श्वान आणि मानव यांचे नाते १५ हजार वर्षांपासून चालत आले आहे. यामध्ये बदल कसे घडले, दोघांवर काय परिणाम झाले, याचा पुरातत्वशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास ‘टेलर आणि फ्रान्सिस ग्रुप’ या कंपनीने प्रसिद्ध केला आहे. त्याचा हा आढावा…

मानव आणि श्वानांचा इतिहास काय आहे?

श्वानांना माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हटले जाते. हे मैत्रीपूर्ण नाते १५ हजार वर्षांपासून चालत आले आहे, असा दावा संशोधक करतात. याचा आधार पुरातत्वशास्त्रज्ञांना मिळालेल्या १४ हजार वर्षे जुन्या कबरींमध्ये दिसून येतो. या कबरींमध्ये माणसांच्या शेजारी पुरलेले श्वान सापडले आहेत. तसेच प्रत्येक खंडातील प्राचीन कलाकृतींमध्येही श्वानांची चित्रे आढळतात आणि जगभरातील संस्कृतींच्या पौराणिक कथा, धर्म आणि लोककथांमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. इतिहासातील नोंदीनुसार श्वानांनी मानवाबरोबर शिकार केली आहे, घरांचे रक्षण केले आहे, ओझे वाहून नेले आहे, पशुधन सांभाळले आहे आणि साथ दिली आहे. संशोधकांच्यामते हजारो वर्षांच्या काळात, मानवाने श्वानांचे शेकडो वेगवेगळे प्रकार विकसित केले आहेत, ज्यात हँडबॅगमध्ये सहज मावतील अशा चिमुकल्या चिवावापासून ते माणसाच्या कमरेपर्यंत पोहोचणाऱ्या ग्रेट डेनपर्यंतच्या श्वानांचा समावेश आहे.

मानव आणि श्वानांची एकत्र उत्क्रांती कशी झाली?

पुरातत्वशास्त्रज्ञ प्राध्यापक पीटर मिचेल यांनी त्यांच्या ‘फर्स्ट डॉग्ज : हंटर-गॅदरर्स अँड देअर कॅनाइन कंपॅनियन्स फ्रॉम प्रीहिस्टरी टू द प्रेझेंट’ या पुस्तकात श्वान पाळीव कसे झाले हे सांगताना ही प्रक्रिया एक गुंतागुंतीची आणि हळूहळू घडली, असे म्हटले आहे. मिचेल यांच्या मते माणसे आणि श्वान सुरुवातीला या मैत्रीपूर्ण नात्यात तुलनेने समान भागीदार म्हणून सामील झाले असावेत. मानवांनी इतर प्राणी किंवा वनस्पतींना आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू करण्याच्याही पूर्वी म्हणजेच अगदी अश्मयुगात मानव आणि श्वान यांचे नाते सुरू झाले असावे. वेगवेगळ्या ठिकाणी हे नाते विकसित होत गेले. यावेळी श्वानांनीदेखील सभोवतालच्या मानवांचे वागणे, जीवनशैली आणि मानवांच्या गरजांना अनुकूल अशी वैशिष्ट्ये आत्मसात केली असावित.

वातावरणाशी जुळवून घेणारे श्वान कसे विकसित झाले?

आर्क्टिक प्रदेशांपासून ते दमट उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत, वेगवेगळ्या मानवी समाजांबरोबर राहत असताना श्वानांमध्ये मोठे बदल झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. सामायिक उत्क्रांतीच्या इतिहासात अत्यंत भिन्न प्राणी निर्माण झाल्याची नोंद आहे. उत्तरेकडील बर्फावर गाड्या (स्लेज) ओढणारे श्वान थंड हवामानासाठी लहान आणि दाट केसांचे झाले, तर विषुववृत्ताजवळील शिकारी श्वान अधिक सडपातळ आणि उष्णतेसाठी अधिक अनुकूल झाले. तिबेटच्या पठारावर, श्वान आणि मानव या दोघांमध्येही उंच ठिकाणी राहण्यासाठी समान जनुके विकसित झाली. संशोधकांना तिबेटी श्वानांमध्ये कमी ऑक्सिजन असलेल्या परिस्थितीतही कार्य करण्यास सक्षम करणारी जनुके ओढळली आहेत.

आर्क्टिक श्वान मानवी जीवनाचे भागीदार कसे झाले?

आर्क्टिक प्रदेशात माणसे आणि श्वान यांच्यातील भागीदारी वैशिष्ट्यपूर्ण बनली आहे. येथील अत्यंत कठीण आणि बर्फाळ वातावरणात आर्क्टिक श्वान हे मानवी समुदायांसाठी जगण्याचा मुख्य आधार आहेत. हजारो वर्षांपासून हे श्वान मानवासाठी वाहतूक, शिकार आणि दळणवळणाचे प्रमुख साधन झाले आहेत. बर्फावर गाड्या (स्लेज) ओढण्यासाठी हे श्वान मानवाला मदत करतात. पुरातत्वीय पुराव्यांनुसार, आर्क्टिक श्वानांमध्ये जड ओझे ओढण्याशी संबंधित सांगाड्याची वैशिष्ट्ये विकसित झाली. त्यांच्या अवशेषांमध्ये मणक्यांवरील ताणाचे विशिष्ट नमुने, तसेच गोठलेल्या भूभागावर वारंवार येणारा शारीरिक ताण सहन करण्यास सक्षम असलेली मजबूत अवयवांची हाडे दिसून येतात. हे श्वान केवळ वाहतुकीचे साधन नव्हते. पृथ्वीवरील काही अत्यंत खडतर वातावरणात लोकांना जगण्यास सक्षम करणाऱ्या जगण्याच्या धोरणांचा ते एक अविभाज्य भाग झाले. किनारपट्टीच्या प्रदेशात, माणसे आणि श्वान अनेकदा सागरी खाद्यपदार्थांचे प्राबल्य असलेला सारखाच आहार घेतात.

