अमेरिकेतील टेनसी राज्यात बुधवारी एका महिला कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार होती. तब्बल २०० वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला मृत्युदंड दिला जाणार असल्याने सगळ्यांचेच लक्ष या घडामोडीकडे लागून होते. १९९५ मध्ये आपल्या वर्गमैत्रिणीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ५० वर्षीय क्रिस्टा पाईक या महिलेला विषारी इंजेक्शन दिले जाणार होते; पण या शिक्षेच्या अंमलबजावणीपूर्वीच प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. अगदी शेवटच्या क्षणी अपीलीय न्यायालयाने क्रिस्टाच्या शिक्षेला तात्पुरती स्थिगिती दिली. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फिरवला आणि तिच्या मृत्युदंडाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर टेनेसी येथील प्रशासनाने क्रिस्टाला प्राणघातक इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे, दोन डोस दिल्यानंतरही या महिलेला काहीही झाले नाही आणि ती जिवंत राहिली.

क्रिस्टाने मैत्रिणीची केली होती क्रूर हत्या

१९९६ मध्ये क्रिस्टाने तिची वर्गमैत्रिण कोलीम स्लेमर हिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणात क्रिस्टाला तिच्या प्रियकरानेही मदत केली होती. दोघांनी मिळून कॉलीनवर चाकूने अनेक वार केले होते. तसेच तिच्या छातीवर अमेरिकेत सैतानी मानले जाणारे पेंटाग्रामचे चिन्ह कोरले होते. कॉलीनच्या हत्येनंतर क्रिस्टाने तिच्या कवटीचा एक तुकडा स्वत:जवळ ठेवला होता. ही क्रूर घटना उघडकीस येताच संपूर्ण अमेरिकेत एकच खळबळ उडाली होती. कॉलीनच्या छातीवर पेंटाग्रामचे चिन्ह कोरले गेल्याचे पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी क्रिस्टा आणि तिच्या प्रियकराला अटक केली. तपासीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, क्रिस्टाने आपल्या मैत्रिणीची शेवटची आठवण म्हणून कोलीनच्या कवटीचा तुकडा आपल्या बॅगेत ठेवला होता आणि ती महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना ही बाब अभिमानाने सांगत होती. या क्रूर हत्येप्रकरणी न्यायालयाने क्रिस्टाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, तर तिचा १७ वर्षीय प्रियकर टॅडारिल शिप याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

क्रिस्टाला शिक्षेपासून वाचवण्यासाठी वकिलांचे प्रयत्न

धक्कादायक बाब म्हणजे, क्रिस्टाने आपला गुन्हा कधीच लपवून ठेवला नाही. आपणच कॉलीनची अत्यंत क्रूरतेने हत्या केल्याचे ती वारंवार सांगत होती. तसेच मी दररोज मृत्युदंडाचा अनुभव घेत असते. ३० सप्टेंबर २०२६ नंतर या जगातील माझ्या नरकयातना संपतील, असे वक्तव्य तिने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केले होते. दुसऱ्या बाजूला क्रिस्टाच्या वकिलांनी तिला शिक्षेपासून वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बालपणीच झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर क्रिस्टा मानसिक तणावात होती. तिला बायपोलर डिसऑर्डर आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारखे मानसिक आजार जडले होते. त्यामुळे हत्येच्या वेळी क्रिस्टाच्या मानसिक स्थितीवर याचा मोठा परिणाम झाला होता, असा दावा त्यांनी न्यायालयासमोर केला होता. तरीही न्यायमूर्तींनी या बाबीकडे दुर्लक्ष करून क्रिस्टाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली, अशी खंतही त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलून दाखवली होती. दुसरीकडे- मृत कॉलीनच्या कुटुंबाने मात्र क्रिस्टाच्या फाशीच्या शिक्षेचे ठामपणे समर्थन केले होते. आमच्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या करणाऱ्या आरोपीला मृत्युदंड ठोठावण्यात आला. त्याबद्दल आम्ही न्यायालयाचे मनापासून आभार मानतो, असे त्यांनी म्हटले होते.

