How Arsenic-Laced Spices Nearly Killed a Hyderabad Family: माणसाचा अहंकार त्याला कुठल्याही थरापर्यंत पोहोचण्यास भाग पाडतो. प्रसंगी आपण कुणाच्यातरी जिवावर उठलो आहोत, याचीही जाणीव माणसाला राहात नाही. हेच सांगणारी एक घटना २०२३ साली उघडकीस आली. लग्नापासून सुरू झालेले सत्र एका दुसर्‍या लग्नापाशी येवून थांबले. २६ जुलै २०२३ रोजी बाला शशिरेखा यांच्या लग्नाला फक्त दोन महीने झाले होते. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. शशिरेखा गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत होता. तसेच ‘एडेमा’मुळे (शरीरात पाणी साचल्याने येणारी सूज) त्यांचे हात-पाय सुजले होते आणि त्यांची हालचालही थांबली होती. हे काही अचानक घडले नव्हते.

१० पट अधिक आर्सेनिक शरीरात होते

त्या माहेरी आल्यापासून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अनेक डॉक्टरांकडे नेले होते. परंतु, त्यांना नक्की काय झाले आहे, हे कुणालाच समजत नव्हते. अखेर न्यूरोलॉजिस्ट डॉ. वेमुरी रामा तारकानाथ यांच्याकडे त्यांना पाठवण्यात आले. त्या ज्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या होत्या, त्या अवस्थेत त्यांचे हात-पाय हलत नव्हते. डॉक्टरांनी त्यांचा हात हातात घेतल्यावर त्यांना नखांवर पांढऱ्या आडव्या रेषा दिसल्या. या रेषांना ‘मीस लाईन्स’ (Mees’ lines) म्हणतात. डॉक्टरांनी चटकन ओळखले हे ‘आर्सेनिक’ या धातूच्या विषबाधेचे स्पष्ट लक्षण आहे. त्यामुळे डॉ. तारकानाथ सावध झाले आणि त्यांनी शशिरेखा यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या. वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांची शंका खरी ठरली. शशिरेखा यांच्या शरीरात सामान्य मर्यादेपेक्षा सुमारे १० पटीने जास्त आर्सेनिक सापडले. त्यामुळे हे प्रकरण थेट पोलिसांकडे गेले.

हे प्रकरण वरकरणी साधं दिसत असलं तरी ते तितकं सरळ नव्हतं. तेलंगणा पोलिसांसमोर एका अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्हेगारी प्रकरणाचे आव्हान होते.

अस्थी जतन करून ठेवल्या होत्या

डॉ. वेमुरी रामा तारकानाथ यांच्यामुळे शशिरेखा प्राणघातक संकटातून वाचल्या. मात्र, त्यांच्या ६२ वर्षीय सासूबाईंचे म्हणजे एम. उमा माहेश्वरी यांचे नशीब इतके चांगले नव्हते. एम. उमा माहेश्वरी यांचे निधन ५ जुलै २०२३ रोजी झाले. त्यांच्या मुलाचे शशिरेखा यांच्याशी लग्न ठरल्यानंतर आणि हैदराबादमधील त्यांच्या घरी पार पडलेल्या एका छोट्या समारंभानंतर अवघ्या एका महिन्यातच त्या जग सोडून गेल्या. उमा यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असे समजून कुटुंबाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते आणि त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या होत्या.

परंतु, शशिरेखा यांना आर्सेनिक विषबाधा झाल्याचे निदान झाल्यानंतर मात्र शशिरेखा यांची नणंद शिरीषा या सावध झाल्या. त्या ब्रिटनमध्ये (UK) राहतात. परंतु, शशिरेखा यांचे मेडिकल रिपोर्ट्स आल्यानंतर शिरीषा यांनी (१८ ऑगस्ट रोजी) सायबराबादच्या मियापूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यांनी आपल्या माजी पतीवर आपल्या आईला विष देऊन मारल्याचा आरोप केला होता आणि त्या संदर्भात त्या FIR दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर एका महिन्यात जे काही समोर आले ते भीषण होत. शिरीषा यांचे माजी पती अजित कुमार मुप्परापू या ब्रिटनस्थित फार्मासिस्टने रचलेला तो एक भीषण कट होता. मुप्परापू याने विभक्त झालेली पत्नी शिरीषा, तिचे कुटुंब आणि त्यांच्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला संपवण्यासाठी हा कट रचल्याचे नंतर तपासात उघड झाले.

एक ‘अस्वस्थ’ सोहळा

३ जुलै २०२३ हैदराबादमधील मियापूर येथील ‘साईनाथ एन्क्लेव्ह’मधील एका आलिशान आणि प्रशस्त अपार्टमेंटमध्ये लग्नाची लगबग सुरू झाली. शिरीषा यांचा भाऊ एम. पूर्णेंदर याचा गुंटूरच्या शशिरेखाबरोबर साखरपुडा ठरलेला तो दिवस होता. घरात जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी शिरीषासुद्धा ब्रिटनहून आल्या होत्या.

