मानवाला इतर प्राण्यांप्रमाणे शेपटी होती, ती कशी गेली हे आपण सर्वांनीच विज्ञानात शिकले आहे. मात्र ही शेपटी का गेली किंवा ती का नसते, याचे उत्तर माहीत आहे का? हे उत्तर किमान २० दशलक्ष वर्षे अगोदरच्या काळात दडले आहे, ते कसे याचा हा आढावा…
प्राण्यांच्या कॉर्डाटा संघात मानव अपवाद का?
पृथ्वीवर आपल्या आसपास राहणाऱ्या सर्वच प्राण्यांना शेपटी आहे. अगदी लहान मांजरीच्या पिल्लापासून ते मोठ्या देवमाशापर्यंत सर्वांनाच त्यांच्या शरीररचना आणि उद्देशानुसार भिन्न भिन्न प्रकारच्या शेपट्या आहेत. ओपॉसम हा उंदरासारखा दिसणारा प्राणी एखाद्या ठिकाणी पकड घेण्यासाठी शेपटी वापरतो, तर कांगारू हा त्याचा तोल सांभाळण्यासाठी शेपटी वापरतो. तर मासे पोहण्यासाठी शेपटीचा वापर करतात. शेपटी असणे ही प्राण्यांच्या कॉर्डाटा संघातील सदस्यत्वाची एक अट आहे, ज्यामध्ये मानव आणि इतर सर्व पृष्ठवंशीय प्राणी येतात. पण यामध्ये मानव आणि काही वानर प्रजाती अपवाद ठरल्या आहेत.
मानवाने शेपटी कधी गमावली याचा अभ्यास करण्यासाठी उत्क्रांतीच्या कालक्रमानुसार खूप मागे जावे लागते. मिसुरी विद्यापीठातील एकात्मिक शरीररचनाशास्त्र कार्यक्रमातील एक गुणश्री प्राध्यापिका (professor emeritus) कॅरोल वॉर्ड यांनी शेपटी नसण्याचे उत्तर देताना म्हटले होते की, मानवांना शेपटी नसण्याचे कारण म्हणजे आपल्या पूर्वजांना शेपटी नव्हती, पण मानवाने शेपटी कशी गमावली, ही कहाणी पाहण्यासाठी मानव आणि वानरांच्या वंशशास्त्रीय इतिहासात किमान २० दशलक्ष वर्षे मागे जावे लागेल.
मानवाच्या उत्क्रांतीचा काळ नेमका कोणता?
मानवाच्या शेपटीचा ऱ्हास उत्क्रांतीच्या कोणत्या वळणावर झाला, याचे उत्तर शोधण्यासाठी मायोसीन युगाच्या मध्यावर जावे लागेल. या युगात जमिनीवर राहणारे प्राणी आजच्या प्राणिजीवनासारखे अधिकाधिक दिसू लागले होते. सुमारे २३ दशलक्ष वर्षांपूर्वीपासून ते पाच दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत टिकलेल्या या युगात, पहिले श्वान-अस्वल दिसू लागले. आदिम जिराफ युरेशियामध्ये होते आणि श्वानांच्या आकाराचे तीन बोटांचे घोड्यांचे पूर्वज फ्लोरिडामध्ये राहत होते. या युगात मानव अजून पूर्णपणे मानव बनले नव्हते. मानवाची उत्क्रांती ही वानरांपासून विभक्त होण्याची एक कहाणी आहे, जी मायोसीन युगापर्यंतची मानली जाते. याच दरम्यान आफ्रिकन वानर ओरंगुटानपासून वेगळे झाले. अलीकडील संशोधनानुसार, मानव, चिम्पांझी आणि बोनोबो यांच्यातील शेवटचा समान पूर्वज सुमारे पाच ते सहा दशलक्ष वर्षांपूर्वी वेगळा झाला, असे मानले जाते.
उत्क्रांतीच्या अभ्यासातील अडचण काय?
मानव उत्क्रांतीच्या अभ्यासात संशोधकांपुढे एक अडचण आहे, ती म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात आपल्यासारखेच असणारे काही प्राणीदेखील शेपटीविहीन होते. त्यामुळे मानवाच्या खऱ्या पूर्वजांचा शोध घेण्यासाठी आणखी काही वर्षे मागच्या कालखंडात जावे लागेल. कॅरोल वॉर्ड यांच्या मते सुमारे २५ ते ३० दशलक्ष वर्षांपूर्वी, आपले वानर पूर्वज शेपटी असलेल्या माकडांपासून वेगळे झाले, असा अंदाज आहे. ही विभागणी झाल्यावर, त्यानंतरच्या लाखो वर्षांमध्ये शेपटीविहीन वानरांच्या अनेक प्रजाती उदयास येऊ लागल्या. यामुळे शेपटीविहीन प्रजातींपैकी नेमकी कोणती प्रजाती पुढे उत्क्रांत होऊन आपण बनलो, हे निश्चित करणे जवळजवळ अशक्य होते.
एकेम्बो प्रजातीतून मानवाची उत्क्रांती?
