मानवाच्या क्षमता कशा विकसित झाल्या हे समजून घेण्यासाठी, अनेक दशकांपासून वानरतज्ज्ञ या प्राणीगटामध्ये असलेल्या मानवासारख्या संज्ञानात्मक क्षमतांचा शोध घेत आहेत. यातूनच बुद्धिमत्तेच्या संकल्पनेला नवी दिशा मिळणार आहे, ती कशी याचा हा आढावा…

वानरांवरील अभ्यासात काय आढळले?

वानरतज्ज्ञ करीत असलेले बहुतांशी संशोधन हे वानर (एप) आणि मानव यांच्यातील विशिष्ट क्षमतांमध्ये असलेला सारखेपणा हा मानव उत्क्रांतीच्या इतिहासात तुलनेने अलीकडेच विकसित झाला असण्याच्या शक्यतेवर आधारित आहे. वानर व मानव संवादासाठी हावभावांचा वापर करतात, याचे उदाहरण संशोधक देतात. परंतु जर्मनीतील ल्युनेबर्ग येथील ल्युफाना विद्यापीठातील अभ्यासकांच्या मते संज्ञानात्मक क्षमतांबाबत विचार करण्याची ही एक स्थिर पद्धत असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठातील विकास मानसशास्त्रज्ञ मॅन्युएल बोन यांनी सांगितले की, वानरांचा अभ्यास करताना असे अनेक अनुभव आले ज्यातून त्यांच्या बोधप्रणालीची रचना आणि संघटन नेमके कसे होते, हे दिसून आले. त्यांना अभ्यासात माणसांबद्दल विकासात्मक आणि वैयक्तिक फरक दिसून आला. त्या गोष्टींची महावानरांमध्ये उणीव स्पष्टपणे दिसून येते.

वानरांमध्ये स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कसे आढळते?

संशोधकांनी १८ महिन्यांच्या कालावधीत बोनोबो, चिंपांझी, गोरिला आणि ओरंगुटान अशा ४८ वानरांवर विविध संज्ञानात्मक चाचण्यांचा अभ्यास केला. ‘सायकॉलॉजिकल सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार, प्रत्येक वानर दुसऱ्या वानरापेक्षा वेगळे होते आणि हे फरक कालांतराने बऱ्यापैकी स्थिर राहिले. विशेष म्हणजे एकाच प्रजातीतील वानरांमध्येही हे फरक अभ्यासकांना दिसून आले. थोडक्यात संगोपन, जीवनातील अनुभव, लिंग, सामाजिक गट आणि मानवांशी पूर्वीचा संपर्क यांसारख्या घटकांचा वानरांच्या वर्तनावर परिणाम होतो, असे या निष्कर्षांमधून उघड झाले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, या अभ्यासातून असे दिसून येते की, अगदी माणसांप्रमाणेच वानरांमध्येही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि बौद्धिक क्षमता असतात. बाॅन यांनी सांगितले की, माणसांमध्ये आढळणारे फरक हे त्यांचे गुण आहेत किंवा एखाद्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये आहेत, असे आपण मानतो. ग्रेट एप्स या वानराबाबतही अशाच प्रकारचे पुरावे आढळले आहेत. यातूनच प्रत्येक वानराचे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे अभ्यासातून उघड झाले.

वानरांची बुद्धिमत्ता वेगळी कशी ठरते?

संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष वानर आणि मानव यांच्या बुद्धिमत्तेमधील फरक अधोरेखित करणारे आहेत. अभ्यासकांच्या मते वानरांची बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेपेक्षा वेगळ्या प्रकारे संघटित झालेली असू शकते. वानरांच्या बाबतीत, काही कामांमध्ये चांगले असणे हे इतर कामांमध्येही चांगले असण्याचे सूचक नव्हते. यासाठी ते एकाग्रतेचे उदाहरण देतात. वानर एखादी गोष्ट एकाग्रतेने लक्ष देऊन करत असेल तर इतर गोष्टींमध्येही ते एकाग्र होतीलच असे नाही. वानरांचा अभ्यास करताना मानवी दृष्टिकोनातून अपेक्षित असलेले निष्कर्ष आढळून न आल्याने हीच गोष्ट रंजक आणि विचारप्रवर्तक आहे, असे बॉन यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते अभ्यास करताना मानवी आकलनप्रणाली हाच मूळ साचा आहे असे न मानता, वानरांची आकलनप्रणाली कशी तयार होते हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. वानरांच्या आकलनशक्तीच्या विविध पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी साधने नसल्याचेही बाॅन म्हणाले. त्यांनी नमूद केले की, भविष्यातील संशोधनातून वानरांची आकलनशक्ती मोजण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या साधनांचे अधिक मूल्यांकन केले जाऊ शकते, ज्यामुळे शास्त्रज्ञांना वानरांमधील आकलनशक्तीचा विकास कसा होत गेला, तो प्रत्येक वानरामध्ये कसा बदलतो याची नोंद करणे शक्य होईल.

dharmesh.shinde@expressindia.com