तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’च्या दुनियेत सातत्याने निर्माण होणारे नवनवीन टूल्स आणि एजंट यांचे एकत्रित व्यासपीठ असलेल्या ‘हगिंग फेस’ या ‘हब’ने १६ जुलै रोजी आपली यंत्रणा कोणा शक्तिशाली ‘एआय’ एजंटने हॅक केल्याचे जाहीर केले. ‘हगिंग फेस’ने आपल्या प्लॅटफॉर्मभोवती उभे केलेले भक्कम सुरक्षा कवच भेदून ही घुसखोरी झाली. दोन दिवसांत १७ हजार आज्ञावली वापरून आणि कृती (ॲक्शन) करून आपली यंत्रणा भेदण्यात आल्याचे ‘हगिंग फेस’ने म्हटले. त्यामुळे हे करू शकणारे इतके प्रगत ‘एआय’ कुणाचे, यावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चर्चा सुरू झाली. पोलीस तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपासही सुरू झाला. शत्रू राष्ट्र किंवा राष्ट्रविरोधी शक्तींकडून हा हल्ला झाला असावा, अशी विश्लेषणे रंगू लागली.

आठ दिवसांनंतर उलगडा

समाजमाध्यमे, तंत्रज्ञानजगतातील ब्लॉग, विश्लेषक वार्तांकने यावर ‘हगिंग फेस’च्या हॅकिंगबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना २४ जुलै रोजी ‘ओपनएआय’ने या कृत्याची जबाबदारी घेतली. आपल्या अतिप्रगत अशा दोन मॉडेल्सनी हा हल्ला केल्याचे ‘ओपनएआय’ने जाहीर केले. हॅकिंग रोखण्यासाठी तयार केलेल्या या एआय एजंटची चाचणी सुरू असताना हा प्रकार घडल्याचे ‘ओपनएआय’ने स्पष्ट केले. तसेच ‘हगिंग फेस’बरोबर संयुक्तपणे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील त्रुटी दूर करू, असेही ओपनएआयने जाहीर केले. पण प्रकरण येथेच थांबले नाही.

नकळत निसटलेला ‘एजंट’

‘ओपनएआय’च्या खुलाशानंतर या घटनेवर पडदा पडला असता. मात्र, ‘हगिंग फेस’च्या प्लॅटफॉर्मवर हा एजंट कसा शिरला, याचा घटनाक्रम थक्क करणारा आहे. जगभरातील कंपन्या नवनवीन एआय टूल्स आणि एजंटची निर्मिती करताना त्याच्या चाचण्या घेत असतात. एखाद्या औषधाच्या ‘क्लिनिकल ट्रायल’ होतात, तसाच हा प्रकार. ‘ओपनएआय’ने या नव्या एजंटची ‘सँडबॉक्स’मध्ये चाचणी चालवली होती. ‘सँडबॉक्स’ ही अशा चाचण्यांसाठी आखून दिलेली एक चौकट आहे. या चौकटीच्या बाहेर ‘एजंट’ने जाऊ नये, अशी रचना त्यात केलेली असते. मात्र, ‘ओपनएआय’चा एजंट ‘सँडबॉक्स’मधून निसटला. आणि त्याने ‘हगिंग फेस’च्या यंत्रणेत शिरकाव केला. हा प्रकार चार दिवसांनी ‘ओपनएआय’च्या निदर्शनास आला तर, याच एजंटनी सार्वजनिक पातळीवर उपलब्ध असलेल्या आणखी चार यंत्रणांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे गुरुवारी (३० जुलै) उघड झाले.

घटनेचे गांभीर्य काय?

‘ओपनएआय’च्या या ‘एजंट’ने केलेली ही घुसखोरी जगातील एआयची पहिली स्वयंचलित घुसखोरी आहे. हे करत असताना संबंधित एजंटने दाखवलेली ‘चलाखी’ चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे प्रचंड यांत्रिक वेगाने हा एजंट ‘हगिंग फेस’च्या सुरक्षाभिंती भेदण्यासाठी धडक देत असताना अधूनमधून काही क्षुल्लक चुकाही करत होता. त्यामुळे ‘हगिंग फेस’ची सुरक्षायंत्रणा संभ्रमावस्थेत सापडली. त्याचा फायदा घेऊन हा एजंट अधिक आत शिरला. त्याने प्लॅटफॉर्मवरील विदाशी कोणतीही छेडछाड केली नाही. मात्र, कोणालाही थांगपत्ता लागू न देता अतीव वेगाने आणि चातुर्याने ही घुसखोरी करण्यात आली. सायबर घुसखोरीचा हा प्रकार गंभीर आहे. कोणताही सायबर हल्ला हा विशिष्ट उद्देशाने करण्यात आलेला असतो. ते उद्दिष्ट साध्य झाले की तो निवळतो. पण या प्रकरणात ‘एआय एजंट’ला कोणतेही लक्ष्य निश्चित करून देण्यात आले नव्हते. तरीही त्या एजंटने ‘हगिंग फेस’ची यंत्रणा भेदली. सामान्यपणे ज्याकडे गुन्हेगारी कृत्य म्हणून पाहिले जाऊ शकते, ती कृती ‘एआय एजंट’ने कोणत्याही वाईट हेतूविना केली.

‘एआय’ कंपन्या आणि सायबर सुरक्षेसमोर आव्हान

‘हगिंग फेस’वरील हल्ल्यानंतर दोन आव्हाने उभी राहिली आहेत. एक म्हणजे, ‘एआय एजंट’ निर्माण करणार्‍या कंपन्यांना त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचे तंत्रही विकसित करावे लागेल. आपल्या एजंटच्या घुसखोरीचा छडा ‘ओपनएआय’ला चार दिवसांनी लागला. यातून या एजंटवर निगराणी केवळ संगणकीय यंत्रणेद्वारे करणे धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले. दुसरे आव्हान सायबर सुरक्षेसमोर आहे. त्यांना अशा विनाकारण आपल्या यंत्रणेत घुसखोरी करू पाहणार्‍या ‘निरुपद्रवी’ एआय साधनांचा बंदोबस्त करण्याचे कसब आत्मसात करावे लागेल. ‘एआय’ने तंत्रज्ञानाचा मोठा अवकाश व्यापायला घेतला असताना त्याला आवरण्याचा नाही तर सावरण्याचा प्रयत्न या क्षेत्रातूनच व्हावा लागेल.