अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (२५ एप्रिल) जीवघेणा हल्ला झाला. व्हाईट हाऊसमधील माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षितस्थळी हलवले. कोल ॲलन असे हल्लेखोराचे नाव असून त्याने शॉटगनचा वापर करून गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांचे कवच भेदून तो थेट कार्यक्रमस्थळी आत घुसला. त्याने केलेल्या गोळीबारात एक सिक्रेट सर्व्हिस एजंट जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. सिक्रेट सर्व्हिस एजंटने जलद व साहसी काम केल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

सिक्रेट सर्व्हिसची स्थापना का झाली होती?

अमेरिकेत मागील काही महिन्यांपासून राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: डोनाल्ड ट्रम्प यांना धोका निर्माण झाला आहे. दोन वर्षांतच ट्रम्प यांच्यावर हा दुसरा जीवघेणा हल्ला झाला आहे. याआधी ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत भाषण देताना गोळीबार झाला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. त्या घटनेनंतर यूएस सिक्रेट सर्व्हिसचे संचालक किंबर्ले चिएटल यांनी राजीनामा दिला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने सिक्रेट सर्व्हिस एजन्सीकडे आहे. दरम्यान, अमेरिकेत नकली नोटा बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी, त्यांना शोधून काढण्यासाठी सिक्रेट सर्व्हिस एजन्सीची स्थापना करण्यात आली होती. डोळ्यांवर गॉगल (सनग्लासेस) लावून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कारच्या आजूबाजूला उभे राहून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेणारे, अशी आज सिक्रेट सर्व्हिस एजंटची ओळख झाली आहे. या एजंट्सकडे दिवसेंदिवस आव्हानात्मक कामांची जबाबदारी सोपवली जात आहे.

३६ वर्षांतच अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांची हत्या, सिक्रेट सर्व्हिसच्या कामाचे स्वरूप कसे बदलले?

अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिस यंत्रणेची स्थापना १८६५ साली झाली. ही आज जगातील सर्वात जूनी फेडरल तपास यंत्रणा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन आणि जेम्स ए. गारफिल्ड यांची राष्ट्राध्यक्ष पदावर असताना हत्या झाली होती. १८६५ मध्ये लिंकन, तर १८८१ मध्ये गारफिल्ड यांची हत्या झाली. त्यानंतर विलियम मॅककिनले यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना हत्या झाली. तीन राष्ट्राध्यक्षांची हत्या झाल्यानंतर यूएस सिक्रेट सर्व्हिस एंजट्सच्या कामाचे स्वरूप बदलण्यात आले.

अमेरिकन सरकारच्या दस्तावेजांमध्ये नमूद केले आहे की, “एका पिढीपेक्षा थोड्या जास्त कालावधीत झालेली राष्ट्राध्यक्षांची ही तिसरी हत्या होती. लिंकन यांच्या हत्येला केवळ ३६ वर्षे उलटली होती. या घटनेने अमेरिकेला हादरवून सोडले. राष्ट्राध्यक्षपदाचे वेगळेपण तसेच या पदावर असलेल्या व्यक्तीला असणारा धोका याबद्दल इशारा मिळाला आहे.” दरम्यान, भारतात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एका वर्षाने म्हणजेच १९८५ मध्ये ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ (SPG) ची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा कवच पुरवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. ही संस्था इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि स्थानिक पोलीस दलांच्या सहकार्याने काम करते.

