रेल्वेच्या प्रत्येक डब्यांमध्ये बसवण्यात आलेली ‘अलार्म चेन’ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची सुविधा मानली जाते. संकटकाळात गाडी थांबवण्यासाठी ही साखळी ओढण्याची मुभा प्रवाशांना असते. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीतच या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जाते. विनाकारण अलार्म चेन ओढल्यास ट्रेनला पुढील प्रवासासाठी विलंब तर होतोच; पण त्या मार्गावर पाठीमागून येणाऱ्या इतर गाड्यांचे वेळापत्रकही विस्कळीत होते. अनेकदा प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी येणारे नातेवाईक किंवा मित्रमंडळी रेल्वेच्या डब्यात चढतात आणि वेळीच खाली उतरत नाहीत. परिणामी गाडी सुरू झाल्यानंतर त्यांची धापवळ उडते आणि त्यातील काहीजण चेन ओढतात. आजवर अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. यादरम्यान अलार्म चेन ओढल्यास संपूर्ण ट्रेन अचानक कशी थांबते? स्टेशन चुकल्यास प्रवासी या सुविधेचा वापर करू शकतात का? याबाबत भारतीय रेल्वेचे नियम काय सांगतात? त्याविषयीचा हा आढावा…

अलार्म चेन ओढल्यानंतर ट्रेन कशी थांबते?

रेल्वेच्या डब्यातील अलार्म चेन ओढल्यास ट्रेन नेमकी कशी थांबते, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवम शर्मा यांनी दी इंडियन एक्स्प्रसेला महत्वाची माहिती दिली. “रेल्वेच्या डब्यातील अलार्म चेन हवा बाहेर सोडणाऱ्या एका व्हॉल्व्हच्या माध्यमातून ब्रेकच्या मुख्य पाइपशी जोडलेली असते. सामान्य परिस्थितीत या ब्रेक पाइपमध्ये सुमारे पाच किलो प्रति चौरस सेंटीमीटर इतका हवेचा दाब कायम ठेवला जातो. प्रवाशाने अलार्म चेन ओढल्यानंतर संबंधित व्हॉल्व्ह उघडतो आणि ब्रेक पाइपमधील हवा बाहेर पडते. त्यामुळे हवेचा दाब कमी होतो आणि ट्रेनचा वेग कमी होऊ लागतो. हवेच्या दाबात झालेला हा बदल लोको पायलटला प्रेशर मीटवर दिसतो आणि त्यानंतर सतर्कता बाळगत ते ट्रेन थांबवतात,” असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.

चेन कोणत्या डब्यातून ओढली कसे समजते?

अलार्म चेन ओढली गेल्याचे गार्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात यावे यासाठी लोको पायलट सलग तीन वेळा हॉर्न वाजवतात. भरधाव वेगात असलेल्या गाडीला एकदम ब्रेक लावल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे गाडी सुरक्षित अंतर पार करून हळूहळू थांबवली जाते. त्याचवेळी साखळी ओढलेल्या डब्यातून हवा बाहेर पडताना मोठा आवाज येत असतो. या आवाजाच्या मदतीने रेल्वे कर्मचारी अलार्म चेन नेमकी कोणत्या डब्यात ओढली गेली ते शोधून काढतात. त्यानंतर साखळी ओढण्याचे कारण तपासून ती पुन्हा जागेवर बसवली जाते आणि मगच गाडी पुढील प्रवासासाठी रवाना होते, अशी माहितीही शर्मा यांनी दिली.

प्रवाशांना अलार्म चेन नेमकी कधी ओढता येते?

रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी गंभीर आपत्कालीन परिस्थिती असेल, तरच त्यांना अलार्म चेन ओढण्याची मुभा असते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास एखादे स्थानक जवळ असताना चेन खेचण्याची मुभा असते. याशिवाय एखादा प्रवासी ट्रेनमधून खाली पडल्यास, ट्रेनमध्ये आग लागल्यास किंवा गंभीर गुन्हेगारी अथवा सुरक्षेशी संबंधित घटना घडल्यासही अलार्म चेनचा वापर करता येतो. आपत्कालीन परिस्थिती इतकी गंभीर असावी की ट्रेन तातडीने थांबवणे आवश्यक ठरेल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. अलार्म चेन ओढल्यामुळे ट्रेन थांबल्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचतात आणि चेन का ओढण्यात आली, याची माहिती घेतात. ट्रेन एखाद्या स्थानकावर असल्यास, प्लॅटफॉर्मवर तैनात असलेले रेल्वे कर्मचारी परिस्थितीची पाहणी करतात. मात्र, दोन स्थानकांदरम्यानच्या ब्लॉक सेक्शनमध्ये घटना घडल्यास ट्रेनमधील गार्ड आणि असिस्टंट लोको पायलट त्या डब्यात जाऊन परिस्थिती तपासतात. या प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलदेखील अलार्म चेन ओढणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ शकते आणि चेन का ओढण्यात आली, याबाबत त्याची चौकशी करू शकते.

