मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांकडे अनेकदा महिलांनी सहन करायची बाब म्हणून पाहिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरातील सुमारे दोन अब्ज स्त्रियांना मासिक पाळी येते. त्यातील तीनपैकी दोघींना पाळीदरम्यान तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. वैद्यकीय भाषेत या समस्येला डिसमेनोरिया असे म्हटले जाते. महिला तसेच किशोरवयीन मुलींमध्ये ही समस्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने त्यावर ठिकठिकाणी संशोधन सुरू आहे. यादरम्यान काही मुलींना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना का होतात? आणि या वेदनांचा धोका आधीच कसा ओळखला जाऊ शकतो? याबाबत एका नव्या अभ्यासातून महत्वाची माहिती समोर आली आहे, त्याविषयी…
‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियकालिकात अलीकडेच मासिक पाळीच्या वेदनांशी संबंधित एक अभ्यास प्रकाशित झाला. अमेरिकेत दीर्घकाळ करण्यात आलेल्या या अभ्यासात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक मुलींना वयाच्या १३ व्या किंवा १४ व्या वर्षीच मासिक पाळीच्या वेदना सुरू झाल्याचे आढळून आले. याचा परिणाम प्रामुख्याने कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकन वंशाच्या मुलींमध्ये अधिक दिसून आला. अभ्यासानुसार, ज्या मुलींना पुढे जाऊन मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदनांचा त्रास झाला, त्यांच्यामध्ये वयाच्या ९ ते १० वर्षांदरम्यानच पौगंडावस्थेची अधिक प्रगत चिन्हे दिसून आली होती. या अभ्यासात संशोधकांनी मासिक पाळी सुरू न झालेल्या २,२५४ मुलींचा समावेश केला होता. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजेच त्यांच्या पहिल्या मासिक पाळीनंतर या मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत वयाच्या १२ ते १३ वर्षांपर्यंत १,२९९ मुलींना डिस्मेनोरियाचा (मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांचा) त्रास सुरू झाल्याचे आढळले. त्यापैकी २४७ मुलींनी म्हणजेच मासिक पाळीदरम्यान तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असल्याचे सांगितले. त्यामुळे मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच दिसून येणारी काही शारीरिक लक्षणे भविष्यातील मासिक पाळीच्या वेदनांचा संभाव्य धोका ओळखण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात, असे या अभ्यासातून सूचित होते.
संशोधकांनी मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी मुलींमध्ये दिसणाऱ्या विविध लक्षणांचाही अभ्यास केला. त्यात वेदना नसलेल्या शारीरिक लक्षणांचाही समावेश होता. त्यानुसार, वयाच्या ९ ते १० वर्षांच्या दरम्यान मळमळ किंवा चक्कर येण्याचा त्रास असलेल्या मुलींना पुढील तीन वर्षांत मासिक पाळीदरम्यान वेदना होण्याची शक्यता अधिक असल्याचे आढळले. याच वयात स्तनांची वाढ, शरीरावर केस येणे किंवा उंचीमध्ये अचानक वाढ होणे यांसारखी पौगंडावस्थेची सुरुवातीची चिन्हे दिसणाऱ्या मुलींनाही पुढे डिसमेनोरिया होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या जास्त होती. या वयातील झोपेच्या समस्यांचा मात्र पुढे मासिक पाळीतील वेदना होण्याशी थेट संबंध आढळला नाही. मात्र, ज्या मुलींना पुढे डिसमेनोरिया झाला त्यांच्यामध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर दैनंदिन कामांमध्ये अधिक अडथळे निर्माण होण्याशी झोपेच्या समस्या संबंधित असल्याचे आढळले. या अभ्यासात आणखी एक बाब समोर आली. ती म्हणजे, श्वेतवर्णीय मुलींच्या तुलनेत कृष्णवर्णीय मुलींना डिसमेनोरियाचा त्रास होण्याची शक्यता अधिक होती. तसेच त्यांना मासिक पाळीच्या वेदनांचा धोका ३८ टक्के अधिक होता.
