपानामुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास किंवा खोकल्यासारखी फुफ्फुसांशी संबंधित कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नसली, तरीही त्याच्या शरीराच्या आत हे घातक परिणाम हळूहळू विकसित होत असतात, असा इशाराही डॉ. मलिक यांनी दिला आहे.

धूम्रपान करणे आरोग्यासाठी कसे घातक ठरते?

तज्ज्ञांच्या मते, नियमित धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी शक्य तितक्या लवकर या दोन्ही व्यसनांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायला हवा. ही दोन्ही व्यसने एकत्र असल्यास त्यांचा शरीरावर परस्परपूरक परिणाम होतो. त्यामुळे तोंड, घसा व अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका केवळ एकाच व्यसनाच्या तुलनेत अनेक पटींनी वाढतो. काहींसाठी कदाचित धूम्रपान आणि मद्यपान एकाच वेळी सोडणे कठीण वाटू शकते; पण अशा परिस्थितीत सर्वसाधारणपणे आधी धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होतो. धूम्रपान सोडल्याचे फायदे जवळपास तत्काळ दिसू लागतात. काही आठवड्यांतच शरीरातील रक्ताभिसरण आणि फुप्फुसांचे कार्य सुधारते. तसेच कालांतराने हृदयविकार, पक्षाघात आणि कर्करोगाचा धोका सातत्याने कमी होत जातो. मात्र, व्यसनमुक्तीसाठी एकच उपाय सर्वांवर लागू होत नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

सिगारेटच्या व्यसनापासून दूर कसे जायला हवे?

धूम्रपान असो किंवा मद्यपान, कोणतेही व्यसन सोडणे हा सकारात्मक निर्णय आहे. मात्र, उपचाराची रणनीती प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार ठरवली पाहिजे. एखाद्या व्यक्तीची निकोटीन आणि मद्यावरील अवलंबित्वाची तीव्रता, रुग्णाची व्यसन सोडण्याची तयारी, मानसिक आरोग्य आणि इतर आजारांचा विचार करूनच आरोग्यतज्ज्ञ योग्य उपचाराची योजना आखतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास दीर्घकाळ व्यसनमुक्त राहण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. व्यसनाधीन व्यक्तीचे समुपदेशन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, मद्यपान कमी करण्यासाठीची औषधे, तसेच वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध उपचारपद्धती यांचा अवलंब केल्यास व्यसनमुक्ती यशस्वी होण्याची आणि ती दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता अधिक असते, असा निष्कर्षही तज्ज्ञांनी मांडला आहे.