भावनिक अश्रूंची उत्क्रांती दुःख व्यक्त करण्यासाठी झालेली नाही. तर ती आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी झाली आहे.
रडण्यातून काहीही उपयुक्त घडत नाही?
१८७२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द एक्सप्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड ॲनिमल्स’ या पुस्तकात चार्ल्स डार्विनने मानवी भावनिक रडण्याच्या क्रियेला ‘निरर्थक’ घोषित केले होते. त्याने याचे वर्णन एक ‘एपिफेनोमिनन’ (Epiphenomenon) असे केले होते. ज्या माणसाने वर्तणुकीच्या प्रत्येक छोट्या तपशिलाचा अर्थ शोधला, त्याच्यासाठी हे म्हणजे एक प्रकारचे अपयश मान्य करण्यासारखेच होते. दीडशे वर्षांनंतर, डार्विनच्या त्या निरीक्षणाला आणखी बळ मिळाले आहे. मात्र हे निरीक्षण डार्विनच्या कल्पनेपेक्षाही अधिक विचित्र आणि सखोल आहे.

‘रडण्या’विषयी नवीन निष्कर्ष कोणता?

वरवर पाहता, रडण्याला उत्क्रांतीच्या दृष्टीने फारसा अर्थ वाटत नाही. यामुळे तुमची दृष्टी धूसर होते आणि तुम्ही कोणासमोरही लगेच असुरक्षित किंवा हतबल असल्याचे संकेत देता; साध्या भाषेत सांगायचे तर, रडण्यातून उघडपणे काहीही उपयुक्त घडत नाही. तरीही, ही क्रिया सार्वत्रिक आहे: इतिहासातील नोंद असलेल्या प्रत्येक मानवी संस्कृतीत लोक रडतात. लाखो वर्षांपासून आणि प्रत्येक सामाजिक वातावरणात अशा प्रकारचे सातत्य अपघाताने टिकून राहत नाही.

अश्रूंची उत्क्रांती दुःख व्यक्त करण्यासाठी नाही?

२०१८ मध्ये ‘ह्यूमन नेचर’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासातून समोर आलेला प्रचलित वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की, रडणे ही केवळ एक क्रिया नाही. ती एकाच वेळी ध्वनी, दृश्य आणि रासायनिक लहरींवर काम करणारी एका स्तरावरील संवाद प्रणाली आहे. संशोधनाच्या वाढत्या पुराव्यांवरून पुढे आलेला विरोधाभासी तर्क असा की, भावनिक अश्रूंची उत्क्रांती दुःख व्यक्त करण्यासाठी झालेली नाही, तर ती आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी झाली आहे. याची सुरुवात ‘मदतीसाठीची हाक’ म्हणून झाली.अश्रूंच्या उत्क्रांतीची मुळे दुःखात नाही तर भूक, थंडी किंवा भीतीत होती. अश्रूंची सुरुवात तान्ह्या जिवापासून होते. सस्तन प्राण्यांमध्ये, आपल्या समूहापासून वेगळी झालेली पिल्ले एक विशिष्ट आवाज काढतात ज्याला संशोधक ‘डिस्ट्रेस व्होकलायझेशन’ म्हणतात. हा एक ‘विरहाचा टाहो’ असतो. त्याचे एकमेव कार्य पिल्लू आणि काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अंतर कमी करणे हे असते.

मुलांप्रमाणे प्रौढ का रडतात?

२०१८ च्या ‘ह्यूमन नेचर’च्या अभ्यासात असे दस्तऐवजीकरण केले आहे की, मानवी अर्भकांचे रडणे थेट या सस्तन प्राण्यांच्या आराखड्यातून विकसित झाले आहे: हा एक आवाजाचा संकेत आहे. हा आवाज निकड कळवण्यासाठी काढला जातो. त्या स्वराचा चढ-उतार आणि तीव्रता या मोजपट्ट्यांवर तो मोजला जातो. हा संकेत अत्यंत विश्वासार्ह असतो. खोट्या संकेतांकडे दुर्लक्ष केले जाते; प्रामाणिक संकेतांना उत्तर मिळते.

मानवी सामाजिक उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात पुढे हा ‘संकट काळचा संकेत’ स्थलांतरित झाला. तो बालपणातून प्रौढत्वात आला. त्याने दृश्य घटक आत्मसात केले: वाहणारे अश्रू, थरथरणारे ओठ, शरणागती पत्करल्यासारखी झुकलेली शरीराची मुद्रा. आणि असे करताना, हे रडणे अंधारातील लहान बाळाच्या रडण्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगत आणि क्लिष्ट बनले.

भावनिक रडण्याचे सामाजिक संकेत

जेव्हा एखादी प्रौढ व्यक्ती रडते, तेव्हा ते पाहणाऱ्या लोकांमध्ये बदल घडतो. त्यांच्यात सहानुभूती वाढते आणि आक्रमकता कमी होते. परिणामी, सामाजिक बंध अधिक घट्ट होतात. हे केवळ वरवरचे परिणाम नाहीत. हे दस्तऐवजीकरण केलेले ठोस निष्कर्ष आहेत. अश्रू हे एक ‘प्रो-सोशल सिग्नलिंग मेकॅनिझम’ म्हणून कार्य करतात, याकडे हे परिणाम लक्ष वेधतात. हा एक विश्वासार्ह आणि खोटा ठरवता न येणारा असा संदेश आहे.

