अमेरिकन हवाई दलाचा एक अधिकारी जवळपास दोन दिवस जखमी अवस्थेत इराणमध्ये पडून होता. इराणी सैनिकांनी केलेल्या अचूक गोळीबारात त्याचे ‘F-15E’ हे लढाऊ विमान एका जंगली भागात कोसळले होते. विमानाचा अपघात होण्याआधी या वैमानिकाने पॅरेशूटच्या सहाय्याने त्यातून उडी घेतली होती; पण तेही हवेतच खराब झाल्याने तो ताशी १०० मैल वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळत होता. त्याचवेळी त्याचा शोध घेण्यासाठी इराणी सैनिकांनी युद्धपातळीवर मोहीम सुरू केली होती. ‘ब्राव्हो’ अशा सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वैमानिकाने पहिल्यांदाच या थरारक अनुभवाची माहिती जाहीरपणे सांगितली. सीएनबीसी न्यूजला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत विमान कोसळल्यानंतर आपण कशाप्रकारे जीव वाचवला, अमेरिकन बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत इराणी सैन्याला कसा चकवा दिला, याबाबत सविस्तर भाष्य केले, त्याविषयी…

एप्रिलमध्ये इराणी सैन्याने विमान पाडल्यानंतर त्यात स्वार असलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या दोन्ही वैमानिकांनी या थरारक प्रसंगाबाबत कोणतेही सार्वजनिक भाष्य केले नव्हते. आता पहिल्यांदाच ब्राव्होने जाहीर मुलाखत दिली असून ‘अल्फा’ या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याने मुलाखतीत सहभागी होण्यास नकार दिला. द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, इराणच्या हद्दीत सुमारे ५० तास घालवल्यानंतर अमेरिकन सैन्याने या वैमानिकांची सुखरुप सुटका केली होती. या थरारक प्रसंगाची सुरुवात ३ एप्रिल रोजी झाली. त्यावेळी पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला होता आणि इराण व अमेरिकेकडून एकमेकांवर हल्ले केले जात होते. त्याचवेळी खांद्यावरून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्राने अमेरिकेच्या ‘F-15E’ या लढाऊ विमानाला लक्ष्य केले. त्यानंतर क्षणार्धात हे विमान इराणमधील कोहगिलुयेह आणि बोयर-अहमद प्रांतात कोसळले.

अमेरिकन वैमानिकाने कसा वाचवला जीव?

विमानावर क्षेपणास्त्र आदळल्याचा तो क्षण एखाद्या भरधाव मालगाडीने धडक दिल्यासारखा होता, अशी थरारक आठवण ‘ब्राव्हो’ या वैमानिकाने सांगितली. क्षेपणास्त्राच्या धडकेनंतर सुमारे तीन कोटी डॉलर्सच्या विमानातून दोन्ही वैमानिक एखाद्या चेंडूसारखे बाहेर फेकल्या गेले. या हल्ल्यांत ब्राव्होचे पॅरेशूट खराब झाले होते. मुलाखतीत त्याने सांगितले की, सुरुवातीच्या हल्ल्यातच माझे पॅराशूट खराब झाले होते. हवेत असताना जेव्हा मी पॅरेशूटच्या वरच्या भागाकडे बघितले तेव्हा मला काहीच दिसून आले नाही. माझ्या आयुष्यातील तो सर्वांत भयानक क्षण होता. ताशी ७० ते १०० मैल वेगाने मी जमिनीच्या दिशेने कोसळत होतो. त्यावेळी माझ्याकडे जराही विचार करण्याचा वेळ नव्हता. खराब झालेले पॅराशूट कसे कार्यान्वित करता येईल, याकडेच मी लक्ष केंद्रित करत होतो.

कंबरेचे हाड, उजवा हात आणि खांदा मोडला

अमेरिकन वैमानिक पुढे म्हणाला की, जमिनीवर आदळल्यानंतर काही क्षण माझी शुद्ध हरपली होती; पण जाग आल्यानंतर मी उभे राहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या कंबरेचे हाड, उजवा हात आणि खांदा मोडल्याचे मला लक्षात आले. तसेच माझ्या पायाचा घोटाही मुरगळला होता आणि चेहऱ्यावर तसेच डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यातून येणारे रक्त थांबवण्यासाठी मी धडपडत होतो. जमिनीवर पडल्यानंतर विमान कोसळलेल्या ठिकाणाजवळ थांबणे म्हणजे थेट शत्रूच्या हाती सापडणे, याची मला जाणीव होती. गंभीर परिस्थितीत जखमी झाल्यानंतर परिस्थितीशी जुळवून घेत संकटावर मात करण्याचे आम्हाला प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे इतक्या गंभीर दुखापती असतानाही मी शक्य तितक्या वेगाने घटनास्थळापासून दूर गेलो. त्यावेळी माझ्याकडे केवळ एक पिस्तूल, एक संवाद यंत्र आणि ट्रॅकिंग बीकन इतकेच मर्यादित साहित्य होते, असेही ब्राव्होने सांगितले.

इराणी सैन्यापासून ब्राव्होने कसा केला बचाव?

सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ब्राव्हो पुढे म्हणाला की, इराणी लष्करातील जवान माझ्या शोधासाठी येत असल्याचा आवाज मला आला. त्यांच्या हाती न लागण्यासाठी मी एका उंच कठड्यावर चढलो आणि जीव मुठीत धरून कपारीत लपून बसलो. इराणी सैन्याच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट प्रेरणा देत होती? असा प्रश्न ब्राव्होला विचारण्यात आला. त्यावर इराणच्या सरकारी माध्यमांवर युद्धकैदी म्हणून झळकण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, असे त्याने सांगितले. बीबीसीच्या वृत्तानुसार, दुसरा वैमानिक ‘अल्फा’ याला विमान कोसळल्यानंतर अवघ्या सहा तासांच्या आत अमेरिकन सैन्याने सुखरूप शोधून काढले होते; पण ब्राव्होला मात्र अमेरिकन बचाव पथक येईपर्यंत पुढील तब्बल दोन दिवस शत्रूच्याच हद्दीत जीव मुठीत धरून राहावे लागले. या कालावधीत त्याच्याकडे अन्नाचा एक कणही नव्हता. अखेर तब्बल ५० तासांच्या संघर्षानंतर अमेरिकन बचाव पथकाने त्याची सुटका केली.

अखेर अमेरिकेचे सैन्य इराणच्या भूमीवर उतरले

इराणच्या भूमीवर कोसळल्यानंतरच्या पहिल्याच रात्री आपण अमेरिकेतील आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो होते, असे ब्राव्होने सांगितले. मला लपण्यासाठी सुरक्षित जागा सापडल्यानंतर त्याने लगेचच संपर्कासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या संकटातून सुरक्षितपणे वाचण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत होतो. सुरुवातीला माझ्या सहकाऱ्यांना मी पाठवलेला संदेश बचाव पथकाला जाळ्यात अडकवण्यासाठी इराणी सैन्याने रचलेला सापळा तर नाही ना अशी भीती वाटत होती; पण त्यानंतर मला काही कोडवर्ड विचारल्यानंतर त्यांच्या मनाचे समाधान झाले, असेही ब्राव्हो म्हणाला. विमानातून बाहेर उडी घेतल्यानंतर हे दोन्ही वैमानिक एकमेकांपासून दूर अंतरावर फेकले गेले होते. अल्फा हा ब्राव्होपासून सुमारे पाच मैल अंतरावर होता. अमेरिकन बचाव पथकाने दिवसा ढवळ्या एका अत्यंत धोकादायक मोहिमेत अल्फाची सुखरूप सुटका केली.

ब्राव्होला वाचवण्यासाठी अमेरिकेची धाडसी मोहीम

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या मोहिमेचे वर्णन तीव्र संघर्षाची कारवाई म्हणून केले होते. त्यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेगसेथ म्हणाले होते की, आमच्या बचाव पथकावर जाताना आणि परत येतानाही दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता. तरीही त्यांनी अल्फाला सुरक्षित बाहेर काढले; पण त्या पहिल्या मोहिमेत ब्राव्हो सापडू शकला नाही. त्यामुळेच आम्ही शोधमोहीम पुढे सुरू ठेवण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला. ब्राव्होला आणखी २४ तास इराणमध्येच राहू द्यावे लागेल आणि नंतर त्याचा शोध घेतला जाईल, असे आम्ही ठरवले होते. इराणने आमचे विमान पाडल्याची बातमी आम्हाला मध्यरात्री कळाली होती. तेव्हा वैमानिक जिवंत असोत वा नसोत त्यांना परत आणणारच असा निर्धार आम्ही केला होता. यादरम्यान अमेरिकेचे ९० हून अधिक सैनिक ब्राव्हो आणि अल्फाच्या शोधासाठी थेट इराणच्या भूमीत उतरले होते. तब्बल ४६ वर्षांनंतर अमेरिकन सैन्याने इराणच्या हद्दीत थेट कारवाई केली होती.

अमेरिकन बचाव पथकाला कोणते अडथळे आले?

या मोहिमेदरम्यान अमेरिकन दलांना मोठ्या अडचणींचाही सामना करावा लागला. ब्राव्होला बाहेर काढण्यासाठी गेलेली बचाव पथकाची विमाने वाळवंटात अडकली आणि खराब झाली. इराणी सैन्याच्या हाती लागू नयेत म्हणून त्यांनी स्वत:हूनच ती नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. याव्यतिरिक्त प्रगत तंत्रज्ञान शत्रूच्या हाती पडू नये यासाठी अनेक ‘लिटल बर्ड’ हेलिकॉप्टर्सही उद्ध्वस्त करण्यात आली, असे सीबीएस न्यूजच्या वृत्तात नमूद आहे. अखेर ब्राव्होचा शोध एका ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आला आणि नंतर त्याच्या सुटकेसाठी दोन मोठ्या विमानांनी उड्डाण केले. अमेरिकन संरक्षण दलाने सार्वजनिक केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या हवाई दलातील कमांडो डोंगराळ भागात ब्राव्होकडे जाताना स्पष्टपणे दिसून येतात.

५० तासांनंतर सुटका होताच ब्राव्होचा पत्नीला फोन

इराणच्या पर्वतरांगांमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ५० तासांनी ब्राव्होचा शोध घेऊन त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. त्या क्षणाची आठवण सांगताना ब्राव्हो म्हणाला की, पर्वताच्या कड्यावर जेव्हा मी बचाव पथकाला माझ्या दिशेने येताना पाहिले, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. त्यांनी माझ्यासाठी जे काही केले, त्याबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याकडे कोणताही शब्द नाही. सहकाऱ्यांनी माझी सुटका करताच मी पहिला फोन माझ्या पत्नीला केला. आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मी तिला सांगितले. या संपूर्ण कठीण काळात तिने दाखवलेल्या धैर्याबद्दल मला तिचा अभिमान वाटतो, असे सांगताना ब्राव्हो भावुक झाला होता. आपल्या सैनिकाला शत्रूच्या भूमीत मागे सोडायचे नाही हे दिलेले वचन पाळण्यासाठी अमेरिका कोणत्या थराला जाऊ शकते याचे हे इतिहासात नोंदवले जाणारे एक उदाहरण आहे, असेही त्याने सांगितले.