क्रिस्टाला मृत्युदंड देण्याआधी नाट्यमय घडामोडी

३० सप्टेंबर रोजी टेनसी येथील एका तुरुंगात क्रिस्टाला मृत्युदंड दिला जाणार होता. मात्र, शिक्षेच्या अंमलबजावणीला अवघा एक तास शिल्लक असताना एका अपीलीय न्यायालयाने या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली. क्रिस्टाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यांचा नव्याने आढावा घेणे गरजेचे असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच दोन्ही बाजूंचे युक्तिवाद समजून घेण्यासाठी आणि प्रकरणाचा पुराव्यांच्या आधारे योग्य निपटारा करण्यासाठी शिक्षेला स्थिगिती आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी राज्यातील ॲटर्नी जनरलच्या कार्यालयाने या निर्णयाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. क्रिस्टाचे वकील केवळ कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे अशा क्लृप्त्यांना थारा न देता आरोपीची फाशीची प्रक्रिया वेळेतच पूर्ण झाली पाहिजे, असा आक्रमक युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अपीलीय न्यायालयाची शिक्षेची स्थगिती तत्काळ रद्द ठरवली आणि क्रिस्टाला मृत्युदंड देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

दोनदा प्राणघातक इंजेक्शन देऊनही गेला नाही जीव

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कारागृह प्रशासने क्रिस्टाला मृत्युदंड देण्याची प्रक्रिया सुरू केली. स्थानिक वेळेनुसार ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:४६ वाजता तिला ‘Pentobarbital’ या प्राणघातक औषधाचा पहिला डोस देण्यात आला. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इंक्जेशन देण्यापूर्वी क्रिस्टा अगदी शांत होती. मी आयुष्यभर जसे प्रेमाने जगले आणि आता प्रेमानेच जग सोडून जात आहे, असे तिचे शेवटचे शब्द होते. मात्र, पहिल्या डोसनंतर क्रिस्टा बेशुद्ध पडण्याऐवजी जागीच राहिली. काही वेळाने ती अचानक बेडवरून उठली आणि आपल्या हातात कळ येत असल्याचे तिने कारागृहांच्या अधिकाऱ्यांना सांगितले. माझा हात फुटून बाहेर येतोय की काय, अशा भयंकर वेदना होत असल्याचे क्रिस्टा म्हणत होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी रात्री ८:२६ वाजता तिला ‘Pentobarbital’ औषधाचा दुसरा डोस दिला. तरीही क्रिस्टाला काहीच झाले नाही. त्याउलट मृत्युदंडाच्या खोलीत तिचा घोरण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकून येत होता. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खरेतर विषारी इंजेक्शन दिल्यानंतर क्रिस्टाचा मृत्यू व्हायला हवा होता; पण तसे अजिबात घडले नाही.

क्रिस्टा रुग्णालयात दाखल; अमेरिकेत खळबळ

मृत्युदंडाची प्रक्रिया फसल्यानंतर क्रिस्टाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती कशी आहे याची कोणतीही माहिती माध्यमांना देण्यात आली नाही. यादरम्यान क्रिस्टाच्या वकिलांनी तिच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला तत्काळ स्थगिती मिळावी यासाठी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात पुर्नयाचिका दाखल केल्याची माहिती आहे. या घडामोडीनंतर टेनसी राज्यात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवले आहे. क्रिस्टाला देण्यात आलेले प्राणघातक इंजेक्शन कालबाह्य झाले असावे आणि म्हणूनच तिचा मृत्यू झाला नसावा, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या गोंधळानंतर टेनेसीचे राज्यपाल बिल ली यांनी अधिकाऱ्यांना या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, चालू वर्षात नियोजित असलेल्या इतर सर्व कैद्यांच्या मृत्युदंडांना स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टेनेसी राज्यात मृत्युदंडाची प्रक्रिया फसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मे महिन्यातही वैद्यकीय पथकाला योग्य नस न सापडल्यामुळे एका कैद्याची नियोजित फाशी ऐनवेळी रद्द करावी लागली होती.