श्वानांची शिकारीसाठी उत्क्रांती कशी झाली?

उष्णकटिबंधीय वातावरणातील मानवाच्या शिकारी समुदायांबरोबर राहणाऱ्या श्वानांमध्ये अत्यंत वेगळी उत्क्रांती झाल्याचे दिसून आले. दक्षिण अमेरिका आणि आग्नेय आशियाच्या वर्षावनांमध्ये दाट वनराईतून शिकारीचा पाठलाग करण्यास आणि अवघड भूभागावरून संचार करण्यास श्वान सक्षम बनत गेले. आर्क्टिक श्वानांच्या तुलनेत, हे उष्णकटिबंधीय श्वान साधारणपणे लहान आणि अधिक चपळ झाले आहेत. त्याच्यातील या गुणांमुळे घनदाट जंगलांमध्ये त्यांना अनेक फायदे मिळतात. मानववंशशास्त्रीय नोंदींवरून असे दिसून येते की, स्थानिक समुदायांनी शिकारीची कौशल्ये टिकवून ठेवण्यासाठी श्वानांच्या प्रजननावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवले. त्यांनी श्वानांच्या आश्वासक पिल्लांची निवड केली आणि त्याची वैशिष्ट्ये अधिक दृढ करण्यासाठी काहीवेळा जंगली श्वानकुळातील प्राण्यांशी श्वानांचे प्रजनन केले असावे, अशी शक्यात शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. श्वानांमधील विविधता ही मानवांच्या व्यावहारिक गरजांमुळे घडली. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेच्या वायव्य किनाऱ्यावर, काही स्थानिक समुदायांनी खास त्यांच्या केसांसाठी लोकरीसारखे केस असलेले श्वान पाळले. या केसांचा उपयोग समारंभासाठी लागणाऱ्या चादरी बनवण्यासाठी केला जात असे, ज्यामुळे या श्वानांना शिकार किंवा वाहतुकीऐवजी वस्त्र उत्पादनावर केंद्रित भूमिका मिळाली.

प्राचीन श्वान वंशांचा वारसा काय आहे?

श्वानांच्या अनुवंशिक संशोधनातून श्वानांच्या अनेक प्राचीन प्रजाती आता त्यांच्या मूळ स्वरूपात टिकून नसल्याचे दिसून आले आहे. वसाहतवादी विस्तारादरम्यान, युरोपीय श्वानांच्या प्रजाती जगभर पसरल्या आणि त्यांनी अनेक प्राचीन वंशांची जागा घेतली. तथापि, त्या प्राचीन श्वानांचे काही अनुवांशिक अवशेष शिल्लक आहेत. हे टिकून राहिलेले दाखले मानव आणि श्वान यांच्यातील दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासाबद्दल मौल्यवान संकेत देतात. पुरातत्वीय शोध, जनुकीय पुरावे आणि मानववंशशास्त्रीय संशोधन या सर्वांमधून श्वानांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची विलक्षण क्षमता होती, हे उघड झाले. श्वानांनी मानवांबरोबर राहण्यापलीकडे जात स्वत:मध्ये बदल घडवले. यामुळे ते भिन्न वातावरणात आणि संस्कृतींमध्ये मानवी जीवनाचे मौल्यवान भागीदार झाले. मानव आणि श्वान यांच्या सामायिक उत्क्रांतीच्या इतिहासातून दोघांनी एकमेकांच्या जीवशास्त्रावर आणि वर्तनावर परिणाम केल्याचे स्पष्ट होते.

श्वानांच्या आजारांचा प्रभाव कसा पडला?

श्वानांच्या जागतिक प्रसारावर केवळ पर्यावरणीय अनुकूलनाचा प्रभाव नव्हता. त्यांना होणारे आजारही महत्त्वाचे ठरले असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटत आहे. त्यामुळे विविध आजारांमुळे श्वानांची वस्ती कुठे टिकू शकली, वाढू शकली तसेच यावर कसे निर्बंध आले, याचा अभ्यास सध्या संशोधक करत आहेत. उप-सहारा अफ्रिकेत, ट्रायपॅनोसोमियासिस आणि एर्लिचियोसिस यांसारख्या रोगांमुळे श्वानांसाठी गंभीर अडथळे निर्माण झाले असावेत. त्यामुळेच उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण ते आर्क्टिक प्रदेशातील प्रजाती असलेले श्वान काही उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आणि अधिक दक्षिणेकडील भागांमध्ये तुलनेने उशिरा पोहोचले असावेत. त्यामुळे, श्वानांचे आजारपण उत्क्रांतीच्या कथेला एक नवीन पैलू जोडतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

dharmesh.shinde@expressindia.com