How To Quit Tobacco Addiction Doctor Advice : प्रिया बाला नामक एका ३१ वर्षीय महिलेने आपल्या आयुष्यातील निम्म्याहून अधिक काळ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यात घालवला. किशोरवयात असताना ती नेहमीच आपल्या आजीसाठी स्थानिक दुकानात खैनी आणण्यासाठी जात होती. सुरुवातीला आजीसाठी केलेले काम स्वत:च्या व्यसनात कधी बदलले हे तिलाही कळाले नाही. प्रियाला दिवसातून अनेकदा हिरड्या आणि गालाच्या आतील बाजूला खैनी ठेवण्याची सवय लागली होती. काहीवेळी ती रात्रभरही खैनी तोंडात ठेवत असे. ओडिशातील एका गावात पती आणि मुलांसोबत राहणारी प्रिया ताणतणावाच्या काळात तंबाखूजन्य पदार्थांचे आणखीनच सेवन करू लागली. गरोदर असताना मळमळ आणि उलट्यांचा सामना करण्यासाठी तिने खैनीचाच आधार घेतला होता.
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते, याची प्रियाला कल्पना होती. त्यामुळे अनेकवेळा तिने खैनी सोडण्याचा प्रयत्न केला होता; पण तीव्र तल्लफ आणि व्यसनाच्या सवयीमुळे तिला ते शक्य झाले नाही. तिसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर प्रियाच्या तोंडात वेदना देणारा व्रण निर्माण झाला होता. ही जखम तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण तर नाही ना अशी भीती तिला सतावत होती. त्यामुळेच प्रियाने तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी मदत करणाऱ्या केंद्राशी संपर्क साधला आणि तज्ज्ञांकडून उपचार आणि मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. व्यसनमुक्ती केंद्रात प्रियाला तंबाखू सोडण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवणे, तंबाखू सोडताना जाणवणारी लक्षणे हाताळणे आणि तल्लफ निर्माण करणाऱ्या कारणांवर नियंत्रण मिळवणे याविषयी मार्गदर्शन मिळाले. तसेच, उपचाराचा भाग म्हणून तिला निकोटीन गमही देण्यात आले.
सुमारे दोन आठवड्यानंतर प्रियाने वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या तोंडात आलेले तो व्रण कर्करोग नसल्याचे स्पष्ट झाले. खैनी खाणे पूर्णपणे थांबवल्यास हा त्रास पूर्ण बरा होईल, असा सल्लाही तिला डॉक्टरांनी दिला. प्रियाचा हा अनुभव एका मोठ्या समस्येकडे लक्ष वेधतो, असे बंगळुरू येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस’ या संस्थेच्या माजी संचालिका डॉ. प्रतिमा मूर्ती यांनी सांगितले. ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या नियतकालिकात नुकताच डॉ. प्रतिमा शोधनिबंध प्रकाशित झाला. तंबाखू सोडण्यासाठीची मदत ही रुग्णांनी स्वतःहून शोधत जाण्यापेक्षा नियमित आरोग्यसेवेचा एक भाग बनवणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी या शोधनिबंधात नमूद केले. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉ. प्रतिमा म्हणाल्या की, भारतात धूम्रपान आणि धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तंबाखू सोडण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी खर्चातील उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामध्ये तंबाखू सोडण्यासाठीच्या हेल्पलाइन, डिजिटल माध्यमातून दिले जाणारे संदेश आणि आरोग्यसेवेकडून तंबाखू सोडण्याचा सल्ला देणे, अशा उपायांचा समावेश आहे.
डॉ. प्रतिमा यांच्यासह व्हिएतनाम, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात तंबाखू सोडण्यासाठी प्रभावी ठरलेल्या वैज्ञानिक पद्धतींचा आढावा घेण्यात आला. या अहवालात ‘Ask–Advise–Connect’ (विचारा, सल्ला द्या, मदतीशी जोडा) या पद्धतीवर भर देण्यात आला. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला त्याच्या तंबाखू सेवनाच्या सवयीबद्दल विचारायला हवे. तसेच, त्याला व्यसन सोडण्याचा सल्ला द्यायला हवा. त्याशिवाय योग्य तंबाखूमुक्ती उपचार किंवा समुपदेशन केंद्राशी त्याला जोडायला हवे. व्यसन सोडण्याची ही पद्धत अत्यंत सोपी असून त्यात डॉक्टर, परिचारिका किंवा दंतवैद्यांना प्रत्येक वेळी दीर्घ समुपदेशन करण्याची गरज पडत नाही. अवघ्या काही मिनिटांच्या संभाषणातून रुग्णाच्या व्यसनाची माहिती मिळवून त्याला समुपदेशन, औषधोपचार किंवा तंबाखू सोडण्यासाठीच्या हेल्पलाइनशी जोडता येते. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठीची मदत रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्यसेवेतच सहज उपलब्ध करून देणे, हे भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणावर लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
‘Ask–Advise–Connect’ या पद्धतीत रुग्णाला केवळ तंबाखू सोडण्याचा सल्ला देण्याऐवजी त्याला थेट व्यसनमुक्तीच्या मदतीशी जोडण्यावर भर दिला जातो. या पद्धतीचे मूल्यमापन करणाऱ्या संशोधनातून असे आढळले की, रुग्णाला तंबाखू सोडण्यासाठीच्या हेल्पलाइनशी थेट जोडल्यास, केवळ त्या सेवेचा संदर्भ दिल्याच्या तुलनेत व्यसनमुक्तीच्या उपचारांमध्ये सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, भारतात २५ कोटींहून अधिक लोक तंबाखूचे सेवन करतात. त्यामध्ये सिगारेट, बिडी यांसारख्या धूम्रपानाच्या पदार्थांसोबतच खैनी आणि गुटखा यांसारख्या धूरविरहित तंबाखूजन्य पदार्थांचाही समावेश आहे. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम केवळ फुफ्फुसांपुरते मर्यादित नाहीत. तंबाखूमुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, पक्षघात, विविध प्रकारचे कर्करोग आणि श्वसनविकारांचा धोका वाढतो. तर खैनी, गुटखा यांसारख्या धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग आणि तोंडाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढतो.