यूएस सिक्रेट सर्व्हिस एजंट्सकडून कोणाला सुरक्षा पुरवली जाते?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची पूर्णवेळ जबाबदारी ‘सिक्रेट सर्व्हिस’ने १९०२ मध्ये स्वीकारली. ही संस्था ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’च्या अंतर्गत काम करते. त्यांच्या वेबसाइटनुसार या संस्थेत “अंदाजे ३,२०० विशेष एजंट, १,३०० युनिफॉर्म डिव्हिजन अधिकारी आणि २,००० पेक्षा जास्त इतर तांत्रिक, व्यावसायिक आणि प्रशासकीय सहाय्यक कर्मचारी कार्यरत आहेत.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांव्यतिरिक्त सिक्रेट सर्व्हिसचे एजंट्स उपराष्ट्राध्यक्ष, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष, त्यांची कुटुंबे, माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी (जोपर्यंत त्या दुसरे लग्न करत नाहीत तोपर्यंत), माजी राष्ट्राध्यक्षांची १६ वर्षांखालील मुले आणि अमेरिकेला भेट देणारे परदेशी राष्ट्रप्रमुख व त्यांच्या पत्नी यांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम करतात. १९६८ च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेले रॉबर्ट केनेडी यांच्या हत्येनंतर निवडणुकीतील उमेदवारांनाही सिक्रेट सर्व्हिसकडून सुरक्षा पुरवली जाते. रॉबर्ट केनेडी यांचे बंधू आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची डलासमध्ये हत्या झाली होती. या घटनेनंतर पाच वर्षांच्या आतच रॉबर्ट केनेडी यांचीही हत्या झाली.

‘सिक्रेट सर्व्हिस’च्या एजंटला कोणते अधिकार?

‘सिक्रेट सर्व्हिस’च्या एजंटला शस्त्रास्त्रे बाळगण्याचे अधिकार आहेत. तसेच कोणत्याही गुन्ह्यासाठी किंवा गंभीर गुन्ह्यासाठी वॉरंटशिवाय ते एखाद्याला अटक करू शकतात. सिक्रेट सर्व्हिसच्या वेबसाइटनुसार, सुरक्षा पुरवलेल्या व्यक्तींवरील संभाव्य धोके ओळखण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसला अत्यंत बारकाईने पूर्वतयारी करावी लागते. सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सचे सुरक्षेसंबंधित कामकाज खूप आधीच सुरू होते. त्यांच्या कामाबाबतीत कमालीची गुप्तता बाळगली जाते. मोठ्या कार्यक्रमांपूर्वी सिक्रेट सर्व्हिसचे एजंट्स बॉम्ब किंवा इतर धोके टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळाची तपासणी करतात. उपस्थितांसाठी मेटल डिटेक्टर्स आणि बॅरिकेड्स लावले जातात. २०२४ च्या ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये सिक्रेट सर्व्हिसच्या ‘काउंटर-स्नायपर’ आणि ‘काउंटर-असॉल्ट’ पथकांचे जवान तैनात करण्यात आले होते. ‘काउंटर-स्नायपर’ पथक लांब पल्ल्याच्या दुर्बिणी आणि स्नायपर रायफल्सचा वापर करतात, तर ‘काउंटर-असॉल्ट’ पथक धोके नष्ट करण्याचे काम करते. या पथकातील जवान संबंधित व्यक्तीभोवती सुरक्षा कवच तयार करून त्या व्यक्तिला सुरक्षितपणे तिथून बाहेर नेतात.

२०२४ पासून सिक्रेट सर्व्हिसमध्ये कोणते बदल झाले?

सिक्रेट सर्व्हिसचे माजी संचालक चिएटल यांनी २०२४ मधील ट्रम्प यांच्या रॅलीतील गोळीबाराच्या घटनेला “सिक्रेट सर्व्हिसचे दहा वर्षांतील सर्वात मोठे अपयश” असल्याचे म्हटले होते. यानंतर सिक्रेट सर्व्हिसमधील त्रुटी तपासण्यात आल्या. गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीत अडथळे, सुरक्षा यंत्रणांबरोबर व्यवस्थित संवाद नसणे आणि सिक्रेट सर्व्हिस एजंट्सकडे अपुरी संसाधने या गोष्टी समोर आल्या. यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह टास्क फोर्सच्या काही शिफारसी कालांतराने लागू करण्यात आल्या. त्यात ‘धोक्यावर आधारित कार्यपद्धती’साठी धोरण तयार करणे आणि ऑपरेशन्समध्ये इतर यंत्रणांना सामावून घेणे यांचा समावेश होता.