Human Consciousness Neuroscience Research: ‘मी आहे’, ‘मला जाणवते आहे’, ‘मला वेदना होत आहेत’ किंवा ‘मी सुखी आहे’ ही अनुभूती म्हणजेच जाणीव (Consciousness). मानवी अस्तित्वाचा हा सर्वात मोठा चमत्कार आहे. गेल्या अनेक दशकांपासून विज्ञानाचा असा ठाम समज होता की, माणसाची विचार करण्याची क्षमता, भाषा आणि तर्क हे सर्व मेंदूच्या सर्वात वरच्या, म्हणजेच ‘निओकॉर्टेक्स’ (Neocortex) या प्रगत भागामुळे शक्य होते. त्यामुळे जाणीवेचा उगमही याच भागात होतो, असे मानले गेले.
मेंदूमध्ये खोलवर रुजलेली जाणीव

परंतु, आधुनिक न्यूरोसायन्स (Neuroscience) आता एका थक्क करणाऱ्या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. जाणीवेची पाळेमुळे केवळ या वरच्या प्रगत मेंदूत नसून, ती उत्क्रांतीच्या लाखो वर्षांपूर्वी विकसित झालेल्या मेंदूच्या अत्यंत खोल आणि ‘आदिम’ भागात (Subcortical Structure) दडलेली आहेत. याचाच अर्थ असा की, जाणीव ही केवळ मानवाची मक्तेदारी नसून निसर्गातील एक अतिशय जुनी आणि व्यापक प्रक्रिया आहे.

जाणीव म्हणजे नक्की काय? (कॉर्टेक्सचा पारंपरिक युक्तिवाद)

विज्ञान आणि तत्त्वज्ञानात जाणीवेची व्याख्या करणे सर्वात कठीण मानले जाते. जाणीव म्हणजे केवळ झोपेतून ‘जागे असणे’ नव्हे, तर जागृत अवस्थेत ‘अनुभव घेता येणे’ होय. आपण एखादे गाणे ऐकतो, तेव्हा कान फक्त आवाज ऐकत नाहीत, तर मन त्या संगीताचा आनंद घेते. आपल्याला सुई टोचते, तेव्हा केवळ शरीराला जखम होत नाही, तर ‘मला वेदना होत आहेत’ अशी अंतर्गत जाणीव होते.

पारंपरिक विज्ञानाने नेहमीच निओकॉर्टेक्सला झुकते माप दिले. याचे कारण असे की, माणसाचे नियोजन, भाषा, गणिती तर्क आणि आत्मभान (Self-awareness) या सर्व उच्च पातळीच्या मानसिक क्रिया याच भागात घडतात. परंतु, २००७ साली शास्त्रज्ञ ब्यॉर्न मर्कर (Björn Merker) यांनी आपल्या एका महत्त्वपूर्ण शोधनिबंधात या सिद्धांताला आव्हान दिले. त्यांनी ‘कॉर्टेक्स नसलेली जाणीव’ (Consciousness without a cerebral cortex) ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते, जाणीवेचा प्राथमिक आणि सर्वात मूळ पाया मेंदूच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या ब्रेनस्टेम (Brainstem), थॅलॅमस (Thalamus) आणि मेसोडायन्सेफॅलिक प्रणाली या खोल भागांमध्ये असतो.

brain Human consciousness
brain consciousness | मेंदूमध्ये असते जाणीवेचे केंद्र (Image- Gemini)

‘लिझार्ड ब्रेन’चे (सबकॉर्टेक्स) नवे रूप

लोकप्रिय विज्ञानात (Pop Science) ज्याला ‘लिझार्ड ब्रेन’ (सरड्याचा मेंदू) किंवा शास्त्रीय भाषेत ‘सबकॉर्टेक्स’ (Subcortical System) म्हटले जाते, त्याकडे आधी केवळ एक ‘यंत्र’ म्हणून पाहिले जात होते. या भागात ब्रेनस्टेम, हायपोथॅलॅमस, बेसल गँग्लिया आणि अमिग्डला या रचना येतात.

१९६० च्या दशकात पॉल मॅक्लीन यांनी ‘ट्राय्यून ब्रेन’ (Triune Brain) सिद्धांत मांडला. त्यांनी सांगितले की, माणसाचा मेंदू तीन स्तरांमध्ये विकसित झाला.

१. सरड्याचा मेंदू: जो फक्त भूक, तहान, भीती आणि जगणे (Survival) नियंत्रित करतो.
२. स्तनधारी प्राण्यांचा मेंदू (Limbic System): जो भावना आणि आठवणी हाताळतो.
३. प्रगत मानवी मेंदू (Neocortex): जो तार्किक विचार करतो.