केंद्र सरकारने तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यामध्ये तंबाखूच्या जाहिराती आणि प्रचारावर निर्बंध, धूम्रपानमुक्त धोरणे, आरोग्यविषयक इशारे, जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर माध्यम मोहिमा आणि तंबाखू सोडण्यासाठीच्या सेवा यांचा समावेश आहे. राष्ट्रीय तंबाखू हेल्पलाईन सेवा २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याचबरोबर ‘mCessation’ सारख्या मोबाइल आधारित सेवांच्या माध्यमातूनही तंबाखू सोडण्यासाठी मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत देशभरात तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रांचे जाळेही उभारण्यात आले आहे. मात्र, एखादी सेवा उपलब्ध असणे म्हणजे लोकांना तिची माहिती असणे किंवा ते तिचा वापर करतीलच असे नाही. डॉ. प्रतिमा मूर्ती यांच्या मते, एसएमएस-आधारित (SMS) व्यसनमुक्ती सेवेचा लाभ घेणाऱ्या पाचपैकी एका व्यक्तीने तंबाखूचे व्यसन यशस्वीरीत्या सोडले आहे, मात्र तरीही या सुविधेविषयी अजूनही पुरेशी जनजागृती नाही.
निकोटीनचे व्यसन तंबाखू सोडण्याची प्रक्रिया कठीण करू शकते. तंबाखूची तीव्र इच्छा, व्यसन सोडताना जाणवणारी लक्षणे, वर्षानुवर्षे तयार झालेल्या सवयी आणि सामाजिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे ट्रिगर यामुळे पुन्हा तंबाखू सेवन सुरू होण्याची शक्यता असते. म्हणूनच वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी तंबाखू व्यसनमुक्ती उपचारांमध्ये वर्तनात्मक समुपदेशनासोबत आवश्यकतेनुसार औषधोपचारांचाही समावेश केला जातो. त्यामध्ये निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचाही वापर केला जाऊ शकतो. ओडिशातील प्रिया बाला या महिलेच्या अनुभवातून हे स्पष्ट होते की, आरोग्यसेवेतील एखादी साधी भेटही तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी महत्त्वाची संधी ठरू शकते. तोंडात झालेल्या व्रणामुळे प्रियाला आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा लागला. याच वैद्यकीय सल्ल्यादरम्यान तिच्या तंबाखू सेवनाबाबत चर्चा झाली आणि तंबाखू सोडण्यासाठी आवश्यक मदतीचा मार्ग तिच्यासमोर खुला झाला. यातूनच ‘Ask–Advise–Connect’ या पद्धतीचे महत्त्व अधोरेखित होते.
तज्ज्ञांच्या मते, ज्या भागात तंबाखूजन्य पदार्थ स्वस्त आणि सहज मिळतात, तिथे व्यसनमुक्तीचे महत्व सांगणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आणि प्रामुख्याने महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यात अनेकदा अडचणी येतात. अशा परिस्थितीत समुदायाच्या पातळीवर राबवण्यात येणारे कार्यक्रम आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या माध्यमातून लोक ज्या ठिकाणी राहतात, त्याच परिसरात त्यांना तंबाखू सोडण्यासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देता येऊ शकते. भारताचा तंबाखू नियंत्रण आणि व्यसनमुक्तीचा अनुभव कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या इतर देशांसाठी, विशेषतः दक्षिण आशियातील देशांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो. या आढाव्यात व्हिएतनामचाही अभ्यास करण्यात आला आहे. तिथे तंबाखू सेवनाची पद्धत, सामाजिक प्रथा, सरकारी नियम आणि आरोग्यसेवा व्यवस्था या सर्व बाबी व्यसन सोडण्याच्या पद्धतीवर कसा प्रभाव पाडतात, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रत्येक देशातील परिस्थिती वेगळी असली, तरी व्यसनमुक्तीसाठी मूलभूत तत्त्व समान राहू शकते. तंबाखूचे सेवन करणारी व्यक्ती ओळखा, तंबाखू सोडण्याचा सल्ला द्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी उपचार व मदत सहज उपलब्ध करून द्या, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
तंबाखू सोडण्यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक
हेल्पलाईन क्रमांक : १८००११२३५६ 1800112356
टेलि-मानस (Tele-MANAS) : १४४१६
एम-सेसिएशन (mCessation): ०११-२२९०१७०१
