मुंबईतील एका ४७ वर्षीय महिलेला सातत्याने थकवा जाणवत होता. कामाची धावपळ आणि व्यस्त दिनचर्येमुळे कदाचित ही समस्या निर्माण झाली असावी, असे तिला वाटत होते. त्यामुळेच महिलेले सुरुवातीला या थकव्याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवले; पण कालांतराने त्रास वाढतच गेल्याने अखेर तिने रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी आरोग्याची तपासणी केल्यानंतर संबंधित महिलेला तिसऱ्या टप्प्यातील स्वादुपिडांच्या कर्करोगाचे निदान झाले. महिलेच्या म्हणण्यानुसार, या गंभीर आजाराने निदान होण्यापूर्वी ती स्वत:ला निरोगी समजत होती. म्हणूनच सतत जाणवणारा थकवा हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, याचा तिला संशयही आला नव्हता. या घटनेने एका मोठ्या आणि गंभीर आरोग्यविषयक प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यादरम्यान कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काय करावे? याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपयांचा हा सविस्तर आढावा…
भारतात कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या वाढली
गेल्या काही वर्षांत देशातील कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पूर्वी कॅन्सर हा शब्द कानी पडल्यानंतर डोळ्यांसमोर एखादी वयस्क व्यक्ती यायची. आता मात्र हे चित्र वेगाने बदलत असून तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. २०४० पर्यंत देशात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा २० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत चर्चा करताना त्या संदर्भात माहिती दिली होती. कर्करोगाच्या प्रादुर्भावाच्या बाबतीत भारताचा क्रमांक चीन आणि अमेरिकेनंतर तिसरा असल्याचे त्यांनी सांगितले होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ टिकून राहणारा थकवा, पोट फुगणे, मेंदूवर ताण येणे आणि कामात लक्ष केंद्रित न होणे यांसारख्या दैनंदिन बदलांकडे अनेकदा नकळत दुर्लक्ष केले जाते. मात्र अशा लक्षणांमागे अनेक वेगवेगळी कारणेही असू शकतात. त्यामुळेच केवळ वरील लक्षणे दिसल्यास ती कर्करोगाचीच असल्याचा थेट निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. तरीही सतत जाणवणाऱ्या शारीरिक बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची वेळेवर तपासणी करून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते.
कर्करोगाचा धोका नेमका कशामुळे वाढतो?
आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने कर्करोगावरील उपचारात मोठी प्रगती केली असली, तरी या जीवघेण्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी काही दैनंदिन सवयी अंगीकारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. लीना दधवाल यांच्या मते, कर्करोग नेमका कशामुळे होतो याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; पण शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे प्रामुख्याने कर्करोगाच्या गाठींची वाढ होते. जर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल, तर बाहेरील या आजाराच्या पेशी शरीरावर सहज आक्रमण करतात आणि त्या लवकर दिसूनही येत नाही. एक सक्षम आणि निरोगी रोगप्रतिकार यंत्रणा तयार करण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक असते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, कर्करोगाची केवळ ५ ते १० टक्के प्रकरणे ही जनुकीय दोषांमुळे उद्भवतात, तर बहुतांश प्रकरणांमध्ये पर्यावरण आणि जीवनशैलीशी संबंधित घटकांची भूमिका असल्याचे दिसून येते.
व्यायाम ठरतोय कर्करोगाविरुद्ध सुरक्षा कवच?
डॉ. दधवाल यांच्या मते, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल महत्त्वाची आहे. व्यायामामुळे आतड्यांचा आणि स्तनांच्या कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. त्याशिवाय आरोग्य आणि शारीरिक-मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासही मदत होते. नियमित व्यायाम केल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो. व्यायामामुळे शरीरात ‘Endorphins’ नावाचे ‘फील-गुड’ संप्रेरक तयार होते, जे रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यास मदत करते. दररोज किमान ४० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम जसे की- वेगाने सायकल चालवणे, जलद चालणे, पोहणे तसेच योगासने केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच संध्याकाळऐवजी दिवसा मोकळ्या हवेत व्यायाम करणे केल्याने शरीराला आवश्यक ‘व्हिटॅमिन डी’ मिळते, असेही डॉ दधवाल यांनी नमूद केले.
कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी काय करावे?
कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून दूर राहण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नसून दैनंदिन जीवनशैलीत योग्य बदल करणे तितकेच गरजेचे असल्याचे डॉ. दधवाल यांनी सांगितले. त्यांच्या मते, अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो आणि तो टाळण्यासाठी सकस आणि संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेला आहार कर्करोगापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतो. दररोज हिरव्या पालेभाज्या आणि पाच प्रकारची फळे खाल्ल्यास शरीर निरोगी राहते. तोंडाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल एक तृतीयांश मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे होतात. विशेषतः फुप्फुसाच्या एकूण कर्करोगांपैकी ८५ टक्के प्रकरणे ही सिगारेट ओढल्यामुळे समोर येतात. तसेच धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही धुराच्या किंवा प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका वाढतो, असा इशाराही डॉ. दधवाल यांनी दिला.
मद्यपानावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे
अतिप्रमाणात मद्यपान केल्याने मोठ्या आतड्याचा, यकृताचा आणि स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. विविध अभ्यासांनुसार महिलांसाठी दररोज ३० मिली आणि पुरुषांसाठी ६० मिली इतके मद्यपान स्वीकारार्ह मानले गेले आहे. तरीही, मद्यपानाचे अगदी नेमके सुरक्षित प्रमाण किती असावे, यावर अजूनही व्यापक संशोधनाची गरज आहे. जरी मर्यादित मद्यपानाने थेट कर्करोग होत नसला, तरी मद्याचे काही थेंबही हृदय आणि यकृताच्या विकारांसारख्या इतर गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात, असेही डॉ. दधवाल यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय त्वचेच्या कर्करोगापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन वापरा, संपूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा आणि दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता सर्वाधिक असल्याने त्या वेळेत उन्हात फिरणे टाळा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. याशिवाय, त्वचेमध्ये होणाऱ्या कोणत्याही सूक्ष्म बदलांकडे जसे की- अचानक तीळ किंवा चट्टे उमटणे याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचेही डॉ. दधवाल यांनी सांगितले.