संशोधकांना या फरकाचे नेमके कारण अद्याप निश्चित करता आलेले नाही. सामाजिक-आर्थिक परिस्थिती, आरोग्यसेवेची उपलब्धता, मासिक पाळीबाबत असलेला सामाजिक संकोच आणि पौगंडावस्था सुरू होण्याच्या वेळेतील फरक यांसारखे घटक यामागे कारणीभूत असू शकतात. मात्र, हे स्पष्ट करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे संशोधकांनी नमूद केले. विशेष म्हणजे, अभ्यासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील चिंता, नैराश्य, झोपेतील अडथळे किंवा लक्ष केंद्रित करण्याच्या समस्या यांचा पुढे डिसमेनोरिया होण्याशी कोणताही संबंध आढळला नाही. या निष्कर्षांमुळे पहिली मासिक पाळी येण्यापूर्वीच काही मुलींमध्ये पुढे होणाऱ्या वेदनादायक मासिक पाळीचा धोका ओळखण्यास मदत होऊ शकते. तसेच अशा मुलींना वेळीच योग्य मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देण्याची शक्यता वाढू शकते, असा दावा करण्यात आला आहे. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या तीव्र वेदनांकडे ‘सामान्य’ म्हणून दुर्लक्ष करू नये. विशेषतः किशोरवयीन मुलींना वारंवार मासिक पाळीच्या वेदना होत असतील, तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गीता चड्ढा यांच्या मते, नव्या अभ्यासातील निष्कर्षांमुळे तरुणींना होणाऱ्या तीव्र मासिक पाळीच्या वेदनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. किशोरवयात मासिक पाळीदरम्यान वेदना होणे अत्यंत सामान्य बाब आहे. मात्र, वेदना तीव्र असतील तर त्याचा संबंध एंडोमेट्रिओसिससारख्या आजाराशीही असू शकतो. मासिक पाळीदरम्यान वेदना होणाऱ्या मुलींमध्ये डोकेदुखी आणि इतर शारीरिक त्रासांसह अनेक लक्षणे दिसू शकतात. काही मुलींना चिंता, नैराश्य, लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा झोपेच्या समस्यांसारखी लक्षणेही जाणवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. एंडोमेट्रिओसिस हा एक वेदनादायक आणि सामान्य आजार आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील अस्तरासारख्या पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात. बहुतांश वेळा या पेशी ओटीपोटातील आवरण, अंडाशय किंवा फॅलोपियन ट्यूब्सवर वाढतात. मात्र, डिसमेनोरिया असलेल्या प्रत्येक मुलीला एंडोमेट्रिओसिस होईलच असा निष्कर्ष या अभ्यासातून निघत नाही. उलटपक्षी, पहिल्या पाळीच्या आधी किंवा त्यादरम्यान तीव्र वेदनांचा धोका असणाऱ्या मुलींची वेळेत ओळख पटल्यास डॉक्टरांना सुरुवातीच्या टप्प्यावरच उपचार करणे सोपे जाईल, असे संशोधनात सुचवण्यात आले आहे.
मासिक पाळीतील वेदना प्रामुख्याने गर्भाशयाच्या आकुंचनाशी संबंधित असतात. गर्भाशयातील स्नायू ज्या पद्धतीने आकुंचन पावतात, त्याचा वेदनांच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो, असे डॉ. चड्ढा यांनी सांगितले. किशोरवयीन मुलींचा योग्य आहार आणि एकूण आरोग्य यांनाही महत्त्व आहे. जेव्हा एखादी मुलगी मासिक पाळीच्या तीव्र त्रासाची तक्रार घेऊन माझ्याकडे येते, तेव्हा मी सर्वात आधी तिच्या पोषणावर लक्ष केंद्रित करते. तसेच तिला सकस आहार घेण्याचा, नियमित व्यायाम करण्याचा आणि शरीराला सर्व आवश्यक पोषणद्रव्ये मिळतील याची खात्री करण्याचा सल्ला देते, असेही डॉ. चड्ढा यांनी सांगितले. त्यांच्या मते, डॉक्टरांनी अशा मुलींमध्ये व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता आहे का, याचीही आवश्यकतेनुसार तपासणी केली पाहिजे. पोषणतज्ज्ञांच्या मदतीने आहाराचे योग्य व्यवस्थापन करणे या लक्षणांवरील उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. यादरम्यान लॅन्सेटच्या नवीन अभ्यासात आहार, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीच्या पूरक आहारामुळे डिस्मेनोरिया टाळता येतो का, याची चाचणी करण्यात आलेली नाही. मात्र त्यात डिस्मेनोरियाचा सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. संशोधकांच्या मते, या निष्कर्षांमुळे मासिक पाळीतील वेदना ही एक कायमस्वरूपी किंवा गंभीर समस्या बनण्यापूर्वीच त्याचा धोका असलेल्या मुलींची वेळेत ओळख पटवणे शक्य होऊ शकते; पण पौगंडावस्थेपूर्वी लक्षणे दिसणाऱ्या प्रत्येक मुलीला पुढे जाऊन मासिक पाळीत तीव्र वेदना होतीलच असे नाही. तरीही मासिक पाळी सुरू झाल्यानंतर जर सतत तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