आजचे वैज्ञानिक या सिद्धांताला तंतोतंत खरे मानत नसले, तरी यातील ‘सरड्याच्या मेंदू’चे रूपक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पूर्वी शास्त्रज्ञ म्हणायचे की, सबकॉर्टिकल भाग हा टीव्हीला मिळणाऱ्या विजेसारखा (Electricity) आहे आणि निओकॉर्टेक्स म्हणजे टीव्हीचा स्क्रीन, त्यावर चित्र दिसते. वीज नसेल तर टीव्ही चालणारच नाही (म्हणजे माणूस कोमात जाईल किंवा मृत्यू होईल). पण चित्र कुठे तयार होते? स्क्रीनवर! म्हणजेच जाणीव कॉर्टेक्समध्ये तयार होते. परंतु नवीन संशोधनाने हा विचार बदलला आहे. आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे आदिम भाग फक्त विजेचे बटन नाहीत, तर ते माणसाच्या प्राथमिक भावना आणि संवदेनशीलतेचे चित्र स्वतःच तयार करू शकतात, ते अनुभवाचा पाया आहेत.

हायड्रॅनेन्सफॅली: कॉर्टेक्स नसलेली मुले काय सांगतात?

या नव्या सिद्धांताला सर्वात मोठा पुरावा मिळतो तो ‘हायड्रॅनेन्सफॅली’ (Hydranencephaly) या अत्यंत दुर्मीळ वैद्यकीय स्थितीमधून. या आजारात मुले जन्माला येतात, तेव्हा त्यांच्या मेंदूचा वरचा मोठा भाग (कॉर्टेक्स) नसतो किंवा अपूर्ण असतो, तिथे केवळ द्रव भरलेले असते.

…जगणार पण भावना किंवा जाणीव नसेल!

पारंपरिक वैद्यकीय शास्त्रानुसार, अशी मुले केवळ एका वनस्पतीसारखी (Vegetative State) जगतात आणि त्यांना कोणतीही जाणीव किंवा भावना नसेल, असे मानले गेले होते. परंतु, शास्त्रज्ञ एलेमन आणि मर्कर (Aleman & Merker, 2014) यांनी अशा मुलांच्या कौटुंबिक जीवनाचा सखोल अभ्यास केला तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या:

  • ही मुले त्यांच्या आई-वडिलांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना पाहून वेगळा प्रतिसाद देतात.
  • आवडीचे संगीत वाजवले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि कर्कश्श आवाजाने ती अस्वस्थ होतात.
  • ती हसतात, रडतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात.

अर्थात, या मुलांची जाणीव आपल्यासारखी विचार करू शकत नाही किंवा ती भाषा समजू शकत नाही. परंतु, त्यांच्यात ‘भावनिक जाणीव’ (Affective Consciousness) असते. जर कॉर्टेक्स नसतानाही आनंदाची किंवा दुःखाची अनुभूती येत असेल, तर याचा स्पष्ट अर्थ असा की, जाणीवेचा हा प्राथमिक स्तर मेंदूच्या खोल (सबकॉर्टिकल) भागातच तयार होत असतो. या संशोधनामुळे वैद्यकीय जगतात एक नवा नैतिक दृष्टिकोन जन्माला आला. जे प्राणी किंवा जे रुग्ण बोलू शकत नाहीत, त्यांनाही वेदना आणि भावना असू शकतात; त्यामुळे त्यांच्या जगण्याला कमी लेखता कामा नये.

मेंदूच्या उत्तेजनेचा अभ्यास (Brain Stimulation) आणि चेतना

वैज्ञानिक मेंदू- उत्तेजनेच्या अभ्यासाचा (Brain Stimulation Studies) वापर करतात, तेव्हा त्यांना आणखी एक वेगळा अनुभव येतो. मेंदूच्या वरच्या भागाला (कॉर्टेक्स) चुंबकीय किंवा विद्युत लहरींनी उत्तेजित केले, तर माणसाला दृश्य भास होतात, जुन्या आठवणी बदलतात किंवा स्वतःच्या शरीराविषयीचे भान बदलते.
परंतु, जेव्हा मेंदूच्या अगदी खोल भागात, विशेषतः ‘थॅलॅमस’ (Thalamus) मध्ये हस्तक्षेप केला जातो, तेव्हा माणसाचा थेट ‘जागेपणा’ किंवा त्याची ‘संपूर्ण चेतनावस्थाच’ बदलून जाते. थॅलॅमस हे मेंदूचे मुख्य ‘रेल्वे जंक्शन’ किंवा ‘सेंट्रल हब’ आहे, जे सर्व संवेदनांची देवाणघेवाण करते. २०२५ मधील अलीकडील वैज्ञानिक आढाव्यानुसार (Cacciatore et al., 2025), चेतनावस्थेसाठी केवळ थॅलॅमस किंवा केवळ कॉर्टेक्स कारणीभूत नसून, या दोन्ही घटकांचे अंतर्गत नेटवर्क (Cortical-Subcortical Network) एकत्र काम करते.

