US Navy SEALs Operation Neptune Spear: ओसामा बिन लादेन याने ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर (World Trade Centre) आणि इतर ठिकाणी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुमारे ३००० (तीन हजार) निष्पाप लोकांचा बळी घेतला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण केले होते. त्यापैकी दोन विमाने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या मनोऱ्यांवर, एक विमान पेंटागॉनवर आदळवण्यात आले, तर चौथे विमान पेनसिल्व्हेनियामधील शेतात कोसळले. अमेरिकेच्या भूमीवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा परकीय हल्ला मानला जातो. या घटनेने अमेरिकेच्या सुरक्षा धोरणात आणि जागतिक राजकारणात कायमचा बदल घडवून आणला. या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी अमेरिकेने तब्बल १० वर्षे ओसामा बिन लादेनचा शोध घेतला आणि अखेरीस २ मे २०११ रोजी पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे एका विशेष मोहिमेत त्याला ठार मारले. हीच मोहीम ऑपरेशन नेपच्यून स्पिअर म्हणून ओळखली जाते. या वर्षी या मोहिमेला आता १५ वर्षे पूर्ण झाली.
कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान
अमेरिकन नेव्ही सील्सच्या (United States Navy SEALs) एका पथकाने पाकिस्तानमधील अबोटाबाद येथील एका सामान्य दिसणाऱ्या घरावर छापा टाकला आणि अल-कायदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याला कंठस्नान घातले. ‘ऑपरेशन नेपच्यून स्पिअर’ ही मोहीम ४० मिनिटांपेक्षाही कमी वेळ चालली, परंतु यामुळे जगातील सर्वात कुख्यात दहशतवाद्याचा एक दशकभर सुरू असलेला शोध संपुष्टात आला.
ओसामा बिन लादेन: अमेरिकेचा ‘मित्र’ ते सर्वात मोठा शत्रू
९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि अमेरिकेच्या ‘दहशतवादाविरुद्धच्या युद्धा’चा मुख्य चेहरा होण्यापूर्वी ओसामा बिन लादेन प्रत्यक्षात अमेरिकेचा एक मदतनीस होता. सौदी अरेबियातील एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या पोटी १९५७ साली जन्मलेला लादेन एकेकाळी वॉशिंग्टनचा विश्वासू साथीदार होता. १९८० च्या दशकात अफगाणिस्तानातून सोव्हिएत रशियन फौजांना हाकलून लावण्यासाठी त्याने अमेरिकन एजंट्सबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले होते.
रशियन फौजांचा पराभव करण्यासाठी ‘अल-कायदा’
ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव रॉबिन कूक यांनी २००५ साली ‘द गार्डियन’मध्ये लिहिलेल्या लेखात एका महत्त्वपूर्ण वास्तवावर प्रकाश टाकला होता. त्यांनी म्हटले होते की, ओसामा बिन लादेन ही पाश्चात्य सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या एका ऐतिहासिक आणि भयंकर चुकीची निष्पत्ती होती. ८० च्या दशकात अफगाणिस्तानवर रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात लढा देण्यासाठी अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने (CIA) लादेनला आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली होती, तर सौदी अरेबियाने या मोहिमेसाठी आर्थिक पाठबळ दिले होते.
संगणकावरची यादी
‘अल-कायदा’ याचा शब्दशः अर्थ ‘डेटाबेस’ (माहितीचा साठा) असा होतो. मुळात, रशियन फौजांचा पराभव करण्यासाठी सीआयएच्या मदतीने ज्या हजारो मुजाहिद्दीन सैनिकांची भरती आणि प्रशिक्षण झाले होते, त्यांच्या नावांची संगणकावरील यादी म्हणजेच ‘अल-कायदा’ होती. (Cook, Robin. “The struggle against terrorism cannot be won by military means.” The Guardian, 8 July 2005)
मैत्री संपुष्टात का आली?
परंतु, १९९० च्या दशकात ही मैत्री संपुष्टात आली. इराकने कुवेतवर चढाई केल्यानंतर सद्दाम हुसेनच्या सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी लादेनने सौदी राजघराण्याकडे स्वतःच्या फौजेनिशी लढण्याची परवानगी मागितली होती. मात्र, सौदी राजाने त्याचा प्रस्ताव नाकारून अमेरिकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ५ लाखांहून अधिक अमेरिकन सैनिक आखाती देशांत दाखल झाले. मात्र, सौदी अरेबियासारख्या ‘पवित्र भूमी’वर बिगर मुस्लिम फौजा ठेवण्यास लादेनने विरोध केला.
लादेन तालिबानच्या आश्रयाला
१९९२-९३ पर्यंत, लादेन आणि त्याच्या अल-कायदाने सोमालियातील अमेरिकाविरोधी अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यास, सुदानमधील इस्लामिक क्रांतीला पाठिंबा देण्यास आणि अमेरिकेला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली होती. यात १९९३ साली न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचाही समावेश होता. १९९६ पर्यंत तो जगातील सर्वात प्रसिद्ध गुन्हेगार ठरला होता आणि त्याने अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या आश्रयाला जाणे पसंत केले.
३००० निष्पाप नागरिकांचा बळी
१९९८ साली केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन दूतावासांवर झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर त्याचे नाव खऱ्या अर्थाने जगभर गाजले; या हल्ल्यात २२० लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर तीन वर्षांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर भीषण हल्ला झाला, यात सुमारे ३००० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.
दशकभराचा शोध
९/११ च्या हल्ल्यानंतर अवघ्या काही वेळातच अमेरिकन सरकारने ओसामा बिन लादेनला या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून घोषित केले. पीटर बर्गेन यांनी त्यांच्या ‘मॅनहंट: द टेन-इयर सर्च फॉर ओसामा बिन लादेन’ (२०१२) या पुस्तकात म्हटले आहे की, ११ सप्टेंबरच्या दुपारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची भेट घेतल्यावर सीआयएचे (CIA) संचालक जॉर्ज टेनेट म्हणाले होते की, या हल्ल्याची “पद्धत, तीव्रता आणि स्वरूप सर्व काही लादेनकडेच बोट दाखवत आहे”.
…मात्र लादेन हाती लागला नाही
असे असूनही, लादेनचे नेमके ठिकाण मात्र एक रहस्यच राहिले होते. बुश प्रशासनाने तातडीने त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्याची मागणी केली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी, २००१ साली ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. अमेरिकन फौजा तिथे २०२१ पर्यंत तैनात होत्या. या काळात त्यांनी तालिबानला काबूलमधून वेगाने हुसकावून लावले खरे, पण अमेरिकन सैन्य माघारी फिरताच तालिबानने पुन्हा सत्ता काबीज केली. या मोहिमेत लादेन मात्र त्यांच्या हाती लागला नाही.