स्टेशन चुकल्यास अलार्म चेन ओढता येते का?

एखाद्या प्रवाशाचे स्टेशन चुकल्यास किंवा घाईगरबडीत दुसऱ्या ट्रेनमध्ये बसल्यास त्याला अलार्म चेन ओढण्याची मुभा नसते. प्रवाशांनी वेळेवर स्थानकावर पोहोचणे आणि योग्य गाडीत बसणे ही त्यांची स्वतःची जबाबदारी आहे. स्थानक चुकल्यास पुढील स्थानकावर उतरून दुसऱ्या गाडीचा पर्याय निवडावा. एखाद्याच्या वैयक्तिक निष्काळजीपणामुळे संपूर्ण गाडी थांबवणे चुकीचे असून, त्यामुळे शेकडो प्रवाशांचा खोळंबा होतो आणि त्या मार्गावरील इतर गाड्यांचे वेळापत्रकही बिघडते. त्यामुळे चेन ओढणाऱ्या प्रवाशाला नियमांनुसार दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विनाकारण अलार्म चेन ओढल्यास किती दंड?

ट्रेनमध्ये विनाकारण अलार्म चेन ओढणे किंवा तिच्या यंत्रणेत हस्तक्षेप करणे हा रेल्वे कायदा, १९८९ मधील कलम १४१ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. या तरतुदीनुसार, योग्य आणि पुरेसे कारण नसताना ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिलेल्या संप्रेषण यंत्रणेत हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षापर्यंत कारावास, १,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विनाकारण अलार्म चेन ओढल्याप्रकरणी एखादा प्रवासी दोषी ठरल्यास त्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी कायद्यानुसार किमान ५०० रुपयांचा दंड होऊ शकतो, तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. ही कारवाई संबंधित तरतुदीत नमूद केलेल्या नियमांनुसारच कारवाई केली जाते, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.

अलार्म चेन ओढल्याने रेल्वेचा खोळंबा कसा होतो?

अलार्म चेनचा गैरवापर होत असल्याबद्दल रेल्वेने चिंता व्यक्त केली आहे. एखादी ट्रेन विनाकारण थांबल्याने त्याच मार्गावर असलेल्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. रेल्वेच्या नोंदीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत आग्रा, झाशी आणि प्रयागराज विभागांमध्ये अलार्म चेन ओढण्याच्या तब्बल सहा हजार ३९३ घटना नोंदवण्यात आल्या. त्यापैकी सहा हजार ३७९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १६ लाख ६३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विभागनिहाय पाहता, प्रयागराज विभागात चेन खेचण्याची सर्वाधिक २,५१७ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यानंतर आग्रा विभागात २,४९३, तर झाशी विभागात १,३८३ प्रकरणे नोंदवण्यात आली.

रेल्वे प्रवाशांनी काय काळजी घ्यावी हवी?

रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या वेळेआधी पुरेसा वेळ स्थानकावर पोहोचावे, तसेच ट्रेन क्रमांक, डबा आणि इतर तपशील तपासून योग्य ट्रेनमध्ये वेळेत चढावे, असा सल्ला देण्यात आला आहे. एखाद्या प्रवाशाचे स्टेशन चुकले किंवा तो चुकीच्या ट्रेनमध्ये चढला, तर त्याने पुढील स्टेशन येईपर्यंत थांबावे आणि तिथे उतरावे. गंभीर आपत्कालीन परिस्थिती नसताना विनाकारण अलार्म चेन ओढू नये, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवासादरम्यान कोणतीही मदत आवश्यक असल्यास प्रवाशांनी १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा आपली तक्रार अथवा समस्या रेल्वेच्या ‘रेल मदत’ अॅपद्वारे कळवावी, असेही अधिकाऱ्यांनी सुचवले. याशिवाय, चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही भारतीय रेल्वेने केले आहे. अलार्म चेनचा मुख्य उद्देश केवळ आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेन थांबवणे हा आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.