संशोधकांनी प्राचीन जीवाश्म नोंदींचा अभ्यास केला आहे. या नोंदी त्या काळात काय घडत होते याची केवळ मर्यादित झलक देत असल्या तरी त्या ज्ञानवर्धक आहेत. संशोधकांना अशा जीवाश्माचा अभ्यास करताना एकेम्बो या प्रजातीचे १७ ते २० दशलक्ष वर्षांपूर्वीचे नमुने केनियामध्ये सापडले. या प्रजातीतील एकेम्बो हेसेलोनी या एका प्रजातीचे जीवाश्म त्या काळातील वानर आणि शेपटी यांच्यातील संबंधांवर बऱ्यापैकी प्रकाश टाकतात. हे प्राणी कदाचित समान लांबीचे पाय आणि हात असलेल्या चिम्पांझीसारखे दिसत असावेत, अशी शक्यता वाॅर्ड यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रजातीमध्ये शेपटीसाठी आवश्यक असलेल्या मुख्य घटकांची कमतरता होती, असेही त्यांनी नमूद केले.
शेपटीच्या ऱ्हासाचे रहस्य त्रिकास्थीमध्ये?
शेपटी नेमकी कधी नाहीशी झाली हे निश्चित करण्यासाठी त्रिकास्थी असलेल्या प्राण्यांचा अभ्यास संशोधकांना अधिक योग्य वाटतो. त्रिकास्थी म्हणजे पाठीच्या कण्यातील कमरेच्या भागाच्या खाली असलेले एक त्रिकोणी आकाराचे हाड. हे पाच मणके एकत्र येऊन बनलेले असते, जे शरीराचा समतोल आणि वजनाचा आधार म्हणून महत्त्वाचे आहे. शेपटी असलेल्या इतर सस्तन प्राण्यांच्या त्रिकास्थीच्या जीवाश्मांमधून शेपटीच्या मणक्यांचा समूह दिसून येतो. वानर आणि मानवांमध्ये त्रिकास्थीचा शेवट फक्त एका लहान टोकाने होतो. वॉर्ड यांच्या मते एकेम्बो हेसेलोनीच्या अभ्यासात या प्रजातीमधील त्रिकास्थी हा छोटासा निर्णायक पुरावा आहे. त्रिकास्थी शेपटीला आधार देऊ शकली नसती आणि त्या प्राण्याला शेपटी नव्हती हेच यातून दिसून येते. पण एकेम्बो हे त्या काळातील शेपटी नसलेल्या वानराचे एकमेव उदाहरण नाही. नॅकोलापिथेकस नावाचे मायोसीन युगातील आणखी एका वानराची नोंद सुमारे १५ दशलक्ष वर्षांपूर्वी केनियाच्या जीवाश्म नोंदींमध्ये आढळते. या प्राण्यांच्या त्रिकास्थीचे जीवाश्मातून हेच दिसून येते की, ते शेपटीला आधार देऊ शकले नसते. लाखो वर्षांनंतर नेमका कोणता वानर होमिनिड बनला हे जरी स्पष्ट नसले तरी पुरावे दर्शवतात की या काळात वानरांची उत्क्रांती शेपटीविरहित होण्यासाठी झाली होती. आणि जर आपल्या प्राचीन वानर पूर्वजांना शेपटी नव्हती, तर होमिनिडना आणि पर्यायाने मानवांनादेखील नाही.
मानवाच्या पूर्वजांच्या शेपट्या का नाहीशा झाल्या?
मानवाच्या पूर्वजांच्या शेपटीचा ऱ्हास होण्याचे अनेक सिद्धांत आहेत. त्यात शेपटीच्या ऱ्हासाचा संबंध हालचाल आणि गतीशी असू शकतो, असे वॉर्ड यांना वाटते. मानव गोरिला, चिम्पांझी आणि गिबन या २० दशलक्ष वर्षे जुन्या असलेल्या वानरांच्या प्रजातींशी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात संबंधित असलो तरी, ते त्यांच्या आधुनिक समकक्षांपेक्षा ते खूप वेगळे दिसत असावेत. सुरुवातीच्या वानरांचे हात आणि पाय जवळपास समान लांबीचे होते, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ते चारही पायांवर चालत असत. शेपटी ही प्राण्याची हालचाल वेगवान असेल तर उपयुक्त ठरते. वॉर्ड यांच्या मते मायोसीन काळातील वानरांना फळझाडांच्या टोकावर असलेली चांगली फळे मिळवण्यासाठी सावकाश व काळजीपूर्वक चालावे लागत असे. अशा वेळी मंद गतीने वावरताना शेपूट असणे म्हणजे ऊर्जेचा अपव्यय असू शकला असता किंवा एखाद्या शिकारी प्राण्याने ओढून नेण्याची शक्यता असलेला धोका. त्यामुळे शेपटीचा त्यांना फायदा नव्हता. यामुळेच या शेपटीचा ऱ्हास झाला, असे संशोधकांचे मत आहे.
dharmesh.shinde@expressindia.com