शोधमोहिमेचा निर्णायक टप्पा पाकिस्तानमध्ये
२००७ साली ‘सीआयए’ला (CIA) बिन लादेनच्या अत्यंत विश्वासू कुरियरचे (संदेशवाहकाचे) नाव समजले. त्यानंतरची दोन वर्षे CIA उत्तर पाकिस्तानातील त्याच्या वास्तव्याचा ठावठिकाणा शोधण्यात व्यस्त होती. त्यानंतरच्या वर्षभरात त्यांनी इस्लामाबादपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या अबोटाबाद या लष्करी छावणीच्या शहरातील एका संशयास्पद ठिकाणाचा अचूक शोध लावला. तो एक मोठा, सुरक्षित आणि निर्जन असा परिसर होता. तिथली कडक सुरक्षा व्यवस्था पाहून तिथे नक्कीच एखादी महत्त्वाची व्यक्ती (high-value target) राहत असावी असा निष्कर्ष काढण्यात आला. २०१० च्या अखेरपर्यंत त्यांना खात्री पटली होती की, तो ओसामा बिन लादेनच आहे.

पाकिस्तानी लष्कराचे लादेनला संरक्षण
लादेनच्या ठावठिकाण्याबद्दल इतकी ठोस माहिती हाती असूनही त्याला कंठस्नान घालणे हे अमेरिकेसमोर एक मोठे आव्हान होते. अबोटाबाद हे शहर पाकिस्तानच्या लष्करी सत्तेचे केंद्र मानले जाते आणि लादेन नेमका ज्या भागात वास्तव्यास होता, तिथे लष्करातील बडे निवृत्त अधिकारी राहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘पाकिस्तान मिलिटरी ॲकॅडमी’ तिथून अवघ्या सव्वा किलोमीटरवर होती आणि तिथून लष्करी तळाकडे जाणारा रस्ता अगदी सरळ होता. शिवाय, शहरात लष्करी विमानतळही होते. पाकिस्तानी लष्करी यंत्रणाच लादेनला संरक्षण पुरवत असावी, असा अमेरिकेला प्रबळ संशय होता. त्यामुळेच, एका मित्रराष्ट्राच्या हद्दीत इतक्या खोलवर शिरून १ आणि २ मे च्या मध्यरात्री ही अत्यंत धाडसी आणि गुप्त मोहीम फत्ते करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला.
मोहिमेची ती निर्णायक रात्र
१ मे च्या रात्री, ७९ अमेरिकन सैनिकांना घेऊन चार हेलिकॉप्टर्सनी अफगाणिस्तानमधील जलालाबाद या अमेरिकन तळावरून उड्डाण केले. २ मे च्या पहाटे सुमारे १ च्या सुमारास हे पथक अबोटाबादमधील त्या संशयास्पद घराजवळ पोहोचले. तिथे उतरताना एका हेलिकॉप्टरचा मागील भाग (tail) कंपाऊंडच्या भिंतीला आदळला आणि ते कोसळले. त्यामुळे मूळ योजनेत ऐनवेळी बदल करावा लागला. नेव्ही सील्सचे जवान घराच्या छतावर उतरण्याऐवजी, सर्व सैनिकांनी जमिनीवरूनच थेट हल्ला चढवला.

लादेनला कंठस्नान
लादेनचा कुरियर अबू अहमद अल-कुवेती आणि त्याची पत्नी एका छोट्या चकमकीत मारले गेले. त्यानंतर कमांडोंनी मुख्य इमारतीत प्रवेश केला. तिथे त्यांनी अल-कुवेतीचा भाऊ आणि लादेनचा मुलगा खालिद, या दोघांनाही ठार केले. अखेर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेव्ही सील्सच्या पथकाला ओसामा बिन लादेन सापडला आणि त्यांनी त्याला गोळ्या घातल्या. लादेनचा मृतदेह ताब्यात घेऊन हे पथक तिथून तातडीने रवाना झाले. विशेष म्हणजे, शेवटचे हेलिकॉप्टर हवेत झेपावल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पाकिस्तानी फौजा त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर १२ तासांच्या आत ओसामा बिन लादेनचा मृतदेह सागरी दफन करण्यात आला.
