मानवी उत्क्रांतीला आकार देण्याचे काम अनेक घटकांनी केले. त्यापैकी एक हिवताप म्हणजेच मलेरिया हा आजार. पहिला मानव लाखो वर्षांपूर्वी आफ्रिकेत उत्क्रांत झाला, असे मानववंशशास्त्र सांगते. मात्र आफ्रिकेतून हा माणूस जगातील इतर भागांत कसा विखुरला गेला याला कारण मलेरिया हा प्राणघातक आजार. या आजारामुळे मानवी उत्क्रांतीवर कसा परिणाम झाला, यांविषयी…

मलेरियाचा मानवी अधिवास निवडीवर परिणाम

‘सायन्स ॲडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात, केंब्रिज विद्यापीठाच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ जिओअँथ्रोपोलॉजीमधील संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, ७४,००० ते ५,००० वर्षांपूर्वीच्या काळात प्लास्मोडियम फाल्सीपेरममुळे होणाऱ्या मलेरियाने मानवी अधिवासाच्या निवडीवर परिणाम केला होता का, याचा अभ्यास केला आहे. हा तो महत्त्वपूर्ण काळ होता, जेव्हा मानव आफ्रिकेबाहेर मोठ्या प्रमाणावर पसरले नव्हते आणि शेतीमुळे मलेरियाच्या प्रसारात नाट्यमय बदल झाला नव्हता. अभ्यासातून असे दिसून येते की, मलेरिया, जो मानवजातीच्या सर्वात जुन्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या रोगजनकांपैकी एक आहे, त्याने मानवी समूहांना उच्च-जोखमीच्या वातावरणापासून दूर ढकलून आणि भूभागावर लोकसंख्येला विलग करून, त्यांच्या निवासस्थानाच्या निवडीवर प्रभाव पाडला. हजारो वर्षांच्या कालावधीत या विखंडनाने लोकसमूह कसे भेटले, मिसळले आणि त्यांनी जनुकांची देवाणघेवाण कशी केली याला आकार दिला, ज्यामुळे आज मानवांमध्ये दिसणारी लोकसंख्या रचना तयार होण्यास मदत झाली. या निष्कर्षांवरून असे सूचित होते की, संसर्गजन्य रोग हे केवळ सुरुवातीच्या मानवांसमोरील एक आव्हान नव्हते, तर ते आपल्या प्रजातीच्या सखोल इतिहासाला आकार देणारे मूलभूत माध्यम ठरले.

शास्त्रज्ञांनी याचा अभ्यास कसा केला?

शास्त्रज्ञांनी तीन प्रमुख डास समूहांच्या प्रजाती वितरण प्रारूपाचा वापर प्राचीन हवामान प्रारूपबरोबर केला, अशी माहिती मॅक्स प्लँक भू-मानववंशशास्त्र संस्था आणि केंब्रिज विद्यापीठाच्या प्रमुख लेखिका डॉ. मार्गेरिटा कोलुची यांनी दिली. या प्रारूपांचा वापर साथीच्या रोगांच्या माहितीबरोबर (एपिडेमियोलॉजिकल डेटा) एकत्र करून, आम्हाला सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेत मलेरिया प्रसाराच्या धोक्याचा अंदाज लावता आला, असे कोलुची यांनी सांगितले. त्यानंतर संशोधकांनी या अंदाजांची तुलना त्याच प्रदेशातील आणि कालखंडातील मानवी परिसंस्थेच्या स्वतंत्र पुनर्रचनेशी केली. निकालांवरून असे दिसून येते की, मलेरिया प्रसाराचा उच्च धोका असलेल्या भागांमध्ये मानवांनी राहणे तीव्रतेने टाळले किंवा तेथे ते टिकू शकले नाहीत. या संशोधनाबद्दल केंब्रिज विद्यापीठाच्या प्राध्यापक अँड्रिया मानिका यांनी सांगितले की, ‘‘या निवडींच्या परिणामांनी गेल्या ७४,००० वर्षांपासून आणि कदाचित त्याही खूप आधीपासून मानवी लोकसंख्येला आकार दिला आहे. भूभागावर मानवी समाजाचे विलगीकरण होऊन, मलेरियाने आज आपण पाहत असलेल्या लोकसंख्येच्या रचनेत योगदान दिले. मानवी लोकवस्ती कुठे राहू शकते हे ठरवणारे हवामान आणि भौतिक अडथळे हे एकमेव घटक नव्हते,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

या अभ्यासातून काय सिद्ध झाले?

हा अभ्यास मानवी उत्क्रांतीवरील संशोधनात नवीन दालने उघडतो, आपल्या प्रजातीच्या सुरुवातीच्या प्रागैतिहासिक काळाला आकार देणारा एक प्रमुख घटक म्हणून रोगाचा क्वचितच विचार केला गेला आहे आणि या काळातील प्राचीन डीएनएशिवाय याची चाचणी करणे कठीण होते. आमचे संशोधन ही धारणा बदलते आणि मानवी इतिहासाच्या खोलात रोगांच्या भूमिकेचा शोध घेण्यासाठी एक नवीन चौकट प्रदान करते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मलेरिया हा प्राणघातक आजार?

आधुनिक काळात विविध औषधे आणि उपचार पद्धतीमुळे मलेरियाचे निराकरण करणे सुलभ झाले आहे. मात्र एके काळी हा जगातील प्राणघातक आजार होता. अलीकडेच, इ.स.पू. ३२०० आणि १३०४ काळातील इजिप्शियन अवशेषांमध्ये मलेरियाचे प्रतिजन (अँटीजेन) आढळले आहे. इसवी सन पहिल्या शतकात रोममध्ये मलेरियाचे झालेले संभाव्य आगमन हा युरोपीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. आफ्रिकेच्या वर्षावनातून, हा रोग बहुधा नाईल नदीमार्गे भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचला, नंतर पूर्वेकडे सुपीक प्रदेशात आणि उत्तरेकडे ग्रीसपर्यंत पसरला. ग्रीक व्यापारी आणि वसाहतवाद्यांनी तो इटलीमध्ये आणला. तेथून, रोमन सैनिक आणि व्यापाऱ्यांनी अखेरीस तो उत्तरेकडे इंग्लंड आणि डेन्मार्कपर्यंत पोहोचवला. मलेरियाचा प्रसार सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेत सुमारे ७४,००० ते ५,००० वर्षांपूर्वी सुरू झाला, जो शेती विकसित होण्यापूर्वीचा काळ होता. सुरुवातीच्या मानवांनी मलेरियाचा धोका जास्त असलेल्या भागात राहणे टाळले, ज्यामुळे मानवी लोकसंख्येचे स्थलांतर आणि मिश्रण यावर मोठा परिणाम झाला.