Cervical Cancer HPV Vaccination: महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना एचपीव्ही लस देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे. पुढील तीन महिन्यांत हे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु, मुलींसह मुलांचेदेखील एचपीव्ही लसीकरण करणे आवश्यक असल्याचे कर्करोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. घसा व तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण मुलांमध्ये वाढले आहे. दर तीनपैकी एका पुरूषाला एचपीव्ही विषाणूंचा संसर्ग झालेला असतो, असे एका अभ्यास अहवालातून नुकतेच समोर आले. मुलांचे लसीकरण न केल्यास एचपीव्ही विषाणूंचा संसर्ग त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मुलींना होण्याचा धोका अधिक आहे. गर्भाशयमुखाचा कर्करोग टाळण्यासाठी मुलींचे होत असलेले एचपीव्ही लसीकरण मुलांसाठीही का महत्वाचे आहे, ते जाणून घेऊयात.ॉ

एचपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्यास कोणता धोका?

गर्भाशयमुख कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी देशभरातील १४ वर्षांच्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण केले जात आहे. मुलांचे देखील एचपीव्ही लसीकरण करणे आवश्यक असल्याचे कर्करोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ह्युमन पेपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) या विषाणूचा संसर्ग मुलींप्रमाणेच मुलांमध्येही होतो. या विषाणूमुळे जननेंद्रियावर चामखीळ (मस्से) किंवा गुठळ्या येतात. तसेच लिंगाचा, गुदद्वाराचा आणि घसा व तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. महिलांना होणाऱ्या गर्भाशयमुख कर्करोगासाठी ९९ टक्के एचपीव्ही विषाणू जबाबदार असतात. २०२६ च्या सुरूवातीला ऑस्ट्रेलिया, यूएस, यूके, कॅनडा आणि जर्मनी या देशांनी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

“भारतात गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. महिला व पुरूष दोघांनाही या कर्करोगासाठी कारण ठरणाऱ्या एचपीव्ही विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. पुरूषांना एचपीव्ही विषाणूचा संसर्ग झाला तरी त्याचे निदान होत नाही. ५० वर्षांनंतर या विषाणूमुळे पुरूषांना घशाचा कर्करोग होतो”, अशी माहिती बंगळुरूतील नारायण हेल्थ सिटी रूग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉ. रोहित रघुनाथ रानडे यांनी दिली. देशपातळीवर सरकारकडून जसे मुलींचे मोफत एचपीव्ही लसीकरण केले जात आहे, तसेच लसीकरण मुलांचेही करण्यात यावे, असे इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने सरकारला सुचवले होते.

पुरूषांमध्ये घशाचा कर्करोग होण्याचे प्रमाण का वाढले आहे?

मुलांना गर्भाशय नसते म्हणून त्यांना एचपीव्ही विषाणूचा संसर्ग होत नाही, असा एक गैरसमज समाजात आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थ मासिकात एक अहवाल प्रकाशित झाला होता. ३० हजार पुरूषांची अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली होती. त्यात प्रत्येक तीन पुरूषांपैकी एका पुरूषात एचपीव्ही विषाणू असल्याचे आढळून आले. तसेच प्रत्येक पाच पुरूषांपैकी एका पुरूषात कर्करोगासाठी कारण ठरणारे एचपीव्ही विषाणूचे मोठ्या प्रमाणात आढळून आले. एचपीव्ही विषाणूमुळे पुरूषांमध्ये घसा व तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण काही देशांमध्ये खूप वाढले आहे. मुलींना होणाऱ्या गर्भाशयमुख कर्करोगापेक्षा मुलांमध्ये घशाच्या कर्करोगाचे प्रमाण काही देशांमध्ये अधिक आहे.

मुलांचेही ‘एचपीव्ही’ लसीकरण करणे महत्वाचे का आहे?

एचपीव्ही विषाणूचा संसर्ग असलेल्या पुरूषाने त्याच्या महिला पार्टनरबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केले, तर महिलेला गर्भाशयमुखाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे पुरूषांनी त्यांना एचपीव्ही संसर्ग आहे की नाही, याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. पुरूषांमध्ये एचपीव्ही विषाणू असल्यास त्याचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही. वयाच्या पन्नाशी नंतर त्यांना घशाचा कर्करोग झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पुरूषांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यास त्यांच्यासह त्यांच्या पार्टनरचे देखील आरोग्य सुरक्षित राहिल, असे कर्करोगतज्ज्ञांचे मत आहे.

एचपीव्ही विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुलींचे लसीकरण केले जात आहे. त्याचप्रमाणे मुलांचेही लसीकरण आवश्यक आहे, फक्त मुलींचे लसीकरण केले, तर मुलांमध्ये एचपीव्ही संसर्ग वाढेल. जर मुली व मुले या दोघांचेही लसीकरण केले तर एचपीव्हीचा संसर्ग होण्याचा धोका पूर्णपणे टाळता येईल, असे मत कर्करोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. युनायटेड किंग्डममध्ये २०१९ मध्ये १२-१३ वर्षांच्या मुलांनाही एचपीव्ही लस देण्यात आली. तसेच ऑस्ट्रेलियात देखील मुले व मुलींचे एचपीव्ही लसीकरण करण्यात आले. २०३५ पर्यंत ऑस्ट्रेलिया गर्भाशयमुख कर्करोगमुक्त देश बनण्याच्या मार्गावर आहे.

लसीकरणाचे योग्य वय कोणते ?

नऊ ते चौदा वर्षांच्या मुला-मुलींना एचपीव्ही लस देणे फायदेशीर ठरेल, असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात येते. या वयात त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. ते एचपीव्ही विषाणूंच्या संपर्कात येण्याआधीच त्यांचे लसीकरण झाले तर त्याचा परिणाम आयुष्यभर दिसून येतो. त्यांना एचपीव्ही विषाणू संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते. तसेच २६ वर्षांपर्यंत पुरूषांना एचपीव्ही लस देता येऊ शकते. ४६ वर्षांपर्यंतच्या पुरूषांना एचपीव्ही लसीकरण डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे योग्य मानले जाते. एचपीव्ही लसीकरणात गार्डसील – ४ ही लस दिली जाते. या लशीमुळे गर्भाशयमुख कर्करोगाचा धोका ९३ ते १०० टक्के टाळता येतो. यात गार्डसील – ६, गार्डसील – ११, गार्डसील १६, गार्डसील – १८ असे विविध स्ट्रेन्स आहेत. ४५ वर्षांपर्यंतच्या पुरूषांना गार्डसील -९ देता येते.

गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून बचाव कसा करावा ?

  • HPV लस या विषाणूपासून सर्वोत्तम संरक्षण.
  • दर ३-५ वर्षांनी पॅप स्मिअर आणि HPV टेस्ट.
  • सुरक्षित लैंगिक संबंधांचे पालन.
  • शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे.
  • कोणतेही अनियमित बदल दिसले की तात्काळ तपासणी.