हा आनंदाचा प्रसंग असायला हवा होता, परंतु वर आणि वधूसह कुटुंबातील इतर सदस्यही आजारी पडले. दिवसभर त्यांना उलट्या होत होत्या आणि ‘ओआरएस’च्या (ORS) द्रावणाचाच आधार होता. लग्नाच्या धावपळीत प्रकृती बिघडली असावी, असे समजून सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली होती. अशी माहिती शिरीषा यांनी लंडनमधून एका अज्ञात ठिकाणाहून फोनवर ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिली. त्या म्हणाल्या “आमच्यापैकी कोणालाही यात काही काळं-बेरं (घातपात) असेल असे वाटले नव्हते.”

संघर्षाची दुसरी इनिंग

या कथेची सुरुवात २०१८ साली होती. शिरीषा यांचा पहिला घटस्फोट झाला होता. त्यानंतर अजित आणि शिरीषा एका ‘मॅट्रिमोनिअल पोर्टल’वर (विवाह संकेतस्थळ) भेटले. शिरीषा यांना सात वर्षांची मुलगी होती, तर अजितलाही एक लहान मुलगा होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हैदराबादमधील एका आर्य समाज मंदिरात त्यांचा विवाह पार पडला.

…पण लवकरच परिस्थिती बिघडली

शिरीषा सांगतात, लग्नानंतर लगेचच अजितने अपशब्द वापरून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. हैदराबादमध्ये दोन महिने राहिल्यानंतर ते ब्रिटनला (UK) गेले, जिथे अजित ‘कन्सलटंट’ म्हणून काम करत होता. त्याच्याकडे फार्मसीची पदवी होती, पण तो इतरही बरीच कामे करत होता. शिरीषा यांनी तिथे ‘जनरल प्रॅक्टिशनर ट्रेनी’ म्हणून नोकरी सुरू केली. लंडनमध्ये अजितच्या शिवीगाळीचे रूपांतर शारीरिक हिंसेत झाले होते. शिरीषा सांगतात, “तो छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचा. मला मारहाण केल्यानंतर तो माफी मागायचा आणि पुन्हा असं होणार नाही असं आश्वासन द्यायचा. पण त्याने ती आश्वासने कधीच पाळली नाहीत.”

तो संयमाचा अंत होता

२०२२ च्या सुमारास, अजितने शिरीषा यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले होते. दुसऱ्या एका घटनेत, त्याने वाईनची बाटली उगारून तिला मारण्याची धमकी दिली होती. आरोपपत्रातील तपशिलानुसार, शिरीषाबरोबर झालेल्या एका वादादरम्यान अजितने तिच्या मुलीलाही इजा पोहोचवली आणि तिला धक्काबुक्की केली. “तो माझ्या संयमाचा अंत होता. मी आणि माझी मुलगी घरातून चोरून बाहेर पडलो आणि एका मैत्रिणीच्या घरी गेलो,” असे शिरीषा सांगतात.

Arsenic poisoning case

लवकरच अजितने शिरीषाचा पाठलाग करणे (stalking) सुरू केले. “एकदा त्याने रस्त्यावर माझ्या कारला ओव्हरटेक केले आणि मला शिवीगाळ करत ‘तुला संपवून टाकीन’ अशी धमकी दिली. २०२२ साली ऑगस्ट महिन्यात अजितने त्यांच्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिरीषाने ब्रिटन पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध ‘रिस्ट्रेनिंग ऑर्डर’ (प्रतिबंधात्मक आदेश) मिळवली. शिरीषा सांगतात, “मी ऑक्टोबर २०२२ साली घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्याने माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचला.”

पहिले लक्ष्य शिरीषाचे वडील हनुमंत राव होते

औषधशास्त्राचे (Pharmacy) शिक्षण घेतलेला असल्याने अजितला हे चांगलेच ठाऊक होते की त्याचे काम कशाने फत्ते होऊ शकते. आर्सेनिक हा निसर्गात आढळणारा एक घटक असून सेमीकंडक्टर उद्योगापासून ते औषधे, काच आणि सिरॅमिक्सपर्यंत त्याचे अनेक उपयोग आहेत. परंतु, ते अत्यंत विषारी देखील आहे आणि याच कारणामुळे ते बाजारात सहज उपलब्ध होत नाही. अशा वेळी अजितने विज्ञान शिक्षिका असलेल्या त्याच्या बहिणीच्या शाळेतील प्रयोगशाळेच्या कोट्यातून हे विष मिळवले.