रडण्याचे शारीरिक आणि सामाजिक महत्त्व

‘PNAS’ (प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स) मधील एका महत्त्वपूर्ण संशोधनानुसार, जेव्हा आपण दुसऱ्याला रडताना पाहतो, तेव्हा आपल्या मेंदूचे तेच भाग सक्रिय होतात, जे रडणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूत सक्रिय असतात. आपली सहानुभूतीची क्षमता ज्या ‘मिरर न्यूरॉन नेटवर्क’वर अवलंबून असते, ती ते अश्रू पाहिल्यावर कार्यरत होते. उत्क्रांतीच्या प्रवासात अश्रू ही समोरच्या व्यक्तीत आपोआप दया, करुणा निर्माण करेल अशा प्रकारे तयार झाली. सहकार्यावर आधारलेल्या मानवी प्रजातीसाठी, एका साध्या दृश्य संकेताने संघर्ष मिटवणे आणि एकजूट निर्माण करणे हा खूप मोठा फायदा होता. या कथेची एक दुसरी बाजूही आहे. अश्रू हे ‘शरणागती’चेही संकेत देतात. पांढऱ्या झेंड्याप्रमाणेच, ते सांगतात की रडणाऱ्या व्यक्तीने आता आपला आक्रमकपणा सोडला आहे. शत्रू असो वा प्रियकर, त्यांच्यातील वादात जिथे शब्द अपुरे पडू लागतात तिथे अश्रू कामी येतात आणि तणाव कमी करतात.

भावनिक रडण्याचे जैवरसायनशास्त्र

येथे विज्ञान खरोखरच थक्क करणारे ठरते. २०११ मध्ये ‘सायन्स’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, मानवी अश्रूंमध्ये गंधहीन ‘केमोसिग्नल्स’ (रासायनिक संकेत) असतात. म्हणजे वासाची जाणीव न होताही आपले नाक हे रासायनिक घटक ओळखून मेंदूला संदेश देते. २०२३ च्या ‘PLOS Biology’ या जर्नलमधील अभ्यासानुसार, जेव्हा पुरुषांनी नकळतपणे या अश्रूंचा गंध घेतला, तेव्हा त्यांच्यातील आक्रमक वागणूक ४३.७% नी कमी झाली. मेंदूच्या इमेजिंगमधून असे दिसले की, हे अश्रू हुंगल्यामुळे मेंदूतील आक्रमकतेशी संबंधित भागांवर नियंत्रण मिळवले जाते. भावनिक अश्रू हे डोळ्यांतील साध्या ओलाव्यापेक्षा किंवा कांदा कापताना येणाऱ्या अश्रूंपेक्षा वेगळे असतात. त्यामध्ये प्रोलॅक्टिन, अड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक (ATCH) आणि ल्यू-एंकेफालिन यांसारख्या हार्मोन्सचे प्रमाण जास्त असते. थोडक्यात, अश्रू हे आपल्या अंतर्गत मानसिक स्थितीची रासायनिक नोंद घेऊन बाहेर पडतात.

जीवशास्त्र विरुद्ध संस्कृती

जर रडणे इतके फायदेशीर असेल, तर आपण ते दडपण्याचा प्रयत्न का करतो? आधुनिक जीवनात रडण्याचे जैविक आणि सामाजिक नियम यामध्ये मोठा संघर्ष आहे. अनेक ठिकाणी, विशेषतः पुरुषांच्या बाबतीत, रडणे हा ‘कमकुवतपणा’ मानला जातो. संशोधनानुसार स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त रडतात, ज्यामागे अंशतः हार्मोन्स आणि अंशतः सामाजिक जडणघडण कारणीभूत आहे. मात्र, रडण्याची आणि रडण्याला प्रतिसाद देण्याची क्षमता सर्व मानवांमध्ये समान आहे. फक्त रडण्याची ‘परवानगी’ संस्कृतीनुसार बदलत असते.

कला आणि अश्रू

सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे माणूस केवळ स्वतःच्या दुःखासाठी नाही, तर कलेसाठीही रडतो – चित्रपट, संगीत किंवा कादंबरीतील काल्पनिक पात्रांसाठी आपण रडतो. ‘ह्यूमन नेचर’ मधील अभ्यासानुसार, सामाजिक जगण्यासाठी विकसित झालेली ही यंत्रणा कलेने आपल्याकडे वळवून घेतली आहे. आपण कलेसाठी रडतो कारण कला त्याच भावनिक भाषेत बोलते जी उत्क्रांतीने आपल्याला शिकवली आहे.

रडणे का टिकून राहिले?

रडणे टिकून राहिले कारण ते एकाच वेळी अनेक कामे करते. संकटाचा आवाज, सहानुभूतीचा ट्रिगर, आक्रमकता रोखणारे साधन आणि सामाजिक बंध घट्ट करणारे माध्यम असे वेगवेगळे उद्देश त्यातून साध्य होतात.

manisha.devne@expressindia.com