प्राण्यांमधील जाणीव आणि नैतिक प्रश्न

प्राण्यांवरील काही जुन्या आणि वादग्रस्त प्रयोगांमध्ये असे दिसून आले होते की, प्राण्यांच्या मेंदूचा निओकॉर्टेक्सचा मोठा भाग काढून टाकल्यानंतरही, ते प्राणी पूर्णपणे निर्जीव होत नाहीत. ते स्वतःची स्वच्छता राखत होते, नवीन गोष्टी (मर्यादित स्वरूपात) शिकत होते, भीती किंवा राग दाखवत होते आणि आपल्या पिल्लांची काळजीही घेत होते.

मूलभूत भावनिक प्रणालीची घट्ट वीण

जाक पँकसेप (Jaak Panksepp, 1998) यांनी ‘अफेक्टिव्ह न्यूरोसायन्स’ (Affective Neuroscience) या शाखेच्या माध्यमातून सिद्ध केले की, सस्तन प्राण्यांच्या मेंदूच्या खोल रचनेमध्ये मूलभूत भावनिक प्रणाली (जसे की खेळणे, भीती वाटणे, राग येणे) आधीपासूनच घट्ट विणलेल्या असतात.

प्राणीहक्काची जाणीव

मूलभूत जाणीव निर्माण होण्यासाठी निओकॉर्टेक्सची गरज नसेल, तर याचा अर्थ असा होतो की गाय, कुत्रा, मांजर, हत्ती यांसारखे प्राणीही माणसासारखीच किंवा त्याहून तीव्र भीती, वेदना आणि सामाजिक बंध अनुभवत असतात. या वैज्ञानिक सत्यामुळे आज जगभरात प्राण्यांवरील प्रयोग आणि त्यांच्या हक्कांबद्दल अधिक संवेदनशील नियमांची मागणी पुढे आली आहे.

द्वैतवादाच्या पलीकडे

या सर्व पुराव्यांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांना दोन टोकाच्या भूमिका टाळण्याचा सल्ला दिला जातो:
१. जाणीव म्हणजे फक्त ‘निओकॉर्टेक्स’ (मानवी बुद्धी म्हणजेच जाणीव).
२. निओकॉर्टेक्सला काहीच महत्त्व नाही, सर्व काही जुन्या मेंदूतच घडते.

जाणीवेची जाणीव असते तरी कशी?

वास्तवात, निसर्गाचे नियोजन या दोन्हीच्या समन्वयात आहे. मॉरिन (Morin, 2007) यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, फक्त डोळे उघडे असणे (Wakefulness) आणि आतून काहीतरी जाणवणे (Consciousness) या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर कोनेन (Coenen, 2007) यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता, कॉर्टेक्स नसलेली जाणीव नक्की कशी असेल? ती कदाचित केवळ शुद्ध भावना आणि संवेदनांचा महासागर असेल, ज्याला भाषेची किंवा शब्दांची चौकट नसेल. त्यामुळे एखाद्या जीवाला जाणीव आहे की नाही? असा हो-नाही प्रश्न विचारण्यापेक्षा, “त्या जीवामध्ये जाणीवेचा कोणता स्तर, कोणते स्वरूप आणि किती क्षमता आहे?” असा विचार करणे अधिक वैज्ञानिक ठरते.

संदर्भ:

  • Merker, B. (2007). Consciousness without a cerebral cortex: A challenge for neuroscience and medicine. Behavioral and Brain Sciences, 30(1), 63–81. https://doi.org/10.1017/S0140525X07000891
  • Aleman, B., & Merker, B. (2014). Consciousness without cortex: A hydranencephaly family survey. Acta Paediatrica, 103(10), 1057–1065. https://doi.org/10.1111/apa.12718
  • Panksepp, J. (1998). Affective Neuroscience: The Foundations of Human and Animal Emotions. Oxford University Press.
  • Cacciatore, M., Magnani, F. G., Barbadoro, F., et al. (2025). Thalamus and consciousness: A systematic review on thalamic nuclei associated with consciousness. Frontiers in Neurology. https://doi.org/10.3389/fneur.2025.1509668
  • Morin, A. (2007). Consciousness is more than wakefulness. Behavioral and Brain Sciences, 30(1), 94–95. https://doi.org/10.1017/S0140525X07000921