आता प्रश्न होता: हे विष शरीरात पोहोचवायचे कसे?

हनुमंत राव आणि त्यांची पत्नी उमा यांची दोन्ही मुले ब्रिटन आणि अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर हे जोडपं हैदराबादमधील वेगाने विकसित होणाऱ्या मियापूर उपनगरात एकटेच राहत होते. आपला प्लॅन पूर्ण करण्यासाठी ब्रिटनहून आलेल्या अजितने मीठ आणि तिखटामध्ये आर्सेनिक मिसळले आणि ते एका व्यवस्थित पॅकेटमध्ये भरून त्यांच्या घरी पोहोचवले. आरोपपत्रानुसार, राव यांना कोणताही संशय आला नाही, त्यांनी ते पाकीट स्वीकारले. अजितला मात्र त्याचा प्लॅन यशस्वी होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली. कारण उमा बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे राव यांच्या घरी जेवण फारसे तयार केले जात नव्हते. दरम्यान, राव यांनी एकदा स्वतःसाठी ऑम्लेट तयार केले होते (त्यांना केवळ तेवढाच स्वयंपाक करता येत असे) आणि ते खाल्ल्यावर त्यांची प्रकृती बिघडली होती. अन्नातून विषबाधा (food poisoning) झाली असावी, असा स्वतःचा समज करून घेत त्यांनी उमा परत येण्याची वाट पाहिली.

तेव्हा संशय आला नव्हता

२० मे २०२३ उमा रोजी परतल्या. इथूनच गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. “माझ्या आई-वडिलांना मळमळणे आणि जुलाब यांसारखी सौम्य लक्षणे जाणवू लागली,” शिरीषा सांगतात. मे ते जून २०२३ या काळात, पूर्णेंदरच्या लग्नाच्या तयारीसाठी कुटुंबातील इतर सदस्य वारंवार या वृद्ध दांपत्याच्या घरी येत-जात होते. “जेव्हा घरातील प्रत्येकाची प्रकृती खालावली, तेव्हा मी दोनदा पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. पण अन्नामध्येच काहीतरी काळं-बेरं असेल असा मला संशयही आला नाही,” असे शिरीषा सांगतात.

विषबाधा झाली पण कारण माहीत नव्हते

३ जून २०२३ रोजी एका छोट्या समारंभात शशिरेखा आणि पूर्णेंदर विवाहबंधनात अडकले. काही दिवसांनंतर, शिरीषा यांच्या आईची प्रकृती गंभीर झाली आणि हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण “कार्डियाक अरिदमिया, परिणामी तीव्र पल्मोनरी एडेमा आणि श्वसन निकामी होणे” असे नोंदवण्यात आले. “माझ्या आईच्या निधनानंतरही आम्ही तेच विषारी अन्न खात राहिलो, कारण आम्ही तेच भेसळयुक्त मसाले वापरत होतो. आमच्यापैकी अनेकांना आर्सेनिक विषबाधेची लक्षणे जाणवू लागली होती, पण ती कशामुळे आहेत हे आम्हाला ठाऊक नव्हते,” शिरीषा सांगतात.

आणि आर्सेनिक चाचणीचे आदेश दिले

२० जुलै २०२३ रोजी शशिरेखा यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, तरीही त्या गुंटूरला आपल्या माहेरी गेल्या. शिरीषा सांगतात, “तो आषाढ महिना होता, या महिन्यात नववधूंनी त्यांच्या माहेरी जाण्याची प्रथा असते. तिथे गेल्यावर काही दिवसांनी त्यांच्या पालकांनी डॉ. तारकानाथ यांचा सल्ला घेतला.” डॉ. तारकानाथ यांनी यापूर्वी ‘मीस लाईन्स’ असलेला रुग्ण प्रत्यक्षात कधीही पाहिला नव्हता. परंतु, शशिरेखा यांची नखे पाहताच त्यांच्या स्मृती थेट वैद्यकीय महाविद्यालयातील दिवसांत गेल्या, जिथे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी याबद्दल अभ्यास केला होता. डॉ. तारकानाथ सांगतात, “मी त्या रेषा पाहिल्यावर तत्काळ रुग्णाची आर्सेनिक चाचणी करण्याचे आदेश दिले. कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचीही ही चाचणी करण्यात आली आणि त्या प्रत्येकाचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला.”

त्यानंतर तेलंगणा पोलिसांसमोर दोन मुख्य प्रश्न होते. या कुटुंबापर्यंत आर्सेनिक पोहोचले कसे? आणि हजारो किलोमीटर दूर ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अजितने यात भूमिका कशी बजावली, तो या कटाचा सूत्रधार कसा असू शकतो?

अपयशी प्रयत्नांची मालिका

जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना अजित आणि त्याच्या तीन मित्रांमधील अनेक फोन कॉल्सचे रेकॉर्ड सापडले. हैदराबादमध्ये हॉटेलची खोली भाड्याने घेऊन राहिलेल्या या तिघांचा पाठलाग करत असताना पोलिसांना समजले की, अजितने त्यांना शिरीषाच्या कुटुंबातील सदस्यांना ‘सक्सिनिलकोलिन’ (succinylcholine) टोचण्यास सांगितले होते. जर हे इंजेक्शन दिले गेले असते, तर त्यांचा जागीच मृत्यू झाला असता. आरोपपत्रानुसार, पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यापैकी तिघे हैदराबादचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून या विषाच्या कुप्या (vials) जप्त करण्यात आल्या आहेत. या विषाचे वैशिष्ट्य म्हणजे शवविच्छेदनादरम्यान (postmortem) हे विष शोधणे अत्यंत कठीण असते. परंतु, हा प्लॅन कधीच अमलात आला नाही.

अजितने शिरीषाच्या वडिलांना (राव यांना) मारण्यासाठी एक-दोनदा नव्हे, तर अनेकदा प्रयत्न केले होते:

  • पहिला प्रयत्न: २०२३ च्या सुरुवातीला त्याने अपघाताचा बनाव रचून त्यांना मारण्याचा प्लॅन केला होता. यासाठी त्याने दोन मारेकऱ्यांना ४ लाख रुपयांची सुपारीही दिली होती.
  • दुसरा प्रयत्न: जेव्हा अपघाताचा कट फसला, तेव्हा त्याने स्वतः सूत्रे हातात घेतली आणि अन्नातून ‘आर्सेनिक’ व ‘सक्सिनिलकोलिन’ यांसारखी घातक विषं देण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तपास आणि बहिणीचा सहभाग:

ऑगस्ट २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात अजितची बहीण सुरेखासह नऊ जणांना पकडले. अजित आणि त्याच्या बहिणीमध्ये झालेल्या फोन कॉल्सबद्दल पोलिसांना संशय होताच.

विष कसे पोहोचवले?

चौकशीत सुरेखाने एक धक्कादायक गोष्ट कबूल केली. तिने सांगितले की, अजितने एका फूड डिलिव्हरी बॉयला २००० रुपये दिले होते. त्या मुलामार्फत त्याने आपल्या पूर्वाश्रमीच्या सासरच्या घरी (शिरीषाच्या घरी) विष मिसळलेले मसाले पाठवले होते.

अजितला ब्रिटनमध्ये अटक

या प्रकरणातील नऊ आरोपी सध्या हत्या आणि कटाच्या कलमांखाली तुरुंगात आहेत. तरीही अजित ब्रिटनमध्येच होता आणि फरार झाला. आरोपपत्रानुसार, “अजित हा ब्रिटनचा नागरिक असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी (extradite) ‘ब्लू’ आणि ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्यात आली. १७ जानेवारी २०२५ रोजी बर्कशायर (Berkshire) मधील मेडनहेड (Maidenhead) येथे ब्रिटन पोलिसांनी अजितला अटक केली. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्याला कोठडी सुनावली आहे. त्याने आपल्या प्रत्यार्पणाविरुद्ध याचिका दाखल केली असून, “सायबराबाद पोलिसांनी अटक केल्यास आपल्या मानवाधिकारांचे उल्लंघन होईल,” असा दावा केला आहे. या याचिकेवर एप्रिल अखेरीस पुढील सुनावणी होणार आहे.

विषाचे परिणाम आजही भोगावे लागत आहेत

शिरीषा सांगतात की, त्यांचा छळ करणारा अजित आता तुरुंगात गेल्यामुळे त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा सावरू लागलं आहे. आता त्यांना सुरक्षित वाटतंय आणि त्यांच्या मुलीलाही आता भीतीदायक स्वप्ने पडत नाहीत. मात्र, तीन वर्षांपूर्वी त्यांना जे विष दिले गेले होते, त्याचे शारीरिक परिणाम अजूनही भोगावे लागत आहे. कुटुंबातील प्रत्येकाला आजही हात-पायांना मुंग्या येणे आणि अशक्तपणा यांसारख्या मज्जासंस्थेशी संबंधित त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परंतु, इतक्या मोठ्या संकटानंतर आता राव कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. ज्या शशिरेखा यांच्यामुळे हे विषबाधेचे प्रकरण उघडकीस आले, त्या आता सुखरूप असून दुसऱ्यांदा आई होणार आहेत. मृत्यूच्या दारातून त्या परत आल्या आणि आता कुटुंबात दोन छोट्या पाहुण्यांचे आगमन होत आहे, याचा शिरीषा यांना खूप आनंद